भोंडला

माझ्या स्मरणातला भोंडला म्हणजे पुण्यात राहायला आल्यावर नवरात्री उत्सवात society मध्ये सार्वजनिक भोंडला होत असे तो. भोंडल्याची सुरुवात आईच्या एका गाण्याने व्हायची. हे गाणं सुरु झालं की सर्व बायका आणि मुली आई च्या मागोमाग एक एक ओळ म्हणत. हे लांबच लांब गाणं झालं की मग “ऐलोमा, पैलोमा..” ने पुढील गाण्यांची झुक झुक गाडी सुरु व्हायची आणि “….पाण्यात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला” इथे ती येऊन थांबायची.

“गजगौरी” गणायचे शब्द खालील प्रमाणे आहेत:

गजगौरी चे गाणे

गाऊ गजगौरी चे गाणे घालू रिंगण

कौरव-पांडव सर्व मिळोनी
करीती हत्ती माती आणुनी
गांधारीला वरी बसवोनी
वाटियली वाणे ।।१।।

कुंतीला मग दिधले वाण
दुर्योधन बोले टोचून
तुम्हास आहे नशिबी कोठून
असले ह्या जगती ।।२।।

माता कुंती कष्टी जहाली
भीम पुसे मग येऊन जवळी
शोक कशाचा, चिंता कसली
सांग सांग आई ।।३।।

सांगे वाणाचा वृत्तांत
भीम कोपला मग चित्तात
करतो हत्ती म्हणे क्षणात
आला नदीतीरी ।।४।।

चिखल करी मग खळ्या खणोनी
फेकी वर वर गोळे करुनी
गेल्या वेशी सर्व बुजोनी
घडला आकांत ।।५।।

अर्जुन बोले मग भीमाला
खटाटोप हा उगीच कशाला
मागू ऐरावत इंद्राला
वाटाया वाण ।।६।।

बाणांचा मग जिना रचीयला
भीम वरी स्वर्गास निघाला
इंद्राला वृत्तांत कळाला
झाला दुःश्चिन्त ।।७।।

काय तरी हे अरिष्ट आले
म्हणुनी कपट इंद्राने केले
दारच स्वर्गाचे लावीयले
अवळोनी घट्ट ।।८।।

भीमे केला गदा प्रहार
स्वर्गाचे मोडियले द्वार
आला इंद्रा जवळी वीर
बोले इंद्राला ।।९।।

भीमसेन बोले इंद्राला
व्रत गौरीचे असे आईला
ऐरावत पाहिजे आम्हाला
वाटाया वाण ।।१०।।

इंद्र म्हणे स्वर्गी चा हत्ती
द्यावा कैसा भूमी वरती
दिधला परी तू कवण्या रीती
नेशील तो खाली ।।११।।

आधी चिडविला होता हत्ती
धावून आला भीमा वरती
गदा प्रहारे जिरवी मस्ती
भीमसेन तेव्हा ।।१२।।

पळतो हत्ती ची-ची करोनि
भीम ओढतो सोंड धरोनि
मुटकुळ त्याचे मग बांधोनी
टाकीयले पाठी ।।१३।।

आला ऐरावत घेवोनि
सजवी अंबारी घालोनी
कुंतीला मग वरी बसवोनी
वाटियली वाणे ।।१४।।

धन्य धन्य ती कुंती माता
स्वर्ग आणिला भूवरी आता
गजगौरी चे व्रत आचरता
गाजे जगी कीर्ती ।।१५।।

भोंडला माझ्या आयुष्यात येण्या आधी “गजगौरी” चं गाणं आई मला आणि माझ्या बहिणीला झोपताना म्हणून दाखवायची. समज वाढायला लागली तशी ह्या गाण्यातून एक गोष्ट सांगितली आहे हे समजलं होतं. पुढे सातवी-आठवीत असताना प्रभात सिनेमा गृहात जुने सिनेमे लागायचे, त्यात “गजगौरी” ह्या नावाचा हिंदी सिनेमा बघण्यात आला आणि गजगौरी चं गाणं आणि त्यातली गोष्ट चित्र रूपात समोर आली.

मला नवल ह्या गोष्टीचे वाटते की हे गाणे आई व्यतिरीक्त माझ्या माहितीतील दुसऱ्या कुठल्याही बाईला ठाऊक नव्हते. तेंव्हा ही नाही आणि आज ही नाही. आई ची अंगाई ऐकून ऐकून गजगौरी चे गाणे तोंड पाठ झालेच होते. पण भोंडल्याच्या वेळी हत्तीच्या प्रतिमेला पाटावर साकारून त्या भोवती फेर धरून गाणी म्हणतात ती हत्तीची प्रतिमा म्हणजेच “गजगौरी” च्या गाण्यातील ऐरावत हे समजायला पुढे बरीच वर्ष लागली. पण ज्या “गजगौरी” च्या व्रतासाठी ऐरावत स्वर्गातून खाली आणायचा खटाटोप भीमाने केला, ते व्रत नेमके काय होते आणि कश्यासाठी करायचे ह्याचे उत्तर मी आता शोधते आहे. कोणी सांगू शकेल का?

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार
९ ऑक्टोबर २०२४

Leave a comment