मोह मोह के धागे (भाग १)….

Ollie, तीन महिने वय – पहिली कोकण वारी

आपल्याकडे एक कुत्रा असावा ही माझी अगदी लहानपणा पासूनची हौस. आमच्या अख्ख्या खानदानात कधी कोणी कुत्रा पाळला नव्हता आणि माणूसप्राण्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला घरात यायलाही मज्जाव होता. माझं मात्र माणसा पेक्षा इतर प्राण्यांवर जरा जास्तच प्रेम. माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये अधिक रमणारी. कोळी, बेडूक, सरडे, साप ही मंडळी सुद्धा मला अगदी गोड, गोंडस वाटतात. गरज पडली तर त्यांना हाताळणे, पकडणे हे ही सर्व मी करत असते.

आमच्या शाळे भोवतीच्या शेतांमध्ये बऱ्याच वेळा कुत्र्याची पिल्लं असत. मधल्या सुट्टीत त्यांना शोधून त्यांच्याशी खेळत बसायचे. एखादे पिल्लू फारच आवडे, अगदी काळजाला हात घाली आणि मी मागचा पुढचा विचार न करता ते पिल्लू घरी घेऊन येत असे. आई माझ्या सारखीच. पण तिला नक्की माहिती असायचं की बाबांना हे अजिबात चालणार नाही. आणि व्हायचं ही अगदी तसंच. घरात पिल्लू दिसलं की बाबा अजिबात न चिडता शांतपणे आदेश द्यायचे “उद्या हे पिल्लू जिथून आणले आहेस तिकडे परत सोडून ये”. कुठली ही चर्चा नाही की वाटाघाटी नाही. Direct फर्मान! त्यांच्या पुढे no appeal! दुसऱ्या दिवशी ते पिल्लू त्याच्या आई आणि भावंडांकडे परत नेऊन पोचवायचे.

आमची मुले जशी मोठी होऊ लागली तशी ते ही कुत्र्यासाठी हट्ट धरू लागली. पण मला एक गोष्ट पक्की माहिती होती की कुत्रा घरात आणला की त्याचे सर्व एखाद्या माणसा प्रमाणे करावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो, काळजी घ्यावी लागते. थोडक्यात घरी कुत्रा घेणे म्हणजे कुटुंबात एका नवीन व्यक्तीला सामावून घेण्यासारखे आहे. आणि मुलं कितीही म्हणाली की आम्ही करू त्याचे सर्व तरी आधी पाळलेले मासे आणि नंतर पाळलेली मांजरे ह्यांचा अनुभव बघता ती नक्कीच पोकळ आश्वासने आहेत हे आम्हाला कळले होते.  मांजरे अगदी स्वतंत्र आणि अलिप्त व्यक्तिमत्वे असतात असं ऐकलं होतं (ह्यातील स्वतंत्र अगदी बरोबर आहे, पण अलिप्त मात्र नसतात हे पुढे अनुभवातून शिकलो) म्हणून घरात जवळ जवळ दहा वर्षे दोन तीन मांजरे बाळगून आहोत. पण कुत्रा पाळण्याचा निर्णय मात्र लांबणीवर टाकत होतो. मुलांनी लग्गा लावला तर मी सांगायची की मी retire झाले की आपण कुत्रा आणू, म्हणजे मला त्याला व्यवस्थित वेळ देता येईल.

मी retire झाल्यावर अथर्व ने आठवण करून दिली “आई, कुत्रा पाळायचे काय झाले?”. म्हटलं करू विचार. वास्तविक कुत्रा कधी पाळायचा हे फक्त ठरायचे होते. आमच्या पूर्ण कुटुंबाचे कुत्रा कोणता पाळायचा ह्या बद्दल विचार अगदी पक्के होते. कुत्रा देशी हवा, वयाने लहान हवा आणि विकत घ्यायचा नाही. हीच तत्वे आम्ही मांजरी पाळल्या तेंव्हा ही होतीच. त्यामुळे कुत्रा बाजारातून नक्की विकत आणायचा नाही हे ठरलं होतं. देशी अश्यासाठी की ते आपल्या कडील वातावरणात चांगले तग धरतात, कारण ते इथलेच असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आपल्याला सहज हाताळता येतात. प्राणी पाळायचा तर त्याला आपल्या स्वतःच्या मुला प्रमाणे हाताळता येणं गरजेचं आहे.

दरम्यान मैत्रेयने एकाकडे चौकशी केली की अमुक एका breed चा कुत्रा हवा आहे, किती खर्च होईल? एखादी वस्तू खरेदी करताना जसा salesman आपले specifications विचारतो, तसा तो विक्रेता मैत्रेय ला प्रश्न विचारू लागला. आम्हला वाटलं होतं breed आणि कुत्रा की कुत्री सांगितलं की पुरेसं आहे. पण हे महाशय कुत्र्याची कातडी कुठल्या रंगाची हवी, शरीराच्या कुठल्या भागावर ठिपके किंवा पट्टे हवे, असे प्रश्न विचारू लागल्यावर मैत्रेय ने तिकडून पळ काढला. हे काहीतरी वेगळंच विश्व आहे ह्याची जाणीव झाली. Designer कपडे, घरं असं तो पर्यंत माहिती होतं, पण designer pets, ही संकल्पना खूपच क्रूर आणि भीतीदायक वाटली. ह्या अनुभवानंतर कुत्रा विकत घ्यायचा नाही हा आमचा निर्णय अजूनच पक्का झाला.

एक दिवस शेखर सकाळी फिरून आला आणि म्हणाला एक खूपच सुंदर पिल्लू रस्त्यावर दिसलं. बहुतेक गावठी असावं, काय करूया. एरवी घरात कुठले काम सांगितले की दिरंगाई करणारा अथर्व ताबडतोब उठलाच. बाप लेक ते पिल्लू आणायला गेले सुद्धा. दरम्यान मैत्रेय चा फोन आला. मी त्याला सांगितलं आज बहुतेक आपल्या घरी कुत्र्याचे पिल्लू येईल. मी घरी बराच वेळ वाट बघत बसले पण दोघांचा पत्ता नाही! शेवटी २-३ तासांनी परत आले ते हात हलवत. पिल्ला बद्दल विचारले, तर कळलं की ते Labrador चे पिल्लू आहे (म्हणजे देशी नाही) आणि ते विक्री साठी उपलब्ध होते. त्यामुळे बेत रद्द झाला होता. मग आता दोघे एकत्र बाहेर पडलेच होते तर अथर्व ची two wheeler exchange करायचे काम करून आले होते. कोणाचं काय तर कोणाचं काय! असो, माझी घोर निराशा झाली. एव्हाना तिकडे Sweden मध्ये आम्ही आज कुत्र्याचे पिल्लू आणणार ही बातमी सुरुची पर्यंत पोचली. पिल्लू नाही म्हटल्यावर तिचाही चेहरा पडला. Video call वर चर्चा सुरू झाली कुठून पिल्लू घ्यावे ह्याची. ही चर्चा चालू असताना मी सहज FB वर एक adoptions चा group join केला. त्यावरती अनेक पिल्लांचे फोटो दिसू लागले. पण सर्व परदेशी कुत्री. त्यात एक फोटो दिसला आणि आवडला. अडीच महीने वयाची Ollie ह्या कुत्रीचा. Video call वरील चर्चेचे एव्हाना वादात रूपांतर झाले होते. ते आटोपते घेत मी त्या जाहिरातीतील नंबर वर फोन केला आणि पिल्लू आहे का आणि कुठून घेऊन यायचे आहे ह्याची चौकशी केली. शेखर आणि अथर्व ला फोटो दाखवला. कुत्री घ्यावी का ह्यावर माफक चर्चा झाली. फोटोतील सुंदरी दोघांनाही आवडली आणि मी आणि अथर्व Ollie ला घेऊन यायला निघालो सुद्धा! तर ५ जून २०२३ ह्या दिवशी Ollie नावाच्या वादळाने आमच्या घरी प्रवेश केला!!

Ollie ला घरी घेऊन येताना

Ollie ला घरी घेऊन आल्यावर मला अनेक प्रश्न पडले. ही adoption साठी होती. म्हणजे आधी कोणाच्या तरी घरी होती (कारण तिचे नाव ठेवलेले होते आणि ती त्या नावाने हाक मारली की प्रतिसाद ही देत होती). त्या घरचे वातावरण कसे असेल. कुठली भाषा तिच्याशी बोलत असतील. आपण मराठीत तिच्याशी बोलणार, ते तिला समजेल का? लहानपणी काही काळासाठी कुत्रा सांभाळला होता. पण तो पूर्ण वाढ झालेला होता. किंवा मित्र मैत्रिणींकडे असलेले कुत्रे सुद्धा हाताळले होते. पण पिल्लू असं पहिल्यांदाच हाताळणार होतो. काय खायला घालायचे, किती आणि किती वेळा खायला द्यायचे, शी शु करायच्या काय सवयी असतील ह्याची काहीच कल्पना नव्हती. Shelter मधून तिला आणले तेंव्हा तिची काही injections झाली होती. पुढची injections द्यायला डॉक्टरकडे नेले तेंव्हा ह्यापैकी तीन महत्त्वाचे प्रश्न त्यांना विचारले – तिला काय आणि किती खायला द्यायचे, शी शू घरा बाहेर करायला कसे शिकवायचे आणि अजून उपयुक्त काय शिकवायचे (बरीच कुत्री बरेच काही करून दाखवतात, त्यापैकी काही शिकवावे का आणि कसे).

त्यांनी pedigree खायला द्या असे सांगितले. पण आमच्या देशी मांजरांच्या अनुभवावरून आम्ही तो सल्ला पुर्णतः अंमलात आणला नाही. तिला घरी केलेलं अन्न जसं भात, भाकरी आणि chicken किंवा मासा द्यायला सुरुवात केली. त्याबरोबरीने तिला जी भाजी आवडेल म्हणजे मागून घेईल ती द्यायला लागलो जसे गाजर, मटार, फरसबी, कोथिंबिरीच्या काड्या इत्यादी. Pedigree अडीनडी ला जवळ ठेवतो. हळूहळू आमच्या असं लक्षात आलं की तिला pedigree पेक्षा घरी केलेले पदार्थ जास्त आवडतात. जसं कधी दूध भात, कधी मीठ आणि तेल न घालता केलेलं अंड्याचे आम्लेट, कधी गरम भाकरी आणि तूप, कधी थालीपीठ. सर्वात आवडतं ते chicken. कुत्र्यांना गोड देऊ नये असे म्हणतात पण ही पठ्ठी पोळीचा लाडू, शंकरपाळी, ओल्या नारळाच्या करंज्या, बेसनाचे लाडू, राजगिरा वडी ह्या वर ताव मारते. हे पदार्थ केले तर तिच्यापासून लपवून खावे लागतात.

गेल्यावर्षी दिवाळीत शंकरपाळ्यांवर डोळा ठेवून असलेली Ollie

तिला काय शिकवावे ह्याला डॉक्टरांनी अगदी practical उत्तर दिले. तिला “नाही” शिकवा. काय केलं तर चालणार नाही हे तिला कळणे सगळ्यात महत्वाचे. आम्हाला हा सल्ला अगदीच पटला. आपण आपल्या मनोरंजना साठी त्या मुक्या प्राण्याला नाही नाही ते करायला लावतो. कुत्र्याला कुत्रा राहू द्यावा, त्याला माणसाला जमतात त्या गोष्टी का करायला सांगायच्या? आणि कुत्रा आपल्याबरोबर राहणार आहे तेंव्हा आपल्या घरची शीस्त त्याला कळली म्हणजे झालं.

अनोळखी जागी म्हणजे आमच्या घरी आल्या आल्या Ollie बरीच गोंधळून गेली होती. आधी खालच्या बागेत फिरवून आणलं. ते काही तिला आवडले नाही. घरी शिरल्यावर मात्र आजीच्या कुशीत शिरून बसली आणि आजीच्या शेजारी आपली जागा निश्चित केली. आज तागायत ती आसपास असताना त्या जागेवर कोणा दुसऱ्याला बसू देत नाही ती. कुत्री आणि मांजरे एकत्र गुण्यागोविंदाने राहतात असे दाखले देणारे अनेक video social media वर बघायला मिळतात. पण प्रत्येक्षात हे प्रत्येक बाबतीत शक्य नाही हे आम्हाला कळले. आमच्या मांजरी बऱ्यापैकी वयस्कर होत्या. Ollie आल्या आल्या तिने त्यांच्याशी मैत्री करायचा प्रयत्न केला. पण आमच्या मांजरांना ते काही मंजूर नव्हते. नाईलाजाने रात्रीच्या वेळी Ollie ची रवानगी वरच्या मजल्यावर झाली. तिचे वय वाढले तसं तिलाही मांजरे नकोशी झाली. परिणामी आता आमची मांजर रात्री Ollie वरच्या मजल्यावर गेली की मग घरात येते . सकाळी मांजरीचे खाणे पिणे आटोपले आणि ती घरा बाहेर गेली की मगच Ollie ला खाली घेऊन येतो.

घरी आल्या आल्या आजीच्या कुशीत शिरलेली Ollie

खात्यापित्या घरची पूर्ण वाढ झालेली मांजरे साधरण चार ते पाच किलो वजनाची असतात. Ollie आमच्या घरी आली तेंव्हा तिचे वजन सहा किलो होते. इथूनच पुढे मांजराची पिल्ले आणि कुत्र्याचे पिल्लू ह्यात फरक असणार हे  लक्षात यायला लागलं होतं. पण हळूहळू समजत गेलं की पाय फुटलेलं माणसाचं पोर आणि हे कुत्र्याचे पोर ह्यात काहीही फरक नाही. माणसाच्या लहान मुलावर जितके डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते तितकेच कुत्र्याच्या पिल्लावर लक्ष ठेवावे लागते. Ollie घरी आली आणि आमच्या घरात कुठल्या गोष्टी नेमक्या कुठे आहेत आणि त्यांची जागा कशी चुकीची आहे हे पदो पदी कळत गेलं. एखादी गोष्ट वेळच्यावेळी जागेवर गेली नाही तर त्याचा नक्की निकाल लागणारच ह्याची अनुभूती Ollie आल्या आल्या काही दिवसातच मिळाली. आदल्या रात्री अथर्व आणि काही मित्र वरच्या खोलीत कॅरम खेळत बसले होते. रात्री कॅरम आवरून ठेवला. पण अर्धा किलो बोरीक पावडर ने भरलेली plastic ची बरणी जमिनीवर राहिली. सकाळी नाश्ता करते वेळी Ollie गायब असल्याचे दिसले म्हणून अथर्व तिला शोधायला वर गेला. तोवर तिने बोरीक पावडरची बरणी चावून फोडली आणि बाहेर आलेल्या पावडर मध्ये लोळून दिवाणखान्याचा एक कोपरा पावडरीने पूर्ण माखून टाकला होता. बोरीक पावडर नाका तोंडात पोटात गेली असणारच. त्यामुळे हिला काही होईल ह्याची चिंता आम्हाला वाटू लागली. ह्या आधी अश्या अनेक गोष्टी तिने केल्या होत्या, जसं चिकन चे हाड न चावता गिळून टाकणे, चष्मा पुसायचे कापड चावून चावून गिळून टाकणे, बारीक बारीक खडे चघळून गिळून टाकणे, इत्यादी.. आणि प्रत्येक वेळी आम्ही डॉक्टरांना फोन करून सल्ला घेत असू. Wait and Watch हा त्यांचा सल्ला अमलात आणायची आता आम्हाला सवय झाली आहे.

बोरीक पावडर ने माखलेला दिवाणखाना

शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की तिला शी आणि शु घराबाहेर करायची सवय कशी लावायची. डॉक्टर म्हणाले की वेळा ठरवून तिला बाहेर फिरवून आणा. शी आणि शु होई पर्यंत घरी परत आणायचे नाही. अशी हळूहळू सवय लागेल. त्यापुढील मोठा प्रश्न असा की शी शु करायला कुठे घेऊन जायचे. घरच्या बागेत जाणे तिला नामंजूर होते. आणि बाहेर कुठेही न्यायचे तर लोकांना बिलकुल खपत नाही (अगदी तिने केलेली घाण आम्ही उचलली तरी). मग त्यावर उपाय म्हणजे तिला टेकडीवर घेऊन जाऊ लागलो. दिवसातून दोन वेळा. शेखर ने सुचवलेला उपाय, बाहेरचे लोखंडी gate लावून घ्यायचे आणि घराचा मुख्य दरवाजा नेहमी असतो तसा उघडा ठेवायचा. पण तिच्या सुरक्षिततेची चिंता मला भेडसावत होती. रस्त्यावर पळून गेली आणि कुठल्या गाडीच्या पुढ्यात आली तर तिच्यासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ती जखमी होऊ शकते, अपंग होऊ शकते किंवा जीवावर ही बेतू शकते. बरेच दिवस चर्चा झाली आणि शेवटी शेखर ने सुचवलेला उपाय आमलात आणला. पण त्या आधी बाहेरच्या लोखंडी दाराला खालच्या बाजूला पत्रे बसवून घेतले जेणे करून ती खालच्या design च्या भागातून बाहेर सटकणार नाही. ह्या उपायाने माझ्या डोक्याला बरीच शांतता मिळाली. पण कार्टी त्यातूनही दोन तीन वेळा आमचा डोळा चुकवून निसटलीच. पळून जाऊन तिला रस्त्यावरील कुत्र्यांबरोबर खेळायचे असायचे. पळून जाण्यातील धोके तिच्या ध्यानीमनी ही नव्हते.

टेकडीवर फिरायला घेऊन जायचा एक महत्वाचा फायदा म्हणजे तिला मोकळं आणि भरपूर पळता येते. रस्त्यावरून कुत्र्याला बांधून फरफटत नेणे ह्यात ना कुत्र्याला आनंद ना त्या माणसाला. शेखर तिला सकाळी फिरायला घेऊन जायला लागला आणि तिला तिकडे मोकळे सोडू लागला. एकदा सकाळी ती हरवली, काही केल्या सापडेना. अथर्व ला बोलावून घेतले टेकडीवर तिला शोधायला. तो पोचेपर्यंत शेखरला ती सापडली. कुठल्या तरी कुत्र्यांच्या मागे फिरत गेली होती. बरं, ह्या सगळ्यात आपण हरवलो आहोत ह्याचा तिला पत्ताच नव्हता. संध्याकाळी मी तिला टेकडीवर नेऊ लागले पण ती हरवेल ह्या चिंतेने तिला बांधूनच चालत न्यायची. Ollie पाच महिन्यांची असताना एकदा संध्याकाळचे आम्ही दोघे बरोबर होतो तेंव्हा एका व्यक्तीने सांगितलं की तुमच्याकडे परत यायचे आहे ह्याची गरज तिला वाटली पाहिजे, तुम्हाला नाही. तिला मोकळे सोडा. मग मी धीर करून तिला मोकळी सोडू लागले. आधी पुढे शेखर मध्ये Ollie आणि मागे मी अशी आमची वरात निघे. नंतर Ollie सरळ मार्गे न जाता उजवी डावी कडील झाडोऱ्यात गडप होत असे. आम्हाला दिसत नसली तरी तिला आम्ही दिसत असू. आम्ही तिला हाका मारत पुढे निघून गेलो की ती बाणाच्या वेगाने आणि हरणाच्या चपळाईने आमच्यापर्यंत धावत येई. असं मोकळं सोडणे ह्याचा थेट फायदा असा की Ollie तिला हवं तसं मनसोक्त भटकते आणि दमली की आमच्यापाशी परत येते. तिला परत घेऊन यायला हाणामारी करावी लागत नाही. भरपूर खेळल्यामुळे भरपूर दमते आणि घरी येऊन गुडूप झोपून टाकते. कधी काही कारणाने टेकडी चुकली तर मात्र आमचा जीव नकोसा करते.

कुत्र्याला फिरायला नेणे हे शहरात खूपच कठीण होऊन बसले आहे. जिथे तिथे माणसेच माणसे. टेकडीवर Ollie कुणाच्या अध्यात मध्यात फिरत नसली तरी अनेक लोक उकरून भांडण काढतात. आम्हाला मूर्ख, बावळट आणि कधी काही अर्वाच्य्या शिव्या ही देतात. “तुम्हाला कुत्रा चावू दे म्हणजे कळेल” असे शाप ही देतात. कुत्रा समोर आला की हा चावतो का हाच प्रश्न अधिक प्रमाणात विचारला जातो. Ollie ही अतिशय प्रेमळ कुत्री आहे. विनाकारण कोणावर धावून जाणे किंवा चावणे हे तिच्या स्वभावातच नाही. पण ते ह्या लोकांना कोण समजावत बसणार. असे लोक भेटले की आम्ही आमचा रस्ता बदलतो आणि दुसरीकडे चालू लागतो.

Ollie च्या गळ्यातील घुंगरू शी खेळताना दहा महिन्यांची मीरा

आमची नात मीरा जेंव्हा घरी आली त्यावेळी ती दहा महीने वयाची होती आणि Ollie सात महिने. ती आल्या आल्या दोघींची गट्टी जमली होती. लहान मूल आहे हे Ollie ला समजवावे लागलेच नाही. स्वतः वयाने मीरा पेक्षा लहान असून सुद्धा मीरा ची ताई झाली. दोघी घरात असल्या की तिच्या बरोबरीने असायची. मीराला खोलीत एकटीला झोपवलं असेल तर तिला सोबत करायची. प्रेमाने तिला चाटून काढायची.

Ollie मीराला सोबत करायची

कुत्रा पाळायचा जेंव्हा विचार केला जातो तेंव्हा कुत्री लोकांना नको असते. ही गंमतच आहे. म्हणजे “So cute” म्हणायला पिल्लू तर हवं असतं, पण त्या पिल्लाला जन्म देणारी मात्र नको असते. Ollie ला दत्तक घेताना हा विचार फक्त क्षणभर मनात आला होता. ती वयात येईल तेंव्हाचे तेंव्हा बघू असा आम्ही विचार केला होता. डॉक्टर म्हणाले की ती सहा महीने वयाची झाली की तिचे operation करून घेऊ म्हणजे पुढचे त्रास वाचतील. माझा मात्र ठाम विचार होता की तिला एकदा तरी पिल्ले होऊ द्यावी. त्यावर डॉक्टरांचा सल्ला असा होता कि तिला तिच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी पिल्ले झाली तर उत्तम.

Ollie वयात म्हणजे heat मध्ये आली तो काळ सर्वात अवघड होता. त्याकाळात ती मुळीच कोणाचे ऐकत नसे. जरा दाराला फट दिसली की रस्त्यावर पळून जायच्या प्रयत्नात असे. टेकडीवर फिरायला नेल्यावर माझ्या जीवाची घालमेल होत असे. माझ्या अखत्यारीत तरी तिला मी नजरेआड होऊ दिले नव्हते. Ollie साधारण नऊ महिने वयाची असताना एकदा आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तिचे त्याकाळातले एकंदरीत वागणे बघून माझी बहीण म्हणाली की “Ollie मला pregnant वाटते आहे”. मी म्हणाले “असेल. असली तरी काय करणार? बघू तेंव्हाचे तेंव्हा”. हा संवाद ऐकून अथर्व आणि शेखर उठले आणि तिला डॉक्टर कडे घेऊन गेले. साधारण तासाभराने शेखर ने फोन करून सांगितले की “अजून काहीच दिवसात अंदाजे सहा ते सात पिल्ले होणार आहेत Ollie ला, त्यामुळे कंबर कसून तयारी ला लागा….!”

क्रमशः

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१८-मे-२०२४

One thought on “मोह मोह के धागे (भाग १)….

Leave a reply to Prasad Dixit Cancel reply