रांगोळी

ऐंशी च्या दशकात मी पहिल्यांदा मुंबईहून पुण्याला राहायला आले, अर्थात आई-बाबांन बरोबर. बाबांना त्यांच्या office चे quarters मिळाले होते. सोसायटी मध्ये सर्व बँकेचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय. बहुतेक सर्व “आई” मंडळी त्याकाळी घरीच असायची आणि त्यामुळेच सर्व सण अगदी साग्रसंगीत पार पडायचे. सण म्हटलं की त्यातील एक अविभाज्य घटक म्हणजे रांगोळी.  

आपल्या संस्कृती मध्ये रांगोळी ला विशेष स्थान आहे. दारात रांगोळी असणे हे शुभ मानलं जातं, आणि अश्या घरात सर्व आगंतुकांचे अगदी न चुकता आदरातिथ्य होणार हे दारातली रांगोळी जणू सांगत असते. दारी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत दारात असलेल्या प्रसन्न रांगोळीने झाले, की प्रवासाचा निम्म्याहून अधिक शीण दूर होत असे. कुठल्याही प्रसंगाची शुभसुचकता ह्या रांगोळी मुळे अधोरेखित होत असे.

साधारण नाताळ ची सुट्टी लागली की राव काकूंची विजया दिवे लागणीच्या सुमारास आमच्या building च्या समोरील चौकोन झाडून घ्यायची आणि नंतर पाण्याचा सडा घालून निघून जायची. हे सर्व आमच्या खिडकीतून दिसत असे. पहिल्या वर्षी आठ-नऊ वर्षांची मी आता पूढे काय घडणार ह्याची वाट बघत खिडकीत बसून राहिले होते. रात्रीची सर्व कामे आवरल्यावर राव काकू आणि विजया परत खाली आल्या आणि मी आवाक होऊन बघत राहिले. राव काकूंनी साधारण चार फुटी चौकोन भरून ठिपक्यांची रांगोळी काढली…मी तात्काळ आई ला वर्दी दिली. काही क्षणातच मी, आई आणि माझी बहिण अपूर्वा बाहेर अंगणात रवाना झालो. रांगोळी काढून झाल्यावर त्यांनी आणि विजयानी त्यात सुंदर रंग भरले. एकीकडे त्यांच्या आणि आईच्या गप्पा चालू होत्याच. त्यात ही आनंद वार्ता मिळाली, की हा रांगोळी काढण्याचा कार्यक्रम संक्रांती, म्हणजे त्यांच्या पोंगल पर्यंत, असाच नेमाने चालू राहणार आहे आणि तो सुद्धा दर वर्षी…मग काय, पुढची अनेक वर्षे आम्ही राव काकूंना ह्या रांगोळ्यांमध्ये रंग भरायला मदत करत असू. संक्रांतीच्या आदल्या रात्री ची रांगोळी म्हणजे सूर्याचा रथ असे आणि त्यानंतर ह्या  रांगोळ्यांच्या उत्सवाचा समारोप होत असे, पुढच्या वर्षी पर्यंत.

चैत्र महिन्यात चैत्रांगण  आणि दिवाळीत ठिपक्यांची रांगोळी आई नेमाने दारा बाहेर काढायची. मी शेजारी बसून मनात येतील ते प्रश्न तिला विचारीत असे. “आई, रांगोळी कशी तयार होते?” हा असाच मला पडलेला  प्रश्न.आईने सविस्तर उत्तर दिले, “रांगोळी चा खास दगड असतो, तो खाणीतून काढून, कुटून त्याची रांगोळी बनवतात”. थोडी मोठी झाल्यावर ह्याच्या पुढचा प्रश्न विचारला होता. “खाणीतले रांगोळीचे सर्व दगड संपले की मग काय होणार?” म्हणजेच जगातली सर्व रांगोळी संपली, तर रांगोळी काढणार कशी? आईने त्यावेळी काय उत्तर दिले आता आठवत नाही. पण जगातली सर्व रांगोळी संपली तर आपण रांगोळी काढायची कशी, ह्या समस्येने मी मात्र बरेच दिवस अस्वस्थ झाले होते.

मी स्वतः आई झाल्यावर आणि मुले लुडबुड करायच्या वयाची झाल्यावर मी पुन्हा दिवाळीत रांगोळ्या काढु लागले. अगदी राव काकूंसारख्या भव्यदिव्य नाही, पण घरातील एक कोपरा रांगोळी साठी राखीव ठेवला होता. दरम्यान बाजारात रांगोळीचे अनेकानेक रंग मिळू लागले होते. दर वर्षी नवीन रंग घ्यायला गेलं की अजून नवीन नवीन रंग छटा बाजारात दिसत. गाड्या भरभरून रांगोळीचे रंग मला भुरळ पाडत आणि मी दिवाळीचे चार दिवस रोज नवीन रांगोळी काढून त्यात रंग भरत असे. मुलांची सुद्धा लुडबुड चाले त्यात. जशी रंगांची भाऊगर्दी वाढत गेली तशी माझ्या एक गोष्ट लक्षात  येऊ लागली. ती म्हणजे दर वर्षी दिवाळी झाली की मी रांगोळी काढण्यासाठी वापरलेल्या बोटांना भेगा पडतात आणि त्या नंतर अनेक आठवडे, महिने तश्याच राहतात . ज्या वर्षी रांगोळी काढली नाही, त्यावर्षी मात्र बोटं अगदी नितळ! हळूहळू रंगांचे निरीक्षण केले आणि लक्षात आले की त्यांना कसला तरी उग्र वास देखील आहे. सर्व निरिक्षणांअंती मी निष्कर्ष काढला की रांगोळीचे विविध रंग हे chemicals पासून बनवलेले आहेत, हे नैसर्गिक नाहीत. लहानपणी रांगोळीचा दगड संपला तर रांगोळी कशी काढणार, ह्या विचाराने जशी अस्वस्थ झाले, तशी ह्या रासायनिक रंगामुळे नक्की कशा कशाचे नुकसान होत असेल, ह्या विचाराने बेचैन झाले!

तो पर्यंत “eco-friendly holi colors” असं ऐकू यायला लागलं होतं आणि नैसर्गिक पदार्थांपासून हे रंग करता येतात हे ही ऐकले होते. पण रांगोळ्यांचे  सार्वजनिक वेड तर दिवसागणिक वाढत होतेच. त्याला काही पर्याय असू शकेल का? त्यात एक दिवस fridge मध्ये एक बीट लोळत पडलेलं दिसलं. सुरकुत्या पडून पडून म्हातारं झालेलं आणि त्यामुळे दुर्लक्षित. अचानक लहानपणी “ज्ञानदीप” किंवा तत्सम कार्यक्रमात एक मुलाखत बघितलेली आठवली. दक्षिण भारतात पांढरी रांगोळी ही तांदूळ भिजवून वाटून त्याची पातळ paste करून मग त्यात एक चिंधी बुडवून काढली जाते. हे त्या कार्यक्रमात बघितलं होतं. बीट खाताना होणारे लालेलाल ओठ सुद्धा आठवले आणि एकदम “Eureka Moment” अनुभवला!

बीट सोलून, किसून त्याचा रस काढून घेतला. त्यात मूठभर तांदूळ रात्रभर भिजवले. सकाळी हे तांदूळ सावलीत वाळत ठेवले. खडखडीत वाळल्यावर मिक्सर मध्ये वाटले. फिकट गुलाबी रंगाचा तांदुळाचा रवा तयार झाला. लागलीच दारात छोटीशी रांगोळी काढली आणि त्यात हा गुलाबी रवा “रंग” म्हणून भरला! सासूबाई सकाळी फिरून आल्या आणि लगेच म्हणाल्या “काय सुंदर दिसतीये दारातली रांगोळी”. गुलाबी रंगाचे गुपित सांगितल्यावर दोन्ही हात जोडून म्हणाल्या  “धन्य आहेस! सुचलं कसं हे तुला?”  त्यानंतर मात्र असे रंगीत “रवे” करायचा छंदच  लागला जणू! नैसर्गिक रंग शोधण्यासाठी बागेत धाव घेतली. कुठले ही फुल, पान, फळ चुरडून बघायचं. रंग करता येईल असं  वाटलं तर जी बीटाच्या बाबतीत केली तीच प्रक्रिया करायची . प्रयोग करता करता आता मी मायाळू च्या फळांन  पासून गुलाबी, गोकर्णा च्या फुलांन  पासून फिकट निळा, जासवंदी  च्या पानांन  पासून फिकट हिरवा, झेंडू च्या फुलांन पासून पिवळा आणि केशरी असे पाच रंग तयार करू शकले. 

मायाळूच्या फळांपासून तयार झालेला गुलाबी रंग
जासवंदी च्या पानांपासून तयार केलेला हिरवा आणि झेंडू पासून तयार केलेले पिवळे आणि केशरी रंग
झेंडू आणि मायाळू
गोकर्ण, झेंडू आणि मायाळू

ह्या माझ्या प्रयोगांनी आणि शोधांनी दोन गोष्टी साध्य झाल्याचे समाधान आहे. एक म्हणजे रांगोळीचे रंग पूर्णताः नैसर्गिक पदार्थांपासून तयार झाले. त्यामुळे मला स्वताःला खूपच फायदा झाला. हाताची बोटे आता कायम नितळ राहू शकतात. त्याचबरोबर रंगातील सर्व पदार्थ निसर्गातून मिळाले आहेत, त्यामुळे हे रंग वापरल्याने निसर्गाची कुठलीही हानी होत नाही. ही रांगोळी आवरताना ती बागेतील कचऱ्यात टाकली तरी तिच्यामुळे कुठल्या जीवजंतूंचे नुकसान होत नाही आणि तिचे पूर्णपणे नैसर्गिक विघटन होऊन जाते.

तांदुळा पासून रंग बनवले हे माझ्या काही स्नेही मंडळींना खटकले. त्यांचे म्हणणे की तेच तांदूळ कोण्या गरजूला उपयोगी पडले असते. मला मात्र रस्त्यातून काढलेल्या भव्य आणि रंगीत रांगोळ्या बघितल्या की वाटतं ह्या पद्धतीने रांगोळी ची हौस भागवण्यापेक्षा एखादवेळेस एखादा रिकाम्यापोटी झोपला तरी हरकत नाही. निदान माझ्या रांगोळी मुळे माती, कीटक, त्या कीटकांवर पोसणारे पशु, पक्षी ह्यांचे तरी काही नुकसान होणार नाही!

ज्यावेळी पर्यावरण पूरक जीवनशैली चा विचार केला जातो, त्या वेळी Renewable आणि Non-Renewable resources चा विचार करावाच लागतो. Non-Renewable resources म्हणजे अशी संसाधने एकदा वापरली की परत वापरता येत नाहीत. उदाहर्णाथ खाणीतून काढलेला रांगोळीचा दगड. एकदा काढून त्याची रांगोळी केली की संपला. निसर्गात तो दगड पुन्हा तयार होत नाही किंवा तो तयार होण्या साठी लाखो वर्षांचा कालावधी जावा लागतो. त्यामुळे पर्यावरणपूरक विचार करायचा झाला तर अशी संसाधने वापरावीत जी एकदा वापरून संपत नाहीत किंवा त्याचे पुनरुत्पादन अगदी कमी कालावधीत सहज शक्य आहे (उदाहर्णाथ तांदुळ). दक्षिण भारतात पारंपारिक रांगोळी ही तांदुळा पासून काढली जाते. रंग सुद्धा तांदुळापासून करता येतोय, तर आता नक्कीच तांदुळाची पिठी रांगोळीला पर्याय म्हणून वापरता येईल. म्हणजेच आता रांगोळीचा दगड संपला (देव करो आणि असं न होवो) तरी रांगोळी नक्कीच काढता येईल. ही दुसरी समाधानाची बाब!

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१०-फेब्रुवारी-२०२१

12 thoughts on “रांगोळी

  1. खूपच छान!
    समस्येचं विश्लेषण करून त्यावर उचित तोडगा कढणं व तो पूर्णत्वास नेणं हे असामान्यत्वाचं लक्षण आहे व तुझ्या अनेक क्रुतीतून ते दिसून येतं. ह्या एकाच कारणास्तव माझे तुला अनेक सलाम. त्यातील कलात्मकता, सुबकता व पर्यावरणीय नेणिव अलाहिदा.

    Liked by 1 person

  2. छान लिहिले आहेस आणि लोकांना खरे eco फ्रेंडली रंग कसे बनवायचे ते ही कळले

    Liked by 1 person

  3. शिवांगी, तुझा रांगोळी प्रवास वाचानिय तर आहेच शिवाय त्यातून तुझी पर्यावरणा विषयी असलेली जागरूकता साहजिकच पुढे येते. मला स्वतः ला रांगोळी फार छान जमत नाही आणि त्याचे खूप वैषम्य वाटते आणि जे कोणी चांगली रांगोळी काढू शकतात त्यांचं खूप कौतुकही वाटते . मलाही अलीकडे हे खूप वाटू लागले आहे की शहरातील रस्त्यांवरील रांगोळ्या दिसायला छान दिसल्या तरी नंतर इतस्तता विखुरल्यावर प्रदूषणाला हातभारच लावतात. तुझ्या या ब्लॉग मुळे वाचणाऱ्या सर्वांमध्ये नैसर्गिक रंगांबद्दल उत्सुकता निर्माण होऊनआणि एका बदलाची सुरवात होऊ दे !

    Liked by 1 person

  4. केवढा महत्वाचा विषय आहे! जेवढ्या जास्त लोकांना हा aspect कळेल तेवढं चांगलं… त्यातले जेवढे जास्त समजून घेऊन बदल करतील तेवढं बरं होईल. तुम्ही हा विषय सहज लक्षात येईल असा गोष्टीरूपात सांगितलं आहे आणि फोटो ही टाकले आहेत! बेस्ट आहे!! Fwd करतो…

    Liked by 1 person

  5. रासायनिक रंग भसाभसा वापरून रांगोळ्या काढलेल्या पाहून जलचर प्राणी ह्यांची असहायता वाटते.
    पण ह्या रांगप्रयोगा मुळे निसर्गाची हानी थांबवू अशी आशा वाटू लागली.
    मीठ हे माध्यम ही वापरू शकतो का

    Like

    1. मीठ पाण्यात अथवा मातीत गेल्याने त्यांचे गुणधर्म बदलू शकतात. अणि हे पाण्यातील आणि मातीतील प्राणी मात्रांना घातक ठरू शकतं. तांदूळ, मैदा ह्या गोष्टी मात्र प्राण्यांसाठी अन्न म्हणून उपयोगी पडू शकतं

      Like

Leave a reply to सुप्रिया Cancel reply