कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात सण, उत्सव हे अगदी बेताने, मोजून मापून करायची पद्धत दिसून येते. त्यावरून विनोद निर्मिती, टोमणे हे ओघाने आलेच. दीड दिवसाचा गणपती आणि खड्यांच्या गौरी ह्या दोन गोष्टींवरून तर कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबांना कंजुषी आणि काटकसरीच्या परमोच्च स्थानावर नेऊन बसवलं आहे. बरं ह्याला काही अपवाद जरी असले तरी सरसकटीकरण झालेलं दिसतं. अर्थात कोकणस्थ मंडळी हे टोमणे तेवढ्याच ताकदीने टोलवीत असतात हे वेगळं सांगायची गरज नाही.
माझ्या माहेरी फक्त गणपती बसवत असू. गौरी नसायची. आजू बाजूला कोकणस्थ गोतावळ्यात ही गौरी बद्दल काही विशेष उत्साह, खळबळ कधी दिसली नाही त्यामुळे कधी त्याबद्दल उत्सुकता वाटली नाही. मग पहिल्यांदा देशस्थ कुटुंबातील गौरी ची सजावट बघितली, खूप छान वाटली. गौरी म्हणजे गणपती ची आई हे नव्याने कळलं. पण माझा पुढचा प्रश्न तयार होता. आई एक आहे, मग दोन मुखवटे का बरं? उत्तर तयार होतं. आई आणि तिची सखी किंवा मैत्रीण . पण परत पुढचा प्रश्न तयार होताच माझा. मग गणपती च्या आदल्या दिवशी हरतालिका असते. तेंव्हा ह्याच दोघींची पूजा होते, मग परत का बरं करायची पूजा? एव्हाना कुठल्या तरी आजीचे किंवा आईचे धपाटे खाण्याच्या range मध्ये मी आलेली असायची. पण मला काही संयुक्तिक उत्तर मिळालं नाही.
लग्न झाल्यावर सासरी गौरी-गणपती असतात ह्याचा पत्ता लागला. इथे मात्र खड्यांच्या गौरी बसतात हे कळलं. आधी वाटलं होतं की गौरीचे खडे म्हणजे काहीतरी विशेष प्रकारचे खडे असतील. पण खडे म्हणजे बागेतील किंवा कुंडीतील खडे बघितल्यावर माझी पार निराशा झाली. पाणवठ्यावरून सात खडे आणायचे किंवा तुळशीतून खडे आणायचे आणि त्याची पंचोपचारी किंवा षोडशोपचारी पूजा करायची आणि गणपती शेजारी त्यांची स्थापना करायची. लहानपणी पडलेले सर्व प्रश्न सासूबाईंना विचारले. त्यांच्याकडेही उत्तरं नव्हती. धपाट्यांच्या जागी “आम्ही नाही बाई असलं काही आमच्या सासूबाईंना विचारलं. कर म्हणल्या ते केलं” हे फक्त ऐकायला मिळालं. असो, कुळाचार म्हणून सर्व करत राहिले.
गेल्यावर्षी गणपती – गौरी उत्सवा दरम्यान माझ्या वाचनात श्री. मकरंद करंदीकर ह्यांचा एक लेख आला. Whatsapp वरील “माहितीपर” लेख मी सहसा वाचत नाही. पण लेखाचं शीर्षक होतं “कोकणस्थ ब्राह्मणांच्या गौरी ७ खड्यांच्या का ?” शीर्षक वाचल्यावर मला कोण आनंद झाला. इतके वर्ष मी जी उत्तरं शोधत होते ती आता मिळणार होती. मुळात मला जे प्रश्न पडले होते ते अजून कोणाला तरी पडले होते आणि त्याची उत्तरं ही मिळाली होती ह्याचा जास्त आनंद झाला होता.
श्री. मकरंद करंदीकर ह्यांनी सात खडे का ह्याचे विस्तृत विश्लेषण दिले आहे. त्याची पार्श्व भूमी ही सांगितली आहे. कोकणात पावसाचे प्रमाण खूप जास्त असते. पाणवठा आणि महिला वर्गाचा खूपच जवळचा संबंध. नळ योजना गावांमध्ये पोचायच्या आधी पूर्वापार रोजच्या वापरासाठी पाणी भरणे, भांडी घासणे, कपडे धुणे वगैरे ही सर्व कामे स्त्रिया करत आणि ते ही पाणवठ्यावर जाऊन. पावसाळ्यात अश्या ठिकाणी अपघात, अपमृत्यु होण्याची शक्यता खूपच जास्त. अश्या घटना घडल्या की त्याबद्दल अनेक भय कथा, गूढ कथा, दंत कथा तयार होतात आणि आपोआप भीतीचे वातावरण तयार होतं. आणि भक्ती ऐवजी भीती पसरवली जाते.
पुढे लेखात, श्री. करंदीकर लिहितात की आपल्या पुराणात सप्त तीर्थ, सप्त मातृका, सात नद्या ह्या संकल्पना मांडलेल्या आहेत. त्याच बरोबर सप्त देवतांची सुद्धा संकल्पना मांडलेली आहे. विहिरी, तळी, सरोवर, पाणवठे अश्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे असं मानलं जातं. कोकणस्थांकडे ह्या सात देवतांची सात खड्यांच्या रूपात पूजा केली जाते. खडे रूपी देवता घरात घेताना “ज्येष्ठे, श्रेष्ठे, तपोनिष्ठे, धर्मीष्ठे, सत्यवाहिनी, समुद्रवसने देवी, ज्येष्ठा गौरी नमोस्तुते।” ह्या श्लोकाचे उच्चारण करायची पद्धत आहे.
ह्या सप्त देवतांची नावे मत्सी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा, मकरी अशी आहेत. आता ही नांव नीट बघितली तर लक्षात येईल की ही जलाचरांची नावे आहेत – मत्सी म्हणजे मासा, कूर्मी म्हणजे कासव, कर्कटी म्हणजे बहुदा खेकडा, मकरी म्हणजे मगर, इत्यादी.. ही माहिती वाचली आणि ज्येष्ठा गौरी च्या सणा बद्दल माझ्यात विशेष उत्साह संचारला. म्हणजे ज्येष्ठा गौरी हा सृजनाचा सण आहे आणि त्या मध्ये ह्या सप्त देवतांना पुजले जाते. एवढ्यावर माझे शंका निरसन झाले होते. पण मला आपल्या संस्कृती बद्दल, सणां बद्दल अजून एक सुखद धक्का बसणार होता ह्याची हा लेख वाचताना मला कल्पना ही नव्हती.
गेली काही वर्ष सरकार पुण्यातील नदी किनारे सुशोभिकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. ह्याला पर्यावरणवादी मंडळी विरोध करत आहेतच आणि अनेक नागरिकांनाही सरकारने मांडलेल्या सुशोभिकरण पद्धती मान्य नाही. त्या मध्ये असलेली झाडे तोडून तिथे concrete ओतून काही “सुधारणा” करण्याचे नियोजन सरकारने केलं आहे. माझा ह्या सगळ्याला अर्थातच विरोध आहे. मुळात नदी स्वतः इतकी सुंदर असते, त्याला सरकार कुठली शोभा आणणार? ते ही असंख्या मोठाली झाडे तोडून! ही माझ्या सामान्य बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे. माझ्या कडून काही माफक प्रयत्न मी करत असते. कुठे मोर्च्यात सामील झाले, कुठे petition वर सह्या केल्या, कोणाला पत्र पाठवलं. ह्या सगळ्या गोष्टींनी खरच काही उपयोग होईल का अशी शंका मनात येत राहते.
ह्याच संदर्भात गेल्यावर्षी परिणीती दांडेकर ह्यांचे एक व्याख्यान माझ्या ऐकण्यात आले. नदी हा परिणीती दांडेकर ह्यांच्या खास अभ्यासाचा विषय. नदी सुशोभिकरण ह्या विषयाला अनुसरून त्यांचे व्याख्यान होते. सामान्य नागरिकांनीं नदी सुशोभिकरण चांगले की वाईट हे कसे ठरवायचे ह्या बद्दल ची त्रिसूत्री त्यांनी ह्या व्याख्यानात मांडली होती. ती त्रिसूत्री म्हणजे “झाड – डोह – मासा”. म्हणजेच ज्या सरकारी किंवा अन्य योजनांमुळे नदीशी संबंधित असलेल्या ह्या तीन घटकांना त्रास होईल किंवा त्याचे नुकसान होईल त्या गोष्टी करणे टाळायच्या.
ह्या तिन्ही सूत्रांचे महत्व त्यांनी समजावून सांगितलं. नदी साठी झाड का महत्वाचं, तर बहुतांश नद्यांचा उगम हा झाडा खाली असतो. म्हणून झाडे वाचवणे हे अतिशय महत्वाचं. मासे अर्थात नदीतील जीव. नदीमध्ये concrete किंवा तत्सम गोष्टी वापरल्या तर निश्चितच नदीतील जीव सृष्टी धोक्यात येईल. नदीतील जीव सृष्टीला धोका निर्माण झाला की त्यावर अवलंबून असलेले उभयचर, पक्षी आणि प्राणी ह्या सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून मासे धोक्यात येतील अश्या सर्व गोष्टी टाळणे. तिसरा घटक म्हणजे नदीचा डोह. नदीचा डोह हा नदीचा सर्वात सृजनशील भाग. म्हणजे नदीतील जलचर नदीतील डोहात आपल्या पुढच्या प्रजेला जन्माला घालतात. म्हणून डोह अत्यंत महत्वाचा. त्याला जपलं पाहिजे.
पुढे त्यांनी जे सांगितलं त्याने खरोखर मी आपल्या पूर्वजांच्या विचारा पुढे नतमस्तक झाले. आपल्या पूर्वजांकडे नदीची काळजी कशी घ्यायची ह्याची निश्चित संकल्पना होती. नदी जपायची म्हणजे नदीचे डोह जपायचे. पण नदीचा डोह सामान्य माणसाने कसा ओळखायचा? परिणीती दांडेकर ह्यांनी पुढे सांगितलं की महाराष्ट्रात अनेक नद्यांच्या काठी “साती आसरा” (म्हणजे करंदीकरांच्या लेखात वाचलेल्या सात अप्सरा किंवा सप्त देवता) ची मंदिरे आहेत. जसे आजकाल आपण Google वर एखादे ठिकाण “pin” करून ठेवतो, तशी ही मंदिरं म्हणजे पूर्वीच्या काळची “pinned locations” असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सामान्य माणसाला नदीचा डोह जपा असं म्हटलं तर कदाचित नाही कळणार. पण त्याला सांगितलं की साती आसरांची पूजा करा, तर त्या अनुशंघाने नदीचा डोह आपोआप जपला जाईल, ही योजना आपल्या पूर्वजांनी केली.
Google मध्ये दिसणारी साती आसरांची मंदिरे
पूर्वजांचे हे विचार आपल्या पर्यंत पोचले नाहीत हे आपले दुर्दैव! हे विचार माहिती नाहीत म्हणून आपण सहज आपल्या चालीरीतीना, सणांना “irrelevant” ठरवून त्यांना आपल्या आयुष्यातून दूर करून टाकतो. किंवा त्या “सुधारण्याचा” प्रयत्न करत राहतो. आज काल बाजारात ज्येष्ठा गौरी पुजण्यासाठी सोन्या-चांदीचे खडे मिळू लागले आहेत. काही ठिकाणी तर चपट्या गोल दगडांवर सात देवींचे चेहरे रंगवून विकत मिळतात. मुळात ह्या सणाची संकल्पना जर नदी आणि त्यातील जलचर ह्यांचे पूजन आहे तर नदीवरून प्रत्येक जलचराचा एक असे सात खडे आणून त्यांची पूजा करणं हा किती साधा, सोपा, संयुक्तिक विचार आहे. साती आसरा ज्या ठिकाणी आहेत तिकडे जाऊन पूजे साठी खडे आणले तर वर्षातून एकदा तरी साती आसरा ह्यांचे ठिकाण बघून नदीचा डोह व्यवस्थित, सुरक्षित आहे ना, हे आपण तपासून बघू शकतो, हा ह्या पूजेचा मुख्य उद्देश. पूजेच्या रूपाने पूर्वजांनी आपल्या खांद्यावर नदी च्या संरक्षणाची जबाबदारी दिली आहे हे ह्या निमित्ताने मला नव्याने उमजले आहे! ही जबाबदारी कशी पार पाडता येईल आता ह्याचा विचार करते आहे…
उंडी अर्थात Calophyllum inophyllum! श्री. द. महाजन सरांच्या पुस्तकात वर्णन वाचलेलं आणि फुलाचा, फळाचा photo बघितलेला. वर्णन वाचून कोकणात समुद्राजवळ वाढणारे हे झाड आपण आपल्या घरा जवळ लावावे असं वाटलं. मनात ईच्छा आली आणि त्याची ताबडतोप अंमलबजावणी केली. आठ वर्षांपूर्वी पावसाळ्यात उंडी चे रोप आणून कोकणातील घरा जवळच्या कुरणातील आमच्या छोट्या जागेत लावलं ही. पण ते काही जगलं नाही.
पूर्वी बहिणीने उंडीचे एक रोप तिच्या पुण्याजवळील farm house मध्ये लावलं होतं ते बघितलं होतं. पण जवळ जवळ आठ दहा वर्ष ते रोप जैसे थे! ना त्याची उंची वाढली, ना त्याला भरभरून पालवी आली. मध्ये कधीतरी ते ही रोप सुकून गेलं. पुण्याचे हवामान त्याला मानवले नाही बहुदा.
कोकणातील आमचे घर समुद्रा जवळ नाही, जंगला जवळ आहे म्हणून रोप जगलं नाही का? म्हटलं एवढ्यात निष्कर्षापर्यंत नको यायला. पहिलं रोप गेल्यावर पुन्हा प्रयत्न करावा म्हणून अजून दोन उंडी ची रोपं आणून लावली. पण ह्यावेळी घरा च्या अंगणात, अगदी नजरे समोर. ही योजना लागू पडली आणि दोन्ही रोपांनी तग धरला आहे.
पण एका झाडाचे फक्त वर्णन वाचून त्या झाडाला आपल्या जवळ वाढवावे असं तुम्हाला का बरं वाटलं? इतकी सुंदर सुंदर झाडे आपल्या आजू बाजूला असताना कोणीही कधीही न ऐकलेले झाड, का मुद्दाम आणून लावायचे आपल्या घरात? असे प्रश्न पूर्वी खूप जण आम्हाला विचारत.
काही वर्षांपूर्वी केलेल्या Ecological Society च्या अभ्यासक्रमात आम्हाला वनस्पती शास्त्राची ओळख करून दिली होती. माझ्या सुदैवाने ओळख करून देणारे होते प्राध्यापक श्री. द. महाजन. अकरावी-बारावी मध्ये अगदी नीरस वाटले अश्या पद्धतीने शिकवलेले वनस्पती शास्त्र आठवत होतं. त्यामुळे Ecological Society च्या वर्गात वेगळं काही शिकायला मिळेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. पण पहिल्याच वर्गात महाजन सरांनी आम्हा सर्वांना मंत्र मुग्ध केलं होतं. वनस्पतींची शास्त्रीय नावे कशी आणि का पडली इथपासून कालिदासाच्या मेघदूत मधील श्लोक आणि त्या मध्ये आलेली आपल्या देशी वृक्षांची माहिती ह्याने वर्ग गाजायचा! इतकं की झाडांबद्दल नुसतेच कुतूहल नाही तर त्यांच्या बद्दल प्रेम आणि आदर ही निर्माण झाला.
महाजन सर प्रत्येकवेळी शंका निरसन करायला उपलब्ध असणार नाहीत, म्हणून त्यांची “देशी वृक्ष” व “आपले वृक्ष” ही पुस्तके संग्रही ठेवली. त्यातील प्रत्येक देशी वृक्षाची माहीती वाचली की आचंबित व्हायला होत असे. इतकं की पुस्तकात वाचलेलं एखादं झाड रस्त्याने जाताना दिसलं की थांबून त्याचे निरीक्षण करणे हे सुरु झालं. त्याच बरोबर एखादे झाड दिसले आणि खूण पटली नाही तर त्याचे निरीक्षण करून घरी येऊन पुस्तकात शोध घ्यायचा हे ही करू लागले.
अस्सल भारतीय देशी वृक्षांचा आणि इतर वनस्पतींचा इतका समृद्ध वारसा असताना आपल्याकडे विदेशी वनस्पती का विकत घ्यायला लागावी? त्याचे कारण “देशी वृक्ष खूप हळू हळू वाढतात”! हे कारण काही आम्हाला पटेना. कोकणात झाडे लावायचं ठरलं तेंव्हा अस्सल देशी वृक्षच लावायचे हा विचार पक्का झाला आणि अस्सल देशी आणि “कोकणी” म्हणजे “कोकणातील देशी वृक्ष कोणते?” ह्यची माहिती मिळवू लागलो.
तर परत उंडी कडे वळू. उंडी हा मघाशी सांगिल्या प्रमाणे अस्सल देशी आणि कोकणात किनारपट्टीवर आढळणारा वृक्ष. त्याचे शास्त्रीय नाव हे त्याच्या पानांवरुन पडलं आहे. Calophyllum inophyllum ह्याचा अर्थ सुंदर पाने असणारा वृक्ष. आणि खरंच ह्याची पाने देखणी आणि अनोखी आहेत. पानांचे सौंदर्य त्यांच्या शिरांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचने मुळे आहे. पाने सुद्धा हिरवीगार आणि चकचकीत असतात. नवीन पालवी फुटलेलं उंडी चं झाड फारच तजेलदार आणि सुंदर दिसतं.
उंडी च्या पानांवरील समांतर शिरांचे जाळे
इतकी वर्ष मी पालवी आणि पाने बघूनच संतुष्ट होत होते. ह्या वर्षी मार्च महिन्यात उंडी जवळ गेले असता मला वरच्या फांदीवर चक्क फळं लागलेली दिसली. फळं आली म्हणजे फुलं येऊन गेली. फुलं बघता आली नाही किंवा बघायची राहून गेली म्हणून मनाला चुटपुट लागून राहीली, आता परत फुलं बघण्यासाठी पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार म्हणून.
उंडी ची फळं
पण आज सकाळी बागेत फेरफटका मारताना सहज उंडी कडे लक्ष गेलं आणि वरच्या फांदीवर चक्क एक फुल दिसलं. सर्व कामे आटोपून फुलाचे निरीक्षण करायला परत बागेत गेले. फुल बरंच उंचावर होत. एक फांदी धरून ते फुल माझ्यापर्यंत आणायचा प्रयत्न केला. पावसाचे भरपूर पाणी पिऊन कुरकुरीत झालेली फांदी तुटून माझ्या हातात आली. झाडाला अजून त्रास द्यायला नको म्हणून ती तुटलेली फांदी घेऊन घराकडे परत निघाले. बघते तर हातातल्या फांदीवर आणखी एक फुल आणि कळी! महाजन सरांनी फुलाचे, फळांचे आणि त्यांच्या उपयोगाचे बरेच वर्णन दिलं आहे. फुलं सुवासिक असतात असं ही लिहिलं आहे. अतिशय मंद सुखावणारा सुगंध आहे ह्या फुलाला. खूप ओळखीचा वाटावा असा. बहुतेक रानात ह्या फुलांचा गंध इतर फुलां बरोबर मिसळून येत असावा.
उंडी चे रोप रुजणे आणि ते फुलू फळू लागणे हे माझ्यासाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी महत्वाचे नाही. किंबहुना असं कोकणात लावलेलं प्रत्येक झाड रुजून फुलू फळू लागलं की तो आमच्यासाठी आनंदोत्सवच असतो.
Ollie च्या निमित्ताने टेकडीवर रोज फिरायला जाणं होतं. अमुक इतके अंतर अमुक इतक्या वेळेत चालून झालेच पाहिजे असा काहीही शिरस्ता नसतो. Ollie जशी मोरांचा, खारींचा मागोवा घेत घेत फिरत राहते, तशी तीच्या बरोबरीने चालत असते. ह्यामुळे पूर्वी ऐकलेली, पाहिलेली झाडे नव्याने ओळखू यायला लागली. अशीच नव्याने पुन्हा ओळख झाली ते पाचुंदा ह्या झाडाची. Ecological Society च्या अभ्यासक्रमात टेकडी ला भेट दिली तेंव्हा नाव कानावर पडलं होतं. पण ह्या वर्षी टेकडीवर ठीक ठिकाणी फुललेले पाचुंदा चे छोटेखानी वृक्ष दिसले आणि डोळ्याचं पारणं फिटलं. फुलांना सुद्धा मंद पण मसालेदार असा सुवास असतो हे ही कळलं.
पाचुंदाच्या पानावर सापडलेली आळी
काही दिवसांनी लेकाला आणि सूनबाईंना पाचुंदा च्या झाडावर एक आळी सापडली आणि सवयी प्रमाणे ते ती घरी घेऊन आले. मग तिला रोज खाऊ घालायचे म्हणून पाचुंदा च्या वृक्षाची मऊ मखमली पाने रोज घेऊन यायची, ह्याची ही घडी बसली. सर्वांना standing instruction होतीच की जे टेकडी वर जातील त्यांनी येताना २-३ पाने आणायचीच.
होता होता एक दिवस आळी ने कोष तयार केला आणि मग प्रतीक्षा सुरू झाली. आळी नक्की कोणाची आहे हे कळायला काही मार्ग नव्हता, त्यामुळे कोणते फुलपाखरू किंवा पतंग येतोय ह्याची वाट बघणं चालू होतं. आधी वाढवलेली असंख्य Common Mormon, Common Lime, Tailed Jay इत्यादी प्रजाती पेक्षा कोश खूपच छोटा होता, त्यामुळं छोटं फुलपाखरू अपेक्षित होतं. काल सकाळी Common Gull प्रजाती चे फुलपाखरू कोषातून बाहेर आहे. सुंदर आणि सुदृढ….त्याला बाहेर सोडताना मात्र ईजा झाली. मोगऱ्याच्या फुलावर त्याला सोडून दिले…नंतर मात्र ते दिसले नाही…ते उडून गेलं असावं अशी आशा आहे!
Ollie सहा महिन्याची होती त्यावेळी आम्ही बाहेरगावी जाणार म्हणून काही दिवस तिला कुत्र्यांच्या वसतिगृहात ठेवावं लागणार होतं. कुत्र्यांच्या वसतिगृहात नियम व अटींची जंत्री होतीच. वसतिगृह नक्की केल्यावर तिथल्या चालकाशी गप्पा मारत होते तेंव्हा तिने सांगितलं की Ollie चे वयात येण्याआधी operation करून टाक. मी माझा विचार सांगितला की तिला निदान एकदा तरी पिल्ले होऊ द्यावी असं मला वाटतं. त्यावर त्या वसतिगृहाची चालक एकदम चवताळली आणि माझा विचार खोडून काढत म्हणाली “अहो, तुम्हाला काय माहिती की ह्या कुत्र्यांना ही माझी पिल्ले आहेत, ह्यांची आपण काळजी घ्यायची असते, अश्या कुठल्या भावना नसतात. एका वेळी ७-८ पिल्ले जन्माला घालतात. जेमतेम ३-४ आठवडे त्यांना दूध पाजतात आणि मग सोडून निघून जातात. आपल्या मानवी भावना त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे rescue करणारी लोक, shelters ह्या यंत्रणांवर किती ताण येतो तुम्हाला माहिती आहे का? तिला ७-८ पिल्लं झाली तर तुम्ही सांभाळणार आहत का त्यांना?”. तिचे विचार ऐकून मी थक्क झाले होते. आपण श्वान प्रेमी म्हणवून घेणारी ही मंडळी इतकी कशी निर्दयी असतात. असो, तिच्या विचारांवर फुली मारून आम्ही आम्हाला जे योग्य वाटलं ते होऊ दिले.
साधारण १५-१७ दिवसांनी Ollie च्या पिल्लांचे डोळे उघडले. तोवर दिसत नसलं तरी आजूबाजूला होणारे आवाज, विविध कारणास्तव त्यांना केलेला स्पर्श कळत असावा. जानेवारी चे थंडीचे दिवस आणि जगाचा, जागेचा आवाका माहिती नसल्यामुळे सुरवातीला सर्व पिल्ले एकमेकांच्या अंगावर आणि नेमून दिलेल्या जागी झोपलेली असत. बरेचदा मऊ आणि गुबगुबीत गोळ्यांचा ढीग करून झोपायची. पिल्लांचे डोळे उघडायची प्रक्रिया सुद्धा अगदी सावकाश, निवांत होती. आधी एका पिल्लाचे डोळे कीलकीले झालेले दिसले. संध्याकाळ पर्यंत त्याचे डोळे पूर्ण उघडले तोवर दुसऱ्याचे उघडू घातले होते. साधारण दोन दिवसांनी सर्व पिल्लांचे डोळे पूर्ण उघडले होते. आधी बहुदा अंधुक दिसत होतं आणि मग दृष्टी स्पष्ट होत गेली. डोळे उघडले तरी अजून पायात ताकद आलेली नव्हती, त्यामुळे थोडे लटपट लटपट चालून पुन्हा लोळण घ्यायचे. डोळे उघडल्यावर जेमतेम २-३ दिवस आम्ही त्यांना त्यांच्या tub मध्ये घालून वरच्या मजल्यावर घेऊन जाऊ शकलो. नंतर मात्र tub मध्ये ते राहीचना. मग दोन दोन पिल्ले बखोटीला मारून वर नेत असू.
पायात ताकद आली आणि पिल्लांचा वावर घरभर होऊ लागला, आणि आता पर्यंत एका जागी शी आणि शू करणारी पिल्ले, चालता चालता, फिरता फिरता, खेळता खेळता घर भर शी आणि शू करू लागले. साधारण झोपून उठली की शू आणि पोट भरलं की शी अश्या ठरलेल्या वेळी दोन्ही कार्यक्रम पार पाडायचे. Ollie अगदी निघुतीने पिल्लांची घाण स्वच्छ करत असे. शू मात्र आम्हाला पुसून घ्यावी लागत होती. आम्ही मग २४ फडक्यांचे गणित बसवलं होतं. २४ फडकी खराब झाली की washing machine ची एक छोटी cycle लावायची आणि फडकी धुवून स्वच्छ करायची. ती वाळे पर्यंत पुढच्या शू ची वेळ होत असे. दिमतीला washing machine असून सुद्धा ह्या कामाने आम्हा दोघांचा पुरता पिट्ट्या पडायचा. रात्री पिल्लांना वरच्या मजल्यावर पोचवले की आम्ही दोघे थकून भागून झोपी जायचो!
साधारण पिल्ले तीन आठवड्यांची झाली आणि वसतिगृह चालकाची भविष्यवाणी खरी होताना दिसू लागली. Ollie पिल्लांकडे फिरकेच ना. एक दिवस तर तिची आचळे इतकी भरली की तिला चालणे ही जड जात होतं. पण पिल्लांपाशी ती फिरकली नाही. काय प्रकार आहे म्हणून मी पिल्लांना जवळ घेतले आणि लक्षात आलं की सर्व पिल्लांना खूप तीक्ष्ण दात आणि नखं आलेली आहेत. Ollie ला जवळ घेऊन तपासले तर पिल्लांचे दात आणि नखं लागून तिला खूप बारीक बारीक जखमा झाल्या होत्या. पिल्ले ३-४ आठवड्यांची झाल्यावर त्यांची आई त्यांना दूध पाजत नाही ह्या मागे तिचे बेजबाबदार वागणे नसून, तिला त्यामुळे होणारी इजा हे कारण आहे हे समजलं.
मग पिल्लांपेक्षा मला Ollie ची काळजी वाटली. की इतकं दूध तर येतंय, पण ती पिल्लांना पाजू शकणार नाहीये. पिल्लांना वरचे दूध देऊन त्यांची भूक भागवू शकत होतो. पण Ollie चे काय करायचे. एक दोन वेळा तिला सविता ने घट्ट धरून ठेवलं आणि मी पिल्लांना तिच्या जवळ पाजायला नेले. तिला खूपच त्रास झाला. पण इलाज नव्हता. नंतर तिच्या असंख्य बारीक बारीक जखमांवर खोबरेल तेल लावले. ह्या समस्येवर काहीतरी उपाय काढावा लागणार होता. डॉक्टर म्हणाले की पंप वापरून दूध काढा आणि पिल्लाना पाजा. म्हणजे ही दुहेरी कसरत होती. आधी झटापट करून पंप वापरून Ollie चे दूध काढायचे आणि नंतर ते बाटलीत भरून पिल्लाना पाजायचे. पंप आणि बाटली दोन्ही हजर झाले. पण आमच्या प्रयत्नांना यश येई ना. शेवटी Google मावशी कडे धाव घेतलीच . दोनच पर्याय होते, एक तर Ollie ने पिल्लाना दूध पाजलं पाहिजे जे सर्वात श्रेयस्कर, किंवा कुठले तरी औषध देऊन तिचे दूध येणे थांबवलं तरी पाहिजे. सुदैवाने दूध तयार होणे थांबवण्यासाठी कोणतेही औषध उपचार सापडले नाहीत. एक उपाय सापडला जो करून बघणं सहज शक्य होतं . तो म्हणजे Ollie ला दोन दिवस उपाशी ठेवणे. पुढचे दोन दिवस Ollie ला उपाशी ठेवलं आणि चमत्कार झाल्या सारखा तिचा पान्हा आटला. ह्या उपायाने तिला बऱ्यापैकी आराम पडला. पिल्लांच्या खाण्या पिण्याची मला चिंता नव्हती. आधी एक दोन दिवस त्यांना साधे दूध आणि त्यांच्या साठी खास बनलेला Formula दिला. आलेले दात बघून ठरवलं की भाताची पातळ पेज थोडे chicken soup घालून त्यांना देऊन बघू. हे मात्र पिल्लाना विशेष आवडलं. मग पिल्लांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्नच सुटला!
काय खायला द्यायचे हे तर ठरलं. पण किती खायला दिलं असता पिल्लांची भूक भागेल हे कसं ठरवावं कळेना. मग वाटीच्या हिशेबाने त्यांचा भात कालवू लागलो. भात कालवून परातीत वाढून ती मध्यभागी ठेवायचे आणि बाजूने सर्व पिल्लं रींगण घालून भरा भरा जेवायचे. आधी परातीचा अंदाज येत नसे त्यामुळे त्यात पुढील पंजे क्वचित मागील पंजे कधी अखंड पिल्लू त्यामध्ये बसून जेवत असे. प्रत्येक जेवणानंतर प्रत्येक पिल्लाला साध्या पाण्याने धुवून काढावे लागत असे. आणि ओघाने ज्या जागी जेवले ती जागा ही झाडून पुसून स्वच्छ करावी लागत असे. ह्या सर्व रणधुमाळीत Ollie सर्व पिल्लांचे जेवण झाले की मग त्यांनी टाकलेले आधी निपटून स्वच्छ करायची आणि मग तिचे जेवण जेवायची.
पिल्लांच्या वाढीची स्थित्यंतरे इतकी झपाट्याने होत होती की आम्हाला सतत पुढचा विचार करत राहावं लागत होता. म्हणजे परातीत सर्वांना एकत्र जेवायला देणे हे आम्ही जेमतेम २-३ दिवस करू शकलो. त्या नंतर असं लक्षात आलं की एखादे दुबळे पिल्लू उपाशी राहते आहे आणि एखादे बलाढ्य पिल्लू दोघा तिघांच्या वाटणीचे खाऊन टाकत आहे. मग एक वेगळी युक्ती करावी लागली. असं लक्षात आलं की तीन पिल्लं, दोन माद्या आणि एक Ollie सारखेच दिसणारे पिल्लू, थोडे मागे पडत आहे. मग त्या तिघांना आधी खायला द्यायचे. वरच्या मजल्यावरील ओटा ह्या कामासाठी एकदम योग्य होता. तीन bowl भरायचे आणि आधी तिघांना ओट्यावर ठेवायचे. त्यांची पोटे भरली की त्यांना sink मध्ये धुवून पुसून खाली सोडायचे आणि पुढच्या तिघांना ओट्यावर ठेवायचे. ह्या मध्ये नंतर ची पिल्ले खाली रडून धुमाकूळ घालत असत. एकंदरीत आमचा दिवस असा वाजत गाजत पार पाडत असे.
पिल्लं जशी मोठी होत होती तसा घरातील वावर वाढला. पायऱ्या चढता यायला जवळ जवळ एक दीड महिना लागला. पण घरातील वावर सीमित ठेवण्यासाठी दिवसा वरच्या मजल्यावर जायचे लोखंडी दार आणि घराचे मुख्य दार सतत बंद ठेवावे लागत होते. पिल्लं उंची वरून खाली पडून ईजा होऊ नये म्हणून आणि चुकून घराबाहेर जाऊन हरवू नये म्हणूनही. साधारण पिल्ले दीड महिन्याची झाली आणि थंडी संपून हळू हळू जसे तापमान वाढू लागले, तसं पिल्लांच्या झोपायच्या सवयी बदलू लागल्या. आधी नेमून दिलेल्या चौघडीवर ढीग करून झोपणारी पिल्ले आता स्वतंत्र झोपू लागली. प्रत्येकाने आपली एक जागा ठरवून टाकली. एक सोफ्याखली, तर एक बाथरूम मध्ये, तर एक फडकी ठेवायच्या trolley मध्ये. सगळे एकदम झोपी जायचे आणि एकत्रच उठायचे. एव्हाना दंग्याचे प्रमाण आणि पद्धत बदलू लागली. जिकडे शक्य होईल तिकडे चढायचा प्रयत्न सुरू झाला. दात आणि तोंडाचा वापर खाणे आणि ओरडणे ह्या व्यतिरिक्त चावणे, कुरतडणे ह्या साठी होऊ लागला.
जशी पिल्लं मोठी होत गेली तशी आपापली झोपायची जागा निश्चित केली
पिल्लांना खेळता खेळता झोप आली तर आमच्या आजूबाजला मिळेल तिथे झोपी जायचे
पिल्लांना खेळता खेळता झोप आली तर आमच्या आजूबाजला मिळेल तिथे झोपी जायचे
जिवंत cartoon network चालू होतं आमच्या घरात दिवस रात्र. म्हणजे एखादे पिल्लू teapoy खालची फळी चढायच्या प्रयत्नात असे, तर एखादे पिल्लू केरसुणी फरफटत आणून त्याच्या चिंध्या करण्यात मग्न असे. माणसांच्या पायात पायात करणे हा तर आवडीचा छंद. माझी आई walker घेऊन निघाली की हमखास मागून पुढून तिचा gown किंवा परकर ओढत तिला थांबवण्याचा प्रयत्न करीत.
भिंती खाणे हे अविरत आणि गुपचूप चालू असलेलं कार्य. रात्री वरच्या मजल्यावर Ollie आणि पिल्लांचा बिनबोभाट दंगा चाले. एकदा Ollie ने उत्साहाच्या भरात पिल्लांना वरच्या मजल्यावरी स्वयंपाकघरातील भिंत खरवडून दिली. सकाळी पिल्लांना घ्यायला वर गेलो, तर सर्व पिल्लं पिठाच्या गिरणीत लोळून आल्या सारखी दिसत होती. आणि त्यांच्या पावलांचे रंगात माखलेले ठसे सर्वदूर उमटलेले होते. पिल्लं भिंती खाऊ लागले की Ollie अगदी कौतुकाने त्याचं हे काम बघत असे. एक दिवस मी पिल्लांवर कडाडले. तसा सर्वांनी घाबरून पोबारा केला. Ollie ला मी तिच्या पिल्लांना का रागावले हा प्रश्न पडला आणि ती खोल माझ्या डोळ्यात बघून उत्तरं शोधू लागली. आपल्या पिल्लांना ओरडा बसला ह्या गोष्टीने एकाच वेळी दुःखी आणि अपमानीत झाली होती ती.
आतापर्यंत च्या वर्णनात पिल्लांच्या संगोपनाच्या प्रवासात Ollie अलिप्त होती असं वाटेल सर्वांना. पण पिल्लांच्या खाण्यापिण्याचा भार आमच्यावर होता हे सोडले तर तिचे आईपण ती अगदी व्यवस्थित निभावित होती. सकाळी टेकडीवर फिरून परत आली की सर्व पिल्लांचा headcount घ्यायची. पिल्लं सुद्धा Ollie बऱ्याच वेळाने दिसल्यावर तीला बिलगून बसायची. एखाद्या पिल्लाने तिने घालून दिलेले नियम पाळले नाही तर त्याला तिचा मार खावा लागे. त्याच बरोबर मी एखाद्या पिल्लाला रागावले तर त्या बिचाऱ्याला तिचा ओरडा खावा लागे. माझी मैत्रीण एकदा मला म्हणाली, की “तू पिल्लांना रागावलीस तर Ollie ला चालते का?” मी म्हणाले, “अगं Ollie पिल्लू असताना आमच्याकडे आली. त्यामुळे मी तिला तिच्या आईच्या ठिकाणी आहे. ओघाने मी तिच्या पिल्लांची आजीच की. त्यामुळे, मी रागावले तर बिचारी पिल्ले तिचेही दणके खातात.” आमच्यावर अपार विश्वास तिचा, त्यामुळे आमचे मित्र मंडळी, आप्त घरी आले तर तेवढ्याच विश्वासाने ती त्यांना पिल्लांना हाताळू द्यायची.
रात्री Ollie आणि पिल्लांची वरच्या मजल्यावर रवानगी होत असे. तिकडे ही बंदोबस्त करावा लागत असे. म्हणजे बाहेरच्या दिवाणखान्यात त्यांचा मुक्त संचार. त्यांच्या सोबतीला असलेल्या व्यक्तीचा (म्हणजे अथर्व किंवा माझा) मुक्काम तिथल्या वाचनालयातील कोपऱ्यात. सुरुवातीला Ollie पिल्लांजवळ झोपायची. नंतर मात्र तिला तिच्या सवयी प्रमाणे गादीवर झोपायची ईच्छा होत असे आणि ती सरळ पिल्लांना जमिनीवर सोडून गादीवर येऊन झोपे. परिणामी खाली पिल्लांची रडारड सुरू होत असे. मग काय, एक एक पिल्लू उचलून गादीवर ठेवावे लागत असे. पिल्ले गादीवर आली की Ollie ला गर्दी झाल्यासारखे वाटे आणि ती थेट तिकडून उठून दुसरी कडे झोपायला निघून जाई. मग अर्ध्या गादीवर पिल्लं आणि अर्ध्या गादीवर मी किंवा अथर्व अशी व्यवस्था झाली की समस्त श्वान परीवार निद्राधीन होई!
अर्ध्या गादी वर सहा पिल्लं आणि अर्ध्या गादीवर मी किंवा अथर्व
रात्री अधून मधून एखादे पिल्लू पांघरुणात शिरे
Ollie ची झोप झाली की ती वरच्या मजल्यावर फिरू लागे. मग पिल्लांची झोप उडे. त्यांना गादीवरून खाली उतरता येत नसे. मग परत रडारड सुरू व्हायची. ती बंद करायला पिल्लांना खाली सोडणं आलंच. पिल्लं जमिनीवर पोचली की Ollie आणि पिल्लं धुमाकूळ घालीत असत. आणि हा दंगा अगदी गुपचूप, बिनबोभाट चाले. क्वचित कधी खेळताना एखाद्या पिल्लाला लागलं तर थोडी रडारड होई. नाहीतर अखंड रात्र पायांचा दुड-दुड आवाज येत राही! सकाळी उठलं की वरचा पूर्ण मजला स्वच्छ करावा लागत असे हे निराळे सांगायची गरज नाहीच.
काळ जसा पुढे जात होता तसं पिल्लांचे पुढे काय करायचे ह्याची चिंता वाटू लागली. शेखर सतत मला आठवण करून देत होताच की पिल्लांना दत्तक देण्याविषयी Facebook, Instagram वर माहिती दे. मी हे करायच्या विरुद्ध होते. कारण FB आणि Insta वापरणाऱ्या लोकांची आणि एकंदरीत शहरातील आमच्या सारख्या घरातील लोकांची मानसिकता मला साधारण माहिती होती. एक तर कुत्रा नकोच, घ्यायचा झाला तर देशी अजिबात नको, कुत्री त्याहून नको. मग करायचं काय ह्यांचं. आम्ही गावाला असतो तर हा प्रश्नच उद्भवला नसता. सर्व पिल्लं आमच्याच घरी सुखाने नांदली असती. पण शहरात हे शक्य नाही. मग एक दिवस सविता मला म्हणाली की पिल्लं इतकी गोड आहेत की कोणीही त्यांना घेऊन जायला तयार होईल. मी तिला म्हणाले तुझ्या ओळखीतल्या लोकांना विचारून ठेव, कोणाला हवी असतील तर घेऊन जाऊ दे. तर म्हणाली माझी भावजय एक जोडी नक्की नेणार आहे. खाली PG मुलींना डबा देणाऱ्या मारुती ला पिल्लं आहेत कळल्यावर तो म्हणाला आम्हाला द्या एक जोडी. पिल्लं कुठे ठेवणार विचारलं तर म्हणाला आमच्या गावी मोठं घर आणि शेत आहे. तिकडे असतातच कुत्री, त्यांच्या बरोबर रहातील ती. माझा जीव भांड्यात पडला. कोणतीही ही जाहिरात न करता चार पिल्लं कुठे जाणार हे ठरलं सुद्धा.
पिल्लांना दत्तक द्यायचं होतच. पण नक्की कधी द्यायचं हे कळेना. पुनः Google मावशी ला साद घातली. तर कळलं की पिल्लं निदान अडीच महिने वयाची झाली असता त्यांना दत्तक द्यावे. पिल्लं अडीच महिन्याची साधारण होळीच्या सुमारास होणार होती. त्याचवेळी चाकरमानी मंडळी गावाकडे सणासाठी जातात. त्याप्रमाणे चार पिल्लांची दत्तक जाण्याची जुजबी तारीख ठरली २३-२४ मार्च. पिल्लं साधारण २ महिने आणि १०-११ दिवसांची असणार होती. एकीकडे मी माझ्या आणि पिल्लांचा मनाची तयारी करू लागले होते. रोज त्यांचाशी बोलायचे की आता तुम्हाला तुमच्या घरी जायचं आहे. तिकडे आनंदाने रहा. इथली आठवण आजिबात काढू नका. हे सांगताना मला प्रत्येक वेळी रडू कोसळत असे (अत्ता इतक्या दिवसांनी लिहितानाही रडू येतंय). डॉक्टरांच्या सल्ल्याने, दत्तक देण्याआधी सर्व पिल्लांचे वर्षभरासाठी चे लसीकरणही करून घेतले.
एक मुलगी आणि एक मुलगा पोलादपूर ला गेले
एक मुलगी आणि एक मुलगा लवासा ला गेले
एक पिल्लू पुण्यात केळेवाडी मध्येच दिले
प्रत्येक पिल्ला बरोबर खाऊ, खेळणं, गळ्यातील पट्टा, vaccination record ची पुस्तिका दिली
शेवटचे पिल्लू बाकी पिल्लांपेक्षा जवळ जवळ १५ दिवस जास्त राहिलं आमच्याकडे. कोणी दत्तक घ्यायला येईना. मग तो एकटा कंटाळेल म्हणून त्याला Ollie बरोबर सकाळी फिरायला घेऊन जायला लागलो. पहिला दिवस खूपच मजेदार होता. त्याला Ollie बरोबर सोडलं की तो Ollie बरोबर पळे आणि घाबरून परत माझ्या जवळ येई. Ollie सुद्धा तो मागे राहीला की त्याला बोलवायला परत मागे फिरे. सकाळची पूर्ण फेरी ह्या प्रमाणे पार पडली. नंतर मात्र त्याला टेकडीवर फिरायला जाणे खूपच आवडू लागले. Ollie आणि टेकडी वरील Ollie चे सवंगडी त्याला भरपूर खेळवत. घरी परत आला की थकून भागून निजे.
मध्येच एकदिवस सर्व कुटुंब मिळून माझ्या बहिणीच्या farmhouse वर राहायला जायचे ठरले. Ollie आणि पिलू (हेच त्याचे नाव पडलं) दोघांना घेऊन जायचं ठरलं. एव्हाना Ollie car प्रवासाला सरवलेली होती. पिलू चा मात्र पहिलाच car प्रवास जेमतेम तासाभराचा. अर्ध्या वाटेवर अपेक्षित ते झालंच. पिलू ला गाडी लागली. गाडी लागेल म्हणून मागच्या seat वर जुनी चादर अंथरली होतीच. ती वाटेत थांबून स्वच्छ केली आणि मी Ollie आणि पिलू बरोबर मागे बसले. गाडी प्रवास आणि गाडी लागल्या मुळे पिलू बेजार झाला होता. मग त्याला मांडीत घेऊन घट्ट धरून बसले. उरलेला पूर्ण रस्ता पिलू कण्हत होता. मला वाटलं की ह्याची तब्बेत बिघडली तर trip cancel करून परत घरी यावं लागेल. पण farmhouse ला पोचलो आणि गाडीतून उतरल्या उतरल्या Ollie आणि पिलू पसार. मोकळी जागा बघून दोघे खेळायला लागले. बहिणीला चिंता वाटत होती की आजू बाजू ची कुत्री ह्या दोघांना त्रास देतील. पण पुढे जे काही झालं ते केवळ अविस्मरणीय!
Farmhouse आणि बाकी आवाराचा अंदाज घेऊन Ollie ने त्यावर पूर्ण ताबा मिळवला. बाकी कुत्री आली, पण Ollie शिताफीने त्यांना घराची पायरी चढू देत नव्हती. ती भुंकायला लागली की तिच्या आवाजाच्या वर आवाज काढून पिल्लू भुंके. आमच्या मागोमाग Ollie आणि पिल्लू गच्चीवर आले. खाली table वर काही खाऊ एका पिशवीत होता. एक कुत्रा आला आणि त्याने ती पिशवी पळवली. Ollie बाणाच्या वेगाने त्याच्या मागे धावत सुटली. काही वेळाने विजयी मुद्रेने Ollie त्याच्याकडून पिशवी परत घेऊन आली. खाऊ मात्र परत मिळाला नाही. रात्री जेवण मागच्या अंगणात होते. तिकडे ही Ollie बाकी कुत्र्यांना आमच्या जवळ येऊ देत नव्हती. एव्हाना पिलू दमून गेला होता. त्याने एक कोपरा धरला आणि झोपी गेला. पण Ollie जरा भुंकली की तो लगेच तिच्या मागून भुंकू लागे.
नवीन ठिकाण त्यामुळे रात्रभर Ollie गस्तीवर होती. मात्र ही गस्त घरात चालू होती (बाकी कुत्री घराबाहेर) त्यामुळे सर्वांची झोपमोड होत होती हे वेगळं सांगायची गरज नाही. सकाळी सर्व कुत्री Ollie आणि पिलू ला खेळायला घेऊन गेली. त्यात शेजारी असलेल्या राणी कुत्री ची भर पडली. ही राणी सर्व कुत्र्यांमध्ये सगळ्यात मोठी. म्हणजे पिलूची खापर खापर पणजी शोभली असती. तिचं वय, तिचा अनुभव पिलू ला कसा समजला कोण जाणे. तो अगदी निमूटपणे तिच्या मागे फिरून ती काय करते आहे हे निरखू लागला. राणीने झाडावरील पिकलेला चिकू तोडून तो चावून चाटला. तिचं चाटून झाल्यावर पिलू ही बसून चिकू खाऊ लागला.
पिलूला जाऊ देणे सगळ्यात अवघड काम होतं. तो कोकणात बिरवाडी ला जाणार असं ठरलं. त्याच सुमारास आम्ही कोकणात जाणार होतो. मग कोकणात जायच्या आदल्या रात्री पिलूला त्याच्या पुण्यातल्या घरी सोडून आले. त्या रात्री मला जेवण गेलं नाही. कोकणात सुद्धा आठवणींचे कढ येत आणि उतू जात. अजून एक दोन दिवस जर पिलूला दत्तक घ्यायला कोणी आलं नसतं तर त्याला आम्ही दत्तक दिलंच नसतं इतका त्याचा लळा लागला होता.
पिल्लांच्या संगोपनाच्या सर्व प्रवासात Ollie चे मी बारीक निरीक्षण करत होते. वसतीगृह चालीकेचे निरीक्षण तपासून बघत होते. पिल्लांच्या संगोपनाबाबत मला Ollie चे कोणतेही बेजवाबदार वर्तन दिसले नाही. पिल्लाना वरचं खाणं द्यायला लागल्यावर सुद्धा आम्ही पिल्लांना काय खायला देतो त्यावर तिचे बारीक लक्ष असे. एकदा शेखर ने पिल्लांसाठी भरपूर हाडे मागवली. मी मात्र ती पिल्लांना द्यायला तयार नव्हते. त्यांना ते खायला जमेल की नाही, त्यांना ती टोचली तर, घश्यात अडकून बसली तर, अश्या अनेक चिंता मला भेडसावत होत्या. एक हाड मी Ollie ला खायला दिले आणि कामासाठी वळले. नंतर बघते तर तिला दिलेलं हाड पिल्लू खात होतं. मला वाटलं पिल्लाने ते तिच्याकडून पळवलं. तोवर पिल्लं असं करू लागली होती. आणि Ollie आदर्श माते प्रमाणे त्यांना तसं करू द्यायची. Ollie ला मी दुसरं हाड दिलं, ह्यावेळी तिने माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं जणू “बघ मी काय करतीये, तू ही न घाबरता हे कर. माझ्यावर विश्वास ठेव पिल्लाना काही होणार नाही” असं सांगून तिने माझ्याकडे बघतच ते दुसरं हाड दुसऱ्या पिल्ला समोर ठेवलं. मग मी सर्व पिल्लाना मधल्या गच्चीत घेऊन गेले आणि हाडांची रास त्यांच्या समोर ठेवली. पिल्लं हाडांवर ताव मारत असताना Ollie चे त्यांच्यावर बारीक लक्ष होतं. जो भाग ते खाऊ शकत नव्हते ते ती नंतर खाऊन टाकी.
ह्याच बरोबर काय खावं कसं मागावं हेही ती पिल्लाना शिकवी. एकदा मी राजगिऱ्याच्या वडया करायचा घाट घातला होता. राजगिऱ्याच्या लाह्या गुळाच्या पाकात घालून ढवळते तोवर मागे Ollie आणि पिल्लांची फौज गुपचूप जमा झाली होती. ती सर्व मंडळी एवढी गोंडस दिसत होती की वड्या देऊन त्यांचे लाड करणं भागच होतं.
Ollie आणि पिल्लांची फौज राजगिऱ्याच्या वडया खायला सज्ज झाले
पिल्लाना देऊन टाकायचे दुःख आम्हाला होतेच. Ollie ला ही दुःख नक्कीच झालं असेल. पूर्वी मांजराची पिल्लं हरवली तर ती दिवस दिवस त्यांना हाका मारायची. पण हे ती पिल्लं अगदी लहान असताना करायची. पिल्लं पुरेशी मोठी झाल्यावर मग ती शोधत नसे. आम्ही पिल्ले Ollie पासून पूर्ण स्वतंत्र झाल्यावर दत्तक दिली. त्यामुळे अगदी तिच्या समोरून पिल्लाना घेऊन गेले तरी Ollie अगदी शांतपणे सर्व बघत होती. हे एक ना एक दिवस होणारच हे बहुदा जाणून होती. सर्व एखाद्या स्थितप्रज्ञ माणसा प्रमाणे. ज्या रात्री पिलू ला सोडून आल्यावर मला जेवण गेलं नव्हतं, त्या रात्री ती मात्र व्यवस्थित जेवली होती.
टेकडीवर फिरताना मला अनेक विचारांची लोकं भेटतात. काही पिल्लं होऊ देऊ नये असं ठामपणे सांगतात कारण आपण जसं त्यांचं व्यवस्थित संगोपन करू, तसं दुसरे करणार नाहीत, मग आपल्याला त्याचा खूप त्रास होईल. अजून काही लोकं असं म्हणतात की Operation करून टाकलं की पाळीव प्राण्याचे आयुष्य वाढतं म्हणू operation करणे श्रेयस्कर. कोण operation करत ही नाहीत आणि पिल्लं ही होऊ देत नाहीत, का तर ऑपरेशन नंतर कुत्री जाड होते म्हणून. ह्या सर्व विचारात पदो-पदी माणसाची स्वार्थी वृत्ती अगदी ठळक दिसून येते. आपल्या करमणूकीसाठी सर्व बंधनं त्या प्राण्यावर लादत असतो आपण.
कुत्र्यांची वाढती संख्या ही काळजीची बाब असू शकेल. पण त्यावर समोर येईल त्या प्राण्याचे operation करून टाकणे कितपत योग्य आहे? आणि प्रत्येक वेळी रस्त्याकडेला पिल्लं दिसली तर “Urgent Appeal for adoption” हे social media वर post करणं खरंच गरजेचं आहे का? निसर्गातील पिल्लं निसर्गावर का सोडून देत नाही आपण? समोर आलेल्या माणसाच्या निराधार पिल्लाना आपण असं वागवतो का? की काणाडोळा करून पुढे निघून जातो?
आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना त्यांच्या प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून बाळगतात. म्हणजे बक्खळ पैसे खर्चून एखादा pure breed किंवा एखादा परदेशी जातीचा कुत्रा विकत घेतला असता तो किती cute असं तोंड फाटे पर्यंत कौतुक करतात आपल्या “fur babies” चं. म्हणजे पैसे खर्चून विकत घेतलेलं पिल्लू गोंडस आणि रस्त्यावरून आणलेलं गोंडस नाही? खरा प्रश्न हा breeders चा आहे असं म्हणतात. पण मागणी आहे म्हणून breeders चे फावतं हे आपण लक्षात घेत नाही. भटक्या कुत्र्या मांजरांचे सरसकट operation करण्यात सगळ्यात मोठा धोका हा संभवतो की ह्या पाळीव प्राण्यांमधील जनुकीय विविधता (genetic diversity) आपण नष्ट करत नेऊ.
घरी पाळलेला कुत्रा किंवा मांजर ह्यांना स्वतंत्र अस्तित्व असतं आणि ते आपला निर्णय स्वतः घेत असतात. दहा वर्षांपूर्वी मी आमच्या दोन मांजरांचे operation करून टाकलं होतं, दर सहा महिन्यांनी पिल्लावळ नको म्हणून मांजरीचं आणि मारा मारी मध्ये बोका दगावू नये म्हणून बोक्याचे. त्याने पिल्लं न होण्याची “समस्या” सोडवता आली. पण इतर मांजरांबरोबर ची भांडणे कमी झाली नाहीत. शेवटी इतर बोके त्याच्या पेक्षा शक्तिशाली झाले म्हणून आमच्या बोक्याने घर सोडलं आणि मागच्या सोसायटी मधील रांगोळे ह्यांना त्याने आपलंस केलं. आपले पाळीव प्राणी आपले आहेत म्हणून त्यांची जबाबदारी नक्कीच घ्यायची आपण, पण त्यांच्या खऱ्या गरजा समजून, ओळखून त्यांना जेवढे शक्य तेवढे त्या प्रमाणे वागू देणे ह्यातच आपले खरं पालकत्व आहे.
Ollie गरोदर आहे हे कळले त्या दिवशी सकाळी टेकडीवर फिरताना
Ollie ला डॉक्टरांनी तपासले आणि काही प्रश्न विचारल्यानंतर तीचा X-Ray करून घेण्यास सांगितलं. X-Ray ची print आल्या आल्या लगेचच शेखर ने मला फोन करून सहा पिल्ले आहेत असं कळवलं होतं. तर, ३० डिसेंबर २०२३ रोजी आम्हाला कळले की अजून काहीच दिवसात आमच्याकडे एकाची सात-आठ कुत्री होणार आहेत! खरोखरच कंबर कसून तयारीला लागावे लागणार होते! ज्या प्रसंगाला दोन अडीच वर्षांनी सामोरे जाऊ असं वाटतं होतं तो काही दिवसांवर येऊन ठेपला होता!
Ollie चा X-Ray ज्या मध्ये पिल्लांचे पाठीचे कणे अगदी स्पष्ट दिसत आहेत
पण कंबर कसून तयारी करायची म्हणजे आम्ही नक्की काय करायचे ते काही कळत नव्हतं. मनुष्य प्राण्याची pregnancy कळली की काय काय करायचे असते ते ठाऊक आहे. म्हणजे gynecologist कडे नाव नोंदवणे आणि महिन्याच्या महिन्याला तपासण्या करून घेणे, घरातील आणि माहितीतील अनुभवी बायकांना विचारून काय खावं, काय काळजी घ्यावी हे माहिती करून घेणे आणि ते आचरणात आणणे, आणि हो, आजूबाजूच्या सर्व लोकांकडून कोड कौतुक करून घेणे. पण कुत्रीचे बाळंतपण म्हणजे आपण नक्की काय करायचे असते ते काही ठाऊक नव्हतं. Ollie च्या डॉक्टरांचा विचार घेतला. पुढच्या पाच सहा दिवसात तिची delivery होणार असा त्यांचा अंदाज होता.
आम्हाला मात्र Ollie कुठल्याही प्रकारे बघितलं तरी गरोदर वाटतच नव्हती. तिचं टेकडीवर सुसाट धावणे अगदी पूर्वी सारखच चालू होतं. गरोदर कुत्र्यांची नेमकी कशी काळजी घ्यायची हे मात्र काही केल्या समजत नव्हते. मग Google मावशी कडे गेले आणि जी माहिती मिळेल ती वाचू लागले. Google वर काही अगदीच विचित्र सल्ले होते, तर काही अगदी शहाणपणाचे. मग शेवटी असा विचार आला, Ollie रस्त्यावरची कुत्री असती, पूर्णतः निसर्गात असती तर आपण काय केलं असतं? उत्तर आलं, काहीच नाही. मग काहीच करायचं नाही असं ठरलं. तिचं खाणं पिणं, हिंडणं फिरणं जो पर्यंत व्यवस्थित चालू आहे तोवर all is well!
पुढचा पेच असा होता की Ollie ची delivery ची वेळ जवळ आली आहे हे कसं ओळखायचं. पुन्हा Google मावशीला हाक मारली. प्रसूत होण्याची वेळ जवळ आली की कुत्री “घरटं” बनवण्यासाठी जागा शोधू लागतात. म्हणजे एका विशिष्ठ ठिकाणी खणून खड्डा करतात. Ollie मात्र असं करताना दिसत नव्हती. म्हणजे तिला प्रसूत व्हायला अजून थोडा काळ आहे असा मी अंदाज बांधत होते. तिला डोहाळे लागले आहेत हे मात्र लक्षात आलं ते तिच्या खाण्या पिण्या वरून. Ollie आता अगदी वाटेल ते खात होती. आम्ही जेवायला किंवा खायला बसलो की शेजारी एखादी रिकामी खुर्ची असेल तर त्यावर येऊन बसायची. विशेष आवडीचा म्हणजे आमच्या बागेतला ओल्या कचऱ्याचा खड्डा. टेकडीवर एखाद्या ठिकाणी वास घेऊन भयंकर उत्तेजीत होत असे आणि तिकडे अक्षरशः लोळण घेत असे. मनसोक्त लोळून परत आली की समजायचं की कुठल्यातरी मेलेल्या प्राण्याचे शिल्लक अवशेष होते. तो वास ती अंगभर लावून घ्यायची. घरी आलं की तिला रगडून अंघोळ घालण्याशिवाय पर्याय राहत नसे.
आम्ही काही खायला बसलो की हटकून शेजारच्या रीकाम्या खुर्चीवर येऊन बसत असे.
Ollie गरोदर आहे हे कळल्यापासून एक आठवडा उलटून गेला. त्या नंतर मात्र ती गरोदर आहे ह्याच्या खाणा खुणा दिसून आल्या. आता टेकडीवर गेली तरी थोडी पळली की दमायला लागली होती. पूर्वी जिथे तिथे टुणकन उडी मारू शकत होती ते मोठ्या मुश्किलीने जमायचे. कधी शेजारी शांत झोपली किंवा बसली असेल तर पोटातल्या पिल्लांच्या हालचाली दिसू लागल्या होत्या. Ollie पूर्वीपेक्षा थोडी शांतही झाली होती. साधारण १०-११ जानेवारी च्या सुमारास तिचे पोट खाली उतरल्या सारखे दिसू लागले होते. माणसांमध्ये प्रसुतीची वेळ जवळ आली की जसं बाई चे पोट खाली उतरते, अगदी त्याची आठवण झाली मला. म्हणजे आता Ollie प्रसूत होण्याची वेळ जवळ आली आहे हे मला जाणवलं.
१२-जानेवारी ला Ollie खासच अस्वस्थ होती. बेचैन होऊन घरभर फिरत होती. अजूनही ती “घरटं” करताना दिसली नव्हती. दिवसभर काहीच घडलं नाही. मग रात्री वरच्या मजल्यावर अथर्व ऐवजी मी राहायचं असं ठरलं. रात्री झोपायची तयारी केली. Ollie मात्र काहीतरी धुंडाळत होती. तिला कपाट उघडुन दिले, त्याला थोडी पसंती मिळाली असं वाटलं. मग आत एक मोठा हारा आणि सतरंजी असं ठेवलं. ती अधून मधून कपाटात जात होती आणि मध्येच बाहेर माझ्या जवळ येऊन झोपत होती. रात्रभर काही विशेष घडलं नाही. मला जागरण मात्र झालं.
१३-जानेवारी ला मी Ollie ला वरच्या मजल्यावर राहू द्यायचा विचार केला होता. ओघाने मी सुद्धा वरच थांबले होते तिच्या सोबतीला. अधून मधून Google मावशी कडे धाव घेत होतेच. त्यात एक महत्वाची गोष्ट कळली. कुत्री प्रसूत होण्याआधी हिरवट लाल स्त्राव किंवा discharge दिसला तर पुढच्या दोन तासात कुत्री प्रसूत होते. Ollie ची बेचैनी अजूनच वाढली होती आणि त्याबरोबर माझी तारांबळ. ती सारखी खाली जायच्या प्रयत्नात होती आणि मी वर येणाऱ्या प्रत्येक माणसाला थोपवून ठेवण्याच्या प्रयत्नात होते. त्याच बरोबर Ollie गच्चीवर देखील जात होती. मग मी तिच्या मागे. अशी धावपळ चालू होती. त्यात एकदा ती गच्चीवर गेली असता मला Google वर वर्णन केलेल्या रंगाचा स्त्राव दिसला. मी डॉक्टरांना फोन करून Ollie च्या मागे आले तेवढ्यात शेखर मधलं दार उघडून मला अंघोळीला खाली बोलवायला आला. ही संधी साधून Ollie खालच्या मजल्यावर सटकली.
रात्रभर जागरण आणि सकाळ पासून ची धावा धाव ह्यामुळे Ollie ला परत वरच्या मजल्यावर फरफटत नेण्याच्या फंदात मी पडले नाही. सरळ अंघोळ करायला निघून गेले. आवरून बाहेर आले तर Ollie शेखर शेजारी सोफ्यावर balcony मध्ये बसली होती. हे तिचे दुसरे अढळपद. ती निवांत बसली आहे बघून मी जरा शांत बसावं म्हटलं तर बाहेर सविता बाई आणि watchman काकांचा आरडा ओरडा ऐकू आला. बाहेर त्यांना साप दिसला होता. त्यांच्या दंग्यात त्या सापाचा हतनाक बळी जायचा म्हणून शांत बसायचा बेत रद्द करून मी तिकडे धाव घेतली. साप बिनविषारी होता आणि बिचारा आपल्या मार्गाने चालला होता. Watchman काका आणि सविताला थोडा धीर धरायला सांगून साप पकडायला मिळाली ती बादली आणि काठी घेऊन गेले. सापाला बादलीत ठेवलं आणि तो बाहेर येऊ नये म्हणून त्याच्यावर काठी अलगद धरून ठेवली. आता बागेत मागच्या बाजूला त्याला विनाविलंब सोडावे लागणार होते कारण त्याची बादली मधून बाहेर यायची धडपड सुरू झाली होती.
बाल्कनी मधील सोफा ज्यावर पिल्लाना जन्म देण्यास Ollie ने पसंती दिली
बादली घेऊन निघाले तेव्हढ्यात शेखरच्या हाका ऐकू आल्या. जरा वैतागूनच काय विचारले, तर म्हणाला “लवकर वर ये, पिल्लू आलं आहे.” अरे देवा! इकडे धाऊ की तिकडे पळू अशी स्थिती झाली. शेवटी हातातले काम संपवून मग Ollie कडे जावे असा निर्णय घेऊन मी बागेत साप सोडायला निघून गेले. सापाला सुखरूप सोडून मी डॉक्टरांना फोन करत घरात शिरले. डॉक्टरांना पहिले पिलू आल्याची बातमी दिली. डॉक्टर म्हणाले “आता तुम्ही ते पिल्लू स्वच्छ पुसून घ्या आणि नाळ व्यवस्थित कापा. त्यानंतर Ollie जवळ परत द्या”. मी फोन ठेवत Ollie पाशी पोचले तोवर Ollie न पिल्लू चाटून पुसून स्वच्छ केले होते आणि नाळ ही व्यवस्थित दाताने चावून पिल्ला पासून वेगळी केली होती.
पिल्लू स्वच्छ झाल्या झाल्या त्याच्या आईला शोधत तिच्या पर्यंत पोचलं सुद्धा आणि तिचं दूध पिऊ लागलं. Ollie ला मात्र उसंत नव्हती, तिला पुढच्या पिल्लाची तयारी करायची होती. दुपारी बारा ते दोन ह्या कालावधीत Ollie ने सात पिल्लांना जन्म दिला. प्रत्येक पिल्लाच्या जन्मा आधी कळा द्यायच्या, पिल्लू आलं की त्याला चाटून पुसून स्वच्छ करायचे, त्याची नाळ तोडायची आणि पुढच्या पिल्लाच्या तयारी ला लागायचे. हा सर्व कार्यक्रम बाल्कनी मधील सोफ्यावर बिन बोभाट चालू होता. ना आरडा ओरड ना दंगा. Ollie ने मला कुठलंच काम करायला शिल्लक ठेवलं नव्हतं. एक संभाव्य धोका Ollie ने लक्षात घेतला नव्हता. तो म्हणजे सोफ्यावरून पिल्लू खाली पडण्याचा. मग मी शांतपणे तिच्या समोर खुर्ची टाकून बसले पहारा देत.
सर्व पिल्लांची आणि Ollie ची सुखरूप सुटका झाल्यावर आम्ही थोडे विसावलो. सात पिल्लांपैकी पाचवे पिल्लू थोडे गुदमरले आहे असं वाटलं. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आणि तिच्या अंगात Ollie पर्यंत जाऊन दूध प्यायची ताकद ही नव्हती. आम्ही थोडं थांबून तिची परिस्थिती बदलते आहे का ते बघायचं ठरवलं. संध्याकाळी एका कार्यक्रमाला जायचे होते. पिल्ले अजून सोफ्यावरच होती. मग पहाऱ्यावर सविताला बसवली आणि आम्ही आमच्या नियोजित कार्यक्रमाला चालते झालो. कार्यक्रम चालू असताना अथर्व बरोबर वार्तालाप चालू होताच. त्यातून Ollie आणि पिल्लांची खबरबात मिळत होती.
नवजात पिल्लां सोबत Ollie
आम्ही घरी येई पर्यंत अथर्व ने Ollie आणि पिल्लांची रवानगी एका मोठ्या खोक्यात केली होती. पाचवे पिल्लू अजूनही सावरले नव्हते आणि दूध पिण्याची त्याच्यात ताकद नव्हती . मग डॉक्टरांशी चर्चा करून त्या पिल्लासाठी formula आणि ते पाजायला syringe घेऊन आला होता. मी अगदी घोटभर formula तयार केला आणि syringe ने त्या अशक्त पिल्लाला पाजायचा प्रयत्न केला. विशेष काही प्यायलं नाही ते पिल्लू. अशक्त असून आवाज खणखणीत होता पिल्लाचा. बाकी सर्व पिल्ले अधून मधून दूध प्यायची आणि परत झोपी जायची. पाचवे पिल्लू मात्र अविरत कण्हत, रडत होतं. रात्री आळी पाळी ने मी आणि अथर्व उठून त्या पिल्लाला दूध द्यायचा प्रयत्न करत राहिलो. पिल्लं झाल्यापासून पुढचे दोन दिवस Ollie पिल्लांच्या शेजारीच बसून राहिली होती. तहान नाही की भूक नाही. दुसऱ्या दिवशी उठल्यावर मी तिला बसल्याजागी थोडं खायला आणि पाणी नेऊन दिले. तिने अगदी गरजे पुरतंच खाल्लं आणि घोटभर पाणी प्यायली. पाचवे पिल्लू अजूनही सावरले नव्हते. हालचाल नाही आणि अन्न नाही त्यामुळे अगदी थंड पडलं होतं ते. मग त्या पिल्लाला एका जाडसर कापडात गुंडाळून Ollie आणि पिल्लांजवळ ठेवलं.
सकाळची माझी कामे उरकून पाचव्या पिल्लाला formula द्यायला गेले आणि पिल्लाला हातात घेऊन Ollie समोर बसले. Syringe भरून पिल्लाला भरवू लागले तर Ollie जागेवरून उठली आणि माझ्या हातातून पिल्लू काढून घेतलं आणि तिच्या जवळ खोक्यात नेवून ठेवलं. तिथून पुढे जेंव्हा जेंव्हा आम्ही त्या पिल्लाला खाऊ घालायचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक वेळी Ollie शांतपणे जागेवरून उठायची आणि आमच्या हातातून पिल्लू परत घेऊन जायची. आम्ही खायला द्यायचा प्रयत्न केला तरी पिल्लू ओठापाशी नेलेले दूध ही पिऊशकत नव्हतं. Ollie ने विरोध केला नसता तरी आमच्या प्रयत्नांना यश येईल ह्याची शाश्वती नव्हती. १६-जानेवारी ला सकाळी ते पाचवे पिल्लू मरण पावले होते. Ollie ने शांतपणे ते तिच्या व इतर पिल्लांपासून दूर सारून टाकले होते. ह्यावेळी मी त्या पिल्लाला उचलून बाहेर घेऊन गेले, तरी Ollie ने माझ्याकडे ढुंकून ही बघितलं नाही.
खोकं नकोसं झाल्यावर Ollie ने सोफ्यावर डेरा जमवायचा प्रयत्न केला
मार्जार कुळातील आया आपल्या पिल्लाना अगदी डौलदार व देखण्या पद्धतीने उचलून नेतात. त्यांची पिल्ले सुद्धा शरीर अगदी आटोपशीरपणे सावरून बसतात. मांजर तिच्या पिल्लाना एक एक करून उचलून नेते ते दृष्य अगदी बघण्यासारखं असतं. कुत्र्यांना काही ते जमत नाही. पोटाच्या भागात जमेल तसं तोंडाने पिल्लू पकडतात. पिल्लू जिवाच्या आकांताने केकाटत असतं. कुत्री मात्र त्या ओरडण्याची पर्वा न करता ते पिल्लू तसेच उचलून घेऊन जाते. दोन तीन दिवसांनंतर Ollie ला खोकं नकोसं झालं आणि ती आत बसून त्यावर पंजे मारून खरवडू लागली. तिला स्वतः ला सोफ्यावर, गादी वर झोपायची सवय, मग ती एक एक पिल्लू उचलून सोफ्यावर ठेवण्याचा अगदीच बेंगरूळ प्रयत्न करू लागली. शेवटी ते खोकं काढून टाकलं आणि सुती चादरींची चौघडी खाली आंथरली. त्यावर पिल्लाना निजवलं. ही व्यवस्था Ollie च्या पसंतीस पडली.
सुती चादरींची चौघडी अखेर पसंतीस पडली
खोक्यातून बाहेर आल्यावर मात्र रात्री Ollie बरोबर आता पिल्लांची ही रवानगी वरच्या मजल्यावर करावी लागत असे. सुरवातीला एका छोट्या plastic च्या tub मध्ये ते सर्व गुबगुबीत गोळे चौघडी सकट ठेऊन वर नेत असू.
छोट्या plastic च्या tub मध्ये पिल्लं वरच्या मजल्यावर जायला सज्ज
Ollie गरोदर आहे हे कळल्यापासून ती प्रसूत होई पर्यंत मी पदोपदी तिची आणि एखाद्या बाई माणसाच्या ह्याच स्थिती ची तुलना करत राहीले. Ollie ही पूर्णपाने निसर्गाच्या स्वाधीन, त्या उलट आपण माणसे प्रत्येक समस्येचा कीस पाडणारे, चर्चा करणारे आणि मग सर्वांना पटेल रुचेल असा निर्णय घेणारे. Ollie च्या आजूबाजू ला कुत्र्यांच्या बाबतीत अनुभव शून्य मंडळी असताना तिचं तिने सर्व व्यवस्थित निभावून नेले. प्रसूती ह्या अत्यंत नैसर्गिक आणि आनंददायक प्रक्रियेला माणसाने किती क्लिष्ट, गुंतागुंतीचे करून टाकलेले आहे हे जाणवलं.
पाचवे पिल्लू अशक्त आहे हे पाहिल्यावर आम्हा सगळयांची घालमेल होत होती. अपूर्वा प्रत्येक वेळी घरी आल्यावर किंवा फोन वरून त्या पिल्लाची चौकशी करायची. पिल्लाने अजून दूध प्यायले नाही असं कळलं की हळहळायची आणि “ते जगलं पाहिजे. आपण अजून काही करू शकतो का त्याला जागवायला?” असं विचारी. Ollie मात्र ठाम होती. पिल्लाला जगायचं असेल तर त्याचे प्रयत्न त्या पिल्लाने करायचे आहेत, आजूबाजू च्या लोकांनी नाही! हे तिने तिच्या कृतीतून स्वच्छ सांगितलं. जोवर त्या पिल्ला मध्ये जीव होता, तोवर पिल्लाला स्वच्छ ठेवणे, ऊबेसाठी कुशीत घेणे अशी सर्व काळजी तिने घेतली. पण त्या पिल्लाची हालचाल बंद पडल्यावर तिने तितक्याच निग्रहाने त्याला स्वतः पासून आणि इतर पिल्लांपासून दूर लोटून दिले.
पाचव्या पिल्ला बाबत चं Ollie चं वागणं बघून मला Lawrence Anthony ह्यांच्या The Elephant Whisperer ह्या पुस्तकातील एका प्रसंगाची आठवण झाली. Nana हत्तीणीने एका पिल्लाला जन्म दिला. हत्तींच्या कळपात पिल्लू जन्माला आले की त्या पिल्ला भोवती सर्व कळप जमा होतो आणि त्या पिल्लाला स्वतःच्या पायावर उभे राहायला प्रोत्साहन देतो. तर हे नवजात पिल्लू काही केल्या उभे राहीना. Nana आणि कळपातील बाकीच्या हत्तिणींनी आधी गोंजारून आणि नंतर लाथा घालून तिला उभे करायचा प्रयत्न केला. हे प्रयत्न तब्बल चोवीस तास चालू राहिले. शेवटी त्या पिल्लाला तिथेच सोडून पूर्ण कळप चालता झाला. लेखकाला हे बघवलं नाही. कळप निघून गेल्यावर लेखक आणि त्याचे सहकारी त्या टाकलेल्या पिल्लाला घरी घेऊन आले आणि सर्व वैद्यकीय सेवा त्या पिल्लाच्या दिमतीला उभी केली. पिल्लाच्या शरीरात हळू हळू ताकद येऊ लागली आणि ते काही महिन्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले. लेखकाच्या घरी सर्वांचे लाडके झाले. लेखकाला वाटले हे पिल्लू अजून थोडे सशक्त झाले की त्याला आपण Nana कडे घेऊन जाऊ आणि तिला आश्चर्याचा सुखद धक्का देऊ. पण नियतीला ते अमान्य होतं. साधारण दोन वर्ष त्या पिल्लाची काळजी घेतली तरी त्याला पुरेशी ताकद आली नव्हती आणि एक दिवस सकाळी जाऊन बघितलं तर त्या पिल्लाचा मृत्यु झाला होता. हे पिल्लू कमकुवत आहे, स्वतंत्र जगू शकणार नाही हे त्या कळपाला पहिल्या दिवशी कळलं होतं. पण माणसाला वाटले आपण वैद्यक क्षेत्राच्या बळावर त्या पिल्लाला सक्षम करू आणि परत त्या कळपात सोडू. वास्तविक, लेखकाने शब्दशः त्या पिल्लाचे आजचे मरण उद्यावर ढकलले होते. आणि जे दुःख त्या कळपा पुरते मर्यादित राहिले असते ते कळपा व्यतिरिक्त अजून अनेक लोकांना भोगावे लागले. निसर्गतः असलेलं हे शहाणपण माणूस परत कधी शिकेल का?
Ollie घरी आली तेंव्हा ती अडीच महिन्यांची होती. तिची पिल्ले तर अजूनच लहान. त्यांची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न पडे. पण Ollie पिल्लांचे सर्व इतकं व्यवस्थित करायची, की आम्हाला काळजीचे काहीच कारण उरले नाही. मग आम्ही फक्त Ollie ला काय हवं नको ते बघू लागलो. पिल्ले झाल्यापासून पुढचे साधारण २-३ आठवडे एका साच्यातील दिनचर्या अंगवळणीस पडून गेली. पिल्लांचे डोळे आजून उघडले नव्हते त्यामुळे त्यांची अगदी मोजकीच हालचाल होत असे. हा खरं तर आमच्या विश्रांतीचा काळ होता आणि वादळापूर्वीची शांतता होती!
आपल्याकडे एक कुत्रा असावा ही माझी अगदी लहानपणा पासूनची हौस. आमच्या अख्ख्या खानदानात कधी कोणी कुत्रा पाळला नव्हता आणि माणूसप्राण्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला घरात यायलाही मज्जाव होता. माझं मात्र माणसा पेक्षा इतर प्राण्यांवर जरा जास्तच प्रेम. माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये अधिक रमणारी. कोळी, बेडूक, सरडे, साप ही मंडळी सुद्धा मला अगदी गोड, गोंडस वाटतात. गरज पडली तर त्यांना हाताळणे, पकडणे हे ही सर्व मी करत असते.
आमच्या शाळे भोवतीच्या शेतांमध्ये बऱ्याच वेळा कुत्र्याची पिल्लं असत. मधल्या सुट्टीत त्यांना शोधून त्यांच्याशी खेळत बसायचे. एखादे पिल्लू फारच आवडे, अगदी काळजाला हात घाली आणि मी मागचा पुढचा विचार न करता ते पिल्लू घरी घेऊन येत असे. आई माझ्या सारखीच. पण तिला नक्की माहिती असायचं की बाबांना हे अजिबात चालणार नाही. आणि व्हायचं ही अगदी तसंच. घरात पिल्लू दिसलं की बाबा अजिबात न चिडता शांतपणे आदेश द्यायचे “उद्या हे पिल्लू जिथून आणले आहेस तिकडे परत सोडून ये”. कुठली ही चर्चा नाही की वाटाघाटी नाही. Direct फर्मान! त्यांच्या पुढे no appeal! दुसऱ्या दिवशी ते पिल्लू त्याच्या आई आणि भावंडांकडे परत नेऊन पोचवायचे.
आमची मुले जशी मोठी होऊ लागली तशी ते ही कुत्र्यासाठी हट्ट धरू लागली. पण मला एक गोष्ट पक्की माहिती होती की कुत्रा घरात आणला की त्याचे सर्व एखाद्या माणसा प्रमाणे करावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो, काळजी घ्यावी लागते. थोडक्यात घरी कुत्रा घेणे म्हणजे कुटुंबात एका नवीन व्यक्तीला सामावून घेण्यासारखे आहे. आणि मुलं कितीही म्हणाली की आम्ही करू त्याचे सर्व तरी आधी पाळलेले मासे आणि नंतर पाळलेली मांजरे ह्यांचा अनुभव बघता ती नक्कीच पोकळ आश्वासने आहेत हे आम्हाला कळले होते. मांजरे अगदी स्वतंत्र आणि अलिप्त व्यक्तिमत्वे असतात असं ऐकलं होतं (ह्यातील स्वतंत्र अगदी बरोबर आहे, पण अलिप्त मात्र नसतात हे पुढे अनुभवातून शिकलो) म्हणून घरात जवळ जवळ दहा वर्षे दोन तीन मांजरे बाळगून आहोत. पण कुत्रा पाळण्याचा निर्णय मात्र लांबणीवर टाकत होतो. मुलांनी लग्गा लावला तर मी सांगायची की मी retire झाले की आपण कुत्रा आणू, म्हणजे मला त्याला व्यवस्थित वेळ देता येईल.
मी retire झाल्यावर अथर्व ने आठवण करून दिली “आई, कुत्रा पाळायचे काय झाले?”. म्हटलं करू विचार. वास्तविक कुत्रा कधी पाळायचा हे फक्त ठरायचे होते. आमच्या पूर्ण कुटुंबाचे कुत्रा कोणता पाळायचा ह्या बद्दल विचार अगदी पक्के होते. कुत्रा देशी हवा, वयाने लहान हवा आणि विकत घ्यायचा नाही. हीच तत्वे आम्ही मांजरी पाळल्या तेंव्हा ही होतीच. त्यामुळे कुत्रा बाजारातून नक्की विकत आणायचा नाही हे ठरलं होतं. देशी अश्यासाठी की ते आपल्या कडील वातावरणात चांगले तग धरतात, कारण ते इथलेच असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आपल्याला सहज हाताळता येतात. प्राणी पाळायचा तर त्याला आपल्या स्वतःच्या मुला प्रमाणे हाताळता येणं गरजेचं आहे.
दरम्यान मैत्रेयने एकाकडे चौकशी केली की अमुक एका breed चा कुत्रा हवा आहे, किती खर्च होईल? एखादी वस्तू खरेदी करताना जसा salesman आपले specifications विचारतो, तसा तो विक्रेता मैत्रेय ला प्रश्न विचारू लागला. आम्हला वाटलं होतं breed आणि कुत्रा की कुत्री सांगितलं की पुरेसं आहे. पण हे महाशय कुत्र्याची कातडी कुठल्या रंगाची हवी, शरीराच्या कुठल्या भागावर ठिपके किंवा पट्टे हवे, असे प्रश्न विचारू लागल्यावर मैत्रेय ने तिकडून पळ काढला. हे काहीतरी वेगळंच विश्व आहे ह्याची जाणीव झाली. Designer कपडे, घरं असं तो पर्यंत माहिती होतं, पण designer pets, ही संकल्पना खूपच क्रूर आणि भीतीदायक वाटली. ह्या अनुभवानंतर कुत्रा विकत घ्यायचा नाही हा आमचा निर्णय अजूनच पक्का झाला.
एक दिवस शेखर सकाळी फिरून आला आणि म्हणाला एक खूपच सुंदर पिल्लू रस्त्यावर दिसलं. बहुतेक गावठी असावं, काय करूया. एरवी घरात कुठले काम सांगितले की दिरंगाई करणारा अथर्व ताबडतोब उठलाच. बाप लेक ते पिल्लू आणायला गेले सुद्धा. दरम्यान मैत्रेय चा फोन आला. मी त्याला सांगितलं आज बहुतेक आपल्या घरी कुत्र्याचे पिल्लू येईल. मी घरी बराच वेळ वाट बघत बसले पण दोघांचा पत्ता नाही! शेवटी २-३ तासांनी परत आले ते हात हलवत. पिल्ला बद्दल विचारले, तर कळलं की ते Labrador चे पिल्लू आहे (म्हणजे देशी नाही) आणि ते विक्री साठी उपलब्ध होते. त्यामुळे बेत रद्द झाला होता. मग आता दोघे एकत्र बाहेर पडलेच होते तर अथर्व ची two wheeler exchange करायचे काम करून आले होते. कोणाचं काय तर कोणाचं काय! असो, माझी घोर निराशा झाली. एव्हाना तिकडे Sweden मध्ये आम्ही आज कुत्र्याचे पिल्लू आणणार ही बातमी सुरुची पर्यंत पोचली. पिल्लू नाही म्हटल्यावर तिचाही चेहरा पडला. Video call वर चर्चा सुरू झाली कुठून पिल्लू घ्यावे ह्याची. ही चर्चा चालू असताना मी सहज FB वर एक adoptions चा group join केला. त्यावरती अनेक पिल्लांचे फोटो दिसू लागले. पण सर्व परदेशी कुत्री. त्यात एक फोटो दिसला आणि आवडला. अडीच महीने वयाची Ollie ह्या कुत्रीचा. Video call वरील चर्चेचे एव्हाना वादात रूपांतर झाले होते. ते आटोपते घेत मी त्या जाहिरातीतील नंबर वर फोन केला आणि पिल्लू आहे का आणि कुठून घेऊन यायचे आहे ह्याची चौकशी केली. शेखर आणि अथर्व ला फोटो दाखवला. कुत्री घ्यावी का ह्यावर माफक चर्चा झाली. फोटोतील सुंदरी दोघांनाही आवडली आणि मी आणि अथर्व Ollie ला घेऊन यायला निघालो सुद्धा! तर ५ जून २०२३ ह्या दिवशी Ollie नावाच्या वादळाने आमच्या घरी प्रवेश केला!!
Ollie ला घरी घेऊन येताना
Ollie ला घरी घेऊन आल्यावर मला अनेक प्रश्न पडले. ही adoption साठी होती. म्हणजे आधी कोणाच्या तरी घरी होती (कारण तिचे नाव ठेवलेले होते आणि ती त्या नावाने हाक मारली की प्रतिसाद ही देत होती). त्या घरचे वातावरण कसे असेल. कुठली भाषा तिच्याशी बोलत असतील. आपण मराठीत तिच्याशी बोलणार, ते तिला समजेल का? लहानपणी काही काळासाठी कुत्रा सांभाळला होता. पण तो पूर्ण वाढ झालेला होता. किंवा मित्र मैत्रिणींकडे असलेले कुत्रे सुद्धा हाताळले होते. पण पिल्लू असं पहिल्यांदाच हाताळणार होतो. काय खायला घालायचे, किती आणि किती वेळा खायला द्यायचे, शी शु करायच्या काय सवयी असतील ह्याची काहीच कल्पना नव्हती. Shelter मधून तिला आणले तेंव्हा तिची काही injections झाली होती. पुढची injections द्यायला डॉक्टरकडे नेले तेंव्हा ह्यापैकी तीन महत्त्वाचे प्रश्न त्यांना विचारले – तिला काय आणि किती खायला द्यायचे, शी शू घरा बाहेर करायला कसे शिकवायचे आणि अजून उपयुक्त काय शिकवायचे (बरीच कुत्री बरेच काही करून दाखवतात, त्यापैकी काही शिकवावे का आणि कसे).
त्यांनी pedigree खायला द्या असे सांगितले. पण आमच्या देशी मांजरांच्या अनुभवावरून आम्ही तो सल्ला पुर्णतः अंमलात आणला नाही. तिला घरी केलेलं अन्न जसं भात, भाकरी आणि chicken किंवा मासा द्यायला सुरुवात केली. त्याबरोबरीने तिला जी भाजी आवडेल म्हणजे मागून घेईल ती द्यायला लागलो जसे गाजर, मटार, फरसबी, कोथिंबिरीच्या काड्या इत्यादी. Pedigree अडीनडी ला जवळ ठेवतो. हळूहळू आमच्या असं लक्षात आलं की तिला pedigree पेक्षा घरी केलेले पदार्थ जास्त आवडतात. जसं कधी दूध भात, कधी मीठ आणि तेल न घालता केलेलं अंड्याचे आम्लेट, कधी गरम भाकरी आणि तूप, कधी थालीपीठ. सर्वात आवडतं ते chicken. कुत्र्यांना गोड देऊ नये असे म्हणतात पण ही पठ्ठी पोळीचा लाडू, शंकरपाळी, ओल्या नारळाच्या करंज्या, बेसनाचे लाडू, राजगिरा वडी ह्या वर ताव मारते. हे पदार्थ केले तर तिच्यापासून लपवून खावे लागतात.
गेल्यावर्षी दिवाळीत शंकरपाळ्यांवर डोळा ठेवून असलेली Ollie
तिला काय शिकवावे ह्याला डॉक्टरांनी अगदी practical उत्तर दिले. तिला “नाही” शिकवा. काय केलं तर चालणार नाही हे तिला कळणे सगळ्यात महत्वाचे. आम्हाला हा सल्ला अगदीच पटला. आपण आपल्या मनोरंजना साठी त्या मुक्या प्राण्याला नाही नाही ते करायला लावतो. कुत्र्याला कुत्रा राहू द्यावा, त्याला माणसाला जमतात त्या गोष्टी का करायला सांगायच्या? आणि कुत्रा आपल्याबरोबर राहणार आहे तेंव्हा आपल्या घरची शीस्त त्याला कळली म्हणजे झालं.
अनोळखी जागी म्हणजे आमच्या घरी आल्या आल्या Ollie बरीच गोंधळून गेली होती. आधी खालच्या बागेत फिरवून आणलं. ते काही तिला आवडले नाही. घरी शिरल्यावर मात्र आजीच्या कुशीत शिरून बसली आणि आजीच्या शेजारी आपली जागा निश्चित केली. आज तागायत ती आसपास असताना त्या जागेवर कोणा दुसऱ्याला बसू देत नाही ती. कुत्री आणि मांजरे एकत्र गुण्यागोविंदाने राहतात असे दाखले देणारे अनेक video social media वर बघायला मिळतात. पण प्रत्येक्षात हे प्रत्येक बाबतीत शक्य नाही हे आम्हाला कळले. आमच्या मांजरी बऱ्यापैकी वयस्कर होत्या. Ollie आल्या आल्या तिने त्यांच्याशी मैत्री करायचा प्रयत्न केला. पण आमच्या मांजरांना ते काही मंजूर नव्हते. नाईलाजाने रात्रीच्या वेळी Ollie ची रवानगी वरच्या मजल्यावर झाली. तिचे वय वाढले तसं तिलाही मांजरे नकोशी झाली. परिणामी आता आमची मांजर रात्री Ollie वरच्या मजल्यावर गेली की मग घरात येते . सकाळी मांजरीचे खाणे पिणे आटोपले आणि ती घरा बाहेर गेली की मगच Ollie ला खाली घेऊन येतो.
घरी आल्या आल्या आजीच्या कुशीत शिरलेली Ollie
खात्यापित्या घरची पूर्ण वाढ झालेली मांजरे साधरण चार ते पाच किलो वजनाची असतात. Ollie आमच्या घरी आली तेंव्हा तिचे वजन सहा किलो होते. इथूनच पुढे मांजराची पिल्ले आणि कुत्र्याचे पिल्लू ह्यात फरक असणार हे लक्षात यायला लागलं होतं. पण हळूहळू समजत गेलं की पाय फुटलेलं माणसाचं पोर आणि हे कुत्र्याचे पोर ह्यात काहीही फरक नाही. माणसाच्या लहान मुलावर जितके डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते तितकेच कुत्र्याच्या पिल्लावर लक्ष ठेवावे लागते. Ollie घरी आली आणि आमच्या घरात कुठल्या गोष्टी नेमक्या कुठे आहेत आणि त्यांची जागा कशी चुकीची आहे हे पदो पदी कळत गेलं. एखादी गोष्ट वेळच्यावेळी जागेवर गेली नाही तर त्याचा नक्की निकाल लागणारच ह्याची अनुभूती Ollie आल्या आल्या काही दिवसातच मिळाली. आदल्या रात्री अथर्व आणि काही मित्र वरच्या खोलीत कॅरम खेळत बसले होते. रात्री कॅरम आवरून ठेवला. पण अर्धा किलो बोरीक पावडर ने भरलेली plastic ची बरणी जमिनीवर राहिली. सकाळी नाश्ता करते वेळी Ollie गायब असल्याचे दिसले म्हणून अथर्व तिला शोधायला वर गेला. तोवर तिने बोरीक पावडरची बरणी चावून फोडली आणि बाहेर आलेल्या पावडर मध्ये लोळून दिवाणखान्याचा एक कोपरा पावडरीने पूर्ण माखून टाकला होता. बोरीक पावडर नाका तोंडात पोटात गेली असणारच. त्यामुळे हिला काही होईल ह्याची चिंता आम्हाला वाटू लागली. ह्या आधी अश्या अनेक गोष्टी तिने केल्या होत्या, जसं चिकन चे हाड न चावता गिळून टाकणे, चष्मा पुसायचे कापड चावून चावून गिळून टाकणे, बारीक बारीक खडे चघळून गिळून टाकणे, इत्यादी.. आणि प्रत्येक वेळी आम्ही डॉक्टरांना फोन करून सल्ला घेत असू. Wait and Watch हा त्यांचा सल्ला अमलात आणायची आता आम्हाला सवय झाली आहे.
बोरीक पावडर ने माखलेला दिवाणखाना
शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की तिला शी आणि शु घराबाहेर करायची सवय कशी लावायची. डॉक्टर म्हणाले की वेळा ठरवून तिला बाहेर फिरवून आणा. शी आणि शु होई पर्यंत घरी परत आणायचे नाही. अशी हळूहळू सवय लागेल. त्यापुढील मोठा प्रश्न असा की शी शु करायला कुठे घेऊन जायचे. घरच्या बागेत जाणे तिला नामंजूर होते. आणि बाहेर कुठेही न्यायचे तर लोकांना बिलकुल खपत नाही (अगदी तिने केलेली घाण आम्ही उचलली तरी). मग त्यावर उपाय म्हणजे तिला टेकडीवर घेऊन जाऊ लागलो. दिवसातून दोन वेळा. शेखर ने सुचवलेला उपाय, बाहेरचे लोखंडी gate लावून घ्यायचे आणि घराचा मुख्य दरवाजा नेहमी असतो तसा उघडा ठेवायचा. पण तिच्या सुरक्षिततेची चिंता मला भेडसावत होती. रस्त्यावर पळून गेली आणि कुठल्या गाडीच्या पुढ्यात आली तर तिच्यासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ती जखमी होऊ शकते, अपंग होऊ शकते किंवा जीवावर ही बेतू शकते. बरेच दिवस चर्चा झाली आणि शेवटी शेखर ने सुचवलेला उपाय आमलात आणला. पण त्या आधी बाहेरच्या लोखंडी दाराला खालच्या बाजूला पत्रे बसवून घेतले जेणे करून ती खालच्या design च्या भागातून बाहेर सटकणार नाही. ह्या उपायाने माझ्या डोक्याला बरीच शांतता मिळाली. पण कार्टी त्यातूनही दोन तीन वेळा आमचा डोळा चुकवून निसटलीच. पळून जाऊन तिला रस्त्यावरील कुत्र्यांबरोबर खेळायचे असायचे. पळून जाण्यातील धोके तिच्या ध्यानीमनी ही नव्हते.
टेकडीवर फिरायला घेऊन जायचा एक महत्वाचा फायदा म्हणजे तिला मोकळं आणि भरपूर पळता येते. रस्त्यावरून कुत्र्याला बांधून फरफटत नेणे ह्यात ना कुत्र्याला आनंद ना त्या माणसाला. शेखर तिला सकाळी फिरायला घेऊन जायला लागला आणि तिला तिकडे मोकळे सोडू लागला. एकदा सकाळी ती हरवली, काही केल्या सापडेना. अथर्व ला बोलावून घेतले टेकडीवर तिला शोधायला. तो पोचेपर्यंत शेखरला ती सापडली. कुठल्या तरी कुत्र्यांच्या मागे फिरत गेली होती. बरं, ह्या सगळ्यात आपण हरवलो आहोत ह्याचा तिला पत्ताच नव्हता. संध्याकाळी मी तिला टेकडीवर नेऊ लागले पण ती हरवेल ह्या चिंतेने तिला बांधूनच चालत न्यायची. Ollie पाच महिन्यांची असताना एकदा संध्याकाळचे आम्ही दोघे बरोबर होतो तेंव्हा एका व्यक्तीने सांगितलं की तुमच्याकडे परत यायचे आहे ह्याची गरज तिला वाटली पाहिजे, तुम्हाला नाही. तिला मोकळे सोडा. मग मी धीर करून तिला मोकळी सोडू लागले. आधी पुढे शेखर मध्ये Ollie आणि मागे मी अशी आमची वरात निघे. नंतर Ollie सरळ मार्गे न जाता उजवी डावी कडील झाडोऱ्यात गडप होत असे. आम्हाला दिसत नसली तरी तिला आम्ही दिसत असू. आम्ही तिला हाका मारत पुढे निघून गेलो की ती बाणाच्या वेगाने आणि हरणाच्या चपळाईने आमच्यापर्यंत धावत येई. असं मोकळं सोडणे ह्याचा थेट फायदा असा की Ollie तिला हवं तसं मनसोक्त भटकते आणि दमली की आमच्यापाशी परत येते. तिला परत घेऊन यायला हाणामारी करावी लागत नाही. भरपूर खेळल्यामुळे भरपूर दमते आणि घरी येऊन गुडूप झोपून टाकते. कधी काही कारणाने टेकडी चुकली तर मात्र आमचा जीव नकोसा करते.
कुत्र्याला फिरायला नेणे हे शहरात खूपच कठीण होऊन बसले आहे. जिथे तिथे माणसेच माणसे. टेकडीवर Ollie कुणाच्या अध्यात मध्यात फिरत नसली तरी अनेक लोक उकरून भांडण काढतात. आम्हाला मूर्ख, बावळट आणि कधी काही अर्वाच्य्या शिव्या ही देतात. “तुम्हाला कुत्रा चावू दे म्हणजे कळेल” असे शाप ही देतात. कुत्रा समोर आला की हा चावतो का हाच प्रश्न अधिक प्रमाणात विचारला जातो. Ollie ही अतिशय प्रेमळ कुत्री आहे. विनाकारण कोणावर धावून जाणे किंवा चावणे हे तिच्या स्वभावातच नाही. पण ते ह्या लोकांना कोण समजावत बसणार. असे लोक भेटले की आम्ही आमचा रस्ता बदलतो आणि दुसरीकडे चालू लागतो.
Ollie च्या गळ्यातील घुंगरू शी खेळताना दहा महिन्यांची मीरा
आमची नात मीरा जेंव्हा घरी आली त्यावेळी ती दहा महीने वयाची होती आणि Ollie सात महिने. ती आल्या आल्या दोघींची गट्टी जमली होती. लहान मूल आहे हे Ollie ला समजवावे लागलेच नाही. स्वतः वयाने मीरा पेक्षा लहान असून सुद्धा मीरा ची ताई झाली. दोघी घरात असल्या की तिच्या बरोबरीने असायची. मीराला खोलीत एकटीला झोपवलं असेल तर तिला सोबत करायची. प्रेमाने तिला चाटून काढायची.
Ollie मीराला सोबत करायची
कुत्रा पाळायचा जेंव्हा विचार केला जातो तेंव्हा कुत्री लोकांना नको असते. ही गंमतच आहे. म्हणजे “So cute” म्हणायला पिल्लू तर हवं असतं, पण त्या पिल्लाला जन्म देणारी मात्र नको असते. Ollie ला दत्तक घेताना हा विचार फक्त क्षणभर मनात आला होता. ती वयात येईल तेंव्हाचे तेंव्हा बघू असा आम्ही विचार केला होता. डॉक्टर म्हणाले की ती सहा महीने वयाची झाली की तिचे operation करून घेऊ म्हणजे पुढचे त्रास वाचतील. माझा मात्र ठाम विचार होता की तिला एकदा तरी पिल्ले होऊ द्यावी. त्यावर डॉक्टरांचा सल्ला असा होता कि तिला तिच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी पिल्ले झाली तर उत्तम.
Ollie वयात म्हणजे heat मध्ये आली तो काळ सर्वात अवघड होता. त्याकाळात ती मुळीच कोणाचे ऐकत नसे. जरा दाराला फट दिसली की रस्त्यावर पळून जायच्या प्रयत्नात असे. टेकडीवर फिरायला नेल्यावर माझ्या जीवाची घालमेल होत असे. माझ्या अखत्यारीत तरी तिला मी नजरेआड होऊ दिले नव्हते. Ollie साधारण नऊ महिने वयाची असताना एकदा आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तिचे त्याकाळातले एकंदरीत वागणे बघून माझी बहीण म्हणाली की “Ollie मला pregnant वाटते आहे”. मी म्हणाले “असेल. असली तरी काय करणार? बघू तेंव्हाचे तेंव्हा”. हा संवाद ऐकून अथर्व आणि शेखर उठले आणि तिला डॉक्टर कडे घेऊन गेले. साधारण तासाभराने शेखर ने फोन करून सांगितले की “अजून काहीच दिवसात अंदाजे सहा ते सात पिल्ले होणार आहेत Ollie ला, त्यामुळे कंबर कसून तयारी ला लागा….!”
माझ्या स्मरणातला भोंडला म्हणजे पुण्यात राहायला आल्यावर नवरात्री उत्सवात society मध्ये सार्वजनिक भोंडला होत असे तो. भोंडल्याची सुरुवात आईच्या एका गाण्याने व्हायची. हे गाणं सुरु झालं की सर्व बायका आणि मुली आई च्या मागोमाग एक एक ओळ म्हणत. हे लांबच लांब गाणं झालं की मग “ऐलोमा, पैलोमा..” ने पुढील गाण्यांची झुक झुक गाडी सुरु व्हायची आणि “….पाण्यात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला” इथे ती येऊन थांबायची.
कुंतीला मग दिधले वाण दुर्योधन बोले टोचून तुम्हास आहे नशिबी कोठून असले ह्या जगती ।।२।।
माता कुंती कष्टी जहाली भीम पुसे मग येऊन जवळी शोक कशाचा, चिंता कसली सांग सांग आई ।।३।।
सांगे वाणाचा वृत्तांत भीम कोपला मग चित्तात करतो हत्ती म्हणे क्षणात आला नदीतीरी ।।४।।
चिखल करी मग खळ्या खणोनी फेकी वर वर गोळे करुनी गेल्या वेशी सर्व बुजोनी घडला आकांत ।।५।।
अर्जुन बोले मग भीमाला खटाटोप हा उगीच कशाला मागू ऐरावत इंद्राला वाटाया वाण ।।६।।
बाणांचा मग जिना रचीयला भीम वरी स्वर्गास निघाला इंद्राला वृत्तांत कळाला झाला दुःश्चिन्त ।।७।।
काय तरी हे अरिष्ट आले म्हणुनी कपट इंद्राने केले दारच स्वर्गाचे लावीयले अवळोनी घट्ट ।।८।।
भीमे केला गदा प्रहार स्वर्गाचे मोडियले द्वार आला इंद्रा जवळी वीर बोले इंद्राला ।।९।।
भीमसेन बोले इंद्राला व्रत गौरीचे असे आईला ऐरावत पाहिजे आम्हाला वाटाया वाण ।।१०।।
इंद्र म्हणे स्वर्गी चा हत्ती द्यावा कैसा भूमी वरती दिधला परी तू कवण्या रीती नेशील तो खाली ।।११।।
आधी चिडविला होता हत्ती धावून आला भीमा वरती गदा प्रहारे जिरवी मस्ती भीमसेन तेव्हा ।।१२।।
पळतो हत्ती ची-ची करोनि भीम ओढतो सोंड धरोनि मुटकुळ त्याचे मग बांधोनी टाकीयले पाठी ।।१३।।
आला ऐरावत घेवोनि सजवी अंबारी घालोनी कुंतीला मग वरी बसवोनी वाटियली वाणे ।।१४।।
धन्य धन्य ती कुंती माता स्वर्ग आणिला भूवरी आता गजगौरी चे व्रत आचरता गाजे जगी कीर्ती ।।१५।।
भोंडला माझ्या आयुष्यात येण्या आधी “गजगौरी” चं गाणं आई मला आणि माझ्या बहिणीला झोपताना म्हणून दाखवायची. समज वाढायला लागली तशी ह्या गाण्यातून एक गोष्ट सांगितली आहे हे समजलं होतं. पुढे सातवी-आठवीत असताना प्रभात सिनेमा गृहात जुने सिनेमे लागायचे, त्यात “गजगौरी” ह्या नावाचा हिंदी सिनेमा बघण्यात आला आणि गजगौरी चं गाणं आणि त्यातली गोष्ट चित्र रूपात समोर आली.
मला नवल ह्या गोष्टीचे वाटते की हे गाणे आई व्यतिरीक्त माझ्या माहितीतील दुसऱ्या कुठल्याही बाईला ठाऊक नव्हते. तेंव्हा ही नाही आणि आज ही नाही. आई ची अंगाई ऐकून ऐकून गजगौरी चे गाणे तोंड पाठ झालेच होते. पण भोंडल्याच्या वेळी हत्तीच्या प्रतिमेला पाटावर साकारून त्या भोवती फेर धरून गाणी म्हणतात ती हत्तीची प्रतिमा म्हणजेच “गजगौरी” च्या गाण्यातील ऐरावत हे समजायला पुढे बरीच वर्ष लागली. पण ज्या “गजगौरी” च्या व्रतासाठी ऐरावत स्वर्गातून खाली आणायचा खटाटोप भीमाने केला, ते व्रत नेमके काय होते आणि कश्यासाठी करायचे ह्याचे उत्तर मी आता शोधते आहे. कोणी सांगू शकेल का?
असं म्हटलं जातं की माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा जास्त उत्क्रांत झाला ह्याला ज्या अनेक गोष्टी कारणीभूत होत्या, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्याचे अन्न शिजवून, प्रक्रिया करून म्हणजेच “स्वयंपाक” करून खाऊ लागला. अन्न शिजवून खाल्ले असता ते कमी लागते आणि कमी वेळा लागते. ह्या पृथ्वीवर दुसरा कोणताही प्राणी आपापले अन्न प्रक्रिया करून खात नाही असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. बहुतांशी प्राणी आपल्या जीवनातला खूप मोठा भाग अन्न शोधणे आणि खाणे ह्या मध्ये व्यतीत करतात. अन्न आणि सोबती शोधणे ह्या दोन क्रियांमध्ये मानवेतर प्राणीमात्र इतके व्यग्र आहेत की त्यांच्या मेंदूला दुसरा कुठला विचार करायची मुभा शिल्लकच राहिलेली नाही.
माणसाला “आग” किंवा “विस्तव” हाताळता येऊ लागला आणि स्वयंपाकाची खरी सुरुवात झाली. प्रथम अन्न नुसतेच उघड्या आगीवर भाजून घेणे, पुढच्या टप्प्यात अन्न आणि पाणी एकत्र करून ते आगीवर तापवून शिजवणे, त्या पुढील टप्प्यात हवे मधील जीवाणूंचा अन्ना मध्ये उपयोग करून घेणे (म्हणजेच अन्न पदार्थ फुगवणे, आंबवणे), अश्या चढत्या भाजणी ने अन्न शिजवण्याची प्रक्रिया उत्क्रांत होत गेली.
आपल्या भारत देशात अगदी वैदिक काळा पासून स्वयंपाकाचा सखोल विचार केला गेलेला आहे. कुठल्या ऋतू मध्ये काय खावे, कसे शिजवावे ह्या पासून स्वयंपाक घरातील कुठले पदार्थ कुठल्या व्याधीवर औषध म्हणून काम करतात इथपर्यंत विचार केला गेलेला आहे. आधुनिक भारतीय स्वयंपाक घरात वैदिक काळा पासून चालत आलेले पदार्थ आज सुद्धा अगदी आवडीने केले आणि खाल्ले जातात (उदा. इडली, कैरीचे पन्हे, खीर, पोळी, पुरी इत्यादी). पाककला हा आपण भारतीयांसाठी एक खूप महत्वाचा वारसा आहे हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये. मात्र हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आपल्या ह्या वारश्याला आता उतरती कळा लागली आहे.
जुन्या कुटुंबव्यवस्थे मध्ये घरातील कामे बाईमाणसाने करायची आणि बाहेरची कामे पुरुषमंडळींनी करायची अशी सुटसुटीत विभागणी होती. पुढील काळात स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने कामासाठी बाहेर पडू लागली आणि तिला दुहेरी भूमिका पार पाडावी लागली. म्हणजे बाहेर नोकरी करायची आणि घरी येऊन घरची कामे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाची जबाबदारी ही पेलायची. पण त्या पुढील काळा पासून आज पर्यंत , मुलामुलींच्या शिक्षण आणि करिअरला प्राधान्य दिले गेले आणि इतर कामे, कौशल्ये जी मागील पिढ्यांमध्ये अगदी सहज आत्मसात होत असत (अगदी स्वयंपाकासह) ती सर्व मागे पडत गेली. बहुदा त्यामुळेच सध्या मोठ्या शहरांमध्ये आणि काही प्रमाणात खेड्यात सुद्धा घरी स्वयंपाक करून खाणे हे बऱ्याच तरुण मंडळींना संकट वाटते.
मुला मुलींनी आयुष्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी (म्हणजे “चांगले”, “उच्च” शिक्षण घेऊन “चांगल्या” career च्या मागे धावण्यासाठी) म्हणून गेल्या काही पिढ्यान् मधील पालक मंडळी मुलांना घरातील इतर कामांपासून दूर ठेवू लागले. मुलाचा किंवा मुलीचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अभ्यास, coaching class, co-curricular activities त्यांच्या मागे लावून दिल्यामुळे वेळच शिल्लक रहात नाही. आणि त्यामुळे मुलाला किंवा मुलीला स्वयंपाकातले कसे काही कळत नाही असं म्हणून पालक मंडळी आपली सुटका करून घेतात. किंवा आता शिकण्याचे वय आहे, स्वयंपाक वगैरे पुढे वेळ आली की शिकतील असं ही ऐकू येतं. मला तरी वाटतं की बाहेर पैसे खर्चून कुठले तरी औटघटकेचे फुटकळ कौशल्य आत्मसात करण्याचा नादात मुलं आणि मुली स्वयंपाक ह्या घरच्या घरी आणि विनामूल्य आत्मसात होणाऱ्या, सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या, त्याच बरोबर पराकोटीचा आनंद देणाऱ्या जीवनावश्यक कौशल्याला मुकतात.
पुरणपोळी, पराठा, किंवा गवसणी सराईत पणे लाटणारा अथर्व
स्वयंपाक शिकण्यासाठी कुठलं ठराविक वय नसतं. आणि आताच्या “युगात” स्वयंपाक करणे ही फक्त घरातील कर्त्या बाईची जबाबदारी असण्याची गरज राहिली नाहीये. अगदी बाल्यावस्थे पासून स्वयंपाक शिकता येतो. नव्हे, प्रत्येक आई-वडिलांनी जाणीवपूर्वक स्वयंपाक करताना आपल्या पाल्यांना लुडबुड करू दिली पाहिजे. ही लुडबुड म्हणजेच स्वयंपाक शिकायची पहिली आणि खूप महत्त्वाची पायरी होय. आमची मुलं लहान होती तेंव्हा स्वयंपाक करताना त्यांना स्वयंपाकाच्या कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवत असू. मटार सोलून ठेवणे, पालेभाजी निवडणे, गवार, पापडी सारख्या शेंगा वर्गीय भाजांच्या शिरा काढून देणे, पोळ्या करताना शेवटची एक छोटी पोळी करायला देणे इत्यादी. ह्याचे दोन थेट फायदे झाले, एक म्हणजे मुलांना वेगळा वेळ मुद्दाम द्यावा लागला नाही आणि आपण स्वयंपाक करत असताना त्यांना दुसऱ्या कुठल्या कामात किंवा activity मध्ये मुद्दाम गुंतवून ठेवावे लागले नाही. काही कापले, चटका बसला, डोळ्यातून पाणी आले तर “आला मंतर, कोल्हा मंतर,…” हा मंत्र म्हणून बाऊ बरा करायचा आणि कामं पुढे चालू ठेवायची.
पाच महिन्याची मीरा बाबा कडून स्वयंपाकाचे धडे गिरवताना
स्वयंपाक करणे ह्या मध्ये फक्त पदार्थ करणे एवढेच अध्यरुत नाही. ढोबळ मानाने रोज काय स्वयंपाक करायचा ह्याची आखणी प्रत्येक कुटुंबात पिढ्यान् पिढ्या चालत आलेली असते. उदाहरणार्थ सर्वसाधारण भारतीय कुटुंबात सकाळी आणि संध्याकाळी जेवायला भात, भाजी, आमटी, पोळी/भाकरी, कोशिंबीर, चटणी असा चौसोपी विचार केलेला असतो. ह्या रोजच्या स्वयंपाकाची जबाबदारी घरातील ज्या व्यक्तींनी उचललेली असते, त्यांना नित्याचे पदार्थ बनवण्यासाठी किती शिधा, भाजीपाला लागतो ह्याचा अचूक अंदाज करता येत असतो. म्हणजेच त्या मंडळींना घरातील प्रत्येक व्यक्तीच्या भुकेचा अंदाज नक्की असतो. हे कोणी शिकवून येत नाही तर सातत्याने घरातील मंडळीचे निरीक्षण करून तयार झालेले अंदाज असतात. घरातील अंदाजपत्रक तयार करण्यासाठी किती महत्त्वाचा गुण आहे हा! हा गुण जर आपल्या पाल्यांच्या अंगी लहानपणा पासून आपण बाणवला तर ते किती उपयुक्त ठरू शकेल! हे ज्ञान अनुभवातून पक्के होत जाते. ह्या ज्ञानार्जनाची बीजे मात्र लहान वयात पेरावी लागतात
दर वर्षी २५ डिसेंबर म्हणजे नाताळच्या दिवशी आमच्या घरी आम्ही सोसायटी मधील सर्व मुलांच्या Christmas party चे नियोजन करायचो. ही party विशेष अश्यासाठी असायची की त्याचे नियोजन सर्व मुलं मिळून करायची. आम्ही फक्त सल्लागाराच्या भूमिकेत. एकदा menu ठरला की party च्या दिवशी सकाळ पासून सर्व मंडळी कामाला लागायची. Menu मधील पदार्थ सर्व मुलं मिळून करायची. एक वर्षी मुलांनी भरपूर cake केले होते. एक वर्ष मी छोले केले आणि मोठ्या मुलांनी पुऱ्या केल्या, एक वर्ष कच्छी दाबेली. आधी काही वर्ष सामान आम्ही आणून देत असू. नंतर मात्र सर्व मुले मिळून किती सामान लागणार ह्याची चर्चा करून बाजारातून साहित्य घेऊन येत. संध्याकाळी बागेत लावलेले Christmas tree सजवायचे आणि त्या भोवती बसून आपण केलेले पदार्थ खायचे असं ह्या पार्टी चे स्वरूप असे. ह्या निमित्ताने त्यादिवशी घरभर मुलांची धमाल आणि धुडघुस असे. मला नक्की खात्री आहे की ह्या पार्ट्यां मधून प्रत्येक मुलाने काही ना काही धडे घेतले असतील जे तिला किंवा त्याला पुढील आयुष्यात उपयोगात आणता येतील. निदान, पुढील आयुष्यात ह्या मुलांनी घरी कोणाला जेवायला बोलावले तर नियोजन करायचे असते हे तरी नक्कीच त्यांना आठवेल.
मुलांमध्ये जिज्ञासा किंवा कुतूहल निर्माण करण्यासाठी स्वयंपाक हे एक उत्तम आणि उपयुक्त साधन आहे. जेवताना पानात वाढलेले पदार्थ आधी आणि नंतर कसे दिसतात किंवा आधी आणि नंतर चवी मध्ये काय बदल होतो. एखाद्या पदार्थाला अमुक चव कश्यामुळे आली आहे हे ओळखण्याचे बाळ कडू मुलांना लहानपणीच देता येते. जेवताना पानात वाढलेल्या पदार्थांकडे नीट लक्ष देऊन जेवावे म्हणून आम्ही मुलांना एक गंमतीशीर गोष्ट करायला सांगत असू. मुलांचे जेवताना लक्ष नाही असं दिसलं की मी त्यांना एखाद्या पदार्थात काय काय घातले आहे असं ओळखायला सांगत असे. कधी अगदीच थातुर मातुर उत्तरे यायला लागली की मी त्या पदार्था बद्दल काहीतरी विशेष सांगत असे (उदाहरणार्थ हा पदार्थ आंबट करण्यासाठी एक विशिष्ट गोष्ट घातली आहे, ती कोणती ओळखा ). असं आव्हान केल्यावर मुले लक्षपूर्वक आणि चवीने खात. तो विशिष्ट पदार्थ ओळखू आला नाही आणि मी सांगितलं की मग त्या चवीकडे अधिक चौकसपणे लक्ष देऊन खात. ह्या खेळाची उपयुक्तता काही वर्षांनी अनेक प्रसंगातून लक्षात येत गेली. जसं कधी चटणी ची चव दिली की “आई ह्यात चिमूटभर साखर हवी आहे” ; कधी कोकणी वड्याचे पीठ भिजवून चव दिली तर “आई, this needs some smoke”.. कधी tomato rice ची recipe करताना भरमसाट मसाले दिसले तर टोमॅटो आणि मसाले ह्यांना चाट मारून सरळ tomato ketchup वापरून मुलांनी उत्कृष्ट पदार्थ तयार करून समोर ठेवला.
स्वयंपाकापासून तरुण मंडळी दूर जाण्याचे अजून एक कारण मला असं वाटते ते म्हणजे अपयशाची भीती. स्वयंपाक जमला नाही किंवा एखादा प्रयत्न फसला तर आपल्याला बोलणी खावी लागतील किंवा बाकी सर्व जमते, पण स्वयंपाक मात्र आजिबात जमत नाही असे टोमणे ऐकावे लागणे. मला तर वाटते स्वयंपाक हा चुका करत करत शिकण्याची गोष्ट आहे. कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाने हातात लाटणे घेतल्या घेतल्या उत्कृष्ट पोळ्या किंवा पुऱ्या केल्याचे आपण कधीही ऐकलेलं नाही. आणि मला वाटतं स्वयंपाक घर ही जगातील सर्वात सुरक्षित प्रयोग शाळा आहे आणि घरातील आपली माणसे त्या प्रयोग शाळेतील गिनी पिग्स.
आपल्याला उत्तम स्वयंपाक करता येतो ह्या माझ्या आत्मविश्वासाला छेद देणारा प्रसंग लग्ना नंतर काहीच दिवसात घडला होता. आपल्या पाककौशल्याने सासूबाईंना चकीत करून त्यांची शाबासकी मिळवण्याच्या हेतूने एक दिवस त्या घरी नसताना मी गोडाचा शिरा करण्याचा “घाट” घातला. “शिरा काय सोपा तर आहे. आईला कधीही शिरा कर असं म्हटलं की दहा मिनिटात गरम गरम शिरा हजर होतो की” असा निरागस विचार करून शिरा करायला घेतला मात्र आणि ब्रह्मांड आठवलं. कधी पाणी जास्त झालं म्हणून रवा वाढवत होते तर कधी रवा जास्त झाला म्हणून पाणी. असं करता करता जवळ जवळ किलोभर रवा आणि साखर ह्यांची आहुती माझ्या शिऱ्यात पडली होती. शेवटी घरातला रवा संपल्यावर माझ्या प्रयोगाला विराम मिळाला. माझे कौशल्य पाहून सासूबाई चकितच काय पण “थक्क” च्या पलीकडे जाऊन पोचल्या होत्या. पुढचे काही दिवस माझ्या पाक कौशल्याची चेष्टा मस्करी करत हसत खेळत पार पडले. पण हा अनुभव माझ्यासाठी अतीव मोलाचा ठरला. फसलेल्या शिऱ्याच्या अनुभवाने न डगमगता मी स्वयंपाक मजल दर मजल करत आत्मसात करत गेले.
स्वयंपाकाचा वारसा जपला नाही तर तो लोप पावतो, ह्याची मी बघितलेली अनेक उदाहरणे आहेत. दर वर्षी होळीला पुरण पोळी खाऊन झाली की शेखर न चुकता त्याच्या कुसुम आजीची आठवण काढतोच. “पोळी चांगली झाली आहे, पण पारी काही कुसुम आजी करायची तशी जमली नाहीये”. शेवटी एक वर्षी मी म्हणाले, “अरे मी कुसुम आजीच्या हातची पुरणपोळी खाल्लीच नाहीये, तर मला कसं कळणार?”. हा नित्याचा संवाद झाला की मला नेहमी वाटत राहतं की कुसुम आजी ने तिची पाककृती लिहून का ठेवली नाही. किंवा तिच्या लेकी, सूना, नात सुनांना का शिकवले नाही. किंवा लेकी, सूना, नात सुनांनी का तिच्याकडून पुरणपोळी शिकून घेतली नाही? ह्या सगळ्यात एक उत्कृष्ट पुरणपोळीची पाककृती नाहीशी मात्र झाली!
रोजच्या धकाधकीत क्वचित नाही जमलं, थोडा बदल म्हणून बाहेरून काही तयार घेऊन यायला हरकत नाही. सोय म्हणून स्वयंपाकाला बाई लावणे ते सुद्धा अगदीच चालेल. पण तिला आपल्या पद्धतीचे शिकवण्याची तिच्या कडून तसे करून घेण्याची जबाबदारी आपलीच आहे. बाहेर थालीपीठाची भाजणी विकत मिळते आणि उत्तम थालीपीठे होतात मग घरी कशाला ते धान्य भाजत बसायचे, असा विचार नसावा. आपल्या कुटुंबात परंपरेने चालत आलेली प्रमाणे, पाककृती आवर्जून जपाव्यात.
आईच्या भाजणीचे प्रमाण, काळा मसाला तिच्या हस्ताक्षरा सहीत जपून ठेवले आहे
प्रत्येक कुटुंबातील काही ठेवणीतील पारंपारीक पदार्थ नक्की शिकून घेऊन आत्मसात करावेत आणि मुलांना आवर्जून खायला घालावेत. कुटुंबातील मागच्या पिढीशी दुवा साधण्याचा स्वयंपाक हा एक उत्तम मार्ग आहे. स्वयंपाकाचा वारसा आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायची जबाबदारी जशी वर्तमान पिढीची आहे, तशीच तो वारसा ग्रहण करायची जबाबदारी पुढच्या पिढीची ही आहे. ही देवाण घेवाण झाली तरच स्वयंपाकाचा वारसा अखंडित राहील.
आंब्याच्या दिवसात आमरस आणि गवसणी करून खाण्याचा आग्रह धरणारे अथर्व आणि त्याचे सवंगडी
आम्ही शहरी मंडळी. शहरात कचरा व्यवस्थापनेची एक पद्धत आहे. रोज आपण घराची स्वच्छता करतो आणि केराची टोपली घराबाहेर ठेवून देतो. केराची टोपली घंटा गाडी किंवा महानगर पालिकेची गाडी येऊन घेऊन जाते. ती केराची टोपली रोजच्या रोज रिकामी झाली की आम्ही “आता आपलं घर अगदी शंभर टक्के स्वच्छ झाले आहे” ह्या भावनेने निश्चिन्त होतो! गेल्या काही वर्षात मात्र माझा हा निश्चिन्तपणा पार हरवून गेला आहे.
साल २०१४, स्थळ मुचरी गाव, पुणे शहरापासून सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर. मुचरीला घराचे बांधकाम चालू होते. त्या काळात आम्ही देवरूखला hotel मध्ये राहायचो. अगदी पर्यटकांसारखे नाही तर जणू hotel मधील खोली आपलीच आहे ह्या भावनेने रहात होतो. त्यामुळे कचरा आपण जितक्या काळजीपूर्वक घरी केराच्या टोपलीत टाकतो तेवढी काळजी आम्ही घेत असूच. पण त्यापेक्षा जास्त कचऱ्याचा विचार केला नव्हता. देवरूख अगदी गाव म्हणता येईल असे नाही, पण पुरतं शहर ही झालेलं नाही. त्यामुळे शहरात असलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या सोई आम्ही गृहीत धरल्या होत्या. तोपर्यंत Ecological Society च्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली होती आणि “कचरा” ह्या संकल्पनेची नव्याने ओळख होत होती.
पण गावाकडील कचरा व्यवस्थापना किंवा त्या व्यवस्थापनेचा पूर्णतः आभाव ह्याची जाणीव आम्ही आमच्या नवीन घराची घरभरणी केली तेंव्हा प्रकर्षाने जाणवली. घरभरणी गावच्या पद्धतीने करून नंतर मुहूर्त बघून वास्तूशांत सर्व नातलगांच्या उपस्थितीत करायचे ठरले. घरभरणी साठी येणाऱ्या गावकरी मंडळींना चहा साठी पेले शोधताना असं लक्षात आलं की कागदी पेले मिळत नाहीत. मिळतात ते फक्त plastic चे पेले. कारण २५ पैशाला एक प्लॅस्टिकचा पेला मिळतो आणि कागदाचा मात्र १ रुपयाला एक. मग घेणार कोण कागदी पेले? म्हणून दुकानदार मंडळी कागदी पेले ठेवतच नाही मुळी. साधारण शंभर-सवाशे मंडळी येणार होती आणि चहा द्यावा लागणारच होता. मग आम्ही त्यावर घरा बाहेर कचऱ्याची टोपली ठेवायची युक्ती काढली आणि निश्चिंत झालो. पण पाहुण्यांची पहिली फळी येऊन गेली आणि आम्हाला जबरदस्त धक्का बसला. सर्व मंडळींनी चाहचे plastic चे पेले अंगणात भिरकावून दिले होते. कचऱ्याची टोपली रिकामीच!
आम्हा उभयतांचा हे बघून संताप झाला. पण शांतपणे सर्व plastic चा कचरा उचलून टोपलीत टाकला आणि पुढच्या फळीला चहा देताना सांगितलं की चहा पिऊन झाल्यावर पेला टोपलीतच टाका. मनातल्या मनात गावाकडील लोकांचा उद्धार करून झालाच की किती बेशिस्त लोकं आहेत ही, किती घाणेरडी राहतात इत्यादी. आम्ही मात्र निगुतीने सर्व plastic चा कचरा गोळा करून पुण्याला परत घेऊन आलो…
२०१५ च्या पावसाळ्यात आम्ही मुचरीला घराजवळ वृक्षारोपण केले. तो आमचा पहिलाच अनुभव. वृक्षारोपणाचे नियोजन, म्हणजे त्या जमिनीच्या तुकड्यावर कुठली आणि किती रोपं लावायची हे ठरवून, त्याप्रमाणे रोपं बरोबर घेऊन गेलो होतो. रोपं लावायची जय्यत तयारी केलेली होती. खड्डे खणायला दोन गडी आणि रोपं खड्ड्यांमधून लावायला दोन बाया आणि आम्ही सगळे. नियोजित आराखड्या प्रमाणे कुठे खड्डे करायचे तिकडे मी ती ती रोपं खूण म्हणून ठेवत पुढे पुढे चालले होते. मागून गडी खड्डे खणून ठेवत होते आणि त्यांच्या मागून बाया आणि बाकी घरातील मंडळी plastic पिशवीतून रोपं अलगद काढून त्या त्या खड्ड्यात लावत होते. साधारण दीडशे रोपं लावण्यासाठी ची ही “assembly line” होती असं म्हटलं तरी चालेल. कारण घराजवळ रोपं लावून मग अजून जवळ जवळ साडे तीनशे रोपं त्याच दिवशी जंगलात लावायची होती.
कचरा “अ”व्यवस्थापनेच्या अगदी ताज्या अनुभवामुळे, सर्व रोपं त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवल्यावर मी माझं ठरवलेलं काम करत पुन्हा सर्व लोकांच्यात फिरू लागले. ते काम म्हणजे रोपे धारण केलेल्या plastic च्या पिशव्या गोळा करून एका पोत्यात भरून ठेवणे. घरातील सर्व मंडळी आपापली रोपे लावून झाली की न सांगता हे काम करत होतेच. आमची ही कृती बघून शेवटी एका बाईला राहवलं नाही आणि तिने मला विचारलंच. “मॅडम (माझ्या haircut मुळे गावात चिकटलेले हे बिरूद), तुम्ही ह्या पिशव्या का गोळा करताय?”. मी म्हणाले, “इकडे कचरा उचलून न्यायला काहीच व्यवस्था नाहीये, म्हणून हा plastic चा कचरा मी आमच्या बरोबर पुण्याला घेऊन जाणार आहे. पुण्यात नाहीतरी plastic चा खूप कचरा आहेच, त्यात अजून ह्या पिशव्यांची भर पडली तर विषेश फरक नाही पडणार”. हे ऐकून बाकी बायका आणि गडी हातातलं काम सोडून माझ्याकडे आ वासून बघत बसले. माझं स्पष्टीकरण ऐकून पुढचा प्रश्न आलाच. “पण तुम्ही हे का करताय?”. मी अधिक खुलासा केला, “ह्या पिशव्या उचलल्या नाहीत तर इकडे कचरा नाही का होणार”. त्यावर ती म्हणाली “अहो मॅडम, कसा होईल कचरा. जातील की वाऱ्या बरोबर उडून”. आता तोंडात बोटं घालायची पाळी माझी होती.
ह्या प्रसंगानंतर माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाली. गावातील सर्व मंडळी हे कचरा घराबाहेर फेकून देतात. त्यांना काहीच कसं वाटत नाही? आणि वाऱ्याबरोबर, पाण्याबरोबर कचरा उडून किंवा वाहून गेला तरी तो आपल्या अंगणातून दुसऱ्याच्या अंगणात जाऊन पडणार, कसं समजत नाही ह्यांना?
विचार सुरू राहिले आणि मी पार २५-३० वर्षापूर्वीच्या गावात जाऊन पोचले. त्याकाळात गावाकडील घरं शेणा मातीची. तांब्या पितळी ची भांडी वापरणारी माणसं. घरात फक्त गरजेपुरतं साहित्य अन्यथा घर रिकामे. घराच्या सजावटीसाठी कुठल्याही वस्तूंचा भरणा नाही की संग्रह नाही (मुचरी मध्ये अजून ही अशी काही घरं आहेत हे ही आठवून गेलं). ह्या अश्या घरांमधील कचऱ्याचे स्वरूप काय असेल ह्याचा विचार केला. साधारणतः अश्या घरांमधून निघणारा कचरा म्हणजे सारवलेल्या जमिनीचे झाडताना निघणारे शेणाचे कूट. ते घरात नकोसे असले तरी घराबाहेर टाकले तर अंगणातील झाडांना खत म्हणून उपयोगात येत. घरात उरलेलं अन्न गुरांना, कोंबड्यांना दिले जायचे. कधी घरी पूजा किंवा सण असेल तर जेवायला केळीची पाने किंवा पळसाच्या पत्रावळ्या, प्रसादाला वडाची पाने असत. ती सुद्धा वापरून मग अंगणात किंवा परसात टाकली तर त्याचे रूपांतर कालांतराने खतातच होणार. चुलीमधील राखेने भांडी घासली जायची, ते पाणी केळी आणि आळूला जायचं. म्हणजे आमच्या सारखे नव-पर्यावरणवादी मंडळी जे शून्य कचऱ्याचे “स्वप्न” उराशी बाळगून असतो, ते ही मंडळी हजारो वर्ष जगतच होती की!!
त्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात plastic नावाची “जादुई” वस्तू आली. गावाकडे विकासाचे वारे वाहण्याआधी विकासा बरोबर येणाऱ्या इतर गोष्टीच आधी पोचल्या आहेत. प्लास्टिकच्या वस्तू स्वस्त, टिकाऊ आणि सोयीच्या म्हणून आठवडी बाजारातून गावाकडे पोचल्या मात्र आणि हळू हळू ह्या प्लास्टिक ने गावकऱ्यांची आयुष्य व्यापून टाकली. प्लास्टिक च्या पिशव्या, शाळे बाहेर मिळणारा खाऊ, शाम्पू, साबण ह्यांची वेष्टणे, असा प्लॅस्टिकचा संचार सर्वदूर होऊ लागला. पण उपयोग संपला की प्लास्टिक चे करायचे काय हे मात्र कोणालाच ठाऊक नाही. त्यामुळे जे पूर्वापार चालत आले आहे तेच ही मंडळी ह्या नवीन कचऱ्याच्या बाबतीत करत राहिले. शहरा कडे कचरा व्यवस्थापन करायला कोणतीतरी यंत्रणा कार्यरत आहे. पण हे मात्र गावाकडे नाही.
अजून विचाराअंती, गावाकडील ह्या परिस्थितीला आपण शहरी मंडळी सुद्धा काही प्रमाणात कारणीभूत आहोत असं मला वाटतं. दोष द्यायला आपल्या दिशेने बोटं वळली की साहजिकच आपण निर्दोष असल्याचा पवित्रा घेणार. मी मात्र त्रयस्थपणे ह्याकडे बघून विचार करते तेंव्हा बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. शहरी माणसाला पर्यटनाची हौस असते. आता त्या हौसेचे रूपांतर गरजेत झालं आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पर्यटन म्हणजे एखादा नवीन प्रदेश बघणे, तिथली संस्कृती अनुभवणे. म्हणजेच आपण जे रोजचे आयुष्य जगतो त्यापेक्षा काही निराळं, वेगळं जगण्याचा अनुभव घेणे. पण आपल्यापैकी किती लोकांनां असा निराळा अनुभव घ्यायचा असतो अथवा तो रूचतो? आता बघा ना, मुलांना गिर्यारोहण करायला पाठवायचे तर पालकांना तिकडे शुद्ध पाणी (म्हणजे Bisleri) मिळेल का ही भ्रांत असते. तिकडे बरोबर खाण्यासाठी आपल्या पाल्यांना आवडतात ती पॅकबंद खाऊची पाकिटे दिलेली असतातच. हा कचरा (bisleri बाटल्यांचा आणि खाऊच्या पिशव्यांचा) ही लेकरं परत आणतात का हो?
गावाकडचे life experience करायला म्हणून जेंव्हा कुटुंब बाहेर पडतं तेंव्हा त्यांची शेणाने सारवलेल्या जमिनीवर झोपायची तयारी असते का? तिकडे गेल्यावर स्थानिक विहिरीचे पाणी प्यायची तयारी असते का? तिथे पिकणाऱ्या भाज्या तिथल्या पद्धतीने रांधलेल्या असतील तर त्यांचा आस्वाद घ्यायची तयारी असते का, की तिथे जाऊन सुद्धा पंजाबी, Italian, Chinese ह्याच पदर्थांची मागणी असते? साधारणतः travel company बरोबर पर्यटनाला गेलेल्या लोकांचे प्रवास अनुभव ऐकले तर तिकडे अगदी आपल्या पद्धतीचे जेवण सकाळ, दुपार, संध्याकाळ कसं मिळालं, ह्याचेच कौतुक जास्त ऐकायला मिळत. समुद्रकिनारी किंवा धबधब्याच्या , ओढ्याच्या कडेला बसून बिअर च्या बाटल्या रिचवून, त्या तिथेच सोडून परतणारे शहरी पर्यटक ह्यांच्या बद्दल तर बोलण्याची सोयच नाही!
आमच्या लहानपणी दूरदर्शन वर Films Division च्या काही कार्टून फिल्म लावत असत. सर्व कार्टून फिल्म्स काही ना काही सामाजिक प्रबोधन करणाऱ्या असत. वरील वर्णन केलेल्या मुचरी मधील प्रसंगाने मला अश्याच एका कार्टून फिल्म ची आठवण करून दिली. ती कचरा ह्या विषयावर होती. रस्त्याने एक मनुष्य चालतो आहे. अचानक एका घरातून त्याच्या अंगावर कचऱ्याचा ढीग येऊन पडतो. त्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे जात राहतो तर पुढे प्रत्येक घरातून कचरा त्याच्या अंगावर पडत राहतो. शेवटी तो भयंकर चिडतो आणि सर्व कचऱ्याचे ढीग तो लाथेने चकचकीत झालेल्या घरांमध्ये परत पोचवतो. शेवटी त्याच्या आणि त्या शहरातील सर्व मंडळीच्या सुदैवाने कचरा गोळा करणारी गाडी येते आणि सर्व कचरा उचलून घेऊन जाते. थोडक्यात ह्या फिल्म चा संदेश असा की कचरा व्यवस्थित गोळा करून टोपलीत टाका आणि वेळच्या वेळी कचरा उचलणाऱ्या गाडी कडे सोपवा आणि निश्चिंत व्हा! पण खरंच आपण निश्चिंत होऊ शकतो का?
साल २०२२, स्थळ पुणे शहर, एका प्रथितयश महाविद्यालया बाहेर. दिवस रात्र त्या महाविद्यालयातील लेकरं महाविद्यालया बाहेरील विविध उपाहार गृहांमधून विविध खाद्यपदार्थ खात उभी असतात. उपाहारगृहांच्या बाहेर भल्यामोठ्या कचऱ्याच्या टोपल्या ओसंडून वाहत राहतात. Morning walk ला निघालेली मंडळी कचऱ्याचे ढीग चुकवत रस्त्याने चालत राहतात, आणि उपाहारगृहांपासून काही अंतरावर असलेल्या आमच्या बागेत वाऱ्याबरोबर उडत आलेली गुटख्याची रिकामी पाकिटे, chocolate ची wrappers, वेफर्स ची रिकामी पाकिटे मला सापडतील तशी मी उचलून कचऱ्याच्या टोपलीत टाकत राहते. खिन्नपणे विचार करत राहते की गावाकडील आडाणी लोकांना कचऱ्या बद्दल शिकवू की ह्या उच्चशिक्षित “आडाणी” लेकरांना….