हर बात होगी मनचाही….

“Beauty lies in the eye of the beholder” म्हणजे एखादी वस्तु, व्यक्ती किंवा अन्य कुठलीही प्रेक्षणीय गोष्ट ह्याच्या सौन्दर्याचे प्रमाण वेगवेगळं, किंबहुना ते व्यक्ती सापेक्ष असतं. तरीही एका ठराविक साच्यातील सौन्दर्याला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. सुंदर स्त्री म्हणजे गोरी, शिडशिडीत, लांब सडक, सरळ आणि काळे भोर केशसंभार असलेली; सुंदर पुरुष म्हणजे उंचापुरा, नाकी-डोळी नीटस, दाट काळेभोर केस असलेला, गोरा रंग नसला तरी चालेल, किंबहुना नसावा सावळा preferred पण काळा नको अशी सर्व मान्य कल्पना आहे. सौन्दर्याच्या कल्पनेचे प्रेरणा स्थान हे बहुदा चित्रपट आणि जाहिरात विश्व आहे असा माझा ठाम विश्वास आहे. आजकाल तर लहान मुलांचा “त्रास” नको म्हणून आई-बाप “Television ” किंवा “Mobile” त्यांच्या हातात देण्याचे सुटसुटीत उपाय योजतात. त्यामुळे तर ह्या कल्पना अगदी बाळ वयातच त्यांच्या मनावर बिंबवल्या जातात. मग काही सुज्ञ पालकांनी अमुक एक नटी सुंदर नाही तर रोगट दिसते असा कितीही टाहो फोडला तरी त्यांच्या षोडशेला तो टाहो ऐकू जात नाही.

शिक्षण संपता संपता गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागली की मग तर हे अमुक एका नटा सारखी शरीरयष्टी कमावणे किंवा तमुक एका नटी सारखी त्वचा, केशभूषा आपली ही असावी अशी ध्येय ठेऊन मंडळी कामाला लागतात. त्यातून एखाद्याचे “corporate career” असेल तर सुंदर दिसणं आणि “up-to-date ” राहण्यावाचून पर्यायच नसतो (?). आजूबाजूची मंडळी सुद्धा एकदम चकचकीत! Branded कपडे वापरणारी आणि रोज सकाळी पाण्याच्या आंघोळी बरोबर deodorant ने अंघोळ करून येणारी… मुली makeup (निदान पावडर आणि lipstick) करून आणि नियमित beauty parlour मध्ये जाऊन चेहरा आणि हात, पाय ह्यांना polish करून येणाऱ्या….ह्या दरम्यान, beauty parlour हे मुलींच्या जीवनातील अविभाज्य घटक होऊन जाते.

नोकरी व्यवसायात स्थिरावल्यावर सौंदर्य प्रसाधनांच्या “गरजा” वाढीला लागतात. अमुक साबण वापरला की त्वचा अगदी “Facial” केल्या सारखी होते, तमुक Moisturizer वापरले की त्वचेवर थंडी चा परिणाम होत नाही, तमुक lipstick ओठांवर दिवस भर टिकते, अमुक Perfume किंवा Deodorant  ह्याने आपण दिवसभर टवटवीत रहातो, एवढेच काय, तमुक पावडर वापरली की दिवसभरातल्या सर्व गोष्टी चक्क आपल्या मनासारख्या होतात!! बाजारातील सर्व सौंदर्यप्रसाधने अशी अनंत वचने देत असतात. आपण आपल्याला “suit” होणारी प्रसाधने विकत आणून वापरू लागतो आणि त्याच्याशी एकनिष्ठ रहाण्याच्या प्रयत्न करत असतो. पण मग गंमत अशी होते की आपण एकनिष्ठ असलेली प्रसाधने बाजारातून गायब होतात आणि त्या जागी “new and improved” अशी लेबलं लावलेली नवीन प्रसाधने येतात. पण “New and Improved” वस्तू काही आपल्या मनात भरत नाही आणि “पुनःश्च हरिओम” म्हणत आपण आपल्याला suit होईल अश्या brand च्या शोधत निघतो. ह्या गर्तेत आपण कायमचे अडकतो….

जाहिरातींच्या कचाटयातून बिचारे केस सुद्धा सुटले नाहीत. “लंबे, घने, काले बाल” जाहिरातींमध्ये बघून बघून त्याच प्रकारचे केस म्हणजे सौंदर्याचे लक्षण होय असं जन मानसात गेली अनेक वर्ष बिंबवलं गेलं आहे. ह्या प्रचारामुळे अनेक लोकांना आपण किती कमनशिबी आहोत असं वाटत राहते. मग आपण ही “लंबे, काले, घने बालो के लिये” म्हणून अनेक पर्यायांची निवड करू लागतो. त्यावर सातत्याने भरपूर पैसे खर्ची घालतो. हे खरंच गरजेचं आहे का? हा प्रश्न स्वताः ला विचारून त्यावर चिंतन करत नाही. हल्ली अगदी कमी वयाचे स्त्रिया आणि पुरुष ही आपले केस अगदी नियमित पणे न चुकता रंगवून  घेतात. सरळ केस कुरळे करून घेतात किंवा कुरळे असतील तर सरळ करतात. थोडक्यात काय, जे आपल्याकडे नाही ते आपल्याला हवं असतं आणि ते कुठल्याही किमतीला आपण विकत घेत असतो.

उमेदीचा काळ सरून गेला की असं लक्षात येतं की कितीही moisturizer चोपडले तरी त्वचेचा कोरडेपणा काही कमी होत नाही. कितीही shampoo, conditioner वापरले तरी केसांचा पोत मुलायम होत नाही. हाताला, पायाला भेगा तर पडतच राहतात. आणि आपण त्याच त्याच ठिकाणी (म्हणजे सौन्दर्य प्रसाधनां मध्ये) ह्यावर उपाय शोधत राहतो. चेहऱ्यावर डाग पडले किंवा मुरूम पुटकुळ्या आल्या की जाहिराती बघून नवीन काहीतरी विकत आणतो किंवा beauty parlour मध्ये जाऊन चेहऱ्यावर काही प्रक्रिया करतो…ती सुद्धा एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करत रहावी लागते. सौन्दर्य, त्याहीपेक्षा तारुण्य टिकवण्यासाठी आपण आपल्या चेहऱ्यावर आणि केसांवर chemicals चा मारा करत रहातो.

अगदी प्रामाणिक पणे सांगायचं तर मी स्वतः कमी-अधिक फरकाने ह्या सर्व टप्प्यातून गेले आहे. काही वर्षांपूर्वी मात्र मला हलकेच एका प्रसंगाने सावध केलं. माझ्यावयाची एक आई जेंव्हा तिच्या लेकीच्या समस्यांसाठी सौन्दर्य प्रसाधनांमध्ये उपाय शोधताना दिसली तेंव्हा मला लहानपणी ची मी आठवले. जवळ जवळ नोकरीला लागे पर्यंत मी क्वचितच beauty parlor मध्ये प्रवेश केला होता. आमचं beauty parlor आमच्या घरातच होतं आणि beautician म्हणजे आमच्या मातोश्री! सर्व समस्यांवर स्वयंपाक घरातील रोजच्या वस्तू वापरून ईलाज केले जायचे. केसात कोंडा झाला, खोबरं आणि मेथी रात्री भिजत घालायची आणि सकाळी वाटून केसांना लावून ठेवायची…केस धुतले की कोंडा गायब आणि केस मुलायम! चेहऱ्यावर पुरळ किंवा फोड आले तर जायफळ उगाळून त्याचा लेप लावणे, दर रविवारी न चुकता शिकेकाई ने केस स्वछ धुणे, अधून मधून साबणा ऐवजी डाळीचे पीठ वापरणे असे अनेक उपाय योजना असत तिच्या जवळ. माझ्या पिढीतील आई ला मात्र हे काही ठाऊक नसावे, ह्याचं मला खूपच वाईट वाटलं! त्या क्षणा पासून फक्त केस कापण्या पुरतीच beauty parlor मध्ये जाऊ लागले.

२०१२ साली मला गंभीर अपघात झाला. नशिबाने त्यातून काही गंभीर परिणाम न होता मी पूर्ण बरी झाले. सक्तीच्या विश्रांतीच्या काळात मी स्वतःवर प्रयोग करू लागले. कोणत्याही रासायनिक पदार्थ न वापरता आपली त्वचा आणि केस ह्यांची निगा राखता येते का ते बघायचं ठरवलं. साबण, shampoo चा वापर ठरवून कमी करता करता पूर्ण बंद करून टाकले. आणि आश्चर्य म्हणजे मला माझ्या त्वचेत आणि केसांवर खूप चांगले बदल घडून येताना दिसले. मुळात त्वचेला साबण लावणं बंद केलं त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण खूपच कमी झालं. आधी उटणं नियमित वापरू लागले, मग लक्षात आलं की उटणं रोज लावायची गरज नाही. उटण्या ला स्वस्त आणि घरातले पर्याय म्हणजे वेगवेगळी पीठं वापरून बघितली. घरच्या घरी फळांच्या साली पासून scrubs करू लागले. संत्री किंवा आंब्याच्या साली उन्हात खडखडीत वाळवून mixer मध्ये वाटून घेतलं असता उत्तम scrub घरच्या घरी तयार होतं. त्वचा कोरडी वाटली तर तेलं आणि अत्यल्प प्रमाणात मधमाशी चं मेण किंवा कोकम खडा वापरून vaseline किंवा moisturizer तयार करू लागले. अजून एक महत्वाचं म्हणजे आपली त्वचा आणि केस हे आपल्या प्रकृतीचे निदर्शक आहे हे मान्य करून जर त्वचा आणि केस ठीक नाहीत, तर आपलं काय चुकतंय हे शोधायचा प्रयत्न करू लागले.

सौन्दर्य प्रसाधनांमधील रसायनांचा पर्यावरणात प्रदूषण करण्याला हातभार लागत असतो. रसायना व्यतिरिक्त त्या प्रसाधनांची वेष्टने सुद्धा पर्यावरणीय घन कचऱ्यात भर टाकत असतात. पर्यावरणाचा विचार करणं कदाचित प्रत्येकाला जमेल असं नाही कठीण ही वाटेल. पर्यावरण तूर्त बाजूला ठेऊन आपण निदान आपल्या प्रकृती चा विचार करणं गरजेचं आहे. सौन्दर्य प्रसाधनांमधील अनेक रसायनं ही आपल्या प्रकृतीला घातक असतात. काही रसायनं तर carcinogenic म्हणजे cancer होण्यासाठी कारणीभूत असतात, हे आपल्याला ठाऊकच नसतं . आपण कुठली रसायन अप्रत्यक्षरीत्या वापरतो आहोत आणि सातत्याने वापरल्यामुळे त्याचे शरीरावर काय परिणाम होतात निदान हे जाणून घेऊन मग ते वापरायचं की नाही हे ठरवावं.

वाढत्या वयाबरोबर lipstick आणि nailpolish ह्या गोष्टी तर कधीच माझ्या कपाटातून हद्दपार झाल्या होत्या . आता तर कुठलीही सौन्दर्य प्रसाधने विकत घ्यावीच लागत नाहीत. “हर बात होगी मनचाही..जब शुरुवात हो सही”, जाहिरातीच्या ह्या ओळीचा दुसरा अर्धा भाग आधी आमलात आणला, तर पहिला अर्धा भाग आपसूक साधला जातो ह्याचा मी स्वतः गेली काही वर्षे सातत्याने अनुभव घेते आहे. आणि हो, पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी माझा खारीचा वाटा देऊ शकते , ही आणखीन समाधानाची बाब!

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१०-मे-२०२१

9 thoughts on “हर बात होगी मनचाही….

  1. फार छान. घरगुती उपाय आजकाल माहीत नाही आणि पिढी प्रमाणे गायब होतात आहे.
    या पिढी ला शिकवणे फार गरजेचे आहे. संस्कृती आणि परंपरा, पिढीजात आलेले आणि पारखलेले उपाय ह्याचे महत्त्व आणि शिकवण गरजेची आहे.

    Like

  2. अगदी सोप्या भाषेत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मांडणी केली आहे.

    Like

  3. उत्तम, काँर्पोरेट जगातली मानसिकता आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करणे नाकारण्याच्या व्रुत्तीचा लेखामधे छान उतरला आहे. alternatives किती साधी, सोपी,कमी खर्चिक आहेत पण तब्येतीला मानवणारी शिवाय पर्यावरण स्नेही हे छान दाखवले आहे. हा लेख पण जास्त विस्त्रुत मंचावर जायला पाहिजे. आपले ग्रूप्स हे कन्व्हरटेड व्यक्तींंचेच आहेत. वेगवेगळ्या प्लँटफाँर्मस्वर जरूर पाठव.
    स्वाती गोळे

    Like

    1. धन्यवाद स्वाती madam! मी नक्की पाठवीन मला माहित असलेल्या सर्व ग्रुप्स वर

      Like

  4. सुंदर लेखन.मला काॅलेजात असताना खूपपिंपल्स यायचे. मग आजीने त्यावर ज्वारीचं पीठ पाण्यात कालवून लावायला सांगितलं.ते थंड गुणधर्माचं असल्यिने पिंअल्सची उष्णता ओढून घ्यायचं आणि पिंपल्स जायचे.
    या सगळ्याच्या आहारी जाण्याचं मुख्य कारण म्हणजे चंगळवादाकडे वाढत असलेला कल. मनाच्या सौदर्याकडे पहायला कुणाला वेळच नाही आहे सध्या.घरगुती उपाय तर दूरच. मुलतानी माती आणि हळद चंदन पण मी लावलं आहे चेहर्‍याला.मागच्या वर्षी पूर्ण लाॅकडाऊन कोकणातल्या घरी शुद्ध हवेत राहिल्याचा फायदा जाणवला कीचेहरा आपोआप नितळ होत गेला.सर्वांना अशी सोय उपलब्ध असेल असं नाही.पण घरगुती वापरून पहायला काहीच हरकत नाही.छान लिहीलं आहे तुम्ही.

    Like

  5. खूपच सुरेख आणि वेगळ्या विषयावर लिहिले आहेस, हे करायला खरंच खूप धाडस लागते, कारण प्रवाहाविरुद्ध
    आणि सवई विरुद्ध जाणे अवघड. तुझ्याकडे मुचरी ला आलो होते त्यावेळेस ही तू बरेच घरगुती उपाय सांगितले होतेस, जेवढे जमेल तेवढे अमलात आणत आहेच.

    Liked by 1 person

  6. Mazya mulichya janmapasun tila fakt coconut oil ani utane ani harbhara baliche pith vaprle. Janmapasun Gele 6 varsh aamhi vegveglya weather conditions madhyehi kadhle pan tila kadhich kuthle skin disease zale nahit.skin and hair are pure virigin. So I totally agree with the information you said above. Very well written articles!!

    Like

Leave a reply to Vishal Park Cancel reply