मोह मोह के धागे (भाग २)….

Ollie गरोदर आहे हे कळले त्या दिवशी सकाळी टेकडीवर फिरताना

Ollie ला डॉक्टरांनी तपासले आणि काही प्रश्न विचारल्यानंतर तीचा X-Ray करून घेण्यास सांगितलं. X-Ray ची print आल्या आल्या लगेचच शेखर ने मला फोन करून सहा पिल्ले आहेत असं कळवलं होतं. तर, ३० डिसेंबर २०२३ रोजी आम्हाला कळले की अजून काहीच दिवसात आमच्याकडे एकाची सात-आठ  कुत्री होणार आहेत! खरोखरच कंबर कसून तयारीला लागावे लागणार होते! ज्या प्रसंगाला दोन अडीच वर्षांनी सामोरे जाऊ असं वाटतं होतं तो काही दिवसांवर येऊन ठेपला होता!

Ollie चा X-Ray ज्या मध्ये पिल्लांचे पाठीचे कणे अगदी स्पष्ट दिसत आहेत

पण कंबर कसून तयारी करायची म्हणजे आम्ही नक्की काय करायचे ते काही कळत नव्हतं. मनुष्य प्राण्याची pregnancy कळली की काय काय करायचे असते ते ठाऊक आहे. म्हणजे gynecologist कडे नाव नोंदवणे आणि महिन्याच्या महिन्याला तपासण्या करून घेणे, घरातील आणि माहितीतील अनुभवी बायकांना विचारून काय खावं, काय काळजी घ्यावी हे माहिती करून घेणे आणि ते आचरणात आणणे, आणि हो, आजूबाजूच्या सर्व लोकांकडून कोड कौतुक करून घेणे. पण कुत्रीचे बाळंतपण म्हणजे आपण नक्की काय करायचे असते ते काही ठाऊक नव्हतं. Ollie च्या डॉक्टरांचा विचार घेतला. पुढच्या पाच सहा दिवसात तिची delivery होणार असा त्यांचा अंदाज होता.

आम्हाला मात्र Ollie कुठल्याही प्रकारे बघितलं तरी गरोदर वाटतच नव्हती. तिचं टेकडीवर सुसाट धावणे अगदी पूर्वी सारखच चालू होतं. गरोदर कुत्र्यांची नेमकी कशी काळजी घ्यायची हे मात्र काही केल्या समजत नव्हते. मग Google मावशी कडे गेले आणि जी माहिती मिळेल ती वाचू लागले. Google वर काही अगदीच विचित्र सल्ले होते, तर काही अगदी शहाणपणाचे. मग शेवटी असा विचार आला, Ollie रस्त्यावरची कुत्री असती, पूर्णतः निसर्गात असती तर आपण काय केलं असतं? उत्तर आलं, काहीच नाही. मग काहीच करायचं नाही असं ठरलं. तिचं खाणं पिणं, हिंडणं फिरणं जो पर्यंत व्यवस्थित चालू आहे तोवर all is well!

पुढचा पेच असा होता की Ollie ची delivery ची वेळ जवळ आली आहे हे कसं ओळखायचं. पुन्हा Google मावशीला हाक मारली. प्रसूत होण्याची वेळ जवळ आली की कुत्री “घरटं” बनवण्यासाठी जागा शोधू लागतात. म्हणजे एका विशिष्ठ ठिकाणी खणून खड्डा करतात. Ollie मात्र असं करताना दिसत नव्हती. म्हणजे तिला प्रसूत व्हायला अजून थोडा काळ आहे असा मी अंदाज बांधत होते. तिला डोहाळे लागले आहेत हे मात्र लक्षात आलं ते तिच्या खाण्या पिण्या वरून. Ollie आता अगदी वाटेल ते खात होती. आम्ही जेवायला किंवा खायला बसलो की शेजारी एखादी रिकामी खुर्ची असेल तर त्यावर येऊन बसायची. विशेष आवडीचा म्हणजे आमच्या बागेतला ओल्या कचऱ्याचा खड्डा. टेकडीवर एखाद्या ठिकाणी वास घेऊन भयंकर उत्तेजीत होत असे आणि तिकडे अक्षरशः लोळण घेत असे. मनसोक्त लोळून परत आली की समजायचं की कुठल्यातरी मेलेल्या प्राण्याचे शिल्लक अवशेष होते. तो वास ती अंगभर लावून घ्यायची. घरी आलं की तिला रगडून अंघोळ घालण्याशिवाय पर्याय राहत नसे.

आम्ही काही खायला बसलो की हटकून शेजारच्या रीकाम्या खुर्चीवर येऊन बसत असे.

Ollie गरोदर आहे हे कळल्यापासून एक आठवडा उलटून गेला. त्या नंतर मात्र ती गरोदर आहे ह्याच्या खाणा खुणा दिसून आल्या. आता टेकडीवर गेली तरी थोडी पळली की दमायला लागली होती. पूर्वी जिथे तिथे टुणकन उडी मारू शकत होती ते मोठ्या मुश्किलीने जमायचे. कधी शेजारी शांत झोपली किंवा बसली असेल तर पोटातल्या पिल्लांच्या हालचाली दिसू लागल्या होत्या. Ollie पूर्वीपेक्षा थोडी शांतही झाली होती. साधारण १०-११ जानेवारी च्या सुमारास तिचे पोट खाली उतरल्या सारखे दिसू लागले होते. माणसांमध्ये प्रसुतीची वेळ जवळ आली की जसं बाई चे पोट खाली उतरते, अगदी त्याची आठवण झाली मला. म्हणजे आता Ollie प्रसूत होण्याची वेळ जवळ आली आहे हे मला जाणवलं.

१२-जानेवारी ला Ollie खासच अस्वस्थ होती. बेचैन होऊन घरभर फिरत होती. अजूनही ती “घरटं” करताना दिसली नव्हती. दिवसभर काहीच घडलं नाही. मग रात्री वरच्या मजल्यावर अथर्व ऐवजी मी राहायचं असं ठरलं. रात्री झोपायची तयारी केली. Ollie मात्र काहीतरी धुंडाळत होती. तिला कपाट उघडुन दिले, त्याला थोडी पसंती मिळाली असं वाटलं. मग आत एक मोठा हारा आणि सतरंजी असं ठेवलं. ती अधून मधून कपाटात जात होती आणि मध्येच बाहेर माझ्या जवळ येऊन झोपत होती. रात्रभर काही विशेष घडलं नाही. मला जागरण मात्र झालं.

१३-जानेवारी ला मी Ollie ला वरच्या मजल्यावर राहू द्यायचा विचार केला होता. ओघाने मी सुद्धा वरच थांबले होते तिच्या सोबतीला. अधून मधून Google मावशी कडे धाव घेत होतेच. त्यात एक महत्वाची गोष्ट कळली. कुत्री प्रसूत होण्याआधी हिरवट लाल स्त्राव किंवा discharge दिसला तर पुढच्या दोन तासात कुत्री प्रसूत होते. Ollie ची बेचैनी अजूनच वाढली होती आणि त्याबरोबर माझी तारांबळ. ती सारखी खाली जायच्या प्रयत्नात होती आणि मी वर येणाऱ्या प्रत्येक माणसाला थोपवून ठेवण्याच्या प्रयत्नात होते. त्याच बरोबर Ollie गच्चीवर देखील जात होती. मग मी तिच्या मागे. अशी धावपळ चालू होती. त्यात एकदा ती गच्चीवर गेली असता मला Google वर वर्णन केलेल्या रंगाचा स्त्राव दिसला. मी डॉक्टरांना फोन करून Ollie च्या मागे आले तेवढ्यात शेखर मधलं दार उघडून मला अंघोळीला खाली बोलवायला आला. ही संधी साधून Ollie खालच्या मजल्यावर सटकली.

रात्रभर जागरण आणि सकाळ पासून ची धावा धाव ह्यामुळे Ollie ला परत वरच्या मजल्यावर फरफटत नेण्याच्या फंदात मी पडले नाही. सरळ अंघोळ करायला निघून गेले. आवरून बाहेर आले तर Ollie शेखर शेजारी सोफ्यावर balcony मध्ये बसली होती. हे तिचे दुसरे अढळपद. ती निवांत बसली आहे बघून मी जरा शांत बसावं म्हटलं तर बाहेर सविता बाई आणि watchman काकांचा आरडा ओरडा ऐकू आला. बाहेर त्यांना साप दिसला होता. त्यांच्या दंग्यात त्या सापाचा हतनाक बळी जायचा म्हणून शांत बसायचा बेत रद्द करून मी तिकडे धाव घेतली. साप बिनविषारी होता आणि बिचारा आपल्या मार्गाने चालला होता. Watchman काका आणि सविताला थोडा धीर धरायला सांगून साप पकडायला मिळाली ती बादली आणि काठी घेऊन गेले. सापाला बादलीत ठेवलं आणि तो बाहेर येऊ नये म्हणून त्याच्यावर काठी अलगद धरून ठेवली. आता बागेत मागच्या बाजूला त्याला विनाविलंब  सोडावे लागणार होते कारण त्याची बादली मधून बाहेर यायची धडपड सुरू झाली होती.

बाल्कनी मधील सोफा ज्यावर पिल्लाना जन्म देण्यास Ollie ने पसंती दिली

बादली घेऊन निघाले तेव्हढ्यात शेखरच्या हाका ऐकू आल्या. जरा वैतागूनच काय विचारले, तर म्हणाला “लवकर वर ये, पिल्लू आलं आहे.” अरे देवा! इकडे धाऊ की तिकडे पळू अशी स्थिती झाली. शेवटी हातातले काम संपवून मग Ollie कडे जावे असा निर्णय घेऊन मी बागेत साप सोडायला निघून गेले. सापाला सुखरूप सोडून मी डॉक्टरांना फोन करत घरात शिरले.  डॉक्टरांना पहिले पिलू आल्याची बातमी दिली. डॉक्टर म्हणाले “आता तुम्ही ते पिल्लू स्वच्छ पुसून घ्या आणि नाळ व्यवस्थित कापा. त्यानंतर Ollie जवळ परत द्या”. मी फोन ठेवत Ollie पाशी पोचले तोवर Ollie न पिल्लू चाटून पुसून स्वच्छ केले होते आणि नाळ ही व्यवस्थित दाताने चावून पिल्ला पासून वेगळी केली होती.

पिल्लू स्वच्छ झाल्या झाल्या त्याच्या आईला शोधत तिच्या पर्यंत पोचलं सुद्धा आणि तिचं दूध पिऊ लागलं. Ollie ला मात्र उसंत नव्हती, तिला पुढच्या पिल्लाची तयारी करायची होती. दुपारी बारा ते दोन ह्या कालावधीत Ollie ने सात पिल्लांना जन्म दिला. प्रत्येक पिल्लाच्या जन्मा आधी कळा द्यायच्या, पिल्लू आलं की त्याला चाटून पुसून स्वच्छ करायचे, त्याची नाळ तोडायची आणि पुढच्या पिल्लाच्या तयारी ला लागायचे. हा सर्व कार्यक्रम बाल्कनी मधील सोफ्यावर बिन बोभाट चालू होता. ना आरडा ओरड ना दंगा. Ollie ने मला कुठलंच काम करायला शिल्लक ठेवलं नव्हतं. एक संभाव्य धोका Ollie ने लक्षात घेतला नव्हता. तो म्हणजे सोफ्यावरून पिल्लू खाली पडण्याचा. मग मी शांतपणे तिच्या समोर खुर्ची टाकून बसले पहारा देत.

सर्व पिल्लांची आणि Ollie ची सुखरूप सुटका झाल्यावर आम्ही थोडे विसावलो. सात पिल्लांपैकी पाचवे पिल्लू थोडे गुदमरले आहे असं वाटलं. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आणि तिच्या अंगात Ollie पर्यंत जाऊन दूध प्यायची ताकद ही नव्हती. आम्ही थोडं थांबून तिची परिस्थिती बदलते आहे का ते बघायचं ठरवलं. संध्याकाळी एका कार्यक्रमाला जायचे होते. पिल्ले अजून सोफ्यावरच होती. मग पहाऱ्यावर सविताला बसवली आणि आम्ही आमच्या नियोजित कार्यक्रमाला चालते झालो. कार्यक्रम चालू असताना अथर्व बरोबर वार्तालाप चालू होताच. त्यातून Ollie आणि पिल्लांची खबरबात मिळत होती.

नवजात पिल्लां सोबत Ollie

आम्ही घरी येई पर्यंत अथर्व ने Ollie आणि पिल्लांची रवानगी एका मोठ्या खोक्यात केली होती. पाचवे पिल्लू अजूनही सावरले नव्हते आणि दूध पिण्याची त्याच्यात ताकद नव्हती . मग डॉक्टरांशी चर्चा करून त्या पिल्लासाठी formula आणि ते पाजायला syringe घेऊन आला होता. मी अगदी घोटभर formula तयार केला आणि syringe ने त्या अशक्त पिल्लाला पाजायचा प्रयत्न केला. विशेष काही प्यायलं नाही ते पिल्लू. अशक्त असून आवाज खणखणीत होता पिल्लाचा. बाकी सर्व पिल्ले अधून मधून दूध प्यायची आणि परत झोपी जायची. पाचवे पिल्लू मात्र अविरत कण्हत, रडत होतं. रात्री आळी पाळी ने मी आणि अथर्व उठून त्या पिल्लाला दूध द्यायचा प्रयत्न करत राहिलो. पिल्लं झाल्यापासून पुढचे दोन दिवस Ollie पिल्लांच्या शेजारीच बसून राहिली होती. तहान नाही की भूक नाही. दुसऱ्या दिवशी उठल्यावर मी तिला बसल्याजागी थोडं खायला आणि पाणी नेऊन दिले. तिने अगदी गरजे पुरतंच खाल्लं आणि घोटभर पाणी प्यायली. पाचवे पिल्लू अजूनही सावरले नव्हते. हालचाल नाही आणि अन्न नाही त्यामुळे अगदी थंड पडलं होतं ते. मग त्या पिल्लाला एका जाडसर कापडात गुंडाळून Ollie आणि पिल्लांजवळ ठेवलं.

सकाळची माझी कामे उरकून पाचव्या पिल्लाला formula द्यायला गेले आणि पिल्लाला हातात घेऊन Ollie समोर बसले. Syringe भरून पिल्लाला भरवू लागले तर Ollie जागेवरून उठली आणि माझ्या हातातून पिल्लू काढून घेतलं आणि तिच्या जवळ खोक्यात नेवून ठेवलं. तिथून पुढे जेंव्हा जेंव्हा आम्ही त्या पिल्लाला खाऊ घालायचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक वेळी Ollie शांतपणे जागेवरून उठायची आणि आमच्या हातातून पिल्लू परत घेऊन जायची. आम्ही खायला द्यायचा प्रयत्न केला तरी पिल्लू ओठापाशी नेलेले दूध ही पिऊशकत नव्हतं. Ollie ने विरोध केला नसता तरी आमच्या प्रयत्नांना यश येईल ह्याची शाश्वती नव्हती. १६-जानेवारी ला सकाळी ते पाचवे पिल्लू मरण पावले होते. Ollie ने शांतपणे ते तिच्या व इतर पिल्लांपासून दूर सारून टाकले होते. ह्यावेळी मी त्या पिल्लाला उचलून बाहेर घेऊन गेले, तरी Ollie ने माझ्याकडे ढुंकून ही बघितलं नाही.

खोकं नकोसं झाल्यावर Ollie ने सोफ्यावर डेरा जमवायचा प्रयत्न केला

मार्जार कुळातील आया आपल्या पिल्लाना अगदी डौलदार व देखण्या पद्धतीने उचलून नेतात. त्यांची पिल्ले सुद्धा शरीर अगदी आटोपशीरपणे सावरून बसतात. मांजर तिच्या पिल्लाना एक एक करून उचलून नेते ते दृष्य अगदी बघण्यासारखं असतं. कुत्र्यांना काही ते जमत नाही. पोटाच्या भागात जमेल तसं तोंडाने पिल्लू पकडतात. पिल्लू जिवाच्या आकांताने केकाटत असतं. कुत्री मात्र त्या ओरडण्याची पर्वा न करता ते पिल्लू तसेच उचलून घेऊन जाते. दोन तीन दिवसांनंतर Ollie ला खोकं नकोसं झालं आणि ती आत बसून त्यावर पंजे मारून खरवडू लागली. तिला स्वतः ला सोफ्यावर, गादी वर झोपायची सवय, मग ती एक एक पिल्लू उचलून सोफ्यावर ठेवण्याचा अगदीच बेंगरूळ प्रयत्न करू लागली. शेवटी ते खोकं काढून टाकलं आणि सुती चादरींची चौघडी खाली आंथरली. त्यावर पिल्लाना निजवलं. ही व्यवस्था Ollie च्या पसंतीस पडली.

सुती चादरींची चौघडी अखेर पसंतीस पडली

खोक्यातून बाहेर आल्यावर मात्र रात्री Ollie बरोबर आता पिल्लांची ही रवानगी वरच्या मजल्यावर करावी लागत असे. सुरवातीला एका छोट्या plastic च्या tub मध्ये ते सर्व गुबगुबीत गोळे चौघडी सकट ठेऊन वर नेत असू.

छोट्या plastic च्या tub मध्ये पिल्लं वरच्या मजल्यावर जायला सज्ज

Ollie गरोदर आहे हे कळल्यापासून ती प्रसूत होई पर्यंत मी पदोपदी तिची आणि एखाद्या बाई माणसाच्या ह्याच स्थिती ची तुलना करत राहीले. Ollie ही पूर्णपाने निसर्गाच्या स्वाधीन, त्या उलट आपण माणसे प्रत्येक समस्येचा कीस पाडणारे, चर्चा करणारे आणि मग सर्वांना पटेल रुचेल असा निर्णय घेणारे. Ollie च्या आजूबाजू ला कुत्र्यांच्या बाबतीत अनुभव शून्य मंडळी असताना तिचं तिने सर्व व्यवस्थित निभावून नेले. प्रसूती ह्या अत्यंत नैसर्गिक आणि आनंददायक प्रक्रियेला माणसाने किती क्लिष्ट, गुंतागुंतीचे करून टाकलेले आहे हे जाणवलं.

पाचवे पिल्लू अशक्त आहे हे पाहिल्यावर आम्हा सगळयांची घालमेल होत होती. अपूर्वा प्रत्येक वेळी घरी आल्यावर किंवा फोन वरून त्या पिल्लाची चौकशी करायची. पिल्लाने अजून दूध प्यायले नाही असं कळलं की हळहळायची आणि “ते जगलं पाहिजे. आपण अजून काही करू शकतो का त्याला जागवायला?” असं विचारी. Ollie मात्र ठाम होती. पिल्लाला जगायचं असेल तर त्याचे प्रयत्न त्या पिल्लाने करायचे आहेत, आजूबाजू च्या लोकांनी नाही! हे तिने तिच्या कृतीतून स्वच्छ सांगितलं. जोवर त्या पिल्ला मध्ये जीव होता, तोवर पिल्लाला स्वच्छ ठेवणे, ऊबेसाठी कुशीत घेणे अशी सर्व काळजी तिने घेतली. पण त्या पिल्लाची हालचाल बंद पडल्यावर तिने तितक्याच निग्रहाने त्याला स्वतः पासून आणि इतर पिल्लांपासून दूर लोटून दिले.

पाचव्या पिल्ला बाबत चं Ollie चं वागणं बघून मला Lawrence Anthony ह्यांच्या The Elephant Whisperer ह्या पुस्तकातील एका प्रसंगाची आठवण झाली. Nana हत्तीणीने एका पिल्लाला जन्म दिला. हत्तींच्या कळपात पिल्लू जन्माला आले की त्या पिल्ला भोवती सर्व कळप जमा होतो आणि त्या पिल्लाला स्वतःच्या पायावर उभे राहायला प्रोत्साहन देतो. तर हे नवजात पिल्लू काही केल्या उभे राहीना. Nana आणि कळपातील बाकीच्या हत्तिणींनी आधी गोंजारून आणि नंतर लाथा घालून तिला उभे करायचा प्रयत्न केला. हे प्रयत्न तब्बल चोवीस तास चालू राहिले. शेवटी त्या पिल्लाला तिथेच सोडून पूर्ण कळप चालता झाला. लेखकाला हे बघवलं नाही. कळप निघून गेल्यावर लेखक आणि त्याचे सहकारी त्या टाकलेल्या पिल्लाला घरी घेऊन आले आणि सर्व वैद्यकीय सेवा त्या पिल्लाच्या दिमतीला उभी केली. पिल्लाच्या शरीरात हळू हळू ताकद येऊ लागली आणि ते काही महिन्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले. लेखकाच्या घरी सर्वांचे लाडके झाले. लेखकाला वाटले हे पिल्लू अजून थोडे सशक्त झाले की त्याला आपण Nana कडे घेऊन जाऊ आणि तिला आश्चर्याचा सुखद धक्का देऊ. पण नियतीला ते अमान्य होतं. साधारण दोन वर्ष त्या पिल्लाची काळजी घेतली तरी त्याला पुरेशी ताकद आली नव्हती आणि एक दिवस सकाळी जाऊन बघितलं तर त्या पिल्लाचा मृत्यु झाला होता. हे पिल्लू कमकुवत आहे, स्वतंत्र जगू शकणार नाही हे त्या कळपाला पहिल्या दिवशी कळलं होतं. पण माणसाला वाटले आपण वैद्यक क्षेत्राच्या बळावर त्या पिल्लाला सक्षम करू आणि परत त्या कळपात सोडू. वास्तविक, लेखकाने शब्दशः त्या पिल्लाचे आजचे मरण उद्यावर ढकलले होते. आणि जे दुःख त्या कळपा पुरते मर्यादित राहिले असते ते कळपा व्यतिरिक्त अजून अनेक लोकांना भोगावे लागले. निसर्गतः असलेलं हे शहाणपण माणूस परत कधी शिकेल का?

Ollie घरी आली तेंव्हा ती अडीच महिन्यांची होती. तिची पिल्ले तर अजूनच लहान. त्यांची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न पडे. पण Ollie पिल्लांचे सर्व इतकं व्यवस्थित करायची, की आम्हाला काळजीचे काहीच कारण उरले नाही. मग आम्ही फक्त Ollie ला काय हवं नको ते बघू लागलो. पिल्ले झाल्यापासून पुढचे साधारण २-३ आठवडे एका साच्यातील दिनचर्या अंगवळणीस पडून गेली. पिल्लांचे डोळे आजून उघडले नव्हते त्यामुळे त्यांची अगदी मोजकीच हालचाल होत असे. हा खरं तर आमच्या विश्रांतीचा काळ होता आणि वादळापूर्वीची शांतता होती!

(क्रमशः)

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
११ जून २०२४

Leave a comment