पडू आजारी(?)…

आज अनेक महिन्यांनी लिहायला घेतलं. विषय सुचत नव्हतें असं नाही, पण काहीच सुचत नाही अशी परिस्थिती काही महिन्यांपूर्वी माझ्या आयुष्यात निर्माण झाली होती.

२०२१ च्या मे महिन्यात एक मैत्रीण योगासनांचा वर्ग घेणार होती. अनेक वर्षांपूर्वी “योग शिक्षक” असलेली मी एव्हाना योगासनं करणं विसरून गेले होते. पण योगासनं करून किती उल्हसित वाटतं ह्या स्मरणाने मात्र मला तिचा महिन्याभराचा वर्ग करावासा वाटला. महिन्याभराने मी सूर्यनमस्कार नियमित घालायचा नेम केला आणि तो बऱ्याच अंशी पाळला. आपण ठरवलेली गोष्ट पुढे तशीच चालू रहावी ह्यासाठी जणू सारी सृष्टी आपल्याला साथ देते आहे हा माझा समज बळावत गेला . एक दिवस एका मित्राने “१०८ सूर्यनमस्कार” असा whatsapp group केला आणि मला सूर्यनमस्कार अनेक लोकांबरोबर घालायची आणि त्यावर PhD मिळवलेल्या तज्ज्ञाचे मार्गदर्शन घ्यायची आयती संधी चालून आली. एकूण सुर्यनमस्काराची गाडी व्यावस्थित रुळावर लागणार अशी चिन्हं दिसू लागली…

सहा ऑक्टोबर ची सकाळ मात्र वेगळीच उजाडली. नेहमी प्रमाणे सकाळी साडे पाच सहा ला उठायला गेले तर मनगटं, पावलं, घोटे हे सर्व सांधे आखडले होते. आपल्याला हे काय होतंय अचानक ते काही कळेचना. म्हटलं थोडे पाय मोकळे करून यावं म्हणजे बरं वाटेल, म्हणून अर्धातास फिरून आले. घरी पोचल्यावर पाय थर थर कापू लागले. आणि आज पर्यंत कोणत्याही आजारपणात कधीही न घडलेली गोष्ट घडली…मी माझ्या बहिणीला, अपूर्वाला फोन करून अक्षरशः भोकाड पसरून रडू लागले की मला बहुतेक arthritis म्हणजे संधिवात झाला आहे. संधिवातावर औषध नाही हे ठाऊक आहे. पण मला अचानक का व्हावा संधिवात, आणि मी अशीच राहिले तर…ह्या विचाराने माझ्या मनाचा थरकाप झाला…कुठल्याही भयपटाने किंवा थरारपाटाने मला कधीही इतकं हादरवलं नव्हतं.

थोड्या उशिराने पण त्याच दिवशी शेखर ही माझ्याप्रमाणेच आजारी पडला. दोघांचे एकच निदान चिकूनगुण्या आणि त्यामुळे उद्भवणारा संधिवात. डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं पुढचे कमीत कमी दोन तीन महिने हा त्रास सहन करावा लागेल.

Pain killers जे मला चालत नाहीत आणि त्यामुळे घ्यावे लागलेले steroids घेऊन सुद्धा परिस्थितीत काही फरक पडत नव्हता. पाय म्हणजे दोन अवजड ओंडके झाले होते जणू. अंगावर घेतलेलं पांघरूण जड व्हायचं. कुशीवर वळणं म्हणजे झोपेत सुद्धा सहज आणि आपसूक घडणारी गोष्ट प्रत्येक्षात करण्यासाठी पाच पाच मिनिटं प्रयत्न करावा लागत होता. कुशीवर वळ्यण्याची ही गत, तर झोपलेल्या अवस्थेत उठून उभं राहणं आणि स्वतः च्या पायाने चालत bathroom गाठणं ही तर शिक्षाच वाटायची. कुठल्याच अवस्थेत बरं वाटत नसे. ना झोपलेल्या अवस्थेत, ना बसलेल्या, ना उभ्याने. जवळ जवळ महिनाभर निराशाजनक परिस्थिती नंतर मात्र आयुर्वेदिक औषधं घ्यायला सुरवात केली. हळूहळू फरक पडत गेला. अजून ही पूर्ण बरी नाही झाले. खूप चालले, पायऱ्या चढ-उतर केल्या, हवामान बदललं की घोटा आणि पाऊल सुजतं. पण कुठलीच हालचाल करता न येणं, त्यापेक्षा ही परिस्थिती खूपच सुकर आहे.

असे अवघड प्रसंग माणसाला खूप काही शिकवून, देऊन जातात. मला ही ह्या आजारपणात काही अनमोल नाते संबंध अनुभवायला मिळाले. ते व्यक्त करण्यासाठीच तर ह्या लेखाचा घाट घातला..

Work from Home च्या काळात घरातील दोन्ही कर्त्या मंडळींनी एकाचवेळी आजारी पडण्याने खूपच पंचाईत झाली खरी. पण आम्हला आमच्या आजूबाजूच्या माणसांचा खूप आधार पण मिळाला. सर्वात भक्कमपणे उभी राहिली ती माझी धाकटी बहीण अपूर्वा. जे कोणी जो काही उपाय सांगतील, ते ती ताबडतोप आमच्या दोघांवर करायची, मग ते पपई च्या साला ने सांधे शेकणं असो, कोणी कुठलं औषध सांगितलं तर घेऊन येणं असो, किंवा अधून मधून चक्कर मारून आमची चौकशी करणं असो. ती तिचं कर्तव्य अगदी चोख बजावत राहिली.

घोटा व पाऊल सुजल्यामुळे मी हलू शकत नाहीये असं समजल्यावर धाकट्या बहिणीप्रमाणे असलेली माझी जाऊ अपर्णा हातातली कामं सोडून भल्या सकाळी मला पायाला तेल लावून द्यायला आली. तिने मला तेल लावून दिलं हे कळल्यावर माझी कामवाली बाई सुवर्णा चक्क हिरमुसली. म्हणाली “ताई, मी म्हणाले होते ना तुम्हाला पाय चोळून देईन, मग मला न सांगता अपर्णा ताईंना का सांगितलं”. दादांना आणि मला आराम मिळावा म्हणून ती दुपारी सर्व कामं आटोपली की येऊन जास्तीची कामं बिनबोभाट करून जायची. चार दिवस झाले तरी आमचं आजारपण संपत नाही बघून माझ्यापेक्षा दहा पावसाळे जास्त पाहिलेल्या पण एक ही इयत्ता न शिकलेल्या लता बाई म्हणाल्या “आजारपण हत्तीच्या पावलाने येतंय आणि मुंगीच्या पावलं जातं”. सुजलेला पाय बघून चक्क खाली बसल्या आणि दोन्ही हात माझ्या पावलावरून फिरवत “लवकर बरं वाटू द्या” असं म्हणत राहिल्या.

ह्या बरोबर माझ्या मावस व मामे सासवा आळी पाळी ने आणि मायेने आमची विचारपूस करत होत्याच. जमेल तसं फोन करून, घरी येऊन समाचार घेत होत्या. संध्यामामीला कोणी आमच्या इथे येणार असा सुगावा लागताच एकदा जेवणाचा पूर्ण डबा आणि एक दोन वेळा घरी केलेले शिंगाड्याच्या पिठाचे लाडू पाठवून दिले.

आमच्या आजारपणाची खबर बात माझ्या मैत्रिणींना माहिती झाली होतीच. माझे सांधे सुजतायत हे कळल्यावर वैदेही ने सांधेदुखीवरचं तेल पाठवून दिलं. तिला सांगितलं की तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे, तर ती आणि प्रमोद दोघे मुद्दाम आले. वैदेही ने चहा करून दिला. शलाका कडे हट्ट केला की घरात बसून बसून खूप कंटाळा आला आहे, तर ये गप्पा मारायला. ती आणि ललित दोघे ही मुद्दाम गप्पा मारायला आले आणि येताना घरी केलेलं गरम गरम soup ही आणलं. घरी चाट खात खात धमाल गप्पा रंगल्या आणि काही काळासाठी आम्ही दोघे आजारपण विसरलो. महिन्याभराने असंच whatsapp वर भेटायचं असं ठरलं आणि मृगाक्षी, वैदेही, प्रमोद आणि थोड्या उशिराने शलाका आणि ललित भेटायला, गप्पा मारायला आले. ती संध्याकाळ सुद्धा हसण्या-खिदळण्यात मस्त गेली.

लेकाचे मित्र घरी आले की चौकशी करीत, औषध आणून देत. लेकाच्या मित्रांकरवी शेखर च्या बाल मित्राला सतीश ला ही आम्ही आजारी असल्याचं कळलं. त्याने आणि दीपा ने फोन करून अंदाज घेतला. आमच्या आजाराचं स्वरूप चिवट आणि वेळखाऊ आहे असं समजताच बाकी मित्रमंडळींना एका शनिवारी थेट वाड्यावर (म्हणजे “झुळूक” मध्ये हो) येण्याचे फर्मान काढलं. एकूण काय, तर महिनोन-महिने एखादे get together ठरवायला वेळ लागतो, ते ह्या चिकूनगुण्या मुळे अगदी सहजी शक्य झालं.

पडू आजारी? तर नको रे बाबा! पण पडलोच तर माझ्याच वाट्याला का आले हे भोग! असा त्रागा करण्याऐवजी, थोडं शांततेने, संयमाने विचार करावा. शहरी वातावरणात आणि corporate संस्कृतीत शक्यतो सर्व गोष्टी स्वतःला manage करता आल्या पाहिजेत अशी अपेक्षा माणूस स्वतः कडून करत असतो. शक्यतो आपल्या मुळे इतरांना त्रास नको, हा मूळचा विचार असतो त्या मागे. मी ही त्याला अपवाद नाहीच. आणि आपण अनेक गोष्टी एका वेळी व्यवस्थित manage करू शकतो ह्याचा कुठे तरी अभिमान असतोच. आमच्या आजूबाजूला असलेली माणसं आपआपल्या परीने आम्हला बरं वाटावं ह्या साठी छोट्या छोटया गोष्टी करीत राहिले. त्यामुळे ह्या आजारपणात दुखणं सोसत नाही म्हणून जितकी रडले असेन तितकेच हसण्याचे, आनंदी रहाण्याचे क्षण ही मिळत गेले. ह्या आजारपणाने इतरांनी पुढे केलेला आधाराचा हात (प्रसंगी बोट सुद्धा) धरायला शिकवलं.

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार

२२ जानेवारी २०२२

2 thoughts on “पडू आजारी(?)…

  1. शिवांगी खूप छान व्यक्त केले आहेस तुझे अनुभव. कुठलाही प्रसंग येवो शिवांगी त्यातून शिवांगी कशी जिद्दीने बाहेर पडते, असं उदाहरण मी नेहमीच आपल्या लोकांना सांगत असते.
    तुझा रक्तगट नक्कीच ‘Be positive’ आहे!

    Liked by 1 person

  2. Khup Chan lihale ahe,you are great fighter,doghna ek ch veles tras ,mhanje tumhi khup difficulty face kelaya astil,but it’s nice to hear both of you have came out of it.

    Liked by 1 person

Leave a comment