आढावा…वृक्ष संवर्धनाचा

२०१३ साली कोकणात जमीन घेतली आणि आमच्या आयुष्याच्या एका समांतर प्रवासाला सुरुवात झाली. कोकणातील जमीन ही जंगल म्हणून जपून ठेवायची हा निर्णय जमीन घेतल्यावर काही महिन्यांतच झाला. जंगलातील जैव विविधता वाढवायची ह्या कामात अनेक मंडळींचा हातभार लागला. पण कालांतराने असेही जाणवलं आहे की जंगलात आपण झाडे लावणे हा एक प्रकारचा द्राविडी प्राणायाम आहे. आधी पुण्यातून किंवा देवरुख मधून रोपे मुचरी पर्यंत घेऊन जायची, मग घरा पासून जंगलात ती वाहून न्यायची आणि मग तिकडे खड्डे खोदून ती जमिनीत लावायची. बरं, हा सर्व कार्यक्रम पावसाळ्याच्या सुरुवातीला होत असे. एक दीड महिन्यानंतर लावलेली रोपे बघायला जावे तर अमर्याद वाढलेल्या गवतात ती सर्व रोपे गडप होऊन जायची. उन्हाळा येईपर्यंत लावलेल्या झाडांपैकी जवळजवळ ८५% झाडे शिल्लक राहत नसत. आणि अजून एक गंमत अशी व्हायची की, जी झाडं लावली आहेत ती नक्की कोणती? हे आठवायचे नाही किंवा ओळखू यायचे नाही.

घर बांधल्यानंतर त्याच्या आजूबाजूला एक छोटीशी बाग करायची ठरली. त्यात आपल्या पुण्या-मुंबईकडे आढळतात तशी झाडे लावली होती – तगर, सोनचाफा, पारिजातक, कढीपत्ता, कण्हेर, कडुलिंब इत्यादी. आमच्या गैरहजेरीत त्यांपैकी फक्त कढीपत्ता, कण्हेर आणि पारिजातक टिकले.

एकीकडे आम्ही श्री. द. महाजन सरांची ‘देशी वृक्ष’ आणि ‘आपले वृक्ष’ ही पुस्तके वाचत होतो आणि त्यानिमित्ताने देशी वृक्षांची माहिती करून घेत होतो. मग विचार केला की आपण कोकणात कायमचे राहायला जायचं की नाही किंवा कधी जायचं याचा विचार इतक्यात करता येणार नाही. मग आपल्याला काळजी घेता येणार नाही अशी बाग अट्टाहासाने का तयार करायची? त्याऐवजी आपल्या घराच्या अंगणातच देशी वृक्ष लावले तर?

विचार आला आणि तो लगेच (म्हणजे २०१५ च्या पावसाळ्यात) कृतीत आणायला सुरुवात केली. २०१४-१५ मध्ये जंगल जमिनीव्यतिरिक्त जमिनीच्या अजून एका तुकड्याबाबत कळलं होतं. घरापासून दोन मिनिटे चालत जाऊन तो छोटा जमिनीचा तुकडा आहे. पसंती आणि खरेदी झाली. या जमिनीचे स्थानिक नाव “कुरण” आहे म्हणून आम्हीही त्या जागेला “कुरण” म्हणतो. तोपर्यंत मी भास्कर सावे यांच्या गुजरात मधील डेहरी गावी त्यांच्याच घरी त्यांनी आयोजित केलेली फळबाग लागवडीची आठवड्याभराची कार्यशाळा करून आले होते. त्यामुळे या जमिनीवरील आणि घराच्या आजूबाजूला झाडांचे नियोजन करायची जबाबदारी मी स्वखुषीने आणि आनंदाने घेतली. फक्त ही फळ बाग न करता देशी वृक्ष आणि फळबाग अशी एक वाटिका किंवा उपवन करायचं ठरवलं. आमच्या पुण्यातील बागेत तयार झालेली रोपे ही त्यामध्ये योजली. देशी वृक्ष पुण्यातून प्रांजल रोपवाटिकेमधून घेऊन आलो. देवरुखमधील रोपवाटिकेमधून खास कोकणी रोपं जशी आंबा, काजू, कोकम घेऊन आलो.

“कुरण” मी प्रत्यक्षात बघितलं नव्हतं. १२ गुंठे जमिनीचा चौरस तुकडा आहे असं शेखर म्हणाला होता. शेखर ला विचारले की रस्त्यालगत कुरणाची लांबी किती असेल १०० फूट की १२० फूट. त्याच्या उत्तरावर अवलंबून मी माझं नियोजन केलं. दर्शनी भागात (म्हणजे रस्त्यावरून दिसतील अशी) वेगवेगळी फूलझाडे. त्यात दोन टोकाला सीता अशोक ह्या वृक्षाची दोन झाडे, घरी रुजून आलेला बहावा, दोन रोहितक अशी फुलणारी, फळणारी झाडे दर्शनी भागात लावायची. नेमकी झाडे लावायच्या वेळी मी देवरुखमधील रोपवाटिकेमधून रोपे आणण्याच्या मोहिमेवर गेले होते. नियोजनाचा कागद शेखर जवळ दिला होता त्यामुळे काहीही गडबड होणार नाही याची निश्चिती होती. पण…गडबड झालीच. शेखर ने जी लांबी सांगितली होती वास्तविक ती जमिनीची रुंदी होती, त्यामुळे दर्शनी भागात लावायचे सीता अशोक भलतीकडेच लावले गेले. बाकीचे वृक्ष मात्र मग मी बदललेल्या आराखड्यानुसार जागेवर ठेवले आणि मग त्या वर्षीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

२०१५ मध्ये केलेले कुरणातील पहिले वृक्षारोपण

२०१५ मध्ये कुरणात वृक्षारोपण केलं. त्यानंतर काळजी घेऊनसुद्धा दर उन्हाळ्यात काही रोपे दगावायची. मग पुन्हा पावसाळ्यात रिकाम्या जागा भरून काढायच्या. हे काम आम्ही गेल्या वर्षापर्यंत म्हणजे २०२५ पर्यंत केलं. कुरणाच्या बरोबरीने घराच्या आजूबाजूला आणि घराच्या थोड्या अंतरावर असलेल्या होडमळयात देखील देशी वृक्ष लावले. २०१७ च्या पावसाळ्यात अंगणातील जुने मोठे पिंपळाचे झाड उन्मळून पडले. त्याची सावली गेली, पण आम्हला घरच्या आजुबाजूला अजून झाडे लावण्याची संधी उपलब्ध झाली. तिथे ही देशी वृक्ष लावले.

कुरणात २०१५ साली लावलेल्या मोहाचा वृक्ष. २०१७ ते २०२६ ह्या कालावधीत टिपलेला त्याच्या वाढीचा आलेख

कुरणात लावलेल्या झाडांच्या वाढीचा एक प्रातिनिधिक आढावा, गेली काही वर्षे आम्ही तिथे लावलेल्या मोहाच्या झाडाच्या संदर्भात घेत आहोत. या मोहाच्या झाडाच्या वाढीचा आलेख आणि कुरणाचे गेल्या पावसाळ्यात टिपलेले चलचित्र (व्हिडिओ) आपण येथे पाहू शकता.

इतकी देशी झाडे कशाला, त्याचा आपल्याला काय उपयोग? असे प्रश्न साहजिकच पडतात. आणि हे प्रश्न फक्त शहरातील लोकांना पडतात असे नाही, तर गावात आमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनाही पडतात. निसर्गाबद्दल विचार करताना देखील आपण अतिशय तात्कालिक आणि व्यावहारिक विचार करत असतो. उदाहरणार्थ, आपण झाड लावताना आधी तिथे असलेली इतर झाडे तोडून ती जागा “साफ” करून घेतो. मग आपल्याला हवे असलेले, माहिती असलेले आणि आपल्या आवडीचीच फुले व फळे देणारे झाड आपण लावतो. माणूस निसर्गाला स्वतःच्या नियमांनुसार वागायला लावण्याच्या सतत प्रयत्नात असतो. आपण निसर्गापासून किती दूर गेलो आहोत याचे हे द्योतक आहे.

या अट्टाहासामुळे आपण आपल्या परिसराची आणि पर्यायाने स्वतःची किती अपरिमित हानी करत असतो, याची आपल्याला जाणीव नसते. आपण नेहमी विचार करतो की ‘या झाडापासून मला काय मिळणार?’ पण झाड आपल्याला काय देऊ शकतं, याचा अनुभव मला माझ्या एका पर्यावरणप्रेमी मैत्रिणीच्या बोलण्यातून आला.

मध्यंतरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही समस्यांबद्दल बोलत होती. बोलता बोलता ती चटकन म्हणाली, “त्या घटनेने मी खूप उदास आणि निराश झाले होते. शेवटी मी माझ्या बागेत गेले आणि एक नवीन झाड लावलं. त्या झाडाचं लालनपालन करण्यात मी स्वतःला गुंतवून घेतलं आणि हळूहळू मी त्या नैराश्यातून बाहेर पडले.” तिचे हे शब्द ऐकल्यावर माझ्या मनात आलेला विचार मी चटकन बोलून गेले—जगातील कुठल्याही समस्येवर ‘झाड’ हे एक उत्तम Solution (उपाय) आहे!

आता वेळ आली आहे की आपण निसर्गाचे “मालक” बनण्याऐवजी त्याचे “सेवक” बनून स्थानिक आणि देशी झाडांचे रक्षण केले पाहिजे. कारण विचार करा, निसर्गाला आपल्या चौकटीत बसवण्याच्या या प्रयत्नात, उद्या जेव्हा निसर्ग स्वतःचे नियम बदलेल, तेव्हा होणाऱ्या हानीला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात आहे का?

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१४ जुलै २०२६

One thought on “आढावा…वृक्ष संवर्धनाचा

  1. खूपच छान आणि वेगळे काम तुम्ही करत आहात. ते असेच, अबाधित सुरू राहो ही इच्छा आणि प्रार्थना.

    कधी वेळ काढून कर्जत येथील आमच्या छोटेखानी, गर्द वनराईला भेट द्याल तर आनंद होईल आणि आठवणींना उजाळा देता येईल.

    आनंद

    Liked by 1 person

Leave a comment