समृद्ध भटकंती

पर्यटन आणि आम्हा दातार मंडळींची कधीचीच ताटातूट झालेली. मुळात trip ला जाणे म्हणजे स्वतः trip चा आराखडा बनवणे आणि तो आमलात आणणे हा पायंडा माझ्या माहेरी आणि सासरी सुद्धा पडला आहे. Travel company बरोबर अमुक एक package घेऊन मग निर्धास्त होणे प्रकार नाही. जो प्रदेश बघायचा ठरेल तेथील पर्यटन स्थळांची माहिती काढून स्वतः सर्व व्यवस्था करून चालू लागणारे आम्ही. पर्यटक म्हणून शेवटचे आम्ही २०१४ मध्ये गेलो. त्यानंतर मात्र मुचरी एके मुचरी. लहान, मोठी सुट्टी मिळाली की तिकडे पळायचं. तिकडे राहून, तिथली हवा खाऊन, पाणी पिऊन टवटवीत व्हायचं आणि पुण्याच्या routine मध्ये परतायचं. हे गेली सात वर्षे अखंड चालू आहे.

गेल्या आठवड्यात धाकटे दातार घरी आल्याआल्या म्हणाले “मंगळवारी किंवा बुधवारी आंबोलीला जायचं आहे. ह्या वेळी मी एकटाच आहे. माझ्या हातून काही readings चे recording delete झाले आहे. ते readings परत घेण्यासाठी जायचं आहे. एक पूर्ण दिवस readings घेण्यासाठी आणि प्रवासाचे दोन दिवस, असा साधारण तीन दिवसांचा कार्यक्रम आहे”. MSc Bio-diversity च्या अभ्यासक्रमात internship च्या अंतर्गत दर महिन्याला तीन-चार दिवस आंबोली ला जाऊन तिथे ठरलेल्या ठिकाणी निरीक्षणे करून वर्षाखेरीच्या प्रबंधाची तयारी ही. दर वेळी बरोबर तीन-चार सहकारी आणि प्राध्यापक असे असतात. आंबोली ला एकट्याने पाठवायला काही हरकत नाही, पण महाराष्ट्र व्यापी ST चा संप अजून चालूच आहे. Private गाड्या थेट आंबोली पर्यंत नाही. सर्वांनी बसून प्रवासाच्या अनेक पर्यायांचा ऊहापोह केला. मग बाबाच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याला विचारलं आठवड्याच्या शेवटी गेलं तर चालणार असेल तर आम्ही दोघे ही बरोबर येतो तुझ्या. हिंडू तुझ्याबरोबर आणि जमेल तशी मदत ही करू.

ठरलं तर मग! गुरुवारी संध्याकाळी पुण्यातून निघायचं. रात्री आंबोली मध्ये मुक्काम. शुक्रवार आणि शनिवार निरीक्षण करणे, फुलं गोळा करणे ह्या साठी राखीव आणि रविवारी सकाळी पुण्याला परतायचे! आंबोली मध्ये कुठे राहायचं ह्या प्रश्नाला अर्थातच “जिथे तुम्ही सगळे राहता तिथे” हे माझं आणि शेखर चं एकमत झालं.  आंबोली मध्ये परब काकांच्या “श्री स्वयंभू” Homestay मध्ये राहायचं निश्चित केलं. रात्री आंबोली मध्ये पोचायला अकरा वाजून गेले होते. परब काका फक्त आम्हाला खोलीची किल्ली देण्यासाठी जागे होते. आडवार असल्यामुळे Homestay मध्ये बाकी कोणीही पर्यटक नव्हते. आम्हाला “company” देण्यासाठी त्यांची welcome party मात्र सज्ज होती.

“श्री स्वयंभू” मधील “Welcome Party”

सकाळी उठून आवरून आम्ही जंगलात निघालो. अर्थात जंगलात म्हणजे खूप आत न जाता, जिथे रस्त्या कडेलाच फुलं आहेत अशी काही ठिकाणं निश्चित केलेली होती. तिथे सकाळी दोन तास आणि दुपारी दोन तास अश्या निरीक्षणाच्या वेळा ठरलेल्या होत्या. अथर्वला आपले काम करू देत मी आणि शेखर स्वतंत्र फिरू लागलो. खूपच दिवसांनी अशी निवांत भटकंती करत होते. मुचरी ला आमच्या जंगलात फिरतो, पण बरोबर कोणी असलं तर परत घरी जायची घाई सुद्धा असते. इथे प्रत्येक पान, फुल, झाड, फळ अगदी मन भरे पर्यंत बघता येत होतं. मुख्य म्हणजे मुचरी मध्ये न दिसलेली किंवा बघितलेली जैवविविधता इथे बघायला मिळाली. महाजन सरांची “देशी वृक्ष” व “आपले वृक्ष” ही पुस्तकं मी घरी असले की अनेक वेळा डोळ्याखालून घालते, एखादे झाड ओळखू आलं नाही की त्याचे फोटो काढून घरी येऊन पुस्तकात बघते. ती माहिती शोधताना इतर अनेक झाडांची नावे आणि माहिती अनाहूतपणे बघितली जाते. ह्या सवयीचा उपयोग ह्या भटकंती मध्ये झाला. शेखर ने एक नखशिखान्त फुललेलं झाड दाखवलं. तो “गेळा” वृक्ष होता. मी कधीही न पाहिलेला पण सरांच्या पुस्तकात अनेक वेळा बघितलेला. प्रत्येक्षात मात्र त्याचं रुपडं फारच मनोहारी! भर उन्हात कुठेही पाण्याचा लवलेश नसताना सुरेख चकचकीत हिरवीगार पानं आणि पानांच्या मध्ये अग्रभागी नाजूक पांढरी फुलं.

गेळा

नंतर त्या भागात जिथे तिथे गेळा दिसू लागला. गेळा वृक्षाचे कौतुक करत असताना अचानक सुंदर नाजूक हिरवीगार पालवी असलेलं एक छोटं झुडूप वजा झाड दिसलं. आधी करवंद वाटलं, पण एकही काटा नाही, त्यामुळे करवंदाची खूण पटेना. आणि पानं इतकी लुसलुशीत होती की कोणत्यातरी कीटकाच्या पिल्लांनी त्यावर ताव मारलेला होता. इतक्यात रस्त्याच्या पलीकडून शेखर ने काही तरी बघायला बोलावलं. एका बाजूला झाडाच्या फांदीवर मोहरी येवढ्या आकाराचे पांढरट गोळे चिकटवल्या सारखं काही होतं. Ecological Society च्या Jungle camp मध्ये हे मी बघितलं होतं, त्यामुळे चटकन ओळखलं की ही तर अंजनी किंवा अंजन वृक्ष. फांदी चे अजून जवळून निरीक्षण केले आणि काही ठिकाणी बारकी बारकी निळी फुलं उमललेली दिसली आणि खात्री पटली. “अंजन कांचन करवंदीच्या महाराष्ट्र देशा….” ह्या गीता मधला हा सदाहरित सुंदरसा वृक्ष! पाने बघितल्यावर कळलं आधी बघितलेली नाजूक हिरवीगार पालवी आणि ह्या झाडाची पाने सारखीच! परत गेळ्या च्या बाबतीत झालं तसं जिथे तिथे अंजनी दिसू लागली. अंजनी त्या भागात सर्वात dominant वनस्पती आहे असं दिसून आलं.

अंजनी ची पालवी, कळ्या आणि काही उमललेली फुलं

कुंभार्ली घाटातून जा ये करताना गाडीच्या खिडकीतून दिसणारा भामणी चा फुलोरा अगदी हात लावून बघता आला. पूर्ण उमललेली फुलं आणि नुकतीच उमलू लागलेली फुलं ही बघता आली. खुळखुळा म्हणजे crotalaria किंवा rattlepod ची पिवळी धम्मक फुलं आणि त्याच्या लाल-चॉकलेटी गुबगुबीत शेंगा ही बघता आल्या. मटार, तूर, मुगाच्या कुळातील म्हणजे Fabaceae family मधील हे खुळखुळ्याचं झुडूप ह्या रानात नक्की Nitrogen Fixing चे काम करत असणार असा विचार डोक्यात येऊन गेलाच!

भामणी ची पूर्ण उमललेली फुलं
खुळखुळा ची फुलं आणि शेंगा

नाजूक सुंदर फिकट पिवळी फुलं कुठली हे अथर्वला विचारलं तर दातपाडी असं उत्तर आलं. दातपाडी किंवा रामेठा ह्या झुडूप वजा झाडाच्या अनेक आख्यायिका शालेय जीवनात ऐकल्या होत्या. एक गोष्ट अशी की काही पोरं trekking ला गेली आणि जंगलात तीन दगडांची चूल पेटवून त्यावर खिचडी करायला ठेवली. ढवळायला डाव, चमचा काही नव्हतं म्हणून एका झाडाची फांदी घेतली आणि ती खिचडी ढवळायला वापरली. गरमागरम खिचडी खाऊन मंडळी निद्राधीन झाले. सकाळी उठल्यावर मात्र हाहाकार झाला! सर्वांचे दात गळून पडले होते. स्थानिक मंडळींना घडला प्रकार कळल्यावर त्यांनी वनस्पती चे नाव “दातपाडी” म्हणजे रामेठा सांगितले. ही गोष्ट किती खरी आणि किती अतिशयोक्ती ते ठाऊक नाही, पण विषाची परीक्षा कोण बघणार नाही का…रामेठा ला हात न लावता त्या सुंदर फुलांचे फोटो काढून संग्रही ठेवले. मुचरी मधील काही परिचित वनस्पती जसा “कुंभा” वृक्ष किंवा “कानफुटी” वनस्पती ही देखील बाकी अनोळखी मंडळी मधून डोकावत होतीच!

दातपाडी किंवा रामेठा
“कानफुटी” वनस्पती
कुंभा चे फुल व कळ्या

सकाळची निरीक्षणे करून झाल्यावर अथर्व आम्हला त्याच्या प्राध्यापकांचे सहकारी श्री. हेमंत ओगले ह्यांच्या कडे घेऊन गेला. श्री. ओगले Whistling Woods ह्या resort चे मालक आहेत आणि फुलपाखरांचे अभ्यासक ही आहेत. शिक्षणाने engineer असलेले श्री. ओगले मूळचे आंबोली चे.  नोकरी न करता आंबोली मध्ये Whistling Woods ह्या नितांत सुंदर अश्या resort ची बांधणी केली आहे. पश्चिम घाट आणि सह्याद्री मधील फुलपाखरांचा नुसता अभ्यासच नाही तर एक उत्कृष्ट दर्जाचे butterfly reference book ही त्यांनी तयार केलं आहे. Whistling Woods मध्ये प्रवेश करणं हा खूपच सुखावणारा अनुभव होता! प्रवेश द्वारातून आत शिरताना डावीकडे अनेक फुलझाडांचे प्रकार लावले आहेत. त्यावर नुकतेच पाणी मारले होते, त्यामुळे असंख्य फुलपाखरं त्या आसमंतात अक्षरशः बागडत होती!  Whistling Woods मधील cottages  ही मन लावून design केलेली आहेत आणि प्रत्येक cottage ला एका एका जातीच्या फुलपाखराचं नाव दिलेलं आहे! नुसतं त्या परिसरात जाऊन सुद्धा चित्त-वृत्ती प्रफुल्लित झाल्या! Whistling Woods हे प्रत्यक्षात अनुभवायला हवं, त्यामुळे कुठले ही फोटो न काढता तिकडून निघालो. हेमंत ओगले ह्यांची स्वाक्षरी असलेल्या फुलपाखरांच्या त्या संदर्भ ग्रंथाची एक प्रत मात्र विकत घेऊन तिकडून निघालो.

दुपारच्या फेरीत आम्ही दोघांनी जायचं नाही असं ठरवलं. संध्याकाळी अथर्व ची वाट बघत आम्ही थोडे पाय मोकळे करायला म्हणून निघालो. तर वाटेत अजून एका सुंदर वनस्पती ने माझं लक्ष वेधून घेतलं. ती म्हणजे वाकेरी! वाकेरी हा शब्द माझ्या परिचयाचा कारण पूर्वी वाकेरी लोह नावाचे आयुर्वेदिक औषध घेतलेलं. मध्यंतरी कुठे तरी फुलांचा फोटो बघितलेला त्यामुळे डोक्यात fit बसलेली. फुलं सुंदर लाल-पिवळ्या रंगाच्या विविध छटा असलेली, एका अक्षावर गोलाकार रचना असलेली ती फुलं अतिशय डौलदार दिसतात. फुलांचा फोटो पाठवल्यावर बहिणीला मोह झालाच. वाकेरी गच्चीवरील बागेत लावता येईल का? कितीही मोह झाला तरी वाकेरी हा मोठा वेल आहे आणि तो जंगलात शोभून दिसेल. फार तर farm house मध्ये लावता येईल.

वाकेरी

बरचसं काम पहिल्या दिवशी उरकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी चौकुळ गावातील केगदवाडी मध्ये जाऊन शेवळी ची फुलं गोळा केली. ह्या फुलांचं तेल काढून त्याच्या पृथक्करणा साठी पुण्यातील NCL मध्ये द्यायचे होते. परतताना “सदाची राई” आणि “लिंगाची राई” ह्या दोन राईना धावती भेट दिली आणि पुण्याची वाट धरली..

शेवळी किंवा Wendlandia ची फुलं – ह्या trip ची नायिका

अनेक वर्षांपूर्वी गोव्याला जाताना आंबोली मधून सावंतवाडीला गाडी ने प्रवास करत गेलो होतो. त्या प्रवासात आंबोली च्या जंगलातून जाताना मनात एक आठवण कोरली गेली होती ती म्हणजे सुवासाची. आंबोली म्हटलं की सुवासिक जंगल हे समीकरण मनाने अगदी पक्क केलं होतं. पण त्या जंगलातून जाताना वाटेत गाडी थांबवून तो सुवास नक्की कुठल्या कुपितून येतोय हे शोधायची उसंत नव्हती किंवा मुभा घेता आली नाही कारण रात्र होण्याआधी गोवा गाठायचं होतं. ह्या भटकंती मध्ये मात्र ती मुभा घेता आली. निवांतपणा मिळाला. आंबोलीला आलोच आहोत तर तिथली सर्व ठिकाण बघितलीच पाहिजेत हा हावरटपणा न करता, शांतपणे संयमाने गोष्टी बघितल्या. खरोखर मनाला आणि चित्ताला समृद्ध करणारा अनुभव ह्या भटकंतीत मिळाला!

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार

१३-मार्च-२०२२

11 thoughts on “समृद्ध भटकंती

  1. सुंदर वर्णन शिवांगी! सुगंधी रान!
    आपण शहरात हे सगळे गधं विसरूनच जातो नाही? छान वाटलं वाचून, आंबोली जाऊन आल्यासारखे वाटले.

    Like

  2. आहा ! वाचूनच खूप आनंद मिळाला. खूप छान लिहिलं आहेस.
    अशी पाने, फुले, कीटक, पक्षी, प्राणी हे मलाही माझे आप्त वाटतात. मला तुझ्याएवढी माहीती नाही पण जाणून घ्यायला आवडतं. असं स्वच्छंद भटकायला आवडतं. आणि अशाप्रकारचं तुझं लेखनही आवडतं…

    Like

  3. तुम्हा दातारांची कमाल आहे बाई
    वाचताना सगळं डोळ्यासमोर येत होतं

    Like

  4. After long time reading article from Avani Mitra
    Such nice article
    What beautiful creation of Nature beautiful flowers herbs small plants just felt to move to amboli
    You & your family are simply great
    True nature lovers

    Like

    1. खूप च छान माहिती आणि फोटो सुद्धा
      निसर्ग इतका रंगसंगतीने भरलेला आहे हे पुन्हा एकदा दिसलं
      सुरेख

      Like

  5. वाचताना सगळं वर्णन डोळ्यापुढे येत होतं. थोडक्यात अंबोलीची सफर घडवलीस.. धन्यवाद

    Like

  6. किती प्रकारच्या विविध वनस्पतींची नावं आणि माहितीमिळाली.

    Like

  7. खूपच सुंदर, शिवांगी.वर्णन अप्रतिम आणि त्याला सुरेख फोटोंची जोड!!!.तुझा अभ्यास भारी आहे,त्यामुळे,आम्हाला घरबसल्या सफर घडवून आणतेस!!!!!

    Like

  8. खूपच छान लेख शिवांगी. विविध झाडं, फुलं यांच खूप सुंदर वर्णन केलाय व फोटोही जोडल्याने वाचताना ती फुले बघायलाही मिळाली. अभ्यासपूर्ण निसर्ग वर्णन करणारा ललित लेख लिहिल्याबद्दल खूप अभिनंदन.

    Like

Leave a reply to Atul Lonkar Cancel reply