Tweety, Cherry आणि Sobo तिघे आमची दत्तक मुलंच जणू….फक्त ती मांजरं आहेत…आता अनेक वर्षांच्या सहवासाने त्यांचे स्वभाव, त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या भावना माहीत झाल्या आहेत…कुठल्या मांजराचे “म्याव” म्हणजे नक्की काय, त्याचा अंदाज आता बऱ्याच वेळी बरोबर येतो. Tweety आणि Cherry मांजरी असल्यामुळे त्यांना घर प्रिया आहे. त्यांच्यासाठी “घर कोंबड्या” हे विशेषण अगदीच चपखल लागू पडेल.

ह्या दोघी कायम माझ्या पाळतीवर असतात…Office मधून परत आले की माझ्या गाडीचा आवाज ऐकून माझ्या स्वागताला न चुकता दारात उभ्या असतात! मी कधी ही बाहेर जाऊन आले, कि त्यांचा जीव भांड्यात पडतो आणि त्या खूप आनंदी होतात! त्यांच्याशी गप्पा मारल्या की सुरेख प्रतिसाद देतात. मी कुठले ही काम करत असले तर मला सोबत करतात. माझ्या कामात हातभार लावता येतो आहे का ह्याचा ही प्रयत्न असतो. “Company” देण्याच्या सवयी मुळे Tweety चे इयत्ता नववी पर्यंत चे भाषा विषय आणि इतिहास, भूगोलाचा अभ्यास झाला आहे असं म्हटलं तरी चालेल..

Sobo बोका असल्याने “उडानटप्पू”. भुकेच्या वेळी घाई घाई ने घरी येतो आणि भरा भरा खाऊन तुरुतुरु बाहेर पसार होतो. अश्यावेळी हटकले तर बघून न बघितल्यासारखं करतो आणि ठरवलेल्या दिशेला धूम ठोकतो. अधून मधून दिवस च्या दिवस गायब असतो. अश्या “गायब” episodes नंतर बरेचदा घरी जखमी अवस्थेत परत येतो. कधी कुठल्या बोक्यानं शेपटी जवळ जोरात चवलेलं असतं, कधी चेहऱ्यावर ओरखडे असतात, कधी मारा मारी मध्ये एखाद्या पायाला दुखापत झालेली असते, कधी भयंकर घाबरलेला ही असतो. एकदा कुत्र्याच्या कचाट्यातून कसाबसा सुटून गंभीररित्या जखमी होऊन ही आलेला होता…
मी आपली रोज न चुकता सकाळी खायच्या वेळी त्याला खिडकीतून हाक मारत…आणि तो यायच्या परिस्थितीत असेल तर हाक ऐकून येतो.

ह्या वर्षी पावसाळ्यात मला मागच्या सोसायटी मधील मिसेस रांगोळे ह्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या की बहुतेक तुमची मांजरी आमच्या इकडे आली आहे आणि ती खूप ओरडते आहे. लगोलग मला त्यांनी photo काढून पाठवला. बघते तर Sobo. तसा ही त्याचा एक “गायब” episode चालूच होता. धो धो पावसात मी त्याच्या कडे पोचले. आमच्या घराच्या अगदी मागच्या बाजूला असलेल्या building मध्ये पाचव्या मजल्यवर बिचारा आर्त स्वरात ओरडत होता…मी ही कासावीस झाले, वाटलं बिचारा किती घाबरला आहे, काही सुचत नाहीये त्याला, आणि इतक्या सर्व घरां मधून बरोबर मांजर आवडणारी व्यक्ती कशी काय सापडली त्याला, कमालच आहे! म्हणून त्याच्या हुषारीचं कौतुक ही वाटलं मला. कसंबसं त्याला घरी आणलं आणि खायला घातलं…खाऊन पुन्हा Sobo पसार झाला..
त्यानंतर मिसेस रांगोळे अगदी नियमितपणे त्याची चौकशी करत आणि कधी त्यांच्या कडे आला तर लगेच मला update ही देत. Sobo सुद्धा अधून मधून त्यांच्याशी गप्पा मारायला गेल्यासारखा तिकडे जाऊ लागला.
तीन-चार दिवसापूर्वी रात्री मांजरांच्या भांडणाचा जोर जोरात आवाज आला. मला अंदाज आलाच की बहुतेक Sobo ला कोणी बलाढ्य बोका मारत असावा…आता हा कुठल्या परिस्थितीत असेल कोण जाणे. मी आपली नित्यनेमाने त्याला खिडकीतून हाक मारायची आणि त्याच्या वाटचे मासे बाजूला ठेऊन द्यायची…
माझं भुकेलं, घाबरलेलं पोर किती दिवस उपाशी आहे अश्या विचारात असतानाच अचानक काल मिसेस रांगोळे ह्यांनी त्याचा फोटो पाठवला…अगदी आरामशीर गादीवर पहुडलेला होता…विचारपूस केल्यावर कळले की तीन-चार दिवसांपूर्वी जी मारा मारी झाली त्यात Sobo ने Gigy नावाच्या एका मांजरीला तिच्या राहत्या घरातून हुसकून, तिकडे ठाण मांडलं होतं.

अरे देवा! हे कार्ट असं वागेल असं माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. तर मिसेस रांगोळे म्हणल्या की Gigy चे आई-बाबा गावाला गेले आहेत, त्यामुळे Gigy ला त्या रोज खाऊ घालतात. पण ह्याने तिला हकलून दिल्यामुळे, तिचा खाऊ हाच रोज मटकवतो आहे…आता Gigy ला कुठे हुडकायचं ते कळत नाहीये. मी म्हणाले, तरीच तो घरी येत नाहीये. तर त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली, म्हणाल्या की Sobo आमच्या सोसायटीत Sobo Datar म्हणून famous आहे. सर्व बायकांशी तो भरपूर गप्पा मारतो, पण पुरुषांना मात्र घाबरतो…हे सर्व ऐकून, मी फक्त घेरी येऊन पडायची बाकी होते…
सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
२९ नोव्हेंबर २०२०
छान वर्णन केलेस
असेही एक friend circle असावे
LikeLike
शिवांगी सोबॊ दातार भन्नाट च, बी वयाच्या स्वभावाचे वर्णन एकदम तंतोतंत, नेहेमीपेक्षा वेगळा हलका फुलका लेख, आवडलाच
LikeLike
खूप छान आणि खुसखुशीत लिहिलं आहेस.
मांजरांना स्व-भाव असतात हे, त्यांच्या “भाव खाण्याच्या” मला आलेल्या अनुभवानं लक्षात आलंय.
सोबो भन्नाट !
पुलं एके ठिकाणी म्हणतात तसं, “बोक्याला इंग्लिशमधे “डांबिस” म्हणत असावेत” हे अचुक पटतं
😄😄
LikeLike
प्रतिमा पुलप्रेमी ❤️❤️❤️
LikeLike