गोष्ट

ज्यांना लहानपणी आजी, आजोबा, आई, बाबा ह्यांच्या कडून गोष्टी ऐकायला मिळाल्या ती मंडळी अतिशय भाग्यवान आहेत असं मला वाटतं. “मुल”पणाचा हक्काचा आणि अविभाज्य घटक म्हणजे रात्री झोपाण्याआधी हट्ट करून ऐकलेली गोष्ट.

इंदू आजी म्हणजे माझ्या बाबांची आई येणार असली की मी अगदी खुशीत असे. त्याचं मुख्य कारण म्हणजे रात्री तिच्या जवळ पडून गोष्टी ऐकायला मिळायच्या. दूरदर्शन वर रामायण मालिका खूप उशिराने आली. आजी आली की रोज रात्री आम्हला रामायणातील एक-एक किस्सा (आता च्या भाषेत episode म्हटलं तरी चालेल) ऐकायला मिळत असे. त्याच बरोबर बोबड्या राण्यांची गोष्ट, हावरट राणी ची गोष्ट, सुमती-कुमती ची गोष्ट अश्या अनेक गोष्टी जोडीला असत ते ही नकला करून किंवा आवाज बदलून. गंमत म्हणजे सर्व गोष्टी अगणित वेळा ऐकलेल्या असल्या तरी दरवेळी नवीच गोष्ट ऐकणार आहोत ह्या उत्साहाने आम्ही ऐकायचो आणि तेवढ्याच उत्साहाने आजी सांगायचीही.

नंतर थोडे मोठे झाल्यावर बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी सांगितलेल्या शिवाजी महाराजांच्या काही निवडक गोष्टींच्या cassettes एका वाढदिवसाला भेट मिळाल्या. त्या गोष्टींची किती वेळा पारायणा झाली असेल देवास ठाऊक! पण प्रत्येक वेळी हिरकणी ची गोष्ट ऐकली की रायगडावर न जाता सुद्धा रायगडाचा कडा डोळ्यांसमोर उभा ठाकत असे. घोडेस्वारांनी हंडा घरी आणून दिल्यावर “बाई, ह्यो माझा हंडा, राहिला की काल राती  गडावरच ” असे उद्गार काढणारी आणि त्यानंतर घोडेस्वारांचे गोंधळलेले चेहरे बघून घाबरी-गुबरी झालेली पोरसवदा हिरा गवळण अगदी लखं उभी राहत असे. प्रतापराव गुर्जरांना गेलेलं महाराजांचे आज्ञापत्र “बहलोलखान या गनिमास गर्दीस मिळविल्याविणा आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका” हे किती ही वेळा ऐकलं तरी जीवाचा थरकाप होत असे. ह्या व्यतिरिक्त शाळेत वाचनाच्या तासाला अमर चित्र कथांचा रतीब असे तो वेगळाच.

गोष्टी ऐकून आपल्याला नक्की काय मिळतं? अहो, काय मिळत नाही विचारा! लहान पणी ऐकलेल्या बोबड्या राण्यांच्या गोष्टीतून नको तिथे बोलायला जाऊ नये अशी संयमाची शिकवण मिळते. त्याच बरोबर “कढी” उत्तम होण्यासाठी ची रेसिपी सुद्धा मिळते…”हिंग, मीय, जिय घाली; कयी चांगी होई” म्हणजेच कढी करताना त्यात हिंग, मिरं आणि जिरं घातलं की फक्कड कढी तयार होते! सुमती आणि कुमती ह्या दोन बहिणींची गोष्ट संकटात असलेल्या सर्वांना आपल्या परीने मदत करावी ही शिकवण देऊन जाते. अडचणीत असलेले सर्व म्हणजे फक्त माणसं नाही तर झाडं , प्राणी, पक्षी हे सर्व सुध्दा आले. इयत्ता चौथीतील चतुर शेतकऱ्याच्या गोष्टी मधून भुईमुगाच्या शेंगा जमिनी खाली, ज्वारीची कणसं रोपाच्या अग्र भागी तर मक्याची कणसं रोपाच्या मध्य भागी येतात हे सामान्य ज्ञान मिळतं. इतिहास, भूगोल हे नावडते विषय गोष्ट रुपात आणीले तर कायम स्मरणात राहतात. ह्या शिवाय रामायण, महाभारत, पंचतंत्र, जातक कथा हे तर खजिनेच आहेत आपल्या संस्कृतीचे. पण ह्या सर्व गोष्टींपेक्षा अधिक मोलाची म्हणजे आपली “ओळख” आपल्याला ह्याच गोष्टींमुळे मिळते.

सध्या मी रॉबिन वॉल किमरेर हिने लिहिलेलं पुस्तक वाचायला घेतलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे “Braiding Sweet Grass: Indigenous Wisdom, Scientific Knowledge and the Teachings of Plants”. लेखिका ही मूळची अमेरिकन आहे. म्हणजे USA ची नागरीक ह्या अर्थी मूळची अमेरिकन नाही तर ख्रिस्ती धर्मप्रचार करणाऱ्या युरोपियन लोकांनी अमेरिके मध्ये शिरकाव करण्या आधी तिथे असलेल्या आदिवासी लोकांची वंशज आहे. ह्या पुस्तकातील पहिलेच प्रकरण वाचून मला अक्षरशः हेलावून सोडलं. गोष्टी चे माणसाच्या आयुष्यातील स्थान आणि महत्व काय ह्याचा एक नवीन दृष्टीकोन दिला.

पहिल्या प्रकरणात रॉबिन आकाश लोकांतून आलेल्या एका स्त्री ची गोष्ट सांगते ती अशी …

आकाश लोकातून एक स्त्री खाली पडते. खाली मिट्ट काळोख आणि खोल खोल पाणी दिसतं तिला. तिला आकाशातून पडताना बघून बगळे तिच्या मदतीला धावून येतात. इतक्या उंचीवरून पडुन तिला ईजा होऊ नये म्हणून तिला अलगद आपल्या पंखावर झेलतात. पण तिचा भार ते फार काळ पेलू शकणार नाही ह्याची कल्पना येते आणि ते पाण्याच्या दिशेने झेपावतात. त्यांची धडपड बघुन कासव पुढे येतं आणि तिला सुखरूप आपल्या पाठीवर पेलतं. त्याला ठाऊक असतं की ह्या आकाश लोकीच्या स्त्री ला जमीन लागेल, पण सगळीकडे पाणीच पाणी. मग हिला उतरवणार कुठे? सर्व प्राणी पक्षी कासवा भोवती जमा होतात. काहींना ठाऊक असतं की पाण्यात खूप खोलवर माती आहे. सगळे जण पाण्यात आळीपाळीने बुडी मारून माती आणायचा प्रयत्न करतात. शेवटी एका छोट्याश्या उंदराला चिमुटभर माती आणण्यात यश येते, पण त्यासाठी त्याला त्याचा जीव गमवावा लागतो. त्याने आणलेली ती चिमुटभर माती घेऊन ती आकाशातील कन्या आपली दिव्य शक्ती वापरून “Turtle Island” म्हणजेच आजच्या उत्तर अमेरिका ह्या खंडाची निर्मिती करते. एखाद्या चांगल्या पाहुण्याप्रमाणे ती रिकाम्या हाती आलेली नसते. आकाशातून खाली पडताना आकाशातील हाती लागलेल्या अनेक वनस्पतींच्या बिया आणि रोपं ती बरोबर घेऊन आलेली असते. त्या बिया आणि रोपं वापरून ती अनेक बागा तयार करते. तिने तयार केलेल्या बागांमुळे तिला ज्या सर्व जीव सृष्टी ने मदत केलेली असते त्या सर्वांची खाण्यापिण्याची चिंता कायमची मिटते. आकाश लोकतून खाली आलेली ही स्त्री आपल्या नवीन जगाचा फक्त स्वीकार करत नाही तर ह्या लोकीतील सर्व चराचर आणि तिच्या स्वतः च्या येणाऱ्या पिढ्यांसाठी अन्न आणि औषधांची कायमची तरतूद करून ठेवते. तिच्या पुढच्या पिढ्यांना सर्व चराचर सृष्टी बरोबर प्रेमाने आणि सलोख्याने नांदायची सूचना देऊन जाते.

ह्या आकाश लोकीच्या स्त्री ची गोष्ट ऐकत ऐकत अमेरिकेतील “Native Indians” च्या पिढ्या वाढत गेल्या. निसर्ग आणि माणूस ह्यांच्यातील नातं सांगणारी आणि ते नातं दृढ करणारी ही गोष्ट. अमेरिकेतील ही माणसं निसर्गातील सर्व घटकांचा आणि विशेषतः वनस्पती विश्वाचा “Elders” म्हणजेच वडीलधारी मंडळी म्हणून उल्लेख करतात. कुठल्याही कठीण परिस्थितीत ह्या वडीलधाऱ्या मंडळींबरोबर सल्लामसलत करतात. ह्या सर्वांमध्ये सर्वात आधी निर्माण झालेली वनस्पती म्हणजे “Sweetgrass”. ह्या गवताला त्यांच्या संस्कृती मध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या गवताच्या पिढ्या वाढवण्याची पद्धत म्हणजे एका पिढी कडून दुसऱ्या पिढी कडे ह्या गवताच्या रोपांच्या वेण्या वळून देण्याचा प्रघात आहे, म्हणून “Braiding Sweetgrass “. वेण्या का घालायच्या ह्याचं ही सुंदर विवेचन रॉबिन हिने दिले आहे. ती म्हणते वेणी घालून देणारी आणि वेणी घालून घेणारी ह्यांच्यात एक सुंदर नातं तयार होतं जे त्या वेणीने बांधलेलं असतं. वेणी घालून देणारीच्या मनात ती जीची वेणी घालून देते आहे तिच्या बद्दल अपार माया आणि प्रेम असतं. हे वाचून मला जुन्या काळातील मराठी चित्रपटांमधील दृश्य आठवली. पोर वयातील सुनबाई चा तिच्या सासूने केसांचा खोपा घालून दिल्यानंतर सूनबाई वाकून तिच्या सासूबाईंना नमस्कार करते हे दृश्य. किंवा एकाच घरातील वेगवेगळ्या वयोगटातील मुली एकमेकींच्या पुढ्यात बसून स्वतः पेक्षा लहान मुलीचे केस विंचरून अवरून देतानाचं दृश्य. ह्या नुसत्या कृतीने देखील काळजी, माया, प्रेम व्यक्त होतं आणि ते पुढ्यात बसलेल्या मुली, सूने पर्यंत पोचतं सुद्धा!

इथपर्यंत वाचताना मी Native Americans ची निरागसता, त्यांचे निसर्गाशी असलेले अतूट बंधन अनुभवत होते. आपल्या संस्कृतीशी असलेलं साम्य देखील तपासून बघत होते. इतक्यात लेखिका आपल्याला वर्तमानात घेऊन येते. Ecology ची प्राध्यापिका असलेली रॉबिन तिच्या दोनशे हून अधिक ecology च्या विद्यार्थ्यांना एका प्रश्नावली द्वारे तपासत होती की किती जणांना माणूस आणि निसर्ग ह्यांच्यात काही सकारात्मक नाते संबंध दिसले आहेत. जवळपास शंभर टक्के मुलांकडून “निसर्ग आणि माणूस ह्यांच्या मध्ये कोणताही सकारात्मक नाते संबंध नाही” हे उत्तर आलं. म्हणजे ह्या पैकी कुठल्याच मुलाने किंवा मुलीने त्या आकाशलोकीच्या स्त्री ची गोष्ट कधी ऐकलीच नाही.

खिन्न पणे रॉबिन पुढे नमूद करते की ह्या मुलांनी दुसऱ्या एका स्त्री ची गोष्ट ऐकली आहे. ती सुद्धा आकाश लोकात एका सुंदर बागेत रहायची. पण त्या बागेतील फळं चाखल्या मुळे तिला शिक्षा म्हणून भूलोकी हद्दपार केले आहे. ही पृथ्वी तिचं घर नाहीच मुळी. इथे ती फक्त तिची शिक्षा संपेपर्यंत निवासासाठी आली आहे. आपल्या सोयी साठी तिला जे जे म्हणून हवं आहे ते ती ओरबाडून घेते, परतफेडीचा कुठलाही विचार न करता. ही पृथ्वी जणू तिला व तिच्या वंशजांना उपभोगण्यासाठीच निर्माण केली आहे एवढा एकच विचार तिच्या व तिच्या पुत्रांच्या ठाई आहे! दोन गोष्टींमध्ये किती कमालीचा विरोधाभास. पिढ्यानपिढ्या माणूस जी गोष्ट ऐकत जातो, ऐकवत जातो त्याचे परीणाम ह्या पृथ्वीवर होत जातात…आजची परिस्थिती बघता कोणती गोष्ट जास्त सांगितली गेली आहे ते उघड आहे!

Native American संस्कृती आता जवळ जवळ नामशेष झाली आहे. ख्रिस्ती धर्म प्रचारकांनी अगदी लहान लहान मुलं-मुली बळेनी उचलून नेऊन त्यांना युरोपियन भाषा आणि संस्कृतीचे शिक्षण देऊन त्यांची पाळं-मुळं विसरायला लावली. ही खरी ताकद आहे गोष्टींची.

शिवाजी महाराजांच्या जडण घडणीत त्यांना त्यांच्या लहानपणी जिजाबाई साहेबांनी सांगितलेल्या गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे. हरीतात्यांची गोष्ट सांगताना पु ल देशपांडे सांगतात की हरितात्यांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्यांच्या बाळमुठीत एक अदृश्य शक्ती पेरली जी पुढील आयुष्यात एखाद्या अवघड प्रसंगी त्यांना बळ देऊन जाते. व्यक्तिमत्व विकास करण्यात हातभार लावणे, मुलांना काही भव्यदिव्य करण्यासाठी प्रेरित करणे ह्या सहज साध्य होणाऱ्य गोष्टींचे मूळ हे गोष्टीतच आहे. हल्ली मात्र केवळ मनोरंजन ह्या दृष्टिकोनातून गोष्टीं कडे बघितलं जातंय. मला तर अशी भीती वाटते आहे की संस्कृतीच्या पाऊलखुणा पुसण्यासाठी कुठल्या धर्म प्रचारकांची गरज उरली नाहीये. आपणच स्वखुशीने भलत्याच गोष्टी आपल्या लेकरांना सांगतो किंवा ऐकवतो. त्यात भर घालायला चंदेरी दुनिया तत्पर आहेच की. कसं थांबवता येईल हे? मी उपाय शोधते आहे आणि हो आपल्या गोष्टीही….

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार

२५-मे-२०२२

2 thoughts on “गोष्ट

  1. गोष्टींमधू संस्कार किती नकळत आणि सहजतेने होतात हे छान उदाहरणातून दाखवून दिलंयस! मस्त!!

    Liked by 1 person

Leave a comment