लहानपणी आई-बाबांन बरोबर पुण्यातील मंडई मध्ये दर रविवारी आठवड्याची भाजी घेऊन यायचा कार्यक्रम न चुकता असे. त्या फेरफटक्यात काही फळे आणि भाज्यांची खरेदी अगदी लक्षात रहायची, जसं लाल चिंच (ती अजून ही फक्त मंडई आणि तुळशीबागेत मिळते), चण्या-मण्या बोरं, करवंद, जांभळं, शेंबडी बोरं (पोरं नाहीहं! आता दोन्ही अजिबात दिसत नाहीत), केळफूल, फणस, सिमला मटार, उंधियो च्या special भाज्या, इत्यादी. ह्या special भाज्या घेतल्या की मग घरी येऊन त्या निवडणे हे एक सर्वांनी मिळून करायचं काम असे..मटार सोलताना पातेल्यात कमी आणि पोटात जास्त जाणार हे गृहीत धरूनच भरपूर आणलेले असायचे. वर्षातून एकदा थंडीत न चुकता उंधियो चा कार्यक्रम असायचाच. मग तो पूर्ण दिवस विविध प्रकारची पापडी निवडणे, मेथीचे गोळे करणे, सुरण, कोनफळ, कच्ची केळी चिरून देणे अश्या कामांमध्ये जायचा. दुपारी ४:३० च्या सुमारास आई उंधियो फोडणीला टाकीत असे…संध्याकाळी तयार झाला की मग येता जाता उंधियो वर ताव मारायचो आम्ही. आता ह्या उंधियो पुराणाचा आणि ह्या लेखाच्या शिर्षकाचा काय संबंध असं म्हणाल… पण थांबा, लवकरच हात घालते त्याला!
लग्नानंतर सुद्धा अनेक वर्ष मी, शेखर आणि मुले न चुकता उंधियो खायला हजेरी लावायचो. तो कधीतरी आई कडून शिकून घ्यायचा असं ठरवलं होतं. एक वर्ष आईकडून यादी लिहून घेतली आणि आईला घरी येऊन मला शिकवं असे सांगितलं…त्या यादीत एक महत्वाची वस्तू होती आणि ती म्हणजे ओली हळद! उंधियो “उंधियो” सारखा लागण्यात ह्या हळदीचा खूप मोठा वाटा आहे. मला पहिल्यांदा हळद पूड आणि ओली हळद ह्याच्या वापराने चवीत काय फरक पडतो ते कळलं.

हळद मनात भरण्याचं अजून एक कारण होतं, ते सुद्धा लहानपणीच. पावसाळ्यात आई मंडईतून कधीतरी हळदीची पाने आणीत असे. त्या पानांचा वास मला भारी आवडायचा आणि आज ही आवडतो. ही पाने वापरून आई आमच्यासाठी पानगी करीत असे…पानगी हे क्वचित खायला मिळणारे पक्वान्न एकदा खाऊन आम्ही वर्षभर त्याची आठवण काढत असू. मैत्रेय आणि अथर्व “आई खाऊ दे ना!” ह्या वयाची झाल्यावर त्यांना आपले पारंपरिक पदार्थ खायला घालू लागले आणि मला पानगी आठवली. हळदीची पाने आणायला माझा मोर्चा थेट मंडईत. तिकडच्या भाजी विक्रेत्यांनी फुकट lecture दिलेच…आहो, हळदीची पाने आत्ता कुठे, ती पावसाळ्यात मिळतात, त्या वेळी या, मी हात हलवत घरी परत. पुढच्या पावसाळ्यात लक्षात राहील ह्याचा नेम नाही. अशी बरीच वर्षे पानगी शिवाय गेली.



एक वर्षी उंधियो च्या भाज्या घेताना अचानक युक्ती सुचली. म्हटलं आपण ओली हळद घेतो आहोत, तीच कुंडीत पेरली तर घरच्या घरी हळदीची पानं मिळतील. पाहिजे तेंव्हा पानगी करता येईल. म्हणून हावरटपणा करून चांगली अर्धा किलो ओली हळद घेतली. घरी येऊन कुंडी तयार करून त्यात लावली सुद्धा (जानेवारी मधे) आणि रोज न विसरता त्याला पाणी घालू लागले. हळद काही उगवली नाही. मी म्हटलं गेले पैसे मातीत आणि नाद सोडून दिला. ५-६ महिन्यांनी एक दिवस अचानक हळद पेरलेल्या कुंडीतून भरपूर कोंब फुटलेले दिसले आणि मला कोण आनंद झाला! ह्या सर्व प्रक्रियेतून माझ्या नकळत माझं एक प्रकारे शिक्षण होत होतं. ते म्हणजे हळद (आणि त्या नंतर इतर झाडे झुडपं) वेळ आली की आपोआप रुजतात आणि वाढतात, तोपर्यंत ते मातीत निद्रिस्थ असतात.

त्या नंतर पानगी साठी हळदीची पाने आणि उंधियो साठी ओली हळद मला कधीही विकत आणावी लागली नाही. हळदीची पाने मोदक वाफवताना सुद्धा वापरू लागले ज्यामुळे मोदकांना हळदीची छान चव येते. कधीतरी चहा करताना सुद्धा एखादं पान घातलं तर छान वास येतो चहाला.


कोकणात घर बांधले त्या नंतरच्या पावसाळ्यात अशीच मंडईमधून अर्धा किलो ओली हळद घेतली आणि तिकडच्या बागेत पेरली. त्यावेळी काही विशेष विचार केला नव्हता. वर्षभरानंतर हळद काढली तर खूपच ओली हळद निघाली. हे म्हणजे आता सोसायटी बाहेर वाटे करून विकावी लागणार की काय असं वाटलं. मग म्हटलं की ह्याची पावडर करावी. You Tube विद्यापीठाकडे धाव घेतली. हळद उकळत्या पाण्यात शिजवून नंतर बारीक तुकडे करून खडखडीत वळवली. वाळवलेली हळद खूप नव्हती, त्या मुळे मिक्सर वर वाटली. वाळलेल्या हळदीचा रंग बाहेर मिळणाऱ्या हळकुंडा सारखा नव्हता, त्यामुळे मी बऱ्यापैकी साशंक होते. पण मिक्सर चं झाकण उघडलं आणि पुन्हा सुखद धक्का बसला, सुरेख हळदी रंगाची पूड तयार झाली होती. ही हळद मी औषध म्हणून अनेक महीने जपून ठेवली होती.

कोकणात हळद लावायचं प्रमाण हळूहळू वाढवत नेलं. गेले ४-५ वर्ष कोकणात केलेली हळद वापरतो आहोत. आता थोड्या जास्त प्रमाणात हळद लावतो. पूर्णपणे शेणखत आणि फक्त पावसाच्या पाण्यावर वाढवलेली, तिकडेच स्वच्छ करून शिजवून वाळवलेली. आम्हला लागते तेवढी बाजूला काढून बाकीची ज्यांना हवी त्यांना विकत देतो.


हळद कोकणात करायचा उद्धेश फक्त इतकाच की हा बहुगुणी, औषधी पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात शुद्ध स्वरूपात असावा. ज्या वस्तूला आपण औषधाचे स्थान दिले आहे, तिच्या शुद्धतेची खात्री कुठल्या प्रमाणपत्राने का द्यावी? नाही का? उंधियो आणि पानगी साठी लागणारी हळद कुंडीत लावून प्रयोग करता करता आम्ही आता दार वर्षी हळदीचे पीक घेऊ लागलो आहोत. बागेत हळद लावणे चालूच आहे, आता कधी पेरायची विसरले तरी आधीच्या वर्षी ठीक ठिकाणी मातीत राहिलेली हळद पावसाळा सुरू झाला की मला “हॅलो” म्हणायला कधीच विसरत नाही!!

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
३०-जुलै-२०२०
खूपच छान
LikeLiked by 1 person
धन्यवाद!
LikeLike
मस्त लेख.
बहुगुणी हळद कुंडितही छान येते.. आणि मीदेखिल या वर्षी भरपूर लावली आहे … बघुया…
LikeLiked by 1 person
धन्यवाद! हो कुंडीत सुद्धा येते. घरच्या घरी हळदीची पाने हवी असतील किंवा थंडीत लोणचं करायला हवी असेल तर कुंडीत लावलेली हळद पुरते…
LikeLike
Very nicely written… Reflect all my own feelings and experiences… Consider growing ambe halad too in your farm…. It’s a wonderfully satisfying experience
LikeLiked by 1 person
Thank you! Yes, we will try growing different varieties. That however will require more dedicated efforts and commitment. It is surely in the plan
LikeLike
Well written article
LikeLiked by 1 person
Thank-you!
LikeLike
खुप छान वर्णन लिहिलं आहेस..
हळद किती बहुगुणी आहे हे सर्वानाच माहित आहे पण तू ज्या पद्धतीने खुलवून सांगितलय ते अगदी रुचकर 😋 हो👍
LikeLiked by 1 person
धन्यवाद! वरती सांगितलेले सर्व “रुचकर” पदार्थ करून ही बघ आणि सांग मला कसे झाले होते ते 🙂 😉
LikeLike
हळदिबाबत आमचेदेखिल असेच काहीसे झाले. गोव्यात जमीनीतून आपोआप उगवलेल्या हळदीने कुतूहल जागृत केले. तिथून सुरुवात झाली व आता, गेली दोन वर्षे, आम्ही कोकणच्या एका कोपऱ्यात, इतर फळाफुलांसमावेत आवर्जून हळद देखिल लावत आहोत.
गंमत म्हणजे काहीच वर्षांपूर्वीपर्यंत हळद व कर्दळ यातील फरक मला कळत नव्हता!
LikeLiked by 1 person
खूप छान! एकदा अनुभवल्यावर हळद आणि कर्दळ ह्यात कधीच गल्लत होणार नाही आता, नाही का?
LikeLike
Felt Really wonderful to see the way you write and all is explained so well. Thank you
LikeLiked by 1 person
Thank-you!
LikeLike
एकदा वाचला होता
आज त्यातल्या अधिक माहितीसह खूप छान वाटला
असेच तुझे सगळे अनुभव सांगत रहा
पेरत रहा
LikeLike
धन्यवाद!
LikeLike