वाळवणं

वाळवणं हा एक अस्सल भारतीय वारसा आणि माझा अत्यंत आवडता उद्योग!. वाळवणं घालायचा मुख्य हेतू हा असावा की शेतातील अतिरिक्त उत्पादनं विविध प्रक्रिया करून उन्हं देऊन ते टिकवण्याचा कालखंड वाढवणे. वर्षा च्या ज्या काळात धान्याचं किंवा भाजीपाल्याचं दुर्भिक्ष असेल, त्या वेळी हे वाळवलेले जिन्नस उपयोगात आणायचे. भारतातील विविध भागात त्या त्या प्रांतातील परंपरेनुसार गृहिणी वाळवणं घालत असत. सूर्याची ऊर्जा वापरून आपल्याला आवडतात ते विविध पदार्थ वर्षभरासाठी करून ठेवणे. ही कल्पनाच किती जबरदस्त आहे!

मला वाळवणं घालायला आवडणे ह्याचे मुख्य कारण अर्थात माझं लहानपण. आयुष्याच्या सुरवातीला मुंबईत असून सुद्धा अगदी वरच्या मजल्यावर घर होतं. त्यामुळे आई होळी आणि गुढी पाडव्याच्या मधल्या पंधरवड्यात वाळवणं घालीत असे. चिकवड्या आणि कुरडया हे वर्षभर तळण म्हणून आणि वर्ष भराच्या तूर डाळीला उन्हं “लावून” मग साठवून ठेवणे ही कामं न चुकता दर वर्षी असत.

चिकवड्या करणे म्हणजे आमच्या साठी धमाल उपक्रम. सकाळी लवकर उठून आई आदल्या रात्री भिजवून ठेवलेला साबुदाणा शिजवून त्यात जिरे घालून मिश्रण तयार ठेवत असे. नंतर गच्चीवर plastic पसरून त्या वर चमच्याने साबुदाण्याच्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या पापड्या घालायच्या. संध्याकाळी उन्हं उतरली की ते plastic घरी घेऊन यायचे आणि अर्धवट वाळलेल्या पापड्या त्यावरून सोडवायच्या. सकाळी पापड्या घालून झाल्यावर साबुदाण्याच्या मिश्रणाचे पातेलं लक्ख चाटून घेतलेलं असे. संध्याकाळी चिकवड्या plastic वरून सोडवताना एक परातीत आणि एक तोंडात अश्या क्रमाने काम चालू असे. त्या अर्धवट वाळलेल्या चिकवड्या खाणं म्हणजे स्वर्ग सुख. दुसऱ्या दिवशी ह्या पापड्या परत उन्हात ठेवायच्या आणि त्या दिवशी संध्याकाळी कढईत तेल तापवून चिकवड्या तळून खायच्या! अश्या रीतीने चिकवड्यांची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होत असे!

मी पहिली-दुसरीत असतानाचा वाळवणाचा एक धमाल किस्सा आहे. सालाबाद प्रमाणे आईने चिकवड्या केल्या. मला ही छोटया वाटीत चिकवड्यांचे मिश्रण आणि plastic चा एक कोपरा दिला होता. त्या दिवशी एक कावळा आमची नजर चुकवून चिकवड्या लांबवायच्या प्रयत्नात होता. मी कार्यकर्तीच्या भूमिकेत शिरले आणि आईला सांगितलं की मी राखण करायला गच्चीवरच थांबते, नाहीतर हा कावळा आपल्या चिकवड्या खाऊन टाकील. आई निर्धास्त होऊन खाली निघून गेली. मी एका हातात काठी ची तलवार घेऊन “राखण” करू लागले. तो चतुर कावळा मला पुरून उरला. त्याने एका चिकवडीत चोच घातलीच. मी चिडले आणि माझी तलवार घेऊन त्याच्या मागे गच्चीभर धावू लागले. अचानक माझा पाय घसरला आणि मी जोरदार आपटले. मला काही समजेना की अचानक आपण घसरलो कश्या.. आणि एकदम जाणीव झाली की आपल्या सर्वांगाला कसले तरी चिकट द्रावण लागलं आहे. अजून एका क्षणा नंतर लक्षात आलं की कावळ्याला हकलायच्या नादात आपण गच्चीला पूर्ण फेरी मारली आहे आणि ज्या चिकवड्यांची राखण करायला आपण गच्चीवर थांबलो होतो त्यावरच आपण पाय घसरून पडलो आहोत. अत्ता हे लिहिताना सुद्धा मला खूप हसू येतंय, पण त्यावेळी मला नक्की जे वाटत होतं ते म्हणजे अपमान, फजिती, आणि आई रागवेल ही भीती, ह्या तिन्ही भावनांचे एक अनामिक मिश्रण होते. खाली जाण्याशिवाय पर्याय नव्हता. घरात शिरल्यावर आईला काय समजायचं ते समजलं आणि तिने एक अक्षर ही न उच्चरता मला थेट bathroom मध्ये shower खाली उभं केलं.

पुण्यात राहायला आल्यावर तळमजल्यावरील वास्तव्य आणि त्यावेळच्या सोसायटी मध्ये मैदान राखून ठेवलेले असल्यामुळे पुण्यात ही वाळवण घालत असू. पण जस जसा काळ पुढे सरकत गेला, शहरांमधील मोकळ्या जागाच नाहीश्या झाल्या. स्वछ सूर्यप्रकाश ही इतकी मुबलक आणि फुकट ऊर्जा आता दुर्मिळ झाली. इतकी की साधे कपडे वाळत घळण्यापुरेस ऊन देखील कुणाच्याही घरात शिरू शकत नाही. मधल्या काळात बायका ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी धंद्याला लागल्या आणि हा वाळवणाचा वारसा काळाच्या पडद्याआड गडप होतोय की काय अशी भीती वाटू लागली. मग ठरवलं की आपल्या घरात जिथे आणि जितकं ऊन मिळतं तितकी तरी वाळवणं घालायचीच. गच्चीवर भरपूर ऊन आहे, त्याचा पुरेपूर वापर करायचा. मग रुचिरा, स्वयंपाक अशी पुस्तकं काढली आणि वाळवणं करायचा एकच सपाटा लावला. दर वर्षी जमेल तेंव्हा आणि जमेल ते वाळवण घालतेच. चिकवड्या, सांडगे,  सांडगी मिरची, तांदुळाच्या फेण्या, कच्च्या केळीचे पीठ, दह्यातली भेंडी, कांदयचे काप, कारल्याचे काप, गेला बाजार आवळा candy, छुंदा आणि गुलकंद सुद्धा …

तांदुळाच्या फेण्या

कोकणात घर बांधल्यावर तर “ऊन” ही एक पर्वणीच झाली आहे. वाळवणं घालायच्या मौसमात तिकडे जाता येईल असं नाही. पण गेलोच तर चिकवड्या किंवा सांडगे जे पटकन करता येईल आणि एक दोन दिवसात तयार होईल अशी वाळवणं घालतेच. तिकडे वाळवण कार्यक्रम केला असता त्या वेळी घरात असलेले आबालवृद्ध त्यात भाग घेऊ शकतात, ही अजून एक जमेची आणि मौजेची बाजू. अश्याप्रकारे वाळवणं घालणं ही कुटुंबा बरोबर “Quality time” मिळवण्याची एक अमूल्य अशी संधी आहे असं मला वाटतं.

कुटुंब रंगलंय “सांडग्यात “

कोकणात गेल्यामुळे माझ्या वाळवणाच्या यादीत अजून भरच पडली आहे. आता तर कधी कोकम फळं मिळाली तर आमसुलं आणि कोकम सरबत, अतिरिक्त आंबे आणि फणस झाले तर आंबा पोळी किंवा फणस पोळी असे ही पदार्थ करू लागले. अर्थात मी केलेली आंबा पोळी किंवा फणस पोळी ही बाजारात मिळते त्या स्वरूपा पर्यंत कधीही पोचू शकत नाही. “वाढता वाढता वाढे” च्या चालीवर “वाळता वाळता खावे” असं म्हणत घरातील मंडळी त्या अर्धवट वाळलेल्या पोळ्यां फस्त करून टाकतात….

हे सर्व वाचून अनेकांना प्रश्न पडू शकेल की बाजारात ह्या सर्व वस्तू मुबलक आणि रास्त किंवा स्वस्तात मिळत असताना हा खटाटोप कश्यासाठी? मुळात, मी सुरवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे वाळवणं हा आपला वारसा नक्कीच आहे आणि तो वारसा किंवा ते ज्ञान पुढच्या पिढी साठी जपून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे हे मी मानते. त्याचबरोबर एखादी वस्तू कशी किंवा कशापासून बनते हे ज्ञात असणं हे ही तितकेच गरजेचं आहे. मला पहिल्यांदा कोकम फळं मिळाल्यावर कोकणातल्या माझ्या चुलत सासूबाईंना आमसुलं कशी करतात हे विचारून त्या प्रमाणे आमसुलं केली. करायला सुरुवात केल्यावर माझ्या डोक्यात शंकेचं काहूर माजलेलं होतं की ह्या लाल चुटुक कोकम फळांची कुट्ट काळी आमसुलं कशी काय होतील…पण सात पुटं चढवल्यावर म्हणजेच कोकम फळांच्याच रसात सात रात्र कोकम फळांची सालं भिजवून सकाळी वाळत घातली की काळी कुट्ट आणि अनेक वर्षे टिकणारी आमसुलं तयार होतात. ही अद्भुत प्रक्रिया मी स्वतः आमसुलं केल्या शिवाय मला समजलीच नसती कधी. आता बाजारात आमसुलं विकत घ्यायला गेलं की चटकन समजतं की ही सात पुटी नाहीत किंवा टिकाऊ ही नाहीत.

वाळवणं म्हणजे गप्पा-गोष्टी करायची अनोखी संधी

अनेकांना असं ही वाटत असेल की आपला वारसा जपावा, किंवा आपल्या आई-आजीचे खास वाळवणाचे पदार्थ शिकून आत्मसात करून आपल्या लेकरांना खाऊ घालावे. पण आता शहरात राहून हे कसे जमवायचे ? कारण शहरात वापरता येईल असा सूर्यप्रकाश मिळायची ठिकाणे गायब झाली आहेत. मला अनेकवेळा असं वाटते की शहरातील लोकं एकमेकांना काही न काही कारणाने भेटत असतातच. भेटून गप्पा आणि खाणीपिणी करताना एखाद्या वाळवणाचा उपक्रम का नाही योजत? Barbeque party असेल तर सगळे चटकन तयार होतात. तिकडे आपल्या हाताने टिक्का भाजून घेतातच की. हे पाश्चिमात्य fad इकडे नव्याने रुजवण्या पेक्षा आपल्याला वारसा म्हणून लाभलेलं वाळवण का नाही करत? Get-Together साठी एखाद्या farm house वर जमतो, तेंव्हा तिकडे सर्वांनी मिळून हासत खिदळत सांडगे किंवा चिकवड्या किंवा पापड असे काही केले आणि नंतर ते पदार्थ वाटून आपापल्या घरी नेले तर प्रत्येक वेळी त्या चिकवड्या तळताना किंवा ते पापड खाताना आपल्याला त्या वेळी केलेल्या मजेचा पुनःप्रत्यय घेता येऊ शकतो, नाही का?

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१८-एप्रिल-२०२१

9 thoughts on “वाळवणं

  1. सुंदर शब्दांकन आणि एकत्र जमून वाळवणं करायची कल्पना भन्नाटच

    Like

  2. वा,शिवांगी, वाळवणं हा वारसा आहे ही कल्पना, अप्रतिम 👍👍🙏

    Like

  3. वाळवण एक वारसा ही कल्पना मला इतकी आवडली आहे म्हणून सांगू
    तुझा शब्द किती योग्य आहे
    सूर्याची शक्ती शोषून घेतलेली वाळवण त्यासोबत गप्पांचा आनंद
    खूप खूप आवडलं

    Like

  4. खरंय, वाळवणं हा तर किती चांगला वारसा आहे आपल्याला मिळालेला. या वाळवणाप्रमाणंच “बेगमीचे पदार्थ” हा ही ! आई किती प्रकारचे पाक, लोणची, मसाले, मेतकुट, डांगर, भाजण्या करून ठेवायची, ते सगळं,
    पानातली डावी बाजू, कधी अचानक पाहुणा आला की गोडधोड, जास्तीचं तोंडीलावणं असं उपयोगी पडायचं. ती मॅनेजमेंट फार भारी असायची !

    तू सुचवलेला उपाय, म्हणजे “एकत्र जमून गप्पा करत वाळवणं करणे” हा तर भन्नाटच आहे. मी तयार आहे. 😀😀 पूर्वी वाड्यात रहात असताना आम्ही मुलीही आयांबरोबर पापड लाटायला शेजारी पाजारी जायचोच की , ती आठवण आली बघ ! किती छान दिवस होते…

    Liked by 1 person

  5. छान लिहिलेस घरी केलेल्या पदारथांची टेस्ट काही वेगळीच
    आम्ही पण लहानपणी हे सगळे अनुभवले आहे

    Liked by 1 person

  6. खूप मस्त लिहिलं आहेस
    खरंच हा वारसा जमेल तेव्हा आणि जमेल त्याने जपला पाहिजे आणि त्यातून पोट पूजा तर होतेच आहे हे विसरून कसं चालेल

    Liked by 1 person

  7. Very well written Shivangi.Really liked the idea of spending quality time with family/friends and getting home made healthy food ready. Win win situation really by treasuring our heritage. These small changes to the lifestyle will improve our health and well being and help the environment as well. Thanks

    Liked by 1 person

  8. खरंच लहानपणी वाळवणं गच्चीवर घालताना खूप मज्जा यायची, लेख वाचून आठवणी जाग्या झाल्या. अलीकडे मी आणि माझी बहीण एक वर्ष पापड करायचा उद्योग केला. मजा आली होती. वाचून परत करावं, असं वाटायला लागले. वाळवणं ह्याला वारसा म्हटलंय, ही कल्पना फार आवडली.

    Liked by 1 person

  9. अरे जबरी!! आम्हीही नाशिकला राहत असताना, लहानपणी, दर उन्हाळ्यात हा कार्यक्रम हमखास असायचा! तसंच गहू, तांदूळ, ज्वारी निवडणे हा देखील सगळ्यांनी एकत्र बसून आणि आई कडून काही न काही ऐकण्याचा कार्यक्रम व्हायचाच! Sharing, चर्चा, हे आणि ते यांची गम्मत असायची त्यामध्ये. अजून देखील माझे पुतण्या, पुतणी, भाच्चा, भाच्ची त्यांच्या आयांनी केलेलं वाळवण एन्जॉय करतात, ते कर म्हणून आग्रह करतात हे बघून छान वाटतं. दोनच वर्षांपूर्वी गच्चीमध्ये वाळवणाला राखण म्हणून काठी आणि पुस्तक घेऊन बसलो होतो. काठी फक्त अधूनमधून आवाज करण्यासाठी म्हणजे पुस्तकातून तोंड बाहेर काढावे लागू नये! तुझा लेख वाचून हे सगळं आठवलं, त्याचं खासपण जाणवलं… 🙂

    Liked by 1 person

Leave a reply to सुप्रिया Cancel reply