वाळवणं

वाळवणं हा एक अस्सल भारतीय वारसा आणि माझा अत्यंत आवडता उद्योग!. वाळवणं घालायचा मुख्य हेतू हा असावा की शेतातील अतिरिक्त उत्पादनं विविध प्रक्रिया करून उन्हं देऊन ते टिकवण्याचा कालखंड वाढवणे. वर्षा च्या ज्या काळात धान्याचं किंवा भाजीपाल्याचं दुर्भिक्ष असेल, त्या वेळी हे वाळवलेले जिन्नस उपयोगात आणायचे. भारतातील विविध भागात त्या त्या प्रांतातील परंपरेनुसार गृहिणी वाळवणं घालत असत. सूर्याची ऊर्जा वापरून आपल्याला आवडतात ते विविध पदार्थ वर्षभरासाठी करून ठेवणे. ही कल्पनाच किती जबरदस्त आहे!

मला वाळवणं घालायला आवडणे ह्याचे मुख्य कारण अर्थात माझं लहानपण. आयुष्याच्या सुरवातीला मुंबईत असून सुद्धा अगदी वरच्या मजल्यावर घर होतं. त्यामुळे आई होळी आणि गुढी पाडव्याच्या मधल्या पंधरवड्यात वाळवणं घालीत असे. चिकवड्या आणि कुरडया हे वर्षभर तळण म्हणून आणि वर्ष भराच्या तूर डाळीला उन्हं “लावून” मग साठवून ठेवणे ही कामं न चुकता दर वर्षी असत.

चिकवड्या करणे म्हणजे आमच्या साठी धमाल उपक्रम. सकाळी लवकर उठून आई आदल्या रात्री भिजवून ठेवलेला साबुदाणा शिजवून त्यात जिरे घालून मिश्रण तयार ठेवत असे. नंतर गच्चीवर plastic पसरून त्या वर चमच्याने साबुदाण्याच्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या पापड्या घालायच्या. संध्याकाळी उन्हं उतरली की ते plastic घरी घेऊन यायचे आणि अर्धवट वाळलेल्या पापड्या त्यावरून सोडवायच्या. सकाळी पापड्या घालून झाल्यावर साबुदाण्याच्या मिश्रणाचे पातेलं लक्ख चाटून घेतलेलं असे. संध्याकाळी चिकवड्या plastic वरून सोडवताना एक परातीत आणि एक तोंडात अश्या क्रमाने काम चालू असे. त्या अर्धवट वाळलेल्या चिकवड्या खाणं म्हणजे स्वर्ग सुख. दुसऱ्या दिवशी ह्या पापड्या परत उन्हात ठेवायच्या आणि त्या दिवशी संध्याकाळी कढईत तेल तापवून चिकवड्या तळून खायच्या! अश्या रीतीने चिकवड्यांची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होत असे!

मी पहिली-दुसरीत असतानाचा वाळवणाचा एक धमाल किस्सा आहे. सालाबाद प्रमाणे आईने चिकवड्या केल्या. मला ही छोटया वाटीत चिकवड्यांचे मिश्रण आणि plastic चा एक कोपरा दिला होता. त्या दिवशी एक कावळा आमची नजर चुकवून चिकवड्या लांबवायच्या प्रयत्नात होता. मी कार्यकर्तीच्या भूमिकेत शिरले आणि आईला सांगितलं की मी राखण करायला गच्चीवरच थांबते, नाहीतर हा कावळा आपल्या चिकवड्या खाऊन टाकील. आई निर्धास्त होऊन खाली निघून गेली. मी एका हातात काठी ची तलवार घेऊन “राखण” करू लागले. तो चतुर कावळा मला पुरून उरला. त्याने एका चिकवडीत चोच घातलीच. मी चिडले आणि माझी तलवार घेऊन त्याच्या मागे गच्चीभर धावू लागले. अचानक माझा पाय घसरला आणि मी जोरदार आपटले. मला काही समजेना की अचानक आपण घसरलो कश्या.. आणि एकदम जाणीव झाली की आपल्या सर्वांगाला कसले तरी चिकट द्रावण लागलं आहे. अजून एका क्षणा नंतर लक्षात आलं की कावळ्याला हकलायच्या नादात आपण गच्चीला पूर्ण फेरी मारली आहे आणि ज्या चिकवड्यांची राखण करायला आपण गच्चीवर थांबलो होतो त्यावरच आपण पाय घसरून पडलो आहोत. अत्ता हे लिहिताना सुद्धा मला खूप हसू येतंय, पण त्यावेळी मला नक्की जे वाटत होतं ते म्हणजे अपमान, फजिती, आणि आई रागवेल ही भीती, ह्या तिन्ही भावनांचे एक अनामिक मिश्रण होते. खाली जाण्याशिवाय पर्याय नव्हता. घरात शिरल्यावर आईला काय समजायचं ते समजलं आणि तिने एक अक्षर ही न उच्चरता मला थेट bathroom मध्ये shower खाली उभं केलं.

पुण्यात राहायला आल्यावर तळमजल्यावरील वास्तव्य आणि त्यावेळच्या सोसायटी मध्ये मैदान राखून ठेवलेले असल्यामुळे पुण्यात ही वाळवण घालत असू. पण जस जसा काळ पुढे सरकत गेला, शहरांमधील मोकळ्या जागाच नाहीश्या झाल्या. स्वछ सूर्यप्रकाश ही इतकी मुबलक आणि फुकट ऊर्जा आता दुर्मिळ झाली. इतकी की साधे कपडे वाळत घळण्यापुरेस ऊन देखील कुणाच्याही घरात शिरू शकत नाही. मधल्या काळात बायका ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी धंद्याला लागल्या आणि हा वाळवणाचा वारसा काळाच्या पडद्याआड गडप होतोय की काय अशी भीती वाटू लागली. मग ठरवलं की आपल्या घरात जिथे आणि जितकं ऊन मिळतं तितकी तरी वाळवणं घालायचीच. गच्चीवर भरपूर ऊन आहे, त्याचा पुरेपूर वापर करायचा. मग रुचिरा, स्वयंपाक अशी पुस्तकं काढली आणि वाळवणं करायचा एकच सपाटा लावला. दर वर्षी जमेल तेंव्हा आणि जमेल ते वाळवण घालतेच. चिकवड्या, सांडगे,  सांडगी मिरची, तांदुळाच्या फेण्या, कच्च्या केळीचे पीठ, दह्यातली भेंडी, कांदयचे काप, कारल्याचे काप, गेला बाजार आवळा candy, छुंदा आणि गुलकंद सुद्धा …

तांदुळाच्या फेण्या

कोकणात घर बांधल्यावर तर “ऊन” ही एक पर्वणीच झाली आहे. वाळवणं घालायच्या मौसमात तिकडे जाता येईल असं नाही. पण गेलोच तर चिकवड्या किंवा सांडगे जे पटकन करता येईल आणि एक दोन दिवसात तयार होईल अशी वाळवणं घालतेच. तिकडे वाळवण कार्यक्रम केला असता त्या वेळी घरात असलेले आबालवृद्ध त्यात भाग घेऊ शकतात, ही अजून एक जमेची आणि मौजेची बाजू. अश्याप्रकारे वाळवणं घालणं ही कुटुंबा बरोबर “Quality time” मिळवण्याची एक अमूल्य अशी संधी आहे असं मला वाटतं.

कुटुंब रंगलंय “सांडग्यात “

कोकणात गेल्यामुळे माझ्या वाळवणाच्या यादीत अजून भरच पडली आहे. आता तर कधी कोकम फळं मिळाली तर आमसुलं आणि कोकम सरबत, अतिरिक्त आंबे आणि फणस झाले तर आंबा पोळी किंवा फणस पोळी असे ही पदार्थ करू लागले. अर्थात मी केलेली आंबा पोळी किंवा फणस पोळी ही बाजारात मिळते त्या स्वरूपा पर्यंत कधीही पोचू शकत नाही. “वाढता वाढता वाढे” च्या चालीवर “वाळता वाळता खावे” असं म्हणत घरातील मंडळी त्या अर्धवट वाळलेल्या पोळ्यां फस्त करून टाकतात….

हे सर्व वाचून अनेकांना प्रश्न पडू शकेल की बाजारात ह्या सर्व वस्तू मुबलक आणि रास्त किंवा स्वस्तात मिळत असताना हा खटाटोप कश्यासाठी? मुळात, मी सुरवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे वाळवणं हा आपला वारसा नक्कीच आहे आणि तो वारसा किंवा ते ज्ञान पुढच्या पिढी साठी जपून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे हे मी मानते. त्याचबरोबर एखादी वस्तू कशी किंवा कशापासून बनते हे ज्ञात असणं हे ही तितकेच गरजेचं आहे. मला पहिल्यांदा कोकम फळं मिळाल्यावर कोकणातल्या माझ्या चुलत सासूबाईंना आमसुलं कशी करतात हे विचारून त्या प्रमाणे आमसुलं केली. करायला सुरुवात केल्यावर माझ्या डोक्यात शंकेचं काहूर माजलेलं होतं की ह्या लाल चुटुक कोकम फळांची कुट्ट काळी आमसुलं कशी काय होतील…पण सात पुटं चढवल्यावर म्हणजेच कोकम फळांच्याच रसात सात रात्र कोकम फळांची सालं भिजवून सकाळी वाळत घातली की काळी कुट्ट आणि अनेक वर्षे टिकणारी आमसुलं तयार होतात. ही अद्भुत प्रक्रिया मी स्वतः आमसुलं केल्या शिवाय मला समजलीच नसती कधी. आता बाजारात आमसुलं विकत घ्यायला गेलं की चटकन समजतं की ही सात पुटी नाहीत किंवा टिकाऊ ही नाहीत.

वाळवणं म्हणजे गप्पा-गोष्टी करायची अनोखी संधी

अनेकांना असं ही वाटत असेल की आपला वारसा जपावा, किंवा आपल्या आई-आजीचे खास वाळवणाचे पदार्थ शिकून आत्मसात करून आपल्या लेकरांना खाऊ घालावे. पण आता शहरात राहून हे कसे जमवायचे ? कारण शहरात वापरता येईल असा सूर्यप्रकाश मिळायची ठिकाणे गायब झाली आहेत. मला अनेकवेळा असं वाटते की शहरातील लोकं एकमेकांना काही न काही कारणाने भेटत असतातच. भेटून गप्पा आणि खाणीपिणी करताना एखाद्या वाळवणाचा उपक्रम का नाही योजत? Barbeque party असेल तर सगळे चटकन तयार होतात. तिकडे आपल्या हाताने टिक्का भाजून घेतातच की. हे पाश्चिमात्य fad इकडे नव्याने रुजवण्या पेक्षा आपल्याला वारसा म्हणून लाभलेलं वाळवण का नाही करत? Get-Together साठी एखाद्या farm house वर जमतो, तेंव्हा तिकडे सर्वांनी मिळून हासत खिदळत सांडगे किंवा चिकवड्या किंवा पापड असे काही केले आणि नंतर ते पदार्थ वाटून आपापल्या घरी नेले तर प्रत्येक वेळी त्या चिकवड्या तळताना किंवा ते पापड खाताना आपल्याला त्या वेळी केलेल्या मजेचा पुनःप्रत्यय घेता येऊ शकतो, नाही का?

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१८-एप्रिल-२०२१

रांगोळी

ऐंशी च्या दशकात मी पहिल्यांदा मुंबईहून पुण्याला राहायला आले, अर्थात आई-बाबांन बरोबर. बाबांना त्यांच्या office चे quarters मिळाले होते. सोसायटी मध्ये सर्व बँकेचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय. बहुतेक सर्व “आई” मंडळी त्याकाळी घरीच असायची आणि त्यामुळेच सर्व सण अगदी साग्रसंगीत पार पडायचे. सण म्हटलं की त्यातील एक अविभाज्य घटक म्हणजे रांगोळी.  

आपल्या संस्कृती मध्ये रांगोळी ला विशेष स्थान आहे. दारात रांगोळी असणे हे शुभ मानलं जातं, आणि अश्या घरात सर्व आगंतुकांचे अगदी न चुकता आदरातिथ्य होणार हे दारातली रांगोळी जणू सांगत असते. दारी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत दारात असलेल्या प्रसन्न रांगोळीने झाले, की प्रवासाचा निम्म्याहून अधिक शीण दूर होत असे. कुठल्याही प्रसंगाची शुभसुचकता ह्या रांगोळी मुळे अधोरेखित होत असे.

साधारण नाताळ ची सुट्टी लागली की राव काकूंची विजया दिवे लागणीच्या सुमारास आमच्या building च्या समोरील चौकोन झाडून घ्यायची आणि नंतर पाण्याचा सडा घालून निघून जायची. हे सर्व आमच्या खिडकीतून दिसत असे. पहिल्या वर्षी आठ-नऊ वर्षांची मी आता पूढे काय घडणार ह्याची वाट बघत खिडकीत बसून राहिले होते. रात्रीची सर्व कामे आवरल्यावर राव काकू आणि विजया परत खाली आल्या आणि मी आवाक होऊन बघत राहिले. राव काकूंनी साधारण चार फुटी चौकोन भरून ठिपक्यांची रांगोळी काढली…मी तात्काळ आई ला वर्दी दिली. काही क्षणातच मी, आई आणि माझी बहिण अपूर्वा बाहेर अंगणात रवाना झालो. रांगोळी काढून झाल्यावर त्यांनी आणि विजयानी त्यात सुंदर रंग भरले. एकीकडे त्यांच्या आणि आईच्या गप्पा चालू होत्याच. त्यात ही आनंद वार्ता मिळाली, की हा रांगोळी काढण्याचा कार्यक्रम संक्रांती, म्हणजे त्यांच्या पोंगल पर्यंत, असाच नेमाने चालू राहणार आहे आणि तो सुद्धा दर वर्षी…मग काय, पुढची अनेक वर्षे आम्ही राव काकूंना ह्या रांगोळ्यांमध्ये रंग भरायला मदत करत असू. संक्रांतीच्या आदल्या रात्री ची रांगोळी म्हणजे सूर्याचा रथ असे आणि त्यानंतर ह्या  रांगोळ्यांच्या उत्सवाचा समारोप होत असे, पुढच्या वर्षी पर्यंत.

चैत्र महिन्यात चैत्रांगण  आणि दिवाळीत ठिपक्यांची रांगोळी आई नेमाने दारा बाहेर काढायची. मी शेजारी बसून मनात येतील ते प्रश्न तिला विचारीत असे. “आई, रांगोळी कशी तयार होते?” हा असाच मला पडलेला  प्रश्न.आईने सविस्तर उत्तर दिले, “रांगोळी चा खास दगड असतो, तो खाणीतून काढून, कुटून त्याची रांगोळी बनवतात”. थोडी मोठी झाल्यावर ह्याच्या पुढचा प्रश्न विचारला होता. “खाणीतले रांगोळीचे सर्व दगड संपले की मग काय होणार?” म्हणजेच जगातली सर्व रांगोळी संपली, तर रांगोळी काढणार कशी? आईने त्यावेळी काय उत्तर दिले आता आठवत नाही. पण जगातली सर्व रांगोळी संपली तर आपण रांगोळी काढायची कशी, ह्या समस्येने मी मात्र बरेच दिवस अस्वस्थ झाले होते.

मी स्वतः आई झाल्यावर आणि मुले लुडबुड करायच्या वयाची झाल्यावर मी पुन्हा दिवाळीत रांगोळ्या काढु लागले. अगदी राव काकूंसारख्या भव्यदिव्य नाही, पण घरातील एक कोपरा रांगोळी साठी राखीव ठेवला होता. दरम्यान बाजारात रांगोळीचे अनेकानेक रंग मिळू लागले होते. दर वर्षी नवीन रंग घ्यायला गेलं की अजून नवीन नवीन रंग छटा बाजारात दिसत. गाड्या भरभरून रांगोळीचे रंग मला भुरळ पाडत आणि मी दिवाळीचे चार दिवस रोज नवीन रांगोळी काढून त्यात रंग भरत असे. मुलांची सुद्धा लुडबुड चाले त्यात. जशी रंगांची भाऊगर्दी वाढत गेली तशी माझ्या एक गोष्ट लक्षात  येऊ लागली. ती म्हणजे दर वर्षी दिवाळी झाली की मी रांगोळी काढण्यासाठी वापरलेल्या बोटांना भेगा पडतात आणि त्या नंतर अनेक आठवडे, महिने तश्याच राहतात . ज्या वर्षी रांगोळी काढली नाही, त्यावर्षी मात्र बोटं अगदी नितळ! हळूहळू रंगांचे निरीक्षण केले आणि लक्षात आले की त्यांना कसला तरी उग्र वास देखील आहे. सर्व निरिक्षणांअंती मी निष्कर्ष काढला की रांगोळीचे विविध रंग हे chemicals पासून बनवलेले आहेत, हे नैसर्गिक नाहीत. लहानपणी रांगोळीचा दगड संपला तर रांगोळी कशी काढणार, ह्या विचाराने जशी अस्वस्थ झाले, तशी ह्या रासायनिक रंगामुळे नक्की कशा कशाचे नुकसान होत असेल, ह्या विचाराने बेचैन झाले!

तो पर्यंत “eco-friendly holi colors” असं ऐकू यायला लागलं होतं आणि नैसर्गिक पदार्थांपासून हे रंग करता येतात हे ही ऐकले होते. पण रांगोळ्यांचे  सार्वजनिक वेड तर दिवसागणिक वाढत होतेच. त्याला काही पर्याय असू शकेल का? त्यात एक दिवस fridge मध्ये एक बीट लोळत पडलेलं दिसलं. सुरकुत्या पडून पडून म्हातारं झालेलं आणि त्यामुळे दुर्लक्षित. अचानक लहानपणी “ज्ञानदीप” किंवा तत्सम कार्यक्रमात एक मुलाखत बघितलेली आठवली. दक्षिण भारतात पांढरी रांगोळी ही तांदूळ भिजवून वाटून त्याची पातळ paste करून मग त्यात एक चिंधी बुडवून काढली जाते. हे त्या कार्यक्रमात बघितलं होतं. बीट खाताना होणारे लालेलाल ओठ सुद्धा आठवले आणि एकदम “Eureka Moment” अनुभवला!

बीट सोलून, किसून त्याचा रस काढून घेतला. त्यात मूठभर तांदूळ रात्रभर भिजवले. सकाळी हे तांदूळ सावलीत वाळत ठेवले. खडखडीत वाळल्यावर मिक्सर मध्ये वाटले. फिकट गुलाबी रंगाचा तांदुळाचा रवा तयार झाला. लागलीच दारात छोटीशी रांगोळी काढली आणि त्यात हा गुलाबी रवा “रंग” म्हणून भरला! सासूबाई सकाळी फिरून आल्या आणि लगेच म्हणाल्या “काय सुंदर दिसतीये दारातली रांगोळी”. गुलाबी रंगाचे गुपित सांगितल्यावर दोन्ही हात जोडून म्हणाल्या  “धन्य आहेस! सुचलं कसं हे तुला?”  त्यानंतर मात्र असे रंगीत “रवे” करायचा छंदच  लागला जणू! नैसर्गिक रंग शोधण्यासाठी बागेत धाव घेतली. कुठले ही फुल, पान, फळ चुरडून बघायचं. रंग करता येईल असं  वाटलं तर जी बीटाच्या बाबतीत केली तीच प्रक्रिया करायची . प्रयोग करता करता आता मी मायाळू च्या फळांन  पासून गुलाबी, गोकर्णा च्या फुलांन  पासून फिकट निळा, जासवंदी  च्या पानांन  पासून फिकट हिरवा, झेंडू च्या फुलांन पासून पिवळा आणि केशरी असे पाच रंग तयार करू शकले. 

मायाळूच्या फळांपासून तयार झालेला गुलाबी रंग
जासवंदी च्या पानांपासून तयार केलेला हिरवा आणि झेंडू पासून तयार केलेले पिवळे आणि केशरी रंग
झेंडू आणि मायाळू
गोकर्ण, झेंडू आणि मायाळू

ह्या माझ्या प्रयोगांनी आणि शोधांनी दोन गोष्टी साध्य झाल्याचे समाधान आहे. एक म्हणजे रांगोळीचे रंग पूर्णताः नैसर्गिक पदार्थांपासून तयार झाले. त्यामुळे मला स्वताःला खूपच फायदा झाला. हाताची बोटे आता कायम नितळ राहू शकतात. त्याचबरोबर रंगातील सर्व पदार्थ निसर्गातून मिळाले आहेत, त्यामुळे हे रंग वापरल्याने निसर्गाची कुठलीही हानी होत नाही. ही रांगोळी आवरताना ती बागेतील कचऱ्यात टाकली तरी तिच्यामुळे कुठल्या जीवजंतूंचे नुकसान होत नाही आणि तिचे पूर्णपणे नैसर्गिक विघटन होऊन जाते.

तांदुळा पासून रंग बनवले हे माझ्या काही स्नेही मंडळींना खटकले. त्यांचे म्हणणे की तेच तांदूळ कोण्या गरजूला उपयोगी पडले असते. मला मात्र रस्त्यातून काढलेल्या भव्य आणि रंगीत रांगोळ्या बघितल्या की वाटतं ह्या पद्धतीने रांगोळी ची हौस भागवण्यापेक्षा एखादवेळेस एखादा रिकाम्यापोटी झोपला तरी हरकत नाही. निदान माझ्या रांगोळी मुळे माती, कीटक, त्या कीटकांवर पोसणारे पशु, पक्षी ह्यांचे तरी काही नुकसान होणार नाही!

ज्यावेळी पर्यावरण पूरक जीवनशैली चा विचार केला जातो, त्या वेळी Renewable आणि Non-Renewable resources चा विचार करावाच लागतो. Non-Renewable resources म्हणजे अशी संसाधने एकदा वापरली की परत वापरता येत नाहीत. उदाहर्णाथ खाणीतून काढलेला रांगोळीचा दगड. एकदा काढून त्याची रांगोळी केली की संपला. निसर्गात तो दगड पुन्हा तयार होत नाही किंवा तो तयार होण्या साठी लाखो वर्षांचा कालावधी जावा लागतो. त्यामुळे पर्यावरणपूरक विचार करायचा झाला तर अशी संसाधने वापरावीत जी एकदा वापरून संपत नाहीत किंवा त्याचे पुनरुत्पादन अगदी कमी कालावधीत सहज शक्य आहे (उदाहर्णाथ तांदुळ). दक्षिण भारतात पारंपारिक रांगोळी ही तांदुळा पासून काढली जाते. रंग सुद्धा तांदुळापासून करता येतोय, तर आता नक्कीच तांदुळाची पिठी रांगोळीला पर्याय म्हणून वापरता येईल. म्हणजेच आता रांगोळीचा दगड संपला (देव करो आणि असं न होवो) तरी रांगोळी नक्कीच काढता येईल. ही दुसरी समाधानाची बाब!

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
१०-फेब्रुवारी-२०२१

गच्चीवरील बाग

हा लेख लिहिण्यामागे माझा कोणाही व्यक्तीला दुखवायचा हेतू नाही. पण गेल्या काही वर्षांपासूनच्या माझ्या पर्यावरणीय प्रवासात मला जे उमगत गेले आणि माझ्या विचारांमध्ये जे बदल होत गेले ते इकडे व्यक्त करते आहे.

माझ्या बालपणीचा खूप मोठा काळ पुण्यात व्यतीत झाला. सदनिकेत राहत असून सुद्धा आजूबाजूला बाग लावणे किंवा असणे हे भाग्य मला लाभले. त्या नंतर जवळ जवळ पंधरा वर्ष माझी आणि बागेची ताटातूट झाली. परत स्वतःच्या घरा भोवती बाग लावली ती landscape artist ने design करून दिलेली होती. Landscape artist ने design केलेली बाग सुरवातीची काही वर्षे आम्ही उभयतांनी राबून देखरेख करायचा प्रयत्न केला. शहरातील नीटनेटक्या बागा बघीतल्या, की आम्हाला जाणवायचं की त्या नीटनेटक्या ठेवण्यासाठी किती मनुष्यबळ खर्ची पडत असेल. अजून एक गोष्ट जाणवली की बाग ही कायम बदलत राहणारी जागा आहे… फक्त आणि फक्त बळजबरीने ती आहे तशी अभंग ठेवता येते.

घराभोवती असलेली बाग आणि गच्चीवरील बागेतील तयार वाफे

आम्हाला हळूहळू ह्या बळजबरीचा कंटाळा येऊ लागला आणि आम्ही आमच्या पद्धतीने बाग “सजवू” लागलो. त्या साठी विविध साहित्य, अवजारे  बागेत येऊ लागली. रस्त्याकडेला मिळणाऱ्या आणि आवडलेल्या फुलझाडांपासून सुरुवात झाली. त्यानंतर व्यावसायिक रोपवाटिकेचा शोध लागला.  प्रत्येकवेळी रोपवाटिकेमध्ये गेलो की एखादे नवीन झाड आम्हाला खूणावी आणि आम्ही ते विकत आणून आमच्या बागेत प्रस्थापित करत असू. बागेत झाडांची गर्दी होत होती आणि आम्हाला सुद्धा हळू हळू झाडांचे अंतरंग उमगत गेले

हळू हळू झाडे, वनस्पती ह्या मध्ये आपले-परके म्हणजेच देशी वनस्पती आणि विदेशी वनस्पती ह्याची माहिती मिळत गेली आणि आम्ही कटाक्षाने विदेशी झाडे अथवा वनस्पती विकत आणायचं बंद केलं. नंतर नंतर मुद्दाम रोपवाटिकेमध्ये जायचे सुद्धा बंद केलं.

बागेत आलेली विविध फुले

आता आपली बाग आहे तर भाजी पाला वाढवून आपल्या बागेतली ताजी ताजी भाजी घ्यायची ठरवलं. त्याचे निष्फळ प्रयत्न काही वर्ष झाले. अपुऱ्या उन्हामुळे काहीच नीट वाढेना. बागेतली झाडे वाढत होतीच आणि त्याबरोबर सावली सुद्धा वाढत होती. माझ्यातल्या निसर्ग प्रेमी शेतकऱ्याने उन्हाच्या शोधात गच्चीवर स्थलांतर केले. गच्चीवर देखील पत्रे टाकलेले होते, त्यामुळे काही ठराविक ठिकाणीच ऊन यायचे. त्या जागा मी कुंड्यांनी भरून टाकल्या. वांगी, मिरची, पालेभाज्या, अननस, विड्याच्या पानांचा वेल अशी माफक लागवड केली.

बागेने दिलेली फळे आणि भाजी पाला

साधारण दोन वर्षांपूर्वी घरावर नवीन मजला वाढवला. त्यामुळे आम्हाला नवीन गच्ची मिळाली आणि त्याबरोबर गच्चीवरील बाग नव्याने विकसित करायची संधी सुद्धा मिळाली. गच्चीवरील बागेतून आपल्या भाजीपाल्याच्या रोजच्या  गरजा भागणार नाहीत ह्याचा अंदाज होता. म्हणून गच्चीवरील बागेचा अजून कुठल्या प्रकारे उपयोग करता येईल ह्याचा विचार करू लागलो. योगायोगाने देशी बीज संवर्धनाबद्दल माहिती मिळाली आणि त्या मध्ये कार्यरत असलेल्या काही लोकांच्या संपर्कात आलो. 

विविध गटांमध्ये प्रवेश केला आणि आमची थोडी निराशा झाली. आमची अपेक्षा साधारण अशी होती की ह्या गटांमधील सदस्य हे निसर्ग प्रेमी असतील, इतर चारचौघांपेक्षा थोडे सहिष्णू  असतील. पण हळू हळू जाणवत गेलं की त्यांनी लावलेल्या बागेत त्यांना इतर कुठल्याही किड्यामुंगीचा शिरकाव झालेला खपत नाही. पाना फुलावर काही वेगळं दिसलं की लगेच त्याची चर्चा आणि त्यावर जीवघेण्या उपायांची देवाण घेवाण सुरु होते! बरं बहुतेक मंडळींनी जगावेगळे उपक्रम जशी “सावंत आजींची बाग” बघितलेले असतात, त्यावर चर्चा करून “विलक्षण”, “”संपन्न करणारा अनुभव” असे अभिप्राय दिलेले असतात. पण प्रत्यक्षात मात्र हे सर्व बासनात गुंडाळून ठेऊन देतात! मुळात देशी बीज संवर्धन करणे म्हणजे कुठल्याही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक उपायांशिवाय (कीटकनाशके इत्यादी) जे बीज उत्पन्न होईल त्याचा प्रसार करणे. पण, जर आपण विविध उपाय करत राहिलो तर त्या बीजांमधील निसर्गदत्त ताकदीचा त्यांना विसर पडेल की काय अशी भीती वाटते.

वास्तविक आपण शहरी शेतकरी/माळी आहोत. आपल्या मर्यादित जागेत आपण खूप काही पिकवू शकणार नाही. आपल्या छोट्याश्या बागेतून मिळणारा भाजीपाला हा प्रत्येक वेळी आपल्या कुटुंबाला पुरेसा असेलच असे नाही. म्हणजेच, आपल्या बागेतील उत्पन्नावर आपली उपजीविका अवलंबून नाही. ही आपली हौस, आवड आणि काही मर्यादित प्रमाणात आपल्याला ताजा भाजीपाला मिळवून देणारी अशी जागा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 

सुदैवाने आमच्या बागकामाच्या सुरुवातीच्या काळात आमच्या हाती श्रीकांत इंगळहळीकर ह्यांनी लिहिलेले “आसमंत” हे पुस्तक लागलं. त्यातील “जिवाभावाचा बहावा” हे प्रकरण आमच्यावर विशेष परिणाम करून गेलं. त्या लेखातील त्यांचा अनुभव वाचून असे लक्षात आले, की आपण जेंव्हा एखादे झाड लावतो, आपल्याला फक्त त्याच्याकडून फुले किंवा फळांची अपेक्षा असते. म्हणजे झाड हे आपल्याला सुंदर दिसणारी, सुगंधी फुले किंवा मधुर फळे देणारे एक “यंत्र” आहे. त्याला खत घातलं, पाणी घातलं की त्यानं त्याचं काम केलेच पाहिजे अशी सर्व साधारण शहरी विचारसरणी असते. आपण झाडा कडे service provider ह्या दृष्टीने बघतो. त्याला वाढवले आहे, खत-पाणी दिले आहे, आता त्यानं आपल्याला सावली, फुले, फळे दिलीच पाहिजे. एखाद्या झाडाची आपल्याला अपेक्षित प्रगती झाली नाही, तर ते तोडून टाकायला सुद्धा आपण मागे पुढे बघत नाही.

शास्त्रज्ञ असं सांगतात, की पृथ्वी वरून माणूस वजा केला, तर पृथ्वीचे काहीच बिघडणार नाही; परंतु पृथ्वीवरून जर कीटकांना वजा केले, तर मनुष्य जाती ३-४ वर्षात नामशेष होईल. माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवण्या मध्ये कीटकांचा किती मोठा वाटा आहे हे  ह्यावरून स्पष्ट होतं. पण जिथे आपण आपल्या आवडत्या झाडाची गय करत नाही,  तिथे त्यावर पोसल्या जाणाऱ्या इतर जिवांना विचारते कोण? एखादा किडा, आळी, कोळी पटकन मारून टाकायला आपला हात क्षणभर ही थबकत नाही. पण एखादे झाड जोपासताना, त्याचे बारीक निरीक्षण करून त्यावर कोणत्या जीव जंतूंची हालचाल होत आहे, त्याचे काय कारण आहे, तो जीव न मारता आपण झाडाची जोपासना करू शकतो का? असे विचार क्वचितच करतो.

आमच्या बागेत आता अनेक वर्ष कोणत्याही प्रकारची कीटकनाशके, रासायनिक खतं ह्याचा वापर कटाक्षाने टाळलेला आहे. असं म्हणा ना, की आमची बाग आता आमची राहिली नाही. सिमेंट च्या जंगलात, कोणत्याही वेळी कुठल्याही जीवाला तिकडे बिनधोक राहता येईल असे ठिकाण तयार झाले आहे. परिणामी, बागेत अनेक प्रकारचे जीव जंतू आहेत, पण कुठल्याही एका कीटकाचा उपद्रव होत नाही. कारण, त्या कीटकांवर पोसली जाणारी अन्नसाखळी कालांतराने तयार झाली आहे. बागेत अजून ही भरपूर भाजी पाला मिळतोच असं नाही, पण कुठल्याही वेळी, बाग जिवंत आणि चैतन्यमय असते काही विशेष कष्ट न घेता!

बागेला भेट देणारे कीटक आणि इतर जनावरं

“आसमंत” मधील बहाव्याच्या लेखाने आम्हाला बागेकडे बघायची वेगळी दृष्टी दिली…झाडाकडे  एकाकी दृष्टी ने न बघता त्याच्या आसमंतातील स्थाना कडे बघावे ही दृष्टी दिली…झाड परिपक्व होऊन बहरायच्या कितीतरी आधीपासून ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आनंद देऊ शकतो, फक्त आपण संयम ठेऊन ते आनंदाचे क्षण शोधण्याची गरज असते.

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
२८-नोव्हेंबर-२०२०

आपला तो बाब्या…..

Tweety, Cherry आणि Sobo तिघे आमची दत्तक मुलंच जणू….फक्त ती मांजरं आहेत…आता अनेक वर्षांच्या सहवासाने त्यांचे स्वभाव, त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या भावना माहीत झाल्या आहेत…कुठल्या मांजराचे “म्याव” म्हणजे नक्की काय, त्याचा अंदाज आता बऱ्याच वेळी बरोबर येतो. Tweety आणि Cherry मांजरी असल्यामुळे त्यांना घर प्रिया आहे. त्यांच्यासाठी “घर कोंबड्या” हे विशेषण अगदीच चपखल लागू पडेल.

बाई ग, किती हा उकाडा Cherry

ह्या दोघी कायम माझ्या पाळतीवर असतात…Office मधून परत आले की माझ्या गाडीचा आवाज ऐकून माझ्या स्वागताला न चुकता दारात उभ्या असतात! मी कधी ही बाहेर जाऊन आले, कि त्यांचा जीव भांड्यात पडतो आणि त्या खूप आनंदी होतात! त्यांच्याशी गप्पा मारल्या की सुरेख प्रतिसाद देतात. मी कुठले ही काम करत असले तर मला सोबत करतात. माझ्या कामात हातभार लावता येतो आहे का ह्याचा ही प्रयत्न असतो. “Company” देण्याच्या सवयी मुळे Tweety चे इयत्ता नववी पर्यंत चे भाषा विषय आणि इतिहास, भूगोलाचा अभ्यास झाला आहे असं म्हटलं तरी चालेल..

मी काही suggest करू का? – Tweety

Sobo बोका असल्याने “उडानटप्पू”. भुकेच्या वेळी घाई घाई ने घरी येतो आणि भरा भरा खाऊन तुरुतुरु बाहेर पसार होतो. अश्यावेळी हटकले तर बघून न बघितल्यासारखं करतो आणि ठरवलेल्या दिशेला धूम ठोकतो. अधून मधून दिवस च्या दिवस गायब असतो. अश्या “गायब” episodes नंतर बरेचदा घरी जखमी अवस्थेत परत येतो. कधी कुठल्या बोक्यानं शेपटी जवळ जोरात चवलेलं असतं, कधी चेहऱ्यावर ओरखडे असतात, कधी मारा मारी मध्ये एखाद्या पायाला दुखापत झालेली असते, कधी भयंकर घाबरलेला ही असतो. एकदा कुत्र्याच्या कचाट्यातून कसाबसा सुटून गंभीररित्या जखमी होऊन ही आलेला होता…

मी आपली रोज न चुकता सकाळी खायच्या वेळी त्याला खिडकीतून हाक मारत…आणि तो यायच्या परिस्थितीत असेल तर हाक ऐकून येतो.

मासे…मासे…मला मासे – इति Sobo

ह्या वर्षी पावसाळ्यात मला मागच्या सोसायटी मधील मिसेस रांगोळे ह्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या की बहुतेक तुमची मांजरी आमच्या इकडे आली आहे आणि ती खूप ओरडते आहे. लगोलग मला त्यांनी photo काढून पाठवला. बघते तर Sobo. तसा ही त्याचा एक “गायब” episode चालूच होता. धो धो पावसात मी त्याच्या कडे पोचले. आमच्या घराच्या अगदी मागच्या बाजूला असलेल्या building मध्ये पाचव्या मजल्यवर बिचारा आर्त स्वरात ओरडत होता…मी ही कासावीस झाले, वाटलं बिचारा किती घाबरला आहे, काही सुचत नाहीये त्याला, आणि इतक्या सर्व घरां मधून बरोबर मांजर आवडणारी व्यक्ती कशी काय सापडली त्याला, कमालच आहे! म्हणून त्याच्या हुषारीचं कौतुक ही वाटलं मला. कसंबसं त्याला घरी आणलं आणि खायला घातलं…खाऊन पुन्हा Sobo पसार झाला..

त्यानंतर मिसेस रांगोळे अगदी नियमितपणे त्याची चौकशी करत आणि कधी त्यांच्या कडे आला तर लगेच मला update ही देत. Sobo सुद्धा अधून मधून त्यांच्याशी गप्पा मारायला गेल्यासारखा तिकडे जाऊ लागला.

तीन-चार दिवसापूर्वी रात्री मांजरांच्या भांडणाचा जोर जोरात आवाज आला. मला अंदाज आलाच की बहुतेक Sobo ला कोणी बलाढ्य बोका मारत असावा…आता हा कुठल्या परिस्थितीत असेल कोण जाणे. मी आपली नित्यनेमाने त्याला खिडकीतून हाक मारायची आणि त्याच्या वाटचे मासे बाजूला ठेऊन द्यायची…

माझं भुकेलं, घाबरलेलं पोर किती दिवस उपाशी आहे अश्या विचारात असतानाच अचानक काल मिसेस रांगोळे ह्यांनी त्याचा फोटो पाठवला…अगदी आरामशीर गादीवर पहुडलेला होता…विचारपूस केल्यावर कळले की तीन-चार दिवसांपूर्वी जी मारा मारी झाली त्यात Sobo ने Gigy नावाच्या एका मांजरीला तिच्या राहत्या घरातून हुसकून, तिकडे ठाण मांडलं होतं.

Gigy ला तिच्या घरातून हुसकावून, तिच्या घरात निवांत बसलेला Sobo

अरे देवा! हे कार्ट असं वागेल असं माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. तर मिसेस रांगोळे म्हणल्या की Gigy चे आई-बाबा गावाला गेले आहेत, त्यामुळे Gigy ला त्या रोज खाऊ घालतात. पण ह्याने तिला हकलून दिल्यामुळे, तिचा खाऊ हाच रोज मटकवतो आहे…आता Gigy ला कुठे हुडकायचं ते कळत नाहीये. मी म्हणाले, तरीच तो घरी येत नाहीये. तर त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली, म्हणाल्या की Sobo आमच्या सोसायटीत Sobo Datar म्हणून famous आहे. सर्व बायकांशी तो भरपूर गप्पा मारतो, पण पुरुषांना मात्र घाबरतो…हे सर्व ऐकून, मी फक्त घेरी येऊन पडायची बाकी होते…

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
२९ नोव्हेंबर २०२०

हळद

लहानपणी आई-बाबांन बरोबर पुण्यातील मंडई मध्ये दर रविवारी आठवड्याची भाजी घेऊन यायचा कार्यक्रम न चुकता असे. त्या फेरफटक्यात काही फळे आणि भाज्यांची खरेदी अगदी लक्षात रहायची, जसं लाल चिंच (ती अजून ही फक्त मंडई आणि तुळशीबागेत मिळते), चण्या-मण्या बोरं, करवंद, जांभळं, शेंबडी बोरं (पोरं नाहीहं! आता दोन्ही अजिबात दिसत नाहीत), केळफूल, फणस, सिमला मटार, उंधियो च्या special भाज्या, इत्यादी. ह्या special भाज्या घेतल्या की मग घरी येऊन त्या निवडणे हे एक सर्वांनी मिळून करायचं काम असे..मटार सोलताना पातेल्यात कमी आणि पोटात जास्त जाणार हे गृहीत धरूनच भरपूर आणलेले असायचे. वर्षातून एकदा थंडीत न चुकता उंधियो चा कार्यक्रम असायचाच. मग तो पूर्ण दिवस विविध प्रकारची पापडी निवडणे, मेथीचे गोळे करणे, सुरण, कोनफळ, कच्ची केळी चिरून देणे अश्या कामांमध्ये जायचा. दुपारी ४:३० च्या सुमारास आई उंधियो फोडणीला टाकीत असे…संध्याकाळी तयार झाला की मग येता जाता उंधियो वर ताव मारायचो आम्ही. आता ह्या उंधियो पुराणाचा आणि ह्या लेखाच्या शिर्षकाचा काय संबंध असं म्हणाल… पण थांबा, लवकरच हात घालते त्याला!

लग्नानंतर सुद्धा अनेक वर्ष मी, शेखर आणि मुले न चुकता उंधियो खायला हजेरी लावायचो. तो कधीतरी आई कडून शिकून घ्यायचा असं ठरवलं होतं. एक वर्ष आईकडून यादी लिहून घेतली आणि आईला घरी येऊन मला शिकवं असे सांगितलं…त्या यादीत एक महत्वाची वस्तू होती आणि ती म्हणजे ओली हळद! उंधियो “उंधियो” सारखा लागण्यात ह्या हळदीचा खूप मोठा वाटा आहे. मला पहिल्यांदा हळद पूड आणि ओली हळद ह्याच्या वापराने चवीत काय फरक पडतो ते कळलं.

पुण्यातल्या बागेत आलेली पहिली ओली हळद

हळद मनात भरण्याचं अजून एक कारण होतं, ते सुद्धा लहानपणीच. पावसाळ्यात आई मंडईतून कधीतरी हळदीची पाने आणीत असे. त्या पानांचा वास मला भारी आवडायचा आणि आज ही आवडतो. ही पाने वापरून आई आमच्यासाठी पानगी करीत असे…पानगी हे क्वचित खायला मिळणारे पक्वान्न एकदा खाऊन आम्ही वर्षभर त्याची आठवण काढत असू. मैत्रेय आणि अथर्व “आई खाऊ दे ना!” ह्या वयाची झाल्यावर त्यांना आपले पारंपरिक पदार्थ खायला घालू लागले आणि मला पानगी आठवली. हळदीची पाने आणायला माझा मोर्चा थेट मंडईत. तिकडच्या भाजी विक्रेत्यांनी फुकट lecture दिलेच…आहो, हळदीची पाने आत्ता कुठे, ती पावसाळ्यात मिळतात, त्या वेळी या, मी हात हलवत घरी परत. पुढच्या पावसाळ्यात लक्षात राहील ह्याचा नेम नाही. अशी बरीच वर्षे पानगी शिवाय गेली.

तांदुळाची पिठी, पिकलेली केळी, गूळ, मीठ सर्व ताकात कालवून पानगी चे मिश्रण केले आहे. हे मिश्रण आपल्या चवी प्रमाणे तांदुळाच्या पिठात काय हवे ते घालून करता येते
हळदीच्या दोन पानां मध्ये पानगी चे मिश्रण घालून पानगी तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेता येते, किंवा मोदका प्रमाणे वाफवून सुद्धा घेता येते
गरम गरम पानगी घरी कढवलेल्या तुपा सोबत खाण्याची मजा केवळ अवर्णनीय आहे

एक वर्षी उंधियो च्या भाज्या घेताना अचानक युक्ती सुचली. म्हटलं आपण ओली हळद घेतो आहोत, तीच कुंडीत पेरली तर घरच्या घरी हळदीची पानं मिळतील. पाहिजे तेंव्हा पानगी करता येईल. म्हणून हावरटपणा करून चांगली अर्धा किलो ओली हळद घेतली. घरी येऊन कुंडी तयार करून त्यात लावली सुद्धा (जानेवारी मधे) आणि रोज न विसरता त्याला पाणी घालू लागले. हळद काही उगवली नाही. मी म्हटलं गेले पैसे मातीत आणि नाद सोडून दिला. ५-६ महिन्यांनी एक दिवस अचानक हळद पेरलेल्या कुंडीतून भरपूर कोंब फुटलेले दिसले आणि मला कोण आनंद झाला! ह्या सर्व प्रक्रियेतून माझ्या नकळत माझं एक प्रकारे शिक्षण होत होतं. ते म्हणजे हळद (आणि त्या नंतर इतर झाडे झुडपं) वेळ आली की आपोआप रुजतात आणि वाढतात, तोपर्यंत ते मातीत निद्रिस्थ असतात.

बागेत उगवलेली हळद

त्या नंतर पानगी साठी हळदीची पाने आणि उंधियो साठी ओली हळद मला कधीही विकत आणावी लागली नाही. हळदीची पाने मोदक वाफवताना सुद्धा वापरू लागले ज्यामुळे मोदकांना हळदीची छान चव येते. कधीतरी चहा करताना सुद्धा एखादं पान घातलं तर छान वास येतो चहाला.

मोदक वाफवताना खाली हळदीची पाने ठेवून वाफवले तर मोदकांना हळदीचा सुरेख स्वाद लागतो
लोणी कढवताना हळदीचे पान घालून कढवले तर तुपामध्ये हळदीची चव उतरते

कोकणात घर बांधले त्या नंतरच्या पावसाळ्यात अशीच मंडईमधून अर्धा किलो ओली हळद घेतली आणि तिकडच्या बागेत पेरली. त्यावेळी काही विशेष विचार केला नव्हता. वर्षभरानंतर हळद काढली तर खूपच ओली हळद निघाली. हे म्हणजे आता सोसायटी बाहेर वाटे करून विकावी लागणार की काय असं वाटलं. मग म्हटलं की ह्याची पावडर करावी. You Tube विद्यापीठाकडे धाव घेतली. हळद उकळत्या पाण्यात शिजवून नंतर बारीक तुकडे करून खडखडीत वळवली. वाळवलेली हळद खूप नव्हती, त्या मुळे मिक्सर वर वाटली. वाळलेल्या हळदीचा रंग बाहेर मिळणाऱ्या हळकुंडा सारखा नव्हता, त्यामुळे मी बऱ्यापैकी साशंक होते. पण मिक्सर चं झाकण उघडलं आणि पुन्हा सुखद धक्का बसला, सुरेख हळदी रंगाची पूड तयार झाली होती. ही हळद मी औषध म्हणून अनेक महीने जपून ठेवली होती.

ओली हळद स्वतः पिकवून आणि घरी प्रक्रिया करून तयार केलेली हळद पूड

कोकणात हळद लावायचं प्रमाण हळूहळू वाढवत नेलं. गेले ४-५ वर्ष कोकणात केलेली हळद वापरतो आहोत. आता थोड्या जास्त प्रमाणात हळद लावतो. पूर्णपणे शेणखत आणि फक्त पावसाच्या पाण्यावर वाढवलेली, तिकडेच स्वच्छ करून शिजवून वाळवलेली. आम्हला लागते तेवढी बाजूला काढून बाकीची ज्यांना हवी त्यांना विकत देतो.

कोकणात घेतलेले हळदीचे पहिले पीक
कोकणात प्रक्रिया केलेली हळद

हळद कोकणात करायचा उद्धेश फक्त इतकाच की हा बहुगुणी, औषधी पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात शुद्ध स्वरूपात असावा. ज्या वस्तूला आपण औषधाचे स्थान दिले आहे, तिच्या शुद्धतेची खात्री कुठल्या प्रमाणपत्राने का द्यावी? नाही का? उंधियो आणि पानगी साठी लागणारी हळद कुंडीत लावून प्रयोग करता करता आम्ही आता दार वर्षी हळदीचे पीक घेऊ लागलो आहोत. बागेत हळद लावणे चालूच आहे, आता कधी पेरायची विसरले तरी आधीच्या वर्षी ठीक ठिकाणी मातीत राहिलेली हळद पावसाळा सुरू झाला की मला “हॅलो” म्हणायला कधीच विसरत नाही!!

हळदीचे फूल

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
३०-जुलै-२०२०

मुक्काम पोस्ट मुचरी

Mukkam2

पार्श्वभूमी

मुक्काम पोस्ट मुचरी ची सुरुवात नेमकी कुठे झाली हे शोधण्याकरता आपल्याला थेट आमचे लग्न ठरले त्या काळात जावे लागेल. लग्न ठरल्या पासून होई पर्यंत आम्ही दोघे रोज भेटायचो आणि बऱ्याच गप्पा मारायचो. अर्थात लग्न ठरल्यावर बाकी लोक काही वेगळे करत नाहीत. पण बोलता बोलता एक दिवस माझा भावी नवरा शेखर म्हणाला की “मला बंगल्यात राहायला खूप आवडते”. मी चमकले, कारण मलाही बंगला आणि भवतालच्या बागेची खूप आवड होती (अजून हि आहेच). त्या वेळी दोघांनी ठरवून टाकले की जेंव्हा आणि जसे जमेल तशी ही आवड पूर्ण करायची. त्या प्रमाणे आमचे बंगल्याचे चे स्वप्न “झुळूक” च्या रूपाने २००४ मध्ये साकार झाले.

दरम्यानच्या काळात १९९७ च्या मे महिन्यात आम्ही शेखर च्या काकू कडे नेवरे येथील त्यांच्या घरी गेलो. तिकडे काकूंच्या च्या आई-वडिलांचे जुने मातीचे घर होते. त्यांनी लावलेल्या आंब्याच्या बागा आणि मे महिना असल्यामुळे तिकडे आंब्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आलेले त्यांचे ३०-४० नातलग असा विस्तृत पसारा बघायला, अनुभवायला मिळाला. आम्हाला जे दिसले, भावले ते म्हणजे तिथली शांतता, शुद्ध हवा, आणि गावा कडची माणसे… काकूंच्या घरात एकाच वेळी ३०-४० लोक असून सुद्धा कुठल्याही प्रकारचा गोंधळ, गडबड काहीही नव्हते. त्या वेळी काकूंची आई पण तिकडे होती. त्यांचा प्रेमळ दरारा सुद्धा जाणवला. मुख्य म्हणजे त्या एका घरात इतके विविध उपक्रम एकाच वेळी चालू होते, की ते बघून आम्ही थक्क झालो होतो. उदाहरण द्यायचे झाले तर, सकाळी ५:३०-६:०० ला उठल्या पासून साधारण ८:००-९:०० वाजेपर्यंत चहा, कॉफी करणे अविरत चालू होते. त्याच बरोबर, नाष्ट्या साठी म्हणून अटवल भात चुलीवर चढवलेला असे. एकी कडे दुपारच्या जेवणाचा बेत आखला जात असे. भात तयार झाला की आधी पुरुष मंडळी आणि लहान मुले नाश्ता करून घ्यायचे. पुरुष मंडळी आंब्याच्या बागेत आंबे तोडायला निघून जायचे आणि मुले खेळायला. नंतर सर्व बायका मिळून नाश्ता करायच्या आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायच्या. भाजीचा फणस कापून चिरून ठेवणे, आंबे फोडी करून ठेवणे किंवा रस काढून ठेवणे, आमटी, भात, चटणी, पोळ्या अशी चारी ठाव तयारी सुरु असायची. तोवर वाडीतली गडी माणसे येऊन त्यांचे काम सुरु करायचे. ती कामे म्हणजे आमसुले करणे, कोकम सरबत करणे, फणसाचे तळलेले गरे करणे, आंबा पोळी, फणस पोळी करणे, खळे सारवणे, कोकमाच्या झाडा वरून कोकमे खाली उतरवणे अश्या स्वरूपाची अनेक कामे चालू असायची.

दुपारी जेवणाच्या सुमारास सर्व पुरुष मंडळी सकाळच्या फेरीतील कामे उरकून घरी परतायची. मग ते आणि सर्व लहान मुले मिळून विहिरीवर पंप लावून अंघोळ करायचे! दुपारी सुग्रास जेवणा बरोबर कोकणी मेव्याचा प्रसाद, म्हणजे भरपूर आंब्याच्या फोडी आणि रस, फणसाचे गारे, कैरी किंवा आंब्याचे लोणचे असे. जेवणे झाली की जागा मिळेल तिकडे सतरंज्या टाकून सर्वजण पटापट आडवी होत कारण लगेच दुपारच्या फेरीची कामे सुरु करायची असत. संध्याकाळी मंडळी परतली की चहा व्यतिरिक्त कोकम चे ताजे सरबत, कैरी चे पन्हे, कोकम फळाच्या गराचे पन्हे, काजू च्या बोंडांचे सरबत आणि कधी कधी काकूंनी केलेले फणसाचे सांदण ही असे! संध्याकाळी मुलांबरोबर काही उत्साही मोठी मंडळी क्रिकेट, आंधळी कोशिंबीर इत्यादी खेळ खेळण्यात रंगून जायची. रात्री मागच्या अंगणात चूल पेटवून त्यावर भाकरी, झुणका, वांग्याची भाजी असा साधा पण रुचकर बेत असायचा. रात्री सर्व जण पुढच्या अंगणात गाद्या घालून झोपायचे. भर मे महिन्यात सुद्धा रात्री कुडकुडून जीव जाईल की काय इतकी थंडी असायची. पंखा, AC ची जरूरच नाही.

नेवऱ्याच्या मुक्कामात अगदी आदर्श गोकुळ म्हणावे असे तीस-चाळीस व्यक्तींचे आनंदाने एकत्र नांदणारे घर बघायला मिळाले. नेवरे मधील आमचा मुक्काम अविस्मरणीय झाला. असे भरले घर बघून आम्ही दोघेही खूपच भारावून गेलो….वाटून गेले, आपल्याला असे काही उभे करता येऊ शकेल का?

Mukkam3

शोध मोहीम
१९९७-२००४ ही वर्षे आमची पुण्यात घर शोधणे, बांगला बांधणे ह्या कामात गेली. त्या नंतर परत जेंव्हा गुंतवणुकीचे विचार सुरु झाले तेंव्हा काय करायचे असा प्रश्न पडला. पुण्यात आजून एक फ्लॅट घ्यावा का असे जेंव्हा शेखर ने विचारले, तेंव्हा माझा साफ नकार होता. मुळात फ्लॅट गुंतवणूक म्हणून घेणे ही संकल्पना मला मान्य नव्हती आणि नाही. मग काय करायचे म्हणून आमच्या दोघांच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली. नेवरे आजून मनात घर करून होतेच. त्या मुळे आम्ही आपसूक जमीन विकत घ्यावी ह्या विचारा पर्यंत येऊन पोहोचलो.

सुरुवातीला पुण्याच्या आसपास काही जमते आहे का ते बघायला सुरुवात केली. त्यातून शेखर चा स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट करायची ठरली की त्या विषयाच्या खूप खोलात जाऊन त्याची पूर्ण चिरफाड केल्या शिवाय त्याला चैन पडत नाही. अगदी झपाटल्या प्रमाणे तो वागू लागतो. आळस, चालढकल मुळीच खपत नाही. मग अगदी पेपर मधील छोट्या जाहिरातींपासून ते एजन्ट ना भेटून चर्चा करणे, ह्या सर्व गोष्टी त्याने केल्या. ह्या सर्वा अंती एक-दोन जमिनींची माहिती मिळायची. मग शनिवार, रविवार आम्ही दोघे ती बघायला जायचो.

शेखरच्या अभ्यासा मुळे जमीन घेण्यातले बारकावे समजायला लागले. एक वर्षभर इकडे तिकडे फिरल्यावर शेखर ने एक दिवस मला विचारले की जमीन आपण नक्की कश्यासाठी घेणार आहोत. आपल्याला त्या जमिनीत काय करायचे आहे? फलोत्पादन करायचे आहे का? तर मग तळेगाव च्या आसपास जमिनी बघितल्या पाहिजेत. शेती करायची आहे का? तर मग पुण्याबाहेर जावे लागेल साधारण भोर, बनेश्वर च्या आसपास वगैरे वगैरे.

त्या वेळी मी एक मोघम स्वप्न (इंग्रजी मध्ये त्याला Vision असे म्हणता येईल) सांगितले. म्हणाले मला आपल्या भविष्यात (उतार वयात) असे व्हायला आवडेल की आपण आपल्या गावातल्या घरात राहत आहोत, बाहेर धो धो पाऊस पडत आहे, आपला सहकारी (तूर्तास त्याला आपण विठू म्हणू) आपल्या शेतात काम करून परतला आहे, आपण दोघे बाहेर पडवीत झोपाळ्यावर बसलो आहोत, त्याची बायको (रखमा) स्वयंपाक घरात काही काम करते आहे आणि मी तिला आवाज देते, “रखमा, विठू आला गं! चहा टाक बघू सगळ्यांना…” बस इतकंच….

२०१० मध्ये आम्हा नातलगांची सहल कोकणात दापोली ला गेली होती. तिकडे जाण्याआधी शेखर ने दापोली मधील एजंट चे फोन नंबर वगैरे मिळत आहेत का ते बघून ठेवले. छोट्या जाहिरातीं मधून दापोली परिसरातली एक दोन जमीन मालकांशी फोन वर चर्चा करून तिकडे आलो की भेटू असे ठरवून टाकले. दापोली च्या मुक्कामात काही विशेष हाती लागले नाही. पण आमच्या शोधला दिशा मिळाली. नक्की ठरले कि जमीन कोकणातच घ्यायची.

मग पुण्यापासून जितके जवळ तितके चांगले असा विचार करून आम्ही कोकण शोध मोहीम सुरु केली. सुरवात खुद्द दापोली पासून केली. बरेचसे शनिवार आणि रविवार दापोली ला जाऊन जमिनी बघणे असा कार्यक्रम सुरु झाला. दापोली ला अनेक फेऱ्या झाल्या आणि चक्क दापोली चा कंटाळा आला. पुणे-मुंबईला बऱ्यापैकी जवळ असल्या मुळे दापोली ला पर्यटकांची फारच गर्दी झाली आहे आणि ती उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. मग दापोली व्यतिरिक्त कुठे जमीन मिळते आहे का ते बघू लागलो. दापोली च्या फेऱ्यांचा एक उपयोग असा झाला कि बऱ्याच एजन्ट लोकांबरोबर आमच्या ओळखी झाल्या. त्या मुळे ते आमच्याशी संपर्क साधून जमिनीची माहिती देत आणि आम्ही शनिवार-रविवार ठरवून ती बघायला जात. दापोली नंतर आमच्या केळशीला अनेक फेऱ्या झाल्या. पण काही जमेना, आवडे ना.

२०११ मध्ये मी कामा निम्मित काही आठवडे थायलंड ला गेले होते. निघायच्या दिवशी शेखर ला फोन केला तेंव्हा कळले कि तो शनिवारी कोकणात जमीन बघायला जाणार आहे. मी शनिवारी पहाटेच पोचणार होते, त्या मुळे मला घेऊन जाणार नाही असे त्याने ठरवून टाकले होते केले होते. मी मात्र ठरवले होते की काहीही झाले तरी आपण जायचे. सकाळी ६:०० ला घरी पोहोचले, बॅगा तश्याच टाकल्या, अंघोळ, चहा उरकला आणि उशी पांघरूण घेऊन गाडीत बसले.

Mukkam4

आरवली गावाजवळ एक जमीन कळली होती. ती जाऊन बघितली. ती काही विशेष पटली नाही. पण तिकडे जवळच एक एजंट कळला होता. त्यांच्या कडे गेलो जेवण, गप्पा झाल्या. त्यांनी सांगितले की वेळ असेल तर आजून एक जागा तुम्हाला दाखवतो. संध्याकाळी ४:०० च्या सुमारास मुचरीला पोहोचलो आणि संबंधित जमीन मालकांना घेऊन जमीन बघायला गेलो. मुचरी मधील हे रान आम्हाला विशेष आवडले. पसंती कळवून आम्ही पुण्याला परतलो.

त्याच सुमारास केळशी मध्ये वर्तक म्हणून एक कुटुंब होते ज्यांना त्यांची आंब्याची बाग विकायची होती. ती सुद्धा आम्हाला पसंत होती. मग बरीच चर्चा केल्यावर आम्ही मुचरी हे ठिकाण ठरवून टाकले.

मुक्काम

मुचरी मध्ये २५ एकर सलग रान विकायचे होते. आधी एजन्ट करवी काही होते का ते बघण्यात जवळ जवळ एक वर्ष निघून गेले. नंतर आम्ही सूत्र हातात घेतली. एक दिवस पुण्याहून निघून थेट मुचरी ला पोहोचलो आणि जमीन मालकांना भेटलो. त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले आणि पुढील वर्ष सव्वा वर्ष पाठपुरावा केला.

पाठपुरावा हा कधी फोन वरून, कधी तिकडे जाऊन त्यांच्या बरोबर चर्चा करणे, अडचणी समजून घेणे, त्यातून मार्ग काढणे असे अविरत चालू ठेवला. ह्या दरम्यान २५ एकर तुकड्याला लागून ३-३ एकर चे सलग तुकडे पण वाडीतील दोघांना विकायचे होते. ते आम्हीच विकत घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. असे लक्षात आले कि गावातील लोकांना एखादी गोष्ट घडवून कशी आणायची हे बरेचदा समाजात नाही. मग शेखर ने बराच खटाटोप करून शेवटी मार्च २०१३ मध्ये आमचे मुचरी येथील ३१ एकर रानाचे खरेदीखत झाले.

ऑगस्ट २०१३ मध्ये आम्ही पावनखिंड ला गेलो होतो. त्यावेळी पावनखिंड रिसॉर्ट चे मालक श्री. शिरगावकर ह्यांच्याशी मी गप्पा मारत होते. त्या सुमारास माझ्या बहिणीचा फार्महाऊस बांधण्याचा विचार चालू होता आणि कुठल्या पद्धतीचे फार्महाऊस बांधायचे ह्या संदर्भात आम्ही विचार करत होतो. मातीचे बांधावे का RCC चे ह्या बाबत शिरगावकरांचा अनुभव काय आहे हे जाणून घायचे होते. मी शिरगावकरांना सहज सांगितले की आम्ही अशी अशी जमीन विकत घेण्याचा विचार करत आहोत. तुमचा अनुभव काय आहे ह्या बाबतीत. त्यांनी सांगितले कि कुठली ही गोष्ट घेणे हे सगळ्यात सोपे आहे. अवघड कामे त्यानंतर सुरु होतात. त्याची तुमची तयारी कितपत आणि काय आहे ह्याचा विचार केला आहे का?

आणि खरंच ह्याचा विचार आम्ही केला नव्हता. लोकांना सांगितले की कोकणात जमीन घेतली आहे, की त्यांचा पुढचा प्रश्न तयार असे, “आता त्याचे काय करणार? असे करा, सरळ आंबे आणि काजू लावा. चांगले उत्पन्न मिळेल” काहींनी असा ही सल्ला दिला की “प्लॉट पडून मस्त डेव्हलोप करा आणि प्लॉट्स विकायला काढा”.

एक सत्य जे सर्व जण सांगत होते ते असे की कोकणात कामाला माणसे मिळत नाहीत. मग आपण नक्की काय करू शकतो ह्या जमिनीचे, अश्या विचाराने आम्हाला भंडावून सोडले. त्यात एक दिवस सकाळी माझ्या बाबांनी फोन करून सांगितले की अतुल कुलकर्णी ची झी २४ तास वर मुलाखत लागली आहे. त्याने पण तुमच्या सारखी जमीन घेतली आहे आणि तो तिकडे वेगळे प्रयोग करतो आहे. मी धावत पळत जाऊन TV चालू केले. अतुल कुलकर्णी ची मुलाखत बघून आमच्या विचारांना नवी दिशा मिळाली….….

आढावा आणि पुढील आराखडा

अतुल आणि गीतांजली कुलकर्णी ह्यांनी साताऱ्या जवळ २४ एकर जमीन घेतली आहे. २००६ पासून ते त्यावर पर्यावरणीय विकास करत आहेत. त्यांचा उद्देश हाच आहे की त्यावर जंगल तयार करायचे आणि भविष्यात तो जमिनीचा तुकडा निसर्गाच्या स्वाधीन करायचा. अतुल कुलकर्णी ह्यांनी सांगितलेला एक विचार मनाला अतिशय भावला, तो म्हणजे ज्यांना शेतीचे उत्पन्न घर चालवण्यासाठी लागत नाही पण जमीन आहे अश्या सर्व व्यक्तींनी निसर्ग संवर्धन केले तर भरपूर काम उभे राहू शकते.

त्या मुलाखतीतून मला बरेच संकेत मिळत गेले. मुख्य म्हणजे दोन संस्थांची माहिती मिळाली एक म्हणजे Ecological Society, पुणे आणि Oikos for Ecological services. Ecological Society मधील अभ्यासक्रमाची ची माहिती मिळाली (Sustainable Development of Natural Resources and Nature Conservation). मला स्वतःला तो अभ्यासक्रम करावा असे वाटले. शेखर ने सुद्धा हे काम (म्हणजे लोकांची बडबड ऐकणे) माझ्या वर सोपवले. ह्या अभ्यासक्रमामधील व्याख्याने मी जीवाचे कान करून ऐकायची आणि घरी येऊन काय शिकले ते शेखर सांगायची. Oikos ला आमच्या प्रकल्पाचा अहवाल करायचे काम सोपवले. त्यानुसार एक दिशा ठरली कि रानात जैव विविधता (Bio-diversity) वाढवायची.

२०१३-१४ ह्या वर्षां मध्ये आम्ही मुचरी ला बऱ्यचवेळा जा ये केली. देवरुख ला हॉटेल मध्ये राहायचे, मुचरी ला जाऊन यायचे, रविवारी पुण्याला परतायचे. आम्ही घेतलेली जमीन ही वस्ती पासून १५-२० मिनिटांच्या अंतरावर आहे. तिकडे घर बांधणें शक्य नाही. मग आम्ही वाडीतच घरासाठी जागा हवी आहे असे गावात सगळ्यांना सांगून ठेवले.

ऑक्टोबर २०१३ मध्ये त्या साठी जागा मिळाली आणि लगोलग आम्ही ती खरेदी करून टाकली. घर बांधायचे ठरवले. त्याच्या भूमी पूजनाला फाटक गुरुजींच्या पत्नी आल्या होत्या. त्यांना सगळे लोक पाणीवाल्या बाई म्हणून ओळखतात. त्यांनी जमिनीवर एके ठिकाणी पाणी लागेल असे सांगितले. आयत्यावेळी विहीर खणायची असे ही ठरवून टाकले. गावात आल्यापासून आम्ही एक धोरण ठरवले आहे. गावातील लोकांच्या ज्या समजुती असतील त्या ताश्याच्या तश्या स्वीकारायच्या. त्यांना आव्हान करायचे नाही किंवा त्यांना शहाणपण शिकवायला जायचे नाही. त्यावर आपण विश्वास किती ठेवायचा हे आपले आपण ठरवयचे. विहीर खणायचा निर्णय घेतला तेंव्हा आमचे आम्ही ठरवले की पाणी लागले तर उत्तम, नाहीतर जे पैसे खर्च होतली ते आपले नव्हते असे समजायचे आणि विसरून जायचे. पण तशी वेळ आली नाही आणि २७ मे २०१४ ला विहिरीला पाणी लागले!!

Mukkam1

घर तयार होता होता घरा जवळ आजून एक जमीन विकायची होती. ती सुद्धा आम्ही घेऊन त्यावर जून २०१५ पासून विविध झाडे लावायला सुरुवात केली. आता त्या जमिनीच्या तुकड्यावर १०० हुन अधिक झाडे, झुडपे लावली आणि जगवली आहेत. २०१८ च्या पावसाळ्यात कदाचित शेवटची झाडे लावू. मग त्या छोट्या जमिनीची आणि झाडांची फक्त निगा राखणे एवढेच काम कायमचे करत राहायचे आहे. त्याच बरोबर घरा भवताली सुद्धा बरीच झाडे लावली आहेत आणि ह्या पुढे ही लावणार आहोत जेणेकरून घनदाट वनराई मध्ये घर वसलेले असेल..

Mukkam5

ह्या व्यतिरिक्त Applied Environmental Research Foundation (AERF) म्हणून एक संस्था आहे जी गेली २-३ वर्षे आम्हाला विविध प्रकारची जंगलात लावण्याजोगी झाडे आणि वेलींची रोपे पुरवते. पावसाळ्याच्या सुरवातीला कोकणातील विशेष झाडे ज्यांचा आता कोकणातील लोकांना सुद्धा विसर पडला आहे, अशी रोपे पुण्यातील “प्रांजल” नर्सरी मधून घेऊन जातो. सध्या च्या गणतीनुसार आम्ही २०-२५ प्रकारची नवीन झाडे नेऊन लावली आहेत जी पूर्वी होती पण आता शिल्लक नाहीत, किंवा जी तिकडे निसर्गतः असायला हवी, पण माणसाच्या आंबे आणि काजू च्या वेडा पायी नाहीशी झाली आहेत. त्यातील काही जगतात, काही जगात नाहीत. त्यांची पुन्हा पुन्हा लागवड करावी लागते.

Mukkam6

कोकणात कोणती झाडे लावायची ह्याचा विचार अविरत करावा लागतो. त्यासाठी पुण्यात फिरताना एखादे झाड दिसले किंवा बिया सापडल्या तर त्याची माहिती गोळा करायची, बिया पेरून त्याची रोपे तयार करायची आणि ती  कोकणात नेऊन लावायची हा मला आता छंदच जडला आहे. २०१६ मध्ये विश्वास लायब्ररी च्या देशपांडे काकांकडून बेलाची फळे मिळाली होती. त्याच्या बियांपासून केलेली २-३ रोपे गेल्यावर्षी लावली आहेत. त्या पैकी एक चांगले फूट दीड फूट वाढले आहे. अशी तयार करून मग लावलेली रोपे छान ताग धरून वाढताना बघितले की खूप समाधान मिळते. बीजा पासून वृक्ष कडे जाणारा हा प्रवास खूप आनंद देणारा आहे.

मला अनेक जण विचारतात की अमुक अमुक झाडाचा माणसाला काय उपयोग? जेंव्हा मी पहिल्यांदा “पारजांभूळ” नावाचे झाड घराच्या आवारात आणून लावले होते तेंव्हा मी सुद्धा Oikos च्या मानसी करंदीकर ला हाच प्रश्न विचारला होता. तिने तेंव्हा इतकेच सांगितले की वन रचनेतील (Forest composition)  एक महत्वाचे झाड आहे म्हणून. तेंव्हा मी फार खोलात शिरायचा प्रयत्न केला नाही. तेवढ्यावर सोडून दिले. कालांतराने विचार करता करता एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक गोष्ट ही माणसाच्या उपयोगी आली पाहिजेच असे नाही. जंगलातील प्रत्येक झाडावर कुठला ना कुठला तरी जीव अवलंबून असतो. तो जीव प्रत्येकवेळी माणूसच असेल असे नाही.

Ecological Society मधील अभ्यासक्रमा मध्ये आम्हाला महाजन सरांनी एक गोष्ट सांगितली होती. बहिणाबाईंच्या एका कवितेत “सालई” (Boswellia serrata) आणि “मोई” (Lannea coromandelica) अश्या दोन झाडांचा उल्लेख आहे. तो असा की ही दोन झाडे बहुतेक वेळा एकत्र दिसतात मैत्रिणीं प्रमाणे. ह्या उलट “सालई” किंवा “मोई” एक एकटे असतील तर त्यांची वाढ नीट झालेली दिसत नाही. ह्याला Botany मध्ये वनस्पती संघटना (Plant Associations) असे म्हटले जाते. वैज्ञानिक दृष्ट्या बोलायचे झाले तर “सालई” मध्ये जी पोषण मूल्ये कमी आहेत ती “मोई” चे झाड पूर्ण करते. त्याच प्रमाणे, “मोई” ला ज्या गोष्टी जमिनीतून मिळू शकत नाहीत त्या “सालई” तिला पुरवते. किती सुरेख विचार आहे हा! पोषण मूल्यांची देवाण घेवाण! म्हणजे प्रत्येक झाडाचा माणसाला प्रत्यक्ष उपयोग नसला तरी अप्रत्यक्ष नक्कीच उपयोग आहे. बाकी काही नाही तरी कुठले ही झाड हे मोठे झाले की माणसाला कमीत कमी सावली तरी नक्कीच देते!!

निसर्ग, झाडे, प्राणी ह्या व्यतिरिक्त आजून एक महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे मनुष्य प्राणी. कोकणातील आमचे मनुष्य शेजारी सुद्धा खूप मनोरंजक आहेत, त्यांच्या वर स्वतंत्र पणे लिहिता येऊ शकेल इतकी. पण, ह्या तीन चार वर्षांच्या वास्तव्यात आम्हाला सध्या तरी आमचे “विठू” आणि “रखमा” मिळाली आहेत. त्यांचे आणि आमचे संबंध कायम राहोत ही आम्हा सर्वांची इच्छा आहे, ते टिकवण्याचे आम्ही आणि ते दोघे आटोकाट प्रयत्न करत असतो.

आम्हला बरेच जण विचारतात, की हे सगळे तुम्ही का करता, गुंतवणुकीवरील परतावा (Return on Investment) काय मिळतो इत्यादी… ह्या प्रश्नाचे एकच उत्तर, आम्हाला ह्यातून असीम समाधान मिळते, पराकोटीचा आनंद मिळतो, नुसते कोकणात जायचे असे म्हटले की इतकी ऊर्जा मिळते की विचारता सोया नाही. आमच्या मते हाच सगळ्यात मोठा Return on Investment आहे, जो पैश्यात कधीही मोजता येणार नाही…

 

मुचरी – क्षणचित्रे

मुचरी ला घर बांधायचं ठरल्यावर आम्ही घरीच models करून वेग वेगळी designs बनवून बघितली

घर आणि विहीर एकत्रच बांधायला घेतले. विहीर मे २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाली. घर ऑक्टोबर २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाले

घर व त्याच्या आजूबाजू ची काही क्षणचित्रे

जंगलातून फेरफटका आणि वृक्षारोपण

मुचरी येथे करत असलेले विविध प्रयोग