
उंडी अर्थात Calophyllum inophyllum! श्री. द. महाजन सरांच्या पुस्तकात वर्णन वाचलेलं आणि फुलाचा, फळाचा photo बघितलेला. वर्णन वाचून कोकणात समुद्राजवळ वाढणारे हे झाड आपण आपल्या घरा जवळ लावावे असं वाटलं. मनात ईच्छा आली आणि त्याची ताबडतोप अंमलबजावणी केली. आठ वर्षांपूर्वी पावसाळ्यात उंडी चे रोप आणून कोकणातील घरा जवळच्या कुरणातील आमच्या छोट्या जागेत लावलं ही. पण ते काही जगलं नाही.
पूर्वी बहिणीने उंडीचे एक रोप तिच्या पुण्याजवळील farm house मध्ये लावलं होतं ते बघितलं होतं. पण जवळ जवळ आठ दहा वर्ष ते रोप जैसे थे! ना त्याची उंची वाढली, ना त्याला भरभरून पालवी आली. मध्ये कधीतरी ते ही रोप सुकून गेलं. पुण्याचे हवामान त्याला मानवले नाही बहुदा.
कोकणातील आमचे घर समुद्रा जवळ नाही, जंगला जवळ आहे म्हणून रोप जगलं नाही का? म्हटलं एवढ्यात निष्कर्षापर्यंत नको यायला. पहिलं रोप गेल्यावर पुन्हा प्रयत्न करावा म्हणून अजून दोन उंडी ची रोपं आणून लावली. पण ह्यावेळी घरा च्या अंगणात, अगदी नजरे समोर. ही योजना लागू पडली आणि दोन्ही रोपांनी तग धरला आहे.
पण एका झाडाचे फक्त वर्णन वाचून त्या झाडाला आपल्या जवळ वाढवावे असं तुम्हाला का बरं वाटलं? इतकी सुंदर सुंदर झाडे आपल्या आजू बाजूला असताना कोणीही कधीही न ऐकलेले झाड, का मुद्दाम आणून लावायचे आपल्या घरात? असे प्रश्न पूर्वी खूप जण आम्हाला विचारत.
काही वर्षांपूर्वी केलेल्या Ecological Society च्या अभ्यासक्रमात आम्हाला वनस्पती शास्त्राची ओळख करून दिली होती. माझ्या सुदैवाने ओळख करून देणारे होते प्राध्यापक श्री. द. महाजन. अकरावी-बारावी मध्ये अगदी नीरस वाटले अश्या पद्धतीने शिकवलेले वनस्पती शास्त्र आठवत होतं. त्यामुळे Ecological Society च्या वर्गात वेगळं काही शिकायला मिळेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. पण पहिल्याच वर्गात महाजन सरांनी आम्हा सर्वांना मंत्र मुग्ध केलं होतं. वनस्पतींची शास्त्रीय नावे कशी आणि का पडली इथपासून कालिदासाच्या मेघदूत मधील श्लोक आणि त्या मध्ये आलेली आपल्या देशी वृक्षांची माहिती ह्याने वर्ग गाजायचा! इतकं की झाडांबद्दल नुसतेच कुतूहल नाही तर त्यांच्या बद्दल प्रेम आणि आदर ही निर्माण झाला.
महाजन सर प्रत्येकवेळी शंका निरसन करायला उपलब्ध असणार नाहीत, म्हणून त्यांची “देशी वृक्ष” व “आपले वृक्ष” ही पुस्तके संग्रही ठेवली. त्यातील प्रत्येक देशी वृक्षाची माहीती वाचली की आचंबित व्हायला होत असे. इतकं की पुस्तकात वाचलेलं एखादं झाड रस्त्याने जाताना दिसलं की थांबून त्याचे निरीक्षण करणे हे सुरु झालं. त्याच बरोबर एखादे झाड दिसले आणि खूण पटली नाही तर त्याचे निरीक्षण करून घरी येऊन पुस्तकात शोध घ्यायचा हे ही करू लागले.
अस्सल भारतीय देशी वृक्षांचा आणि इतर वनस्पतींचा इतका समृद्ध वारसा असताना आपल्याकडे विदेशी वनस्पती का विकत घ्यायला लागावी? त्याचे कारण “देशी वृक्ष खूप हळू हळू वाढतात”! हे कारण काही आम्हाला पटेना. कोकणात झाडे लावायचं ठरलं तेंव्हा अस्सल देशी वृक्षच लावायचे हा विचार पक्का झाला आणि अस्सल देशी आणि “कोकणी” म्हणजे “कोकणातील देशी वृक्ष कोणते?” ह्यची माहिती मिळवू लागलो.
तर परत उंडी कडे वळू. उंडी हा मघाशी सांगिल्या प्रमाणे अस्सल देशी आणि कोकणात किनारपट्टीवर आढळणारा वृक्ष. त्याचे शास्त्रीय नाव हे त्याच्या पानांवरुन पडलं आहे. Calophyllum inophyllum ह्याचा अर्थ सुंदर पाने असणारा वृक्ष. आणि खरंच ह्याची पाने देखणी आणि अनोखी आहेत. पानांचे सौंदर्य त्यांच्या शिरांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचने मुळे आहे. पाने सुद्धा हिरवीगार आणि चकचकीत असतात. नवीन पालवी फुटलेलं उंडी चं झाड फारच तजेलदार आणि सुंदर दिसतं.

इतकी वर्ष मी पालवी आणि पाने बघूनच संतुष्ट होत होते. ह्या वर्षी मार्च महिन्यात उंडी जवळ गेले असता मला वरच्या फांदीवर चक्क फळं लागलेली दिसली. फळं आली म्हणजे फुलं येऊन गेली. फुलं बघता आली नाही किंवा बघायची राहून गेली म्हणून मनाला चुटपुट लागून राहीली, आता परत फुलं बघण्यासाठी पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार म्हणून.

पण आज सकाळी बागेत फेरफटका मारताना सहज उंडी कडे लक्ष गेलं आणि वरच्या फांदीवर चक्क एक फुल दिसलं. सर्व कामे आटोपून फुलाचे निरीक्षण करायला परत बागेत गेले. फुल बरंच उंचावर होत. एक फांदी धरून ते फुल माझ्यापर्यंत आणायचा प्रयत्न केला. पावसाचे भरपूर पाणी पिऊन कुरकुरीत झालेली फांदी तुटून माझ्या हातात आली. झाडाला अजून त्रास द्यायला नको म्हणून ती तुटलेली फांदी घेऊन घराकडे परत निघाले. बघते तर हातातल्या फांदीवर आणखी एक फुल आणि कळी! महाजन सरांनी फुलाचे, फळांचे आणि त्यांच्या उपयोगाचे बरेच वर्णन दिलं आहे. फुलं सुवासिक असतात असं ही लिहिलं आहे. अतिशय मंद सुखावणारा सुगंध आहे ह्या फुलाला. खूप ओळखीचा वाटावा असा. बहुतेक रानात ह्या फुलांचा गंध इतर फुलां बरोबर मिसळून येत असावा.
उंडी चे रोप रुजणे आणि ते फुलू फळू लागणे हे माझ्यासाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी महत्वाचे नाही. किंबहुना असं कोकणात लावलेलं प्रत्येक झाड रुजून फुलू फळू लागलं की तो आमच्यासाठी आनंदोत्सवच असतो.

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
३१-जुलै-२०२५