“कोकण” हा शब्द उच्चारला की पुणेकर-मुंबईकर मंडळींच्या डोक्यात पहिला आणि शेवटचा विचार येतो तो म्हणजे हापूस आंब्याचा! हापूस आंब्याचे वेड हे सर्वव्यापी आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पूर्वी फक्त मे महिन्यात मिळणारा आंबा आता लवकर लवकर म्हणता म्हणता अगदी फेब्रुवारी-मार्च पासून मिळू लागला आहे. आंब्याच्या वेडा पायी कोकणातील इतर बरीच फळं जशी जांभूळ, करवंद, पपनस, अळू, अंबूळकी इत्यादी दुर्लक्षित राहिली आहेत. त्यातील एक महत्वाचे फळ म्हणजे फणस. खरं तर फणसाला “फळ” म्हणणे थोडं विचित्र वाटतं. इतर फळं मोहक रंगाची, गोजिरवाणी, सहसा एका हाताच्या पंज्यात मावणारी असतात, पटकन उचलून खावी अशी. फणसाचे बाह्य रूपडं मात्र अजस्त्र शरीरयष्टी, ओबडधोबड आकार, काटेरी जाड जुड त्वचा आणि त्यामुळेच काहीसं विद्रुप. आतील गरे सुद्धा खूपच कष्टाअंती हाती लागणारे!

फणसाच्या अगदी लहानपणी च्या आठवणी म्हणजे एका कागदाच्या पिशवीत काही अखंड गरे आई किंवा बाबा बाहेरून येताना घेऊन येत. आधी ते गरे खायचे आणि मग राहिलेल्या आठळ्या मिठाच्या पाण्यात शिजवून सोलून खायच्या. एकंदर फणसाचा अनुभव सुखावह होताच कारण गरे आणि आठळ्या दोन्ही आवडायच्या. माहेर च्या चौकोनी कुटुंबात पाव किलो अर्धा किलो इतपत गरे आणले जायचे. उन्हाळा सुरू होण्याआधी बाजारात भाजीचे फणस आणून फणसाची भाजी न चुकता व्हायची.
सासरी आल्यावर एकूण माणसांची संख्या आणि आत्यंतिक आवडते फळ व खाण्याचे प्रमाण जास्त असल्या कारणामुळे फणसाचे गरे क्वचित विकत आणले जात. शेखर च्या आत्याच्या घरचे फणस दर वर्षी यायचे त्या व्यतिरिक सबंध फणस विकत आणायचे व कापून खायचे अगदी तडस लागेपर्यंत. फणस कापायची “कला” मुलांबरोबर घरच्या सगळयांना अवगत झाली. कितीही मोठा फणस असो, पिकला की आम्ही सगळे उत्साहाने तो चिरायला घेत आणि गऱ्यांचे आणि आठळ्यांचे “व्यवस्थापन” करत. फणस चिरला की गरे भरपूर असत, त्यामुळे एक फणस पुढचे तीन चार दिवस पुरायचा. आठळ्या जमवून ठेवायच्या आणि एकदिवस सर्व आठळ्यांची भाजी करायची हा नेम असे.
बाजारातून विकत आणलेला फणस हा आत्याच्या बागेतील फणसा इतका चांगला निघेल का अशी कायम धाकधूक असायची. फणस चांगला निघेल का ह्या शंके बरोबर तो बरका निघणार नाही ना ही धाकधूक असायची. बरका फणस पूर्वी कधी खाल्लेला नव्हता. आणि अनेक लोकांकडून बरका फणस चांगला नसतो, गिळगिळीत असतो, तो घश्यात अडकतो अशी वर्णनं ऐकलेली होती. त्यामुळे फणस कापा आणि गोड निघाला की सुटकेचा निश्वास सोडायचो आम्ही.
विकतचा फणस चांगला निघेल की नाही ही जरी धास्ती असली तरी कलिंगड ज्या प्रमाणात रंग आणि चवीच्या बाबतीत दगा देऊ शकतं तसा क्वचितच फणसाने दगा दिला. फणसाने काही वेळा तारांबळ मात्र उडवून दिली आहे!
एकदा भल्यामोठ्या कापा फणसाचा वास यायला लागला. पिकला असेलच ह्या खात्रीने चिरायला घेतला आणि आतून तो पूर्णपणे कच्चा निघाला.. देवा! आता काय करायचं ह्याचं असं म्हणत कोकणातील चुलत सासूबाईंन कडे धाव घेतली! कच्च्या फणसाचे तळगरे करतात हे ठाऊक होतं, पण मागे बहिणीने केलेले तळगरे पार फसले होते ते ही आठवलं. सासूबाईंशी बोलल्यावर साक्षात्कार झाला की तळगरे खोबरेल तेलात तळायचे त्याने ते खुसखुशीत होतात. एवढ्या मोठ्या फणसाचे तळगरे करायला किती खोबरेल तेल लागेल त्याचा काही अंदाज येईना आणि मी चांगल्या दोन मोठ्या खोबरेल तेलाच्या बाटल्या विकत आणल्या. तळगरे उत्कृष्ट झाले, पण जवळ जवळ दीड लिटर खोबरेल तेल शिल्लक राहिले. आता एवढे खोबरेल तेल कोणाच्या डोक्यावर थापायचे ह्याचा विचार करू लागले. एक दिवस मनाचा हिय्या करून खोबरेल तेल वापरून त्यात फोडणीचे पोहे केले. ते इतके उत्कृष्ट झाले की त्या नंतर आमच्या कडे फोडणीचे पोहे, उपमा, कडव्या वालाची उसळ, दुधी भोपळ्याची दह्यातली पचडी, इतकेच काय सुरमई, पापलेट हे तळायला सुद्धा खोबरेल तेलच नियमित वापरू लागलो.
अजून एका कोकण फेरीत पाटण च्या बाजारातून एक भला मोठा फणस विकत घेतला. गाडीची डिकी जवळ जवळ फणसाने व्यापून टाकली होती. वाटेतच फणस पिकला आहे ह्याची वर्दी त्याच्या वासाने दिली. दुसऱ्या दिवशी office, त्यामुळे घरी पोचल्या पोचल्या फणस चिरायला घेतलाच पाहिजे हे नक्की ठरलं. फणस चिरायला घेतला आणि काळजात धस्स झालं. पहिली चिर दिल्या दिल्या नुसत्या बोटाने फणस चक्क “फाडता” येत होता आणि आतून धो धो गरे कोसळत होते. सासूबाई एकदम कावऱ्या बावऱ्या झाल्या, म्हणाल्या “अगं हा तर बरका फणस आहे! आता काय करणार ह्याचं, कोणी खाणार नाही तो…” घाबरत घाबरत एक गरा तोंडात टाकला आणि…..एका क्षणात स्वर्गीय स्वाद आणि रसाने तोंड भरून गेले! इतके दिवस आपण कुठल्या स्वादाला आणि चवीला मुकलो आहोत ह्याची जाणीव झाली!
इतकं चविष्ट, रसदार फळ मी तोपर्यंत चाखलेच नव्हते. शेखर आणि मुले देखील पटा पटा गरे खाऊ लागले. फणस इतका प्रचंड होता की सर्वांनी खाऊन संपणे अशक्य. मग काय करावं अश्या विचारात असताना पुन्हा एकदा कोकणातल्या चुलत सासूबाईंचे स्मरण झाले! ताबडतोब त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलल्यावर माझ्या जीवात जीव आला. बरका फणसाची पोळी किंवा साठ आणि सांदण ह्या दोन्हीचे प्रमाण आणि कृती लिहून घेतली. गरे मनसोक्त खाऊन झाल्यावर मी पुरण यंत्रातून बाकीचे गरे फिरवले आणि पातेलं भर रस काढून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन ताटं फणसाचं साठ करायला उन्हात ठेवली आणि राहिलेल्या फणसाचे “सांदण” केले. रस काढल्यावर राहिलेला चोथा मला टाकवेना. मग त्यात थोडा गूळ, चवी पुरतं मीठ, मावेल तेवढी कणिक घालून त्याचे मुटके केले आणि उकडून कणीदार साजूक तुपाबरोबर सर्वांना सकाळी नाश्त्याला वाढले!

बरक्या फणसाची अशी अचानक ओळख झाली आणि त्याच्या स्वादावर आणि चवीवर मी बेहद्द फिदा झाले! दर वर्षी बरका फणसाची मी आतुरतेने वाट बघत असते. कोकणात गेले तर आवर्जून माहितीतल्या लोकांना सांगून ठेवते की बरका फणस असेल तर मला हवा आहे म्हणून. दोन तीन वर्षांपूर्वी फणसाच्या मोसमात कोकणात जाऊन सुद्धा बरका फणस हाती लागला नाही. एक दिवस अचानक विशाखा चा कोकणातून फोन आला. तिने एका bus driver चा फोन नंबर दिला आणि सांगितलं की उद्या पहाटे driver ला फोन करा आणि त्याच्या गाडीतून फणस उतरवून घ्या. पहाटे साडे चार – पाच वाजता driver चा फोन आलाच आणि कुठे भेटायचं ते त्याने कळवले. बाहेर पावसाची रिप रिप चालू होती, अश्यात मी आणि अथर्व रस्त्यावर छत्र्या घेऊन bus ची वाट बघत उभे होतो. Bus आल्यावर driver ने आम्ही नक्की फणस वाले आहोत ह्याची खात्री करून घेऊन चार भलेमोठे बरके फणस आमच्या ताब्यात दिले. कोणी बघितले असते तर आम्ही नक्की फणसाची तस्करी करणारे गुंड आहोत ह्याची खात्री पटली असती. अगदी सत्तर च्या दशकातील सिनेमातील smuggling चे दृश्य होते!
एकंदरीत फणस अगदी “कोयरी” स्वरूपाचा म्हणजे लहान असल्या पासून तो पूर्ण पिके पर्यंत त्याचे विविध खाद्य पदार्थ करून खाऊ शकतो. कोवळ्या फणसाची भाजी, अर्धवट पिकलेल्या फणसाची भाजी, बिर्याणी, तळगरे आणि पिकल्यावर तर अनेक पक्वान्नं आणि खाऊ चे पदार्थ करता येतात. आठळ्यांची भाजी, पीठ आणि पुरण सुद्धा करता येते. ह्या सर्व फणसोत्सवात अजून एक गोष्ट उमजली. हा वृक्ष तजेलदार , सुखावणारा दिसतो. उत्तम आरोग्यदायक घटकांनी परिपूर्ण अशी फळे देणारा व दीर्घायुषी असतो. रानावनात सहसा आढळत नाही तर घराजवळ जास्त चांगल्या प्रकारे वाढतो म्हणजे कदाचित मनुष्याचा सहवास हवा असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाऊस , ऊन , वारा , थंडीचे प्रमाण किंवा अवेळी होणारे वातावरणातील बदल , ह्या गोष्टींचा काहीही परिणाम फळ धारणेवर , चवीवर होत नाही असा सद्गुणीही असतो.
गेल्यावर्षी मैत्रिणी कडून बरेच बरके फणस मिळाले. काही नातेवाईकांना हवे होते त्यामुळे माझ्या वाट्याला एकच फणस शिल्लक राहिला. तो चिरताना अक्षरशः एक गरा तोंडात आणि एक पातेल्यात ह्या क्रमाने माझं काम चालू होतं. WhatsApp वर दिराचा फोटो झळकला. एका हातात फणसाचे मधले जाडजूड देठ त्याने खांद्यावर गदे सारखे धरले होते आणि फोटो ला caption “बरकासुर” असे होते. मी म्हटलं हा नुसता फोटो पुरता “बरकासुर” आहे. मी मात्र खरी खुरी “बरकासुर” आहे…
सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार १५-जुलै-२०२१
अग्गं ए बरकासुरणी!!
काय झक्कास लिहितेस गं!
पोड फाडलेला बरका फणस, त्याच्या त्या घमघमाटासहित डोळ्यासमोर उभा केलास बघ!
पण खरचं, एकेकाळी सर्रास पहायला, खायला मिळणार फणस आता कोकण व गोव्यातून लुप्त होत चालला आहे. आमच्याच गोव्यातील घराभोवतीचेचं सर्व फणस गेल्या दोन दशकात लयाला गेले. लाकडाचा पैसा आला व जमीन मोकळी झाली तिथे “कार पार्क” वा दुकाने आली! उरलेला एक, घाबरून की काय, पण फळतच नाही.
तूझे लिखाण वाचून माझ्या देखील लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या व मन हेलावले. आजीने आग्रहाने दिलेले फणस, आंबे, केरसुण्या घोडागाडी, खाडीवरील फेरीबोट, समुद्री आगबोट अशी सफर करीत गोव्याहून मुंबईपर्यंत आणण्याचे दिव्यकर्म केल्याचे आठवले व आजीच्या प्रेमळ आठवणीने डोळे पाणावले.
असो. अशीच लिहीत रहा व आम्हाला तुझ्या अनुभवांतून पगल्भ करित रहा हा सद्विचार.
LikeLiked by 1 person
🙂 🙂 🙂 बारकासूर पुराण वाचून खूपच मजा आली…!! एखाद्या साधारण, कोकणात सगळीकडे होण्याऱ्या गोष्टीला आपण किती खास एन्जॉय करू शकतो हे तू छान टिपलं आहेस! मस्तच…
LikeLiked by 1 person
मी अस्सल कोकणस्थ. लहानपणी फणसाचे सर्व पदार्थ खाल्ले. आषाढी कार्तिक एकादशी ला आठळ्यांची उउपवासाची भाजी अप्रतिम.
गेले ते दिवस.
LikeLiked by 1 person
माझेही अत्यंत आवडीचे फळ
त्याच्या वाट्याला मात्र आंब्याच्या तुलनेने उपेक्षा आली आहे
इतकं।मधुर रसाळ फळ जगाच्या पाठीवर कुठेच नाही
मी तर फणस खाऊन झाल्यावर हाताला येणारा बस कितीतरी वेळ हुंगत राहते
त्याचा चीक सोडल्यास उरलेल्या प्रत्येक भागाचा फायदाच होतो
अगदी चारखंडही गुरांना आवडतात
असो तुझा लेख अति उत्तम
तू जमिनी सोबत शब्दांचीही मशागत उत्तम करतेस
तू लिहिलेला प्रत्येक लेख मला आवडतो
अशीच लिहीत जा
LikeLiked by 1 person
ज्याला बरका फणस आवडत नाही तो खरा फणस प्रेमी नव्हेच! मधुर रसाळ सोनेरी पिवळे गरे, कसे विनासायास अलगद उचलून तोंडात सोडता येतात! फणस पिकल्याचा घमघमाट आणि सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेण्याचा आनंद मिळाला वाचून!👍👍
LikeLiked by 1 person
फार सुंदर लिहिले आहे.
LikeLiked by 1 person
शिवांगी,
छान लिहीले आहेस. तुला लिहिण्याची कला अवगत आहेच.
लहानपणी कोकणात काकांकडे महिनाभर राहायला जायचो. महिन्याभरात निदान ७-८ वेळा “फणस खाणे” कार्यक्रम व्हायचा.
आजी मागच्या अंगणात फणस कापायची. तिच्या लेकी व नातवंडे गोल करुन फणस फस्त करायच्या. त्याची मजा काही वेगळीच होती.
तुझ्या लेखामुळे त्या प्रसंगाची आठवण झाली.
तू बनवलेले सांदण खूप छान असते. तुझ्यामुळे मला दरवर्षी सांदण खायला मिळते.
फणसाचे वाळवलेले गरे घालून कढी व्हायची.
आजी फणसाच्या दोन प्रकारच्या भाज्या करायची. एक प्रकार दाणे घालून उपवासाची भाजी व दुसरी वालाची डाळ घालून बिनउपवासाची.
अजून एक फणसाची आठवण म्हणजे मुंबईला परत येताना S.T. मधे सुटलेला फणसाच्या वासाचा घमघमाट!
LikeLiked by 1 person
बरकासुर आख्यान फारच भारी बुवा, फणस माझेही अती आवडते फळ, त्याचा घमघमाट मला आंब्याच्या वासापेक्षा जास्त सुखावतो. हुंगत रहावेसे वाटते. खूपच सुरेख आणि सोपे लिहितेस ग.
LikeLiked by 1 person
वा,शिवांगी, झकास 👌.फणसाचा घमघमाट आला अगदी !!!!!
LikeLiked by 1 person
वाढदिवसानिमित्त मी आमच्या परसबागेत एक फळझाड म्हणुन फणसाचं रोप लावलं. नेमकं तेच झाड निवडल्याचा आनंद मात्र हा लेख वाचून झाला.
खरचं खुप सुदंर लिहिलं आहे.
LikeLiked by 1 person
राणी तुझ्या हौशी खवय्येगिरीला चविष्ट शब्दांमुळे फार मजा येते.चित्रच उभं करतेस .आजच्या पिझा ,पास्ता ,बर्गर,च्या जमान्यात तू हे पारंपरिक पदार्थांचं वैशिष्ट्य जपून वर आणि काही प्रयोगपण करतेस .खरंच कौतुकास्पद !!!
LikeLiked by 1 person
Barkasur 😊😊
Made me recollect old memories
Very nicely written
Never mind if jackfruit is small or big all jackfruits are yummy & tasty
👌👌
LikeLiked by 1 person
तुमचे सगळेच लेख सुंदर असतात. त्यातील आपली स्थानिक परंपरा विसरल्या गेलेल्या गोष्टीना पुनरूज्जीवित करतात.
सगळ्या लेखांचे संकलन करुन छानसे पुस्तक तयार करा
LikeLiked by 1 person