कांदेपात पुराण

१.कांद्याची फुलं कोषातून बाहेर येताना; २.बिया धरलेली कांद्याची फुलं; ३.कांद्याची रोपं; ४.तयार कांदेपात

सकाळी फिरताना वाण्याच्या दुकाना बाहेर त्याने मोड आला आहे म्हणून भिरकवलेला कांदा न लाजता उचलणे..तो घरी आणून गच्चीवरील बागेत पेरणे..कालांतराने त्याला कळ्या आणि फुलं येतात, त्यांचा आनंद घेणे..फुलांच्या बहराचे फोटो टिपणे (आणि ते social media वर share करणे)..फुलां मध्ये बिया तयार होऊ देणे..फुलांचा बहर ओसरला की बिया काढून सावलीत मोकळ्या हवेवर वाळत ठेवणे..योग्य वेळी त्या पुन्हा पेरणे..रोपं उगवून आली की मोठया कुंडीत transplant करणे..मांजराने मोठी मोकळी कुंडी बघून त्यात प्रातर्विधी उरकून सर्व लावलेली रोपे मातीत पुरलेली दिसली तर पुन्हा उरलेली रोपे लावणे (हे मांजराला कंटाळा येई पर्यंत पुन्हा पुन्हा करत रहाणे)..त्यानंतर नियमित किंवा गरजे प्रमाणे पाणी देत रहाणे..(वरील वर्णन केलेली प्रक्रियेला जवळ जवळ ६ महिने लागतात, त्यामुळे घाई गडबड न करणे)…भाजी साठी कांदे पात तोडून आणताना एक-दोन पाती कुंडीत तश्याच ठेवून देणे म्हणजे पुढे त्याचे कांदे होण्याची प्रक्रिया बघता येते…कांदे पात आणली की आपल्या आवडी प्रमाणे ती रांधणे…ह्या रीतीने कांदे पाती ची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपन्न!

सौ. शिवांगी चंद्रशेखर दातार

१-ऑक्टोबर-२०२१

Leave a comment