जिमी

गेल्या आठवड्यात Aseem Foundation च्या संस्कृती ताई चा message आला. गडबडीत एवढंच दिसलं की “जिमी” येणार आहे. Message नीट बघितला नव्हता, त्यामुळे कोण “जिमी” असा प्रश्न पडला. वेळ मिळाल्यावर लगेच message बघितला. तरी “जिमी” कोण ह्याचा उलगडा होईना. सोबत एक pdf file जोडली होती. ती उघडली आणि “जिमी” कोण ह्याचा लागलीच उलगडा ही झाला आणि पत्र वाचून आनंद ही झाला.

सन २०१७-१८ मध्ये मला Aseem foundation बद्दल पहिल्यांदा कळले. काश्मीर आणि लढाख प्रांतात Aseem foundation कार्यरत आहे. तेथील अशांत प्रांतात फिरून तिथल्या मुलांशी संवाद साधून Aseem foundation काही हुशार आणि होतकरू मुलांची निवड करतं आणि त्या मुलांना पुण्यात घेऊन त्यांना येथील शाळेत इतर मुलांबरोबर शिकण्याची संधी उपलब्ध करून देतं. ही मुलं इकडे आपल्या कुटुंबा पासून दूर राहतात, पण इकडे ते Aseem कुटुंबाचाच एक भाग असतात. त्यांची पूर्ण जबाबदारी व काळजी Aseem चे सदस्य घेतात. शनिवार – रविवारी मी आणि शास्त्रवहिनीच्या सौ. सुनीता खरे ह्यांनी मिळून त्या वर्षी आलेल्या काश्मिरी मुलांसाठी science based toys ची कार्यशाळा घेतली होती. पुढे काही दिवस संपर्क राहिला.

२०१८ मध्ये असाच Aseem मधून संपर्क साधला गेला. त्यांची एक अनोखी मागणी होती. लढाख मधून १२-१५ मुलं मुली student exchange program साठी पुण्यात येणार होते. त्यांच्या भरगच्च कार्यक्रमात Aseem ला एका रात्री साठी मुलांना पुण्यात कुटुंबा बरोबर  राहण्याचा अनुभव द्यायचा होता. त्या साठी Aseem ने त्यांच्या समर्थकांशी संपर्क साधला होता. आम्ही ताबडतोप होकार कळवून टाकला. ज्या रात्री मुलं येणार तेंव्हा Aseem ने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं ज्या मध्ये ह्याच लढाखी मुला मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. कार्यक्रमा नंतर सर्व यजमान कुटुंब आणि मुला मुलींच्या ओळखी करून दिल्या. आमच्या घरी दोन मुली राहायला येणार होत्या. त्यातली एक “जिमी” म्हणजे Jigmet Chunzin.

आता पत्र पूर्ण वाचलं आणि आमच्याकडच्या जिमी च्या वास्तव्या नंतर चा तिच्या प्रवासाची थोडक्यात ओळख झाली. थोडक्यात असलेली  माहिती वाचून सुद्धा जिमी बद्दल खूपच कौतुक वाटलं आणि तिला भेटण्याची उत्सुकता लागून राहिली.

काल प्रत्यक्ष तिच्या तोंडून तिचा पुढील प्रवास ऐकला. जिमी आमच्याकडे आली तेंव्हा ती आठवीत होती. Football वेडी! Student exchange program नंतर ती लढाख ला परतली. पण Aseem foundation मुळे मिळालेली संधी तिच्या मनात घर करून राहिली. दहावी च्या परीक्षे नंतर पुढील शिक्षण आणि Football साठी म्हणून ती Aseem च्या सहायाने पुण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर football चे प्रशिक्षण ही सुरू राहिले. अथक परिश्रम करत ती football मध्ये मजल दर मजल प्रगती करत होतीच. ह्या वर्षी तिने चक्क SAAF Futsal Championship मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि रौप्य पदक जिंकून आणले! जिमी लढाख मधील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी पहिली महिला खेळाडू ठरली! सोबत महाविद्यालयीन शिक्षण चालू आहेच. सध्या Fergusson महाविद्यालयात B.A Psychology च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.



काल तिच्या सत्कार समारंभाला गेलो असता तिला परत भेटण्याची संधी मिळाली. ह्या निमित्ताने तिच्या आई ला सुद्धा भेटलो.

आमच्याकडे आलेली दंगेखोर जिमी आता एकदम शांत, परिपक्व झाली आहे. अथर्व भैय्या कडून rubix cube चे धडे तेवढ्या थोडक्या वेळात तिने घेतले होते. पूर्ण वेळ उलटी टोपी घालून घरभर वावरत होती तेंव्हा.



जिमी च्या प्रवासातील आमचा इतकासा खारीचा वाटा. पण Aseem परिवाराने त्याची आठवण ठेऊन आम्हला जिमी च्या घवघवीत यशा बद्दल कळवलं आणि त्यांच्या आनंदात सहभागी ही करून घेतलं. Aseem चे ह्या साठी आभार. आणि जिमी म्हणजे Jigmet Chunzin ला तिच्या पुढच्या प्रवासासाठी अनेक उत्तम आशीर्वाद!

आह्माला आलेला हा छोटासा अनुभव आह्माला खूप काही देऊन, शिकवून गेला. गीतेतील ह्या श्लोकाची प्रचितीच आली जणू.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥

“तुम्हाला तुमचे विहित कर्तव्य (कर्म) करण्याचा अधिकार आहे. परंतु तुम्ही कधीही तुमच्या कृतीचे फळ (परिणाम) मिळवण्यास पात्र नाही.
तुमच्या कार्याच्या परिणामाचे कारण स्वतःला कधीच समजू नका. आणि तुमचे कर्तव्य (निष्क्रियता) न करण्याबद्दल कधीही संलग्न होऊ नका.”

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१४ फेब्रुवारी २०२६

One thought on “जिमी

Leave a comment