आम्ही शहरी मंडळी. शहरात कचरा व्यवस्थापनेची एक पद्धत आहे. रोज आपण घराची स्वच्छता करतो आणि केराची टोपली घराबाहेर ठेवून देतो. केराची टोपली घंटा गाडी किंवा महानगर पालिकेची गाडी येऊन घेऊन जाते. ती केराची टोपली रोजच्या रोज रिकामी झाली की आम्ही “आता आपलं घर अगदी शंभर टक्के स्वच्छ झाले आहे” ह्या भावनेने निश्चिन्त होतो! गेल्या काही वर्षात मात्र माझा हा निश्चिन्तपणा पार हरवून गेला आहे.
साल २०१४, स्थळ मुचरी गाव, पुणे शहरापासून सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर. मुचरीला घराचे बांधकाम चालू होते. त्या काळात आम्ही देवरूखला hotel मध्ये राहायचो. अगदी पर्यटकांसारखे नाही तर जणू hotel मधील खोली आपलीच आहे ह्या भावनेने रहात होतो. त्यामुळे कचरा आपण जितक्या काळजीपूर्वक घरी केराच्या टोपलीत टाकतो तेवढी काळजी आम्ही घेत असूच. पण त्यापेक्षा जास्त कचऱ्याचा विचार केला नव्हता. देवरूख अगदी गाव म्हणता येईल असे नाही, पण पुरतं शहर ही झालेलं नाही. त्यामुळे शहरात असलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या सोई आम्ही गृहीत धरल्या होत्या. तोपर्यंत Ecological Society च्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली होती आणि “कचरा” ह्या संकल्पनेची नव्याने ओळख होत होती.
पण गावाकडील कचरा व्यवस्थापना किंवा त्या व्यवस्थापनेचा पूर्णतः आभाव ह्याची जाणीव आम्ही आमच्या नवीन घराची घरभरणी केली तेंव्हा प्रकर्षाने जाणवली. घरभरणी गावच्या पद्धतीने करून नंतर मुहूर्त बघून वास्तूशांत सर्व नातलगांच्या उपस्थितीत करायचे ठरले. घरभरणी साठी येणाऱ्या गावकरी मंडळींना चहा साठी पेले शोधताना असं लक्षात आलं की कागदी पेले मिळत नाहीत. मिळतात ते फक्त plastic चे पेले. कारण २५ पैशाला एक प्लॅस्टिकचा पेला मिळतो आणि कागदाचा मात्र १ रुपयाला एक. मग घेणार कोण कागदी पेले? म्हणून दुकानदार मंडळी कागदी पेले ठेवतच नाही मुळी. साधारण शंभर-सवाशे मंडळी येणार होती आणि चहा द्यावा लागणारच होता. मग आम्ही त्यावर घरा बाहेर कचऱ्याची टोपली ठेवायची युक्ती काढली आणि निश्चिंत झालो. पण पाहुण्यांची पहिली फळी येऊन गेली आणि आम्हाला जबरदस्त धक्का बसला. सर्व मंडळींनी चाहचे plastic चे पेले अंगणात भिरकावून दिले होते. कचऱ्याची टोपली रिकामीच!
आम्हा उभयतांचा हे बघून संताप झाला. पण शांतपणे सर्व plastic चा कचरा उचलून टोपलीत टाकला आणि पुढच्या फळीला चहा देताना सांगितलं की चहा पिऊन झाल्यावर पेला टोपलीतच टाका. मनातल्या मनात गावाकडील लोकांचा उद्धार करून झालाच की किती बेशिस्त लोकं आहेत ही, किती घाणेरडी राहतात इत्यादी. आम्ही मात्र निगुतीने सर्व plastic चा कचरा गोळा करून पुण्याला परत घेऊन आलो…
२०१५ च्या पावसाळ्यात आम्ही मुचरीला घराजवळ वृक्षारोपण केले. तो आमचा पहिलाच अनुभव. वृक्षारोपणाचे नियोजन, म्हणजे त्या जमिनीच्या तुकड्यावर कुठली आणि किती रोपं लावायची हे ठरवून, त्याप्रमाणे रोपं बरोबर घेऊन गेलो होतो. रोपं लावायची जय्यत तयारी केलेली होती. खड्डे खणायला दोन गडी आणि रोपं खड्ड्यांमधून लावायला दोन बाया आणि आम्ही सगळे. नियोजित आराखड्या प्रमाणे कुठे खड्डे करायचे तिकडे मी ती ती रोपं खूण म्हणून ठेवत पुढे पुढे चालले होते. मागून गडी खड्डे खणून ठेवत होते आणि त्यांच्या मागून बाया आणि बाकी घरातील मंडळी plastic पिशवीतून रोपं अलगद काढून त्या त्या खड्ड्यात लावत होते. साधारण दीडशे रोपं लावण्यासाठी ची ही “assembly line” होती असं म्हटलं तरी चालेल. कारण घराजवळ रोपं लावून मग अजून जवळ जवळ साडे तीनशे रोपं त्याच दिवशी जंगलात लावायची होती.
कचरा “अ”व्यवस्थापनेच्या अगदी ताज्या अनुभवामुळे, सर्व रोपं त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवल्यावर मी माझं ठरवलेलं काम करत पुन्हा सर्व लोकांच्यात फिरू लागले. ते काम म्हणजे रोपे धारण केलेल्या plastic च्या पिशव्या गोळा करून एका पोत्यात भरून ठेवणे. घरातील सर्व मंडळी आपापली रोपे लावून झाली की न सांगता हे काम करत होतेच. आमची ही कृती बघून शेवटी एका बाईला राहवलं नाही आणि तिने मला विचारलंच. “मॅडम (माझ्या haircut मुळे गावात चिकटलेले हे बिरूद), तुम्ही ह्या पिशव्या का गोळा करताय?”. मी म्हणाले, “इकडे कचरा उचलून न्यायला काहीच व्यवस्था नाहीये, म्हणून हा plastic चा कचरा मी आमच्या बरोबर पुण्याला घेऊन जाणार आहे. पुण्यात नाहीतरी plastic चा खूप कचरा आहेच, त्यात अजून ह्या पिशव्यांची भर पडली तर विषेश फरक नाही पडणार”. हे ऐकून बाकी बायका आणि गडी हातातलं काम सोडून माझ्याकडे आ वासून बघत बसले. माझं स्पष्टीकरण ऐकून पुढचा प्रश्न आलाच. “पण तुम्ही हे का करताय?”. मी अधिक खुलासा केला, “ह्या पिशव्या उचलल्या नाहीत तर इकडे कचरा नाही का होणार”. त्यावर ती म्हणाली “अहो मॅडम, कसा होईल कचरा. जातील की वाऱ्या बरोबर उडून”. आता तोंडात बोटं घालायची पाळी माझी होती.
ह्या प्रसंगानंतर माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाली. गावातील सर्व मंडळी हे कचरा घराबाहेर फेकून देतात. त्यांना काहीच कसं वाटत नाही? आणि वाऱ्याबरोबर, पाण्याबरोबर कचरा उडून किंवा वाहून गेला तरी तो आपल्या अंगणातून दुसऱ्याच्या अंगणात जाऊन पडणार, कसं समजत नाही ह्यांना?
विचार सुरू राहिले आणि मी पार २५-३० वर्षापूर्वीच्या गावात जाऊन पोचले. त्याकाळात गावाकडील घरं शेणा मातीची. तांब्या पितळी ची भांडी वापरणारी माणसं. घरात फक्त गरजेपुरतं साहित्य अन्यथा घर रिकामे. घराच्या सजावटीसाठी कुठल्याही वस्तूंचा भरणा नाही की संग्रह नाही (मुचरी मध्ये अजून ही अशी काही घरं आहेत हे ही आठवून गेलं). ह्या अश्या घरांमधील कचऱ्याचे स्वरूप काय असेल ह्याचा विचार केला. साधारणतः अश्या घरांमधून निघणारा कचरा म्हणजे सारवलेल्या जमिनीचे झाडताना निघणारे शेणाचे कूट. ते घरात नकोसे असले तरी घराबाहेर टाकले तर अंगणातील झाडांना खत म्हणून उपयोगात येत. घरात उरलेलं अन्न गुरांना, कोंबड्यांना दिले जायचे. कधी घरी पूजा किंवा सण असेल तर जेवायला केळीची पाने किंवा पळसाच्या पत्रावळ्या, प्रसादाला वडाची पाने असत. ती सुद्धा वापरून मग अंगणात किंवा परसात टाकली तर त्याचे रूपांतर कालांतराने खतातच होणार. चुलीमधील राखेने भांडी घासली जायची, ते पाणी केळी आणि आळूला जायचं. म्हणजे आमच्या सारखे नव-पर्यावरणवादी मंडळी जे शून्य कचऱ्याचे “स्वप्न” उराशी बाळगून असतो, ते ही मंडळी हजारो वर्ष जगतच होती की!!
त्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात plastic नावाची “जादुई” वस्तू आली. गावाकडे विकासाचे वारे वाहण्याआधी विकासा बरोबर येणाऱ्या इतर गोष्टीच आधी पोचल्या आहेत. प्लास्टिकच्या वस्तू स्वस्त, टिकाऊ आणि सोयीच्या म्हणून आठवडी बाजारातून गावाकडे पोचल्या मात्र आणि हळू हळू ह्या प्लास्टिक ने गावकऱ्यांची आयुष्य व्यापून टाकली. प्लास्टिक च्या पिशव्या, शाळे बाहेर मिळणारा खाऊ, शाम्पू, साबण ह्यांची वेष्टणे, असा प्लॅस्टिकचा संचार सर्वदूर होऊ लागला. पण उपयोग संपला की प्लास्टिक चे करायचे काय हे मात्र कोणालाच ठाऊक नाही. त्यामुळे जे पूर्वापार चालत आले आहे तेच ही मंडळी ह्या नवीन कचऱ्याच्या बाबतीत करत राहिले. शहरा कडे कचरा व्यवस्थापन करायला कोणतीतरी यंत्रणा कार्यरत आहे. पण हे मात्र गावाकडे नाही.
अजून विचाराअंती, गावाकडील ह्या परिस्थितीला आपण शहरी मंडळी सुद्धा काही प्रमाणात कारणीभूत आहोत असं मला वाटतं. दोष द्यायला आपल्या दिशेने बोटं वळली की साहजिकच आपण निर्दोष असल्याचा पवित्रा घेणार. मी मात्र त्रयस्थपणे ह्याकडे बघून विचार करते तेंव्हा बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. शहरी माणसाला पर्यटनाची हौस असते. आता त्या हौसेचे रूपांतर गरजेत झालं आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पर्यटन म्हणजे एखादा नवीन प्रदेश बघणे, तिथली संस्कृती अनुभवणे. म्हणजेच आपण जे रोजचे आयुष्य जगतो त्यापेक्षा काही निराळं, वेगळं जगण्याचा अनुभव घेणे. पण आपल्यापैकी किती लोकांनां असा निराळा अनुभव घ्यायचा असतो अथवा तो रूचतो? आता बघा ना, मुलांना गिर्यारोहण करायला पाठवायचे तर पालकांना तिकडे शुद्ध पाणी (म्हणजे Bisleri) मिळेल का ही भ्रांत असते. तिकडे बरोबर खाण्यासाठी आपल्या पाल्यांना आवडतात ती पॅकबंद खाऊची पाकिटे दिलेली असतातच. हा कचरा (bisleri बाटल्यांचा आणि खाऊच्या पिशव्यांचा) ही लेकरं परत आणतात का हो?
गावाकडचे life experience करायला म्हणून जेंव्हा कुटुंब बाहेर पडतं तेंव्हा त्यांची शेणाने सारवलेल्या जमिनीवर झोपायची तयारी असते का? तिकडे गेल्यावर स्थानिक विहिरीचे पाणी प्यायची तयारी असते का? तिथे पिकणाऱ्या भाज्या तिथल्या पद्धतीने रांधलेल्या असतील तर त्यांचा आस्वाद घ्यायची तयारी असते का, की तिथे जाऊन सुद्धा पंजाबी, Italian, Chinese ह्याच पदर्थांची मागणी असते? साधारणतः travel company बरोबर पर्यटनाला गेलेल्या लोकांचे प्रवास अनुभव ऐकले तर तिकडे अगदी आपल्या पद्धतीचे जेवण सकाळ, दुपार, संध्याकाळ कसं मिळालं, ह्याचेच कौतुक जास्त ऐकायला मिळत. समुद्रकिनारी किंवा धबधब्याच्या , ओढ्याच्या कडेला बसून बिअर च्या बाटल्या रिचवून, त्या तिथेच सोडून परतणारे शहरी पर्यटक ह्यांच्या बद्दल तर बोलण्याची सोयच नाही!
आमच्या लहानपणी दूरदर्शन वर Films Division च्या काही कार्टून फिल्म लावत असत. सर्व कार्टून फिल्म्स काही ना काही सामाजिक प्रबोधन करणाऱ्या असत. वरील वर्णन केलेल्या मुचरी मधील प्रसंगाने मला अश्याच एका कार्टून फिल्म ची आठवण करून दिली. ती कचरा ह्या विषयावर होती. रस्त्याने एक मनुष्य चालतो आहे. अचानक एका घरातून त्याच्या अंगावर कचऱ्याचा ढीग येऊन पडतो. त्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे जात राहतो तर पुढे प्रत्येक घरातून कचरा त्याच्या अंगावर पडत राहतो. शेवटी तो भयंकर चिडतो आणि सर्व कचऱ्याचे ढीग तो लाथेने चकचकीत झालेल्या घरांमध्ये परत पोचवतो. शेवटी त्याच्या आणि त्या शहरातील सर्व मंडळीच्या सुदैवाने कचरा गोळा करणारी गाडी येते आणि सर्व कचरा उचलून घेऊन जाते. थोडक्यात ह्या फिल्म चा संदेश असा की कचरा व्यवस्थित गोळा करून टोपलीत टाका आणि वेळच्या वेळी कचरा उचलणाऱ्या गाडी कडे सोपवा आणि निश्चिंत व्हा! पण खरंच आपण निश्चिंत होऊ शकतो का?
साल २०२२, स्थळ पुणे शहर, एका प्रथितयश महाविद्यालया बाहेर. दिवस रात्र त्या महाविद्यालयातील लेकरं महाविद्यालया बाहेरील विविध उपाहार गृहांमधून विविध खाद्यपदार्थ खात उभी असतात. उपाहारगृहांच्या बाहेर भल्यामोठ्या कचऱ्याच्या टोपल्या ओसंडून वाहत राहतात. Morning walk ला निघालेली मंडळी कचऱ्याचे ढीग चुकवत रस्त्याने चालत राहतात, आणि उपाहारगृहांपासून काही अंतरावर असलेल्या आमच्या बागेत वाऱ्याबरोबर उडत आलेली गुटख्याची रिकामी पाकिटे, chocolate ची wrappers, वेफर्स ची रिकामी पाकिटे मला सापडतील तशी मी उचलून कचऱ्याच्या टोपलीत टाकत राहते. खिन्नपणे विचार करत राहते की गावाकडील आडाणी लोकांना कचऱ्या बद्दल शिकवू की ह्या उच्चशिक्षित “आडाणी” लेकरांना….
सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
०३-नोव्हेंबर-२०२२
खूप योग्य रितीने मनातली खळबळ आणि अस्वस्थता उतरवली आहेस. शब्दागणिक जाणवते.
तुझं म्हणणं बरोबरच आहे,
शहरी म्हणजे सुशिक्षित असा उगीचच समज असतो, पण जास्त धक्के तिथेच बसतात, कारण तिथे अपेक्षेचा नुसता भंगच नाही तर चक्काचूर होतो. आणि आपली चिडचिड होते. गावाकडचे तर काय, बोलून चालून या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञच . त्यांना काय बोलणार !
LikeLiked by 1 person
अगदी बरोबर आहे!
LikeLike
कोणा कोणाला शिकवणार? आणि काय शिकवणार? विचार करायला शिकवता येईल का? फक्त आपल्यापुरते नाही, तर आपल्या कृती, विचाराने इतरांवर, निसर्गावर काय परिणाम होणार किंवा होत आहे? ते चांगलं आहे का, आवश्यक आहे का? छान विचार प्रवर्तक लेख लिहिला आहेस, शिवांगी.
LikeLike
धन्यवाद!
LikeLike
खरं आहे ग
प्लास्टिक चा वापर इतक्या भयानक प्रदूषणात रूपांतरित होणार आहे हे अजूनही उच्च शिक्षित म्हणवणार्यांनाही कळत नाही ही वस्तुस्थिती आहे
तुझ्या लेखाने तरी काही जणांचे तरी डोळे उघडतील अशी आशा
LikeLike
खूप सुंदर लेख लिहिला आहेत तुम्ही.
आमचंही second home वाड्याजवळच्या एका गावात आहे. तिथे जाणं होतं तेव्हा प्रत्येकवेळी असेच विचार कायम मनात येत राहतात. आम्हीही तिकडून येताना नेहमीच प्लॅस्टिक आणि इतर अविघटनशील कचरा आमच्याबरोबर घेऊन येतो.
ती न शिकलेली माणसं म्हणून असं वागतात असा विचार मात्र नाही केला जात कारण इथे मुंबईत राहतो त्या सोसायटीमधल्या शिकलेल्या माणसाचं वागणं हे त्या गावातल्या माणसांपेक्षा फार वाईट आणि विचित्र असलेलं जाणवतं.
लेख वाचून काहीजण तरी आपलं वागणं बदलतील अशी आशा करूया…..
LikeLiked by 1 person
माणसाचं या पृथ्वीवरचं प्रयोजन कधीच संपलं आहे…
आता केवळ आणि केवळ आपणच कचरा म्हणून आहोत या पृथ्वीवर…
निसर्गा… हटव रे लवकर हा कचरा!!
LikeLike
खरंय शिवांगी, कचऱ्याची समस्या खूपच भीषण आहे, ग्रामीण अडाणी आणि शहरी अडाणी दोन्ही लोक ह्याला सारखीच जबाबदार आहेत. ग्रामीण लोक शहरिंची नक्कल करायला जातात, आणि अर्धवट ज्ञानाने काहीतरी होऊन बसते. तर शहरी अडाणी सगळं माहीत असून डोळ्यावर कातडे ओढून बसतात. हे जास्त dangerous आहे. प्रत्येकानी आपला कचरा करण्याचं प्रमाण कमी केले तरच भविष्य सुसह्य, नाहीतर अवघड आहे
LikeLiked by 1 person
शिवांगी तू कचरा ह्या समस्येच्या तळाशी जाऊन तुझा स्वानुभव फार कळकळीने मांडला आहेस . मला तर वाटतंय की हा लेख शालेय अभ्यासक्रमात असला पाहिजे.
खेडेगावात अज्ञान तरी असतं .पण शहरात अनास्था दिसून येते .स्वतःच्या पलिकडे न बघण्याची, असंवेदनशील वृत्ती दिसून येते .त्याचे सर्वात वाईट वाटते.
प्रश्न मांडून न थांबता कृती करणारी तू आहेस !!!
LikeLiked by 1 person
Kachara
A very serious & sensetive topic which is neglected
In our so called society
Whether it’s rural or urban
A very casual approach
Only buckets are kept outside compound
Really i feel very sad about the kachara workers
Shivangi your article is eye-opener
🙏🏻🙏🏻
LikeLiked by 1 person
आपण व्यक्त केलेली हळहळ समजू शकतो. व्यवस्थेअभावी लोक आता कचरा अगदी प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांसहीत जाळतात. हे गावात होते पण कचरा उचलण्याची व्यवस्था असलेल्या मुंबई पुण्यासारख्या शहरातही होते आहे.
LikeLike